Online Course : Kriya and Meditation for Software Developers || Build your personal meditation routine step-by-step for calm and clear mind, improved focus, and blissful inner connection.

Untitled 1

जीवनाचा दृष्टीकोन बदलणारे १०८ श्वास

भारतीय अध्यात्म विद्येत मंत्राला अतिशय महत्व आहे. मंत्र म्हटला की त्याचा जप हा ओघाने आलाच. जप म्हटला की तो मोजण्यासाठी जपमाळही आलीच. जपमाळेतही किती वैविध्य! रुद्राक्ष, चंदन, तुळशी पासून ते अगदी मोती, पोवळे आणि हकिक पर्यंत चित्रविचित्र अशा गोष्टींनी बनलेले मणी गुंफून ही जपमाळ तयार होते. मंत्र आणि अपेक्षित फलानुसार माळेचा प्रकार भिन्न-भिन्न असतो असे मंत्रशास्त्र सांगते. अशा या जपमालांच्या बाबतीत एक गोष्ट साधारणतः समान असते ती म्हणजे जपमाळेतील मण्यांची संख्या. बहुतेक जपमाळा या १०८ मणी आणि सुमेरू अशा प्रकारे गुंफलेल्या असतात.

आता ही १०८ ही संख्या आली कशी या बद्दल भिन्न-भिन्न मान्यता आहेत. काही जण नऊ ग्रह आणि बारा राशी (९ X १२ = १०८) अशी याची उकल करतात तर काही जण सत्तावीस नक्षत्रे आणि प्रत्येक नक्षत्राचे चार चरण (२७ X ४ = १०८) अशी याची उकल करण्याचा यत्न करतात. अन्य काही जण चौरांशी लक्ष जीवयोनी आणि अष्टधा प्रकृती वगैरे गोष्टींची सांगड घालून या १०८ चा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न करतात. तर अन्य काही जण मातृका शक्तींच्या आधाराने १०८ चा धांडोळा घेतात. यांतील कोणती उकल तुम्ही खरी मानावी हा शेवटी तुमच्या श्रद्धेचा आणि विश्वासाचा प्रश्न आहे.

तुम्हाला जर अजपा ध्यानाची आवड असेल तर या १०८ कडे "अजपा दृष्टीने" सुद्धा आपण पाहू शकतो. अजपा जपाचा मूळ सिद्धांतच आहे:

षटशतानि दिवारात्रौ सहस्त्राण्येकविंशतिः । एतात्संख्यांवितं मंत्रम जीवो जपति सर्वदा ॥

याचा अर्थ असा की दिवस आणि रात्र मिळून चोवीस तासांत मनुष्य प्राणी २१,६०० वेळा श्वासोच्छ्वास रुपी अजपा जप करत असतो. चोवीस तासातील बारा तास दिवस आणि बारा तास रात्र अशी विभागणी केली तर मानव प्राण्याकडे बारा तास "जागृत" अवस्थेचे असतात. परमेश्वराची आराधना करायला निद्राधीन काळापेक्षा हा जागृत काळच उपयोगी असतो हे उघड आहे. याचा अर्थ असा की चोवीस तासात होणाऱ्या २१,६०० पैकी बारा तासात होणारे १०,८०० श्वासोच्छ्वासच असे असतात की जे आपण जाणीवपूर्वक आणि शुभ संकल्पपूर्वक ईश्वरी आराधनेसाठी वापरू शकतो. परंतु दैनंदिन जीवनातील मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वांनाच या बारा तासांतील बराचसा वेळ द्यावा लागतो. त्यामुळे सर्वच्या सर्व म्हणजे १०,८०० श्वास ध्यानावस्थेत घालवणे ही बहुतेकांसाठी अशक्यप्राय गोष्ट असते. परमेश्वर खुप दयाळू आहे. या १०,८०० श्वासांचा शंभरावा भाग अर्थात १०८ श्वास जरी भक्तिपूर्वक अंतःकरणाने त्याला अर्पण केले तरी तो सत्वर प्रसन्न होतो. जपमाळेतील १०८ चे "अजपा निरुपण" हे असे करता येऊ शकते.

खरं म्हणजे अजपा जप करण्यासाठी कोणत्याही जपमाळेची गरज नसते. तो स्वयमेव होणारा उद्घोष आहे. म्हणूनच तर त्याला "अ-जप" म्हणतात. नवीन ध्यानाभ्यासींना मात्र "माळेवरील अजपा" फायदेशीर ठरू शकते. एक म्हणजे श्वास माळेवर मोजल्याने श्वासांवरील जाणीव मन न भरकटता नीट टिकून रहाते. दुसरे असे की वर्ष-दोन वर्षांच्या अभ्यासानंतर त्या जपमाळेत एक प्रकारची अद्भुत उर्जा निर्माण होते. जेंव्हा कधी मन अशांत होते किंवा भौतिक गोष्टींनी ग्रसित होते तेंव्हा ती जपमाळ हातात नुसती धरून पाच-दहा मिनिटे स्वस्थ बसलं तरी मनाला उभारी येते. जपमाळ वापरण्याचा अजून एक फायदा म्हणजे वेळ मोजण्यासाठी मोबाईलचा टायमर, अलार्म किंवा तत्सम गोष्टी वापरण्याची गरज पडत नाही. येथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की अजपा जप करणे म्हणजे काही फक्त श्वास मोजणे नाही. या एका प्रक्रियेत अनेक सूक्ष्म गोष्टींचा समावेश होतो. अजपात मंत्र आहे, त्या मंत्राचा जप आहे, श्वासांवरील जाणीव आहे, सहज प्राणायाम आहे, ध्यान आहे, भाव आहे आणि भक्तीही आहे. हे सगळे अर्थातच नीट शिकून आत्मसात करून घ्यायला हवे.

आजकाल बहुतांश नवीन ध्यान साधकांना वेळेची कमतरता भेडसावत असते. वर सांगितल्याप्रमाणे १०८ जपसंख्या पूर्ण करायला १०-२० मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत नाही. अर्थात तुम्ही जास्त वेळ देऊ शकत असात तर उत्तमच आहे. वेळेची उपलब्धता असेल तर एकापेक्षा अधिक माळांनी (१०८ च्या पटीत) सुद्धा सुरवात करायला हरकत नाही. दिवाळीचे शुभ पर्व सुरु झाले आहे. नवीन अजपा अभ्यासकांसाठी "माळेवरील अजपा" जप सुरु करायला उत्तम काळ आहे. नित्य नियमाने केलेला अजपा जप तुमचा जीवना विषयीचा दृष्टीकोन बदलण्यास सहाय्यक ठरेल. तुम्ही अधिक सकारात्मक बनाल. योग-अध्यात्माविषयी केवळ पुस्तकी गोष्टी चघळण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष अनुभूती मिळवू लागाल.

माणसाला अहंभाव फार पटकन चिकटतो. वरकरणी अध्यात्ममार्गी भासणाऱ्या गोष्टी, जसं मी अमुक संप्रदायाचा, मी तमुक पंथाचा, मी अमक्याचा शिष्य, मी तमक्याचा भक्त वगैरे वगैरे, प्रत्यक्षात फक्त पोकळ अहंकाराची पुटं चढवत असतात. हा सर्वप्रकारचा "अहं" टाकून साधक जेंव्हा विधीपूर्वक "सोहं" ची कास धरतो तेंव्हा त्याला कळतं की हा सहज निसर्गप्रदत्त मार्ग कसा भरभरून अध्यात्मसुख प्रदान करणारा आहे.

असो.

अजपा जप ज्या पराम्बा पराशक्ती कुंडलिनी मुळे घटीत होत असतो ती जगन्माता तुम्हाला अजपा ध्यानाची कास धरण्यास प्रेरित करो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. सॉफ्टवेअर डेव्हलपर्स साठी अजपा ध्यानाची ओंनलाईन सेशन्स. अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 03 November 2021