... आणि कृष्ण हसला

नंदाघरी खूप धावपळ सुरू होती. नुकतेच घरात बाळकृष्णाचे आगमन झाले होते.  यशोदा मातेला तर जराही फुरसत नव्हती. आपल्या घरी साक्षात विष्णुने अवतार घेतला आहे याची तीच्यातील मातेला कल्पनाही नव्हती. तान्ह्या कृष्णाला कुठे ठेवू अन कुठे नको असे तीला झाले होते. शंकर आणि विष्णु एकमेकाचे जीवाभावाचे मित्र. विष्णूने कृष्णावतार घेतला आहे हे कळताच शंकराला रहावले नाही. कृष्णरूपातला विष्णु कसा दिसतो ते प्रत्यक्ष बघण्यासाठी तो नंदाघरी गेला. दारात उभे राहून त्याने यशोदेच्या नावाने पुकारा केला. यशोदेच्या सख्यांनी तीला "दारावर कोणी जोगी उभा आहे" अशी बातमी दिली. कोणीतरी भिक्षा मागण्यासाठी आला असेल असे वाटून यशोदा त्याला भिक्षा घालण्यासाठी गेली. त्या बिचारीला शंकराला काही ओळखता आले नाही. शंकर तीला म्हणाला, "माते! मला भिक्षा नको. मला फक्त तुझ्या तान्ह्या बाळाला बघायचाय." एका व्याघ्रचर्म परिधान केलेल्या, भस्माने माखलेल्या आणि काहीशा भीतीदायक वाटणार्‍या स्मशानयोग्याला आपले बाळ दाखवावे हे तीला पटेना. ती शंकरावर रागावून ओरडली, "अरे जोगड्या! माझ्या कान्हावर मी तुझी नजरही पडू देणार नाही. तू कोणीतरी जादूटोणा करणारा कपटी दिसतोस. मुकाट्याने भिक्षा घे आणि चालता हो कसा." यशोदेच्या या उत्तरावर काहीही न बोलता शंकर शांतपणे गावाच्या वेशीबाहेर निघून गेला.

शंकर निघून जाताच अघटीत घडले. आपल्या मातेने शंकराचा अपमान करून त्याला हाकलून दिले हे कळताच इकडे कान्हाने आक्रोश करायला सुरवात केली. मोठ्या आवाजात भोकाड पसरून कान्हा हातपाय आवेशाने हवेत उडवू लागला.  त्याचे रडणे काही केल्या थांबेना. यशोदा काळजीत पडली. सार्‍या सख्या आणि घरातील अन्य मंडळी जमली. यशोदेच्या सख्यापैकी कोणीतरी म्हणाले, "यशोदे! तू मगाशी त्या जोग्याला घालून पाडून बोललीस. त्यानेच कान्हाला काहीतरी केले असणार. त्याला परत बोलावून आण आणि त्याची माफी माग." यशोदा जरा नाखुशीनेच तयार झाली.

कोणीतरी धावत गावाबाहेर गेले. शंकर एका झाडाखाली धुनी पेटवत बसला होता. झाला प्रकार कळताच शंकर आनंदला. आता विष्णूला भेटायला मिळणार म्हणून त्याने लगेच नंदघरचा रस्ता धरला. शंकर परतल्यावर यशोदा खजीलपणे त्याला म्हणाली, "जोगड्या मला माफ कर. मी मगाशी तुला नाही नाही ते बोलले. तू गेल्यापासून माझा कान्हा जो रडायला लागलाय तो अजूनही थांबायला तयार नाही." शंकराने कान्हाला घेण्यासाठी हात पसरले. कान्हा शंकराच्या कडेवर जाताच रडायचे एकदम थांबला. शंकराच्या अंगाखांद्यावर मोठ्या आनंदाने खेळू लागला. अत्यानंदाने हसू लागला. यशोदेसह सर्वांनाच खूप आश्चर्य वाटले. यशोदा शंकराला म्हणाली, "जोगड्या! तू माझ्या कान्हाला आनंद दिलास. आजपासून तू गावातच रहा म्हणजे माझा कान्हा जेव्हा जेव्हा रडेल तेव्हा तुला त्याला खेळवता येईल."

शंकराने यशोदेची विनंती मान्य केली आणि गावातच मुक्काम ठोकला. असे म्हणतात की आजही शंकर गोकुळात ' नन्देश्वर' रूपाने वास करतो आहे.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 22 August 2011


Tags : शिव कथा भक्ती

Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates