Untitled 1

अष्टमुद्रा, अष्टचक्र आणि अजपा ध्यान

शैव दर्शनाच्या आणि नाथ संप्रदायाच्या सिद्धांतांपैकी एक महत्वाचा सिद्धांत म्हणजे - "पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी". शिव-संहितेत आणि सिद्ध सिद्धांत पद्धतीमध्ये तो स्पष्टपणे मांडलेला आहे. सर्वसाधारण साधक देव, परमात्मा, परमेश्वर या संकल्पनांचा शोध बाह्य जगामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो. साधनेच्या सुरवातीच्या अप्रगत काळात तो एका अर्थी बरोबरही असतो. परंतु योगमार्गावर चालायचे असेल तर समस्त देवी-देवता या मानवी पिंडामध्ये वास करत आहेत, जीव आणि शिव एकच आहेत हे तत्व मनावर ठसणे आवश्यक ठरते. जर हे मुलतत्व साधकाच्या मनावर नीटपणे ठसले नाही तर मग त्या तत्वाची प्रत्यक्ष अनुभूती दूरच राहित हे उघड आहे.

हे लक्षात घेऊनच प्राचीन काळातील योग्यांनी शैव दर्शनातील अनेक योगक्रिया या निव्वळ शारीरिक स्तरावर न ठेवता त्यांत पिंड-ब्रह्म ऐक्याचा संदेश जागोजागी दिलेला आढळतो. गोरखबोध, गोरखबानी यांसारख्या हिंदी सदृश वाटणाऱ्या प्राकृत भाषांमधून विपुल प्रमाणात नाथ साहित्य विखुरले आहे. पुढच्या आठवड्यात २५ ऑगस्ट २०१६ रोजी गोकुळाष्टमी आहे. त्याचेच औचित्य साधून गोरक्षनाथांच्या त्याच साहित्य सागरातून "अष्ट मुद्रा" आणि "अष्ट चक्र" या संकल्पना या लेखात थोडक्यात जाणून घेऊया.

शैव दर्शनातील योगक्रियांमध्ये प्रामुख्याने मंत्र, प्राणायाम, मुद्रा आणि ध्यान यांचा समावेश होतो. पैकी मुद्रा हा साधना प्रकार कुंडलिनी जागृतीच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. गोरक्षनाथ प्रणीत साहित्यात खालील आठ मुद्रांचा उल्लेख आढळतो. गोरक्षनाथांनी वापरलेली भाषा प्राकृत असल्याने ही नावे रूढ संस्कृत नावांपेक्षा खुप वेगळी वाटतात. परंतु त्यातील साधर्म्य चटकन लक्षात आल्यावाचून रहात नाही.

मुलनी मुद्रा :  ही मुद्रा मूलबंध आहे हे उघड आहे. गोरक्षनाथ म्हणतात या स्थानी ब्रह्मदेवाने काम उत्पन्न केला. या मुद्रेच्या प्रदीर्घ अभ्यासाने सर्व वासनांची आटणी होते.

जलश्री मुद्रा : ही मुद्रा नाभि स्थानी घडते. क्रोध हा नाभिस्थानापासून उत्पन्न होतो अशी योगाशास्त्रीय मान्यता आहे कारण नाभि हे अग्नितत्वाचे निवासस्थान आहे. जलश्री मुद्रेचा अभ्यासाने क्रोध जिंकता येतो असे गोरक्षनाथ म्हणतात. ही क्रिया उद्डीयान बंधाशी साधर्म्य दर्शवते.

खीरनी मुद्रा : ही हृदय स्थानी घडते. या मुद्रेच्या अभ्यासाने ज्ञान दीप उजळतो अर्थात ज्ञान प्राप्ती होते असे गोरक्ष अवधूत सांगतात.

खेचरी मुद्रा : ही मुद्रा मुखामध्ये घडते. समस्त योगशास्त्रात खेचरी प्रसिद्धच आहे. मुखात स्वाद आणि अस्वाद यांची निर्मीती होते. खेचरी मुद्रेने या द्वंद्वाच्या पलीकडे जाता येते असे गोरक्षनाथ सांगतात.

 भूचरी मुद्रा : ही मुद्रा नासिकेमध्ये घडते. समस्त सुगंध आणि दुर्गंध यांचा उगम नासिकेमध्ये होतो. या मुद्रेच्या अभ्यासाने साधक गंध या विषयावर ताबा मिळवतो.

चांचरी मुद्रा : ही नेत्रांमध्ये घडते. चांगली किंवा वाईट दृष्यांचे ज्ञान येथेच घडते. या मुद्राभ्यासाने साधक नेत्रजन्य ज्ञानावर ताबा मिळवू शकतो.

 अगोचरी मुद्रा : ही कर्णांमध्ये घडते. शब्द किंवा कुशब्द यांचे ज्ञान येथेच घडते. या मुद्रेच्या अभ्यासाने साधक श्रवणेद्रीयांवर ताबा चालवू शकतो.

 उनमनी मुद्रा : ही मुद्रा सहस्त्रार चक्रामध्ये अर्थात शिरोभागात घडते. साधनेच्या उच्च अवस्थेत साधक सहस्रार चक्रात दिव्य ज्योतीचे दर्शन करत असतो. या मुद्रेद्वारे ज्योतीदर्शनाबरोबरच त्याही पलीकडची अशी तुर्यावस्था अनुभवता येते.

या अष्टमुद्रा वर्णन केल्यावर गोरक्ष नाथ बघा काय छान सांगतात - "इति अष्ट मुद्रा जाए भेव, आपे करता आपे देव". गोरक्षनाथ म्हणतात या आठ मुद्रा करता करता साधक स्वतःच कर्ता आणि स्वतःच देव बनून जातो.

 अष्ट मुद्रांचे नामदर्शन करून झाल्यावर गोरक्षनाथ आता अष्टचक्रांचा निर्देश करत आहेत. अष्टचक्रांबरोबरच त्यात कोणत्या चक्रावर किती "अजपा गायत्री" जप होतो ते ही सांगितले आहे.

आधार चक्र : हे चक्र गुद स्थानी आहे. यालाच मुलाधार चक्र म्हणतात. या ठीकानो "षट शत" अर्थात सहाशे अजपा जप होतो.

इष्टी चक्र : या चक्राची जागा आहे लिंग स्थान. यालाच स्वाधिष्ठान चक्र असेही म्हणतात. येथे "षट सौ" अजपा जप घडतो.

मणिपूर चक्र : याचे ठिकाण म्हणजे नाभी स्थान. या चाक्रापाशी "षट सौ" अजपा जप होतो.

अनाहत चक्र : या चक्राचे स्थान म्हणजे मध्य स्थान किंवा हृदय स्थान. येथेही "षट सौ" एवढ्या संख्येने अजपा जप घडतो. 

विशुद्धी चक्र : विशुद्धी चक्राची जागा आहे कंठ स्थान. येथे "सहस्र" अर्थात एक हजार एवढ्या संख्येने अजपा जप होत असतो.

अग्नि चक्र : या चक्राची जागा आहे नेत्र स्थान. येथेही एक सहस्र अजपा जप होत असतो.

गिनान चक्र : गिनान चक्र म्हणजे ज्ञान चक्र. यालाच ब्रह्मांड स्थान असेही म्हणतात. येथेही एक सहस्र संख्येने अजपा जप होतो.

सूक्ष्म चक्र : या चक्राचे स्थान सहस्रार चक्राच्याही वर आहे. या चक्राला शून्य स्थान असेही म्हणतात.

गोरक्षनाथांच्या या प्राकृत भाषेमधल्या ग्रंथातील विभिन्न चक्रांवरील अजपा जप संख्या एकूण अजपा जपसंख्येशी जुळत नाही. काही ठिकाणी "षट सौ" असा शब्द आहे. त्याचा अर्थ "सहाशे" धरल्यास अजपा जपाची संख्या चुकते. "सौ" म्हणजे "सहस्र" असा अर्थ घेतला तर संख्या बरीचशी जुळते. बहुधा कालौघात झालेला हा पाठभेद असावा. माझ्या नाथ संकेतींचा दंशु मध्ये मी यथायोग्य जपसंख्या आणि अधिक विस्ताराने लिहिले आहे. येथे फक्त गोरक्षनाथांच्या परिभाषेत थोडक्यात विवेचन देणे एवढाच उद्देश आहे.

वरील आठ चक्रांचे आणि त्या ठिकाणी होणाऱ्या अजपा जपाचे विवरण करून झाल्यावर गोरक्षनाथ पुन्हा सांगतात - "एकवीस सहस्र अजपा जप आणि आठ कमळे यांना जाणणारा साधक स्वतः कर्ता आणि स्वतः देव बनून जातो."  शैव दर्शनातील योग येथे एक वेगळीच उंची गाठतो. स्वकर्तुत्वावर विश्वास आणि गुरुवर श्रद्धा असेलला साधक स्वतः अत्युच्च अवस्था प्राप्त करतो असे ठासून प्रतिपादन करणारा असा हा साधना मार्ग आहे.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 17 August 2016


Tags : योग अध्यात्म कुंडलिनी चक्रे साधना नाथ