Untitled 1

अमृतकुंभ आणि बिंदुविसर्ग (प्रश्नोत्तरे - जुलै २०१५)

प्रिय वाचकांनो,

तुम्हाला माहीत असेलच की आजपासून म्हणजे १४ जुलै २०१५ पासून कुंभमेळ्याला सुरवात होत आहे. कुंभमेळा हा साधू, संन्यासी, योगी, आखाडे आणि लाखो भाविकांची गर्दी यांमुळे नेहमीच लोकांच्या कुतुहलाचा विषय असतो. आजचे कुंभमेळ्याचे स्वरूप आणि त्याची उपयोगिता हा एक स्वतंत्र विषय आहे. मूलतः कुंभमेळा हा देव आणि दानव याचे समुद्रमंथन आणि त्यांतून उत्पन्न झालेला अमृतकुंभ यांच्याशी संबंधित आहे.

आपल्या पूर्वजांनी कुंडलिनी योगशास्त्रातील रहस्ये आपापल्यापरीने कथा, ग्रंथ, परंपरा, विधी यांद्वारे जतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुंभमेळ्याचा विषय असलेलं अमृतही त्याला अपवाद नाही. अशी आख्यायिका सांगतात की समुद्रमंथनातून एक अमृतकुंभ उत्पन्न झाला. तो मिळवण्यासाठी देव आणि दानव यांच्यात युद्ध सुरू झाले. युद्धात अमृतकुंभाला काही होऊ नये म्हणून सूर्याने मदत केली. सूर्याच्या उष्णतेपासून अमृताचे रक्षण करण्यासाठी चंद्राने आपले शीतल किरण अमृतकुंभावर टाकले. वरकरणी ही एक दंतकथा वाटेल पण त्यात योगशास्त्रातील गूढ रहस्य दडलेलं आहे.

कुंडलिनी योगशास्त्रानुसार मेंदूत असे एक स्थान आहे जेथून निरंतर अमृताचा वर्षाव होत असतो. ते स्थान म्हणजे बिंदुविसर्ग नावाचे चक्र. सर्वसाधारणपणे योगग्रंथांत सात चक्रांचा उल्लेख आढळतो. परंतु आगमग्रंथांमध्ये या सात चक्रांच्या बरोबरीने बिंदुविसर्ग नामक चक्राची महतीहि सांगितलेली आढळते. भौतिक बाह्य शरीराच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर डोक्यावर जेथे शेंडी ठेवली जाते तेथे हे चक्र आहे. येथून एक सूक्ष्म स्त्राव सतत पाझरत असतो अशी योगशास्त्रीय मान्यता आहे. मागे मी खेचरी मुद्रेविषयी एक लेख लिहिला होता. त्यात खेचरी मुद्रेने योगीजन जे अमृत प्राशन करतात त्याचा उल्लेख आहे. ते अमृत म्हणजे बिंदुविसर्गातील हा स्त्राव होय. थोडक्यात सांगायचे तर योग्यांचा अमृतकुंभ म्हणजे हे बिंदुविसर्ग! बिंदुविसर्ग आणि "नाद" यांचा घनिष्ठ संबंध आहे. हठयोगात आणि लययोगात बिंदुविसर्ग चक्र जागृत करण्याच्या काही खास साधना आहेत. काही मुद्रा विशेषरूपाने या चक्रावर प्रभाव टाकतात. विशुद्धी चक्राच्या साधनांमुळेही हे चक्र उत्तेजित होतं कारण बिंदुविसर्गाचा एक trigger point म्हणजे विशुद्धी चक्र.

आता सूर्य-चंद्रांकडे वळू. कुंडलिनी योगशास्त्रानुसार चंद्र हा मेंदूकडील भागात तर सूर्य हा मणिपूर चक्रात स्थानापन्न आहे. बिंदुविसर्गात जे अमृत आहे त्याचा स्त्रोत हा चंद्र मानला गेला आहे. या चंद्राकडील अमृत अर्थातच शिवतत्वाकडून प्राप्त झालेलं आहे. मेंदूतील चंद्राने स्त्रवलेलं हे अमृत नाभीस्थानातील सूर्य भक्षण करतो अशी संकल्पना आहे. ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायातही या चंद्रामृताचा उल्लेख संत ज्ञानेश्वरांनी केलेला आहे. चंद्राने स्त्रवलेलं अमृत सूर्यापासून कसं वाचवायचं यावर हठयोगात भर दिलेला आहे. हठयोगातील काही बंध, विपरीतकरणी मुद्रा, योनिमुद्रा यांसारख्या योगक्रिया अमृताच्या रक्षणासाठी महत्वाच्या मानल्या गेल्या आहेत. आता तुम्हाला कुंभमेळयाची कथा योगशास्त्राच्या दृष्टिकोनातून अधिक चांगल्या प्रकारे कळू शकेल. चंद्र अमृताचे रक्षण करतो म्हणजे काय वगैरे संदर्भ योगगर्भ कसे आहेत ते सहज समजण्यासारखे आहे.

आता या महिन्याच्या वाचकांच्या निवडक प्रश्नांकडे वळूया.

प्रश्न

नमस्कार गुरुजी,
मी श्री स्वामी समर्थांची उपासना करतो. तसेच काही स्तोत्र व मंत्रही म्हणतो. रोज जवळजवळ दिड-पावणेदोन तास मी हे करतो. पण मला अजूनही मी बालवाडीत असल्यासारखे वाटते (अध्यात्म या विषायात).  मला गुरु नाही. काही ज्येष्ठ साधक मला सांगतात त्याप्रमाणे मी साधना करतो. तरी जप कसा करावा? अजपा साधना कशी करावी? आपली अध्यात्मिक प्रगती होत आहे की नाही हे कसे ओळखावे? असे अनेक प्रश्न माझ्या अज्ञानी मनात येतात. याबद्दल आपण जर मार्गदर्शन केले तर मी आपला शतशः ऋणी असेन.

उत्तर

प्रत्येक साधक हा बालवाडीपासूनच सुरवात करत असतो. त्यात कमीपणा वाटण्यासारखे किंवा चुकीचे असे काहीच नाही. तुमच्या प्रश्नावरुन असं दिसतय की तुम्ही तुमचे उपास्य निवडलेलं आहे. फक्त आपल्या साधनेविषयी आणि प्रगती विषयी तुम्हाला शंका आहे.

प्रथम तुमच्या साधनेकडे वळू. तुम्ही जप करतच आहात. भक्तिमार्गातला जप (ज्याला सर्वसाधारणपणे नामस्मरण किंवा नामजप म्हणतात) आणि मंत्रशास्त्रातला जप यात बराच फरक असतो. नामस्मरणाला न्यास, संकल्प, पुरश्चरण, प्राणायाम, हवन असे विधिविधान असत नाही. परंतु मंत्रशास्त्रातील काही पत्थ्ये नामस्मरणालाही फायदेशीर ठरतात. त्यातील काही महत्वाची खालीलप्रमाणे :

 • जप हा ठराविक वेळी आणि ठराविक संख्येने करावा. दिवसाच्या अन्य वेळी अथवा उठता-बसता जे नाम घेतले जाईल त्याचा समावेश या संख्येत करू नये.
 • जप करताना रुद्राक्ष, तुळशी किंवा चंदनाची माळ वापरावी.
 • जप करताना तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला करावे.
 • जप शक्यतो मानसिक स्वरुपात करावा. जमत नसेल तरच पश्यन्ति किंवा वैखरीत करावा. 
 • जपाची माळ आणि आसन अन्य कारणासाठी वापरू नये किंवा गळ्यातही घालू नये.
 • आपल्या इष्ट देवतेसमोर निरांजन किंवा तुपाचा दिवा लावून जपाला बसावे.
 • जप पूर्ण झाल्यावर तो इष्ट देवतेला अर्पण करावा.

अजपा साधनेची सविस्तर माहीत या वेब साईटच्या मुख्यपृष्ठावर दिलेली आहे. ती नीट वाचावी आणि साधना समजावून घ्यावी. जर जप आणि अजपा साधनेविषयी अधिक माहिती वाचण्याची इच्छा झाली तर नाथ संकेतींचा दंशू हे पुस्तक अवश्य वाचावे.

साधनेसंदर्भात जेष्ठ साधकांचा सल्ला घ्यायला काहीच हरकत नाही. परंतु त्यांची या मार्गावरील प्रगति किती आहे त्याची खात्री करावी. त्यांचा सल्ला स्वतःच्या बुद्धीने पडताळून पहावा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की प्रत्येकाची कर्म आणि अनुभव हे वेगळे असतात. दुसर्‍यांशी तुलना किंवा अंधानुकरण करणे टाळावे.

आध्यात्मिक प्रगतिची लक्षणे प्रत्येक साधकात भिन्नभिन्न वेळी आणि भिन्नभिन्न प्रकारे प्रकट होत असतात. त्यामुळे अमुक-अमुक लक्षणे दिसली म्हणजेच प्रगती होत आहे असं नाही. तरीही सर्वसाधारणपणे खालील लक्षणे दिसू लागली तर साधना योग्य दिशेने कार्य करत असे असे समजण्यास हरकत नाही.

 • दैनंदिन नित्यकर्म हातून नीट घडू लागणे. वृत्ती समाधानी बनणे.
 • मन शांत रहाणे. क्षुल्लक गोष्टींनी मनाचा पोत न बिघडणे.
 • साधनेतून एक वेगळाच वर्णन न करता येण्याजोगा आनंद प्राप्त होणे.
 • आपल्या इष्ट दैवत्तेवरील भक्ति वृद्धींगत होणे.

असे काही साधक पाहण्यात येतात की जे वीस-तीस वर्षे साधना करूनही आपल्या मार्गावर समाधानी नसतात. मी म्हणेन की प्रगतीची सगळ्यात मूलभूत खूण म्हणजे आपल्या साधनेवर आणि मार्गावर पूर्णतः समाधानी असणे. जोवर आपला मार्ग आपल्याला इच्छित ठिकाणी नेईलच अशी खात्री होत नाही तोवर मग बाकीच्या चिन्हांबद्दल बोलायलाच नको. तेव्हा प्रथम हे बघा की तुमची साधना तुम्हाला समाधान देत आहे का. केवळ यांत्रिकपणे साधना करण्यात काही अर्थ नाही. गरज वाटल्यास साधनेत आवश्यक ते बदल करा. मग योग्य वेळ येताच एक दिवस प्रगतीची अन्य लक्षणे प्रकट होतीलच यात शंका नाही.

जगदंबा कुंडलिनी तुम्हाला योग्य मार्ग दाखवो ही सदिच्छा.

प्रश्न

मी ४५ वर्षीय विवाहित असून मला एक १४ वर्षाचा मुलगा आहे. मी ईलेक्ट्रीकल इंजिनिअर असून मार्केटिंग मध्ये काम करत आहे. कुंडलिनी जागृती विषयी अधिक माहिती हवी असून ती शिकण्याची तीव्र ओढ मनामध्ये आहे तरी कृपया या संबंधी योग्य ते मार्गदर्शन करण्याची विनंती आहे.

उत्तर

कुंडलिनी शक्तिविषयी या वेब साईटच्या मुख्यपृष्ठावर विस्ताराने माहिती दिलेली आहे. या वेब साईटवरील अन्य लेखांमध्येही जागोजागी ती आलेली आहे. याकारणाने येथे परत त्याची पुनरावृत्ति करत नाही. तुम्ही इलेक्ट्रिकल क्षेत्रातील आहात तेव्हा तुम्हाला तुमच्याच क्षेत्रातील एक उदाहरण देतो.

समजा एक विद्युत जनित्र आहे आणि तो एका मोठ्या सर्किटला विद्युत पुरवठा करण्यासाठी जोडलेला आहे. जेंव्हा ते सर्किट बंद असते तेंव्हा त्या जनरेटर काहीच लोड असणार नाही. त्या स्थितीत विजेची शक्ति किंवा ऊर्जा त्या जनरेटर मध्ये सुप्त स्वरुपात असते. जेंव्हा ते सर्किट सुरू होतं आणि वीज वापरू लागतं तेंव्हा जनरेटर मधील सुप्त ऊर्जा विजेच्या रूपाने सर्किट मधून खेळू लागते. जनरेटर मध्ये ऊर्जा बाहेरून आली का? अर्थातच नाही. ती ऊर्जा जनरेटर मध्येच potential energy या स्वरुपात होती आणि मग लोड येताच ती kinetic energy या स्वरुपात प्रकट झाली.

अगदी हाच प्रकार कुंडलिनी शक्तीचा असतो. मानवी शरीरातच ती सुप्तावस्थेत असते. विविध योगासाधंनांनी तिला जागृत केले जाते आणि सहस्रार चक्राकडे (मेंदूकडे) प्रवाहीत केले जाते. वरील जनरेटरच्या उदाहरणात जनरेटर मधील सुप्त ऊर्जा सर्किट मध्ये प्रवाहीत होते हे आपण पाहिले. पण मुळात तो जनरेटर सुरू करण्यासाठी थोडीशी ऊर्जा बाहेरून द्यावी लागते. हा जो बाह्य ऊर्जेचा "धक्का" असतो त्याला कुंडलिनी योगमार्गावर शक्तिपात असे म्हणतात. साधारणतः गुरु आपल्या शिष्याला शक्तिपात देत असतो. प्राचीन नाथ संप्रदायात आणि शैव दर्शनात शक्तिपाताला आत्यंतिक महत्व आहे. शक्तिपातानंतर साधकाचा "जनरेटर" सुरू होऊन नाड्यांमध्ये आणि चक्रांमध्ये प्राणरूपी ऊर्जा खेळू लागते.

कुंडलिनी योगमार्गावर अनेक साधना आहेत. त्यापैकि जप आणि अजपा यांची सविस्तर माहीत या वेब साईटच्या मुख्यपृष्ठावर दिलेली आहे. ती नीट वाचावी आणि साधना समजावून घ्यावी. जर जप आणि अजपा साधनेविषयी अधिक माहिती वाचण्याची इच्छा झाली तर नाथ संकेतींचा दंशू हे पुस्तक अवश्य वाचावे.

जगदंबा कुंडलिनी तुम्हाला योग्य मार्ग दाखवो ही सदिच्छा.


सदा शिवचरणी लीन,
बिपीन जोशी

Posted On : 14 July 2015


Tags : योग कुंडलिनी