Untitled 1

"शिव गोरक्ष" आणि अजपा जप

नाथ संप्रदाय हा साधना प्रधान मार्ग आहे. नुसत्या पुस्तकी पांडित्याला किंवा नुसत्या तात्विक चर्चाचर्वणांना या मार्गावर स्थान नाही. आधुनिक काळात योग-अध्यात्म विषयातील ज्ञान बरंच सुलभपणे उपलब्ध आहे. परंतु या सहजपणे उपलब्ध असलेल्या ज्ञानाचा वापर योग्य प्रकारे जो करतो तोच योगमार्गावर टिकाव धरू शकतो. अन्यथा फॅशन अथवा फॅड म्हणून अध्यात्म चघळणारेच आजकाल जास्त दिसून येतात. ज्या साधकाला नाथयोगात खरोखर प्रगती करायची आहे त्याने फारशा मत-मतांतरात न शिरता लवकरात लवकर साधनारत व्हावे हेच त्याच्यासाठी श्रेयस्कर आहे.

नवीन साधकांना नाथयोग किचकट आणि बराच गुंतागुंतीचा वाटू शकतो. अशांनी निदान सुरवात करतांना सोप्या आणि दैनंदिन जीवनात सहज आचरणात आणता येतील अशाच साधना कराव्यात. नाथ संप्रदायाच्या काही साधना कडक आहेत. शरीर आणि मन तयार न करता अशा साधना केल्या तर फायदा होण्यापेक्षा तोटाच होण्याची शक्यता अधिक. अजपा जप ही नाथ संप्रदायाची अतिशय महत्वाची साधना आहे हे मी अनेक लेखांमधून सांगितले आहे. या छोट्याशा लेखात या साधनेचा एका नाममंत्राशी मेळ कसा घालायचा ते पाहू.

नाथ संप्रदायातील प्रमुख नाथांचे - नवनाथांचे - नामस्मरणाचे मंत्र संप्रदायात लोकप्रिय आहेत. परंतु त्यातही गोरक्षनाथांचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. गोरक्षनाथांचे बीजमंत्र, गायत्री मंत्र आणि नाममंत्र असे विविध मंत्र आहेत. त्यापैकी बीजमंत्र आणि गोरक्ष गायत्री मंत्र हा विषय मंत्रशास्त्राशी निगडीत असल्याने त्याविषयीचे सविस्तर विवरण येथे करत नाही. येथे आपण गोरक्षनाथांचा नाममंत्र जाणून घेऊ. गोरक्षनाथांचा नाममंत्र आहे : 

ॐ शिव गोरक्ष किंवा ॐ शिव गोरक्ष योगी

एकाच नाम मंत्राची दोन रूपे वर दिलेली आहेत. एक षडाक्षरी आहे आणि एक अष्टाक्षरी. त्यापैकी कोणता नाममंत्र वापरायचा हे खरं तर आपापल्या गुरु कडूनच जाणून घ्यायला पाहिजे. पण ते शक्य नसल्यास आपल्या आवडीप्रमाणे कोणताही एक निवडावा. एकदा निवडल्यावर तो बदलू नये.

स्कंद पुराणानुसार आणि नाथ परंपरेनुसार गोरक्षनाथांना भगवान शंकराचा अवतार मानले आहे. भगवान शंकरच आदिनाथ रूपाने नाथ संप्रदायाचे जनक आहेत. शिवमय झालेल्या गोरक्षनाथांचे स्मरण 'शिव गोरक्ष' या नामातून ध्वनीत झाले आहे. या मंत्राविषयी गोरक्ष बानी नामक ग्रंथात असा उल्लेख आढळतो :

शिव गोरक्ष यह मंत्र है सब सुखो का सार |  जपो बैठ एकांत मै तन की सुधी बिसार ||
शिव गोरक्ष नाम मै शक्ती भरी अगाध | लेने से है तर गये नीच कोटी के व्याध ||

गोरक्ष नाममंत्राचा जप करण्यासाठी शक्य असल्यास रुद्राक्षाची जपमाळ वापरावी. आसन लोकरीचे असावे. त्यावर सुती वस्त्र टाकावे. तोंड पूर्वेला किंवा उत्तरेला करावे आणि शांत चित्ताने जप करावा. समोर गोरक्षनाथांचे चित्र किंवा भगवान शंकराचे चित्र किंवा शिवलिंग असल्यास उत्तम. म्हणजे जप करतांना डोळे उघडल्यास नजर इतरत्र जाण्याऐवजी विनासायास नाथांवर स्थिरावते. कमीत कमी एक माळ तरी जप करावा. जास्त करायचा असल्यास विषम संख्येने माळा पूर्ण कराव्यात. साधना कधीही केली तरी चालते पण शक्यतो वेळ सारखी सारखी बदलू नये. जप पूर्ण झाल्यावर येत असल्यास गोरक्षनाथांना नाथपंथी "आदेश" करावा.

लक्षात घ्या की ही साधना सोपी असली तरी ती नाथपंथी साधना आहे. ती संप्रदायाविषयी आदर आणि श्रद्धा बाळगूनच करायची आहे. काहीतरी कारणे काढून, वेळ नाही, एकांत नाही, असल्या सबबी सांगून यात शीघ्र प्रगती होणार नाही हे पक्के ध्यानात ठेवावे. जर सर्व पत्थ्ये पाळून आणि भक्तिपूर्वक अंतःकरणाने जप केला तर योग्य वेळ येताच हळू हळू अनुभूती येऊ लागेल. पण अनुभव लवकर आला नाही तरी निराश होऊ नये. साधना एक 'नाथ सेवा' म्हणून करावी. नाथांच्या कृपेखेरीज त्यातून कसलीच अपेक्षा ठेऊ नये. असो.

वर सांगितल्या प्रमाणे जप झाला की काही वेळ डोळे बंद करून नुसते बसून राहावे. जपमाळ एक तर बाजूला ठेवावी किंवा दोन्ही हातात धरून ठेवावी. जपाने शांत झालेले मन साक्षी भावाने पहावे. त्यानंतर माळ बाजूला ठेवावी. आवश्यकता वाटल्यास आसन, बैठक नीट करावी. पाय आखडले असतील तर मोकळे करावेत. मग परत आसनस्थ होऊन अजपा जप सुरु करावा. गोरक्ष नाममंत्राचा जप जेवढा वेळ केला तेवढा किंवा त्यापेक्षा जास्त वेळ अजपा साधना करावी. अजपा साधनेविषयी विस्तृत माहिती या वेब साइटच्या मुख्यपृष्ठावर दिलीच आहे. गोरक्ष बानीत अजपा साधने विषयी खालील उल्लेख आढळतो :

अजपा जपे शून्य मर धरे, पांचो इंद्रिय निग्रह करे | ब्रह्म अग्नी में होमे काया, तासू महादेव बंदे पाया ||

याचा अर्थ असा की साधकाने इंद्रिय निग्रहपूर्वक साधनारत होणे आवश्यक आहे. अशा प्रकारे अजपा साधना करून मनाला शून्य करणे अर्थात अमनस्क योग साधणे हे नाथ योगाचे परम उद्दिष्ठ आहे. असा साधक ब्रह्मरूपी अग्नीत शरीररूपी काष्ठांचे हवन करत असतो. अशा साधनारत योग्याला महादेव सहज प्रसन्न होतो.

आदिनाथाच्या आणि गोरक्षनाथांच्या चरणी आदेश करून या लेखाला पूर्णविराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 03 February 2016


Tags : योग अध्यात्म शिव साधना नाथ