Untitled 1

योग्यासाठी बाह्य आणि अंतर्गत अग्नीचे महत्व

हठयोग प्रदिपिकेत योगी स्वात्मारामाने योग्यांसाठी आवश्यक असलेले दहा यम आणि दहा नियम सांगितलेले आहेत. त्यात उल्लेखिलेल्या दहा दहा नियमांमध्ये जप आणि हवन यांना स्वतःचे असे खास महत्व आहे. एक लक्षात घ्यायला हवे की प्राचीन काळाच्या हठयोग्यांना आणि नाथ योग्यांना मंत्रशास्त्राची उत्तम जाण असे. किंबहुना भगवान शंकराने सांगितलेला योग हा मंत्रयोग, हठयोग, लययोग, आणि राजयोग अशा चार शाखांमध्ये विराजमान झालेला आहे. त्यामुळे योग्यांना मंत्रशास्त्राची यथायोग्य माहिती असणे आवश्यक आहे. योगशास्त्र हे पूर्णतः सात्विक जीवनशैलीवर आधारले असल्याने मंत्रशास्त्रातील सात्विक भागच आपल्याला येथे अभिप्रेत आहे.

कोणताही मंत्र जपायला सुरवात केल्या केल्या लगेच फळ प्रदान करत नाही. आधी त्या मंत्राला विधिवत सिद्ध करावे लागते. मंत्राला सिद्ध करणे म्हणजे त्यात सुप्त रूपाने वास करत असलेले ईश्वरी चैतन्य जागृत करणे. हे चैतन्य जागृत करण्यासाठी मंत्रशास्त्रात अनेक विधी आणि उपाय आहेत. त्यांतील एक महत्वाचा विधी म्हणजे हवन. मंत्र शास्त्रानुसार जपाचा एका विशिष्ठ संख्येने जप करून त्या संख्येच्या एक दशांश एवढ्या संख्येने हवन केले जाते. हवन करतांना अनेक गोष्टींची आहुती दिली जाते. त्यात फार खोलात जायची आपल्याला गरज नाही. पण लक्षात घेण्याची गोष्ट अशी की अग्नि शिवाय जप साधनेला लवकर पूर्णता प्राप्त होत नाही अशी मान्यता आहे.

भारतीय अध्यात्मात अग्नि उपासनेला अत्यंत महत्वाचे मानले गेले आहे. वैदिक उपासना पद्धतीत यज्ञ महत्वाचा मानला जातो. अग्निहोत्र सारखे विधीही अग्नीचे महत्व अधोरेखित करतात. आगम-निगमोक्त उपासना पद्धतीत हवन महत्वाचे मानले जाते. नाथ संप्रदयात प्रसिद्ध असलेली धुनी हे सुद्धा अग्नीचेच एक स्वरूप आहे. एवढंच काय पण सर्वसामान्यपणे घरोघरी देवघरात लावले जाणारे समई, पणती किंवा निरांजन असे दिवे हे सुद्धा अग्नि उपासानेचेच एक स्वरूप आहे.

अग्नि एवढा महत्वाचा मानण्याचे कारण काय बरे? मनुष्य आपल्या विविध इच्छा आकांक्षांची पूर्ती व्हावी या इच्छेपायी विविध देवी-देवतांची उपासना करतो. मोठ्या भक्तीने तो आपल्या इष्टदैवतेला काही अर्पण करू इच्छितो. पण प्रश्न असा की मनुष्य ज्या वस्तू अर्पण करू इच्छित असतो त्या सर्व जड भौतिक स्वरूपात असतात. त्या काही थेट त्या देवतेपर्यंत पोहोचत नाहीत. त्या वस्तू सूक्ष्म रूपाने त्या त्या देवतेपर्यंत पोहोचवण्याचे काम अग्नि करतो. थोडक्यात जी वस्तू देवतेला अर्पण करायची ती प्रथम अग्निला समर्पित करावी आणि मग अग्नीने ती त्या देवतेप्रत पोचती करावी असा क्रम असतो.

या लेखाशी संलग्न व्हिडिओ

जर सूक्ष्म विचार केला तर अग्निचे दोन महत्वाचे गुणधर्म आपल्याला जाणवतात. एक म्हणजे प्रखर प्रकाश आणि दुसरा म्हणजे दाहकता. अध्यात्मदृष्टीने विचार केल्यास प्रकाश म्हणजे ज्ञान आणि दाहकता म्हणजे साधकाच्या शरीर-मनात साचलेली अशुद्धी भस्मसात करून त्याला निर्मळ करण्याची क्षमता.

ज्यांना भौतिक सुखोपभोगाची इच्छा आहे त्यांच्यासाठी वरील हवन प्रकारच आवश्यक मानला गेला आहे.  परंतु ज्याला कोणत्याही भौतिक इच्छेसाठी ईश्वराराधाना करण्यात रस नाही त्याला हवन कुंडातील बाह्य अग्नीपेक्षा श्रेष्ठ असा "अंतर्गत अग्नि" उपलब्ध आहे. भगवत गीतेत सांगितलेला प्राणयज्ञ अर्थात प्राणाचा अपानात आणि अपानाचा प्राणात होम करणे म्हणजे त्याचेच एक स्वरूप आहे.

ज्यांना अजपा योगाचे सूक्ष्म स्वरूप कळलेले आहे त्यांना तर हा अंतरीचा यज्ञ अगदी सुकर आणि सुलभ आहे. अजपा हा एका अर्थाने "जप" आहे आणि जप म्हटले की "हवन" ओघाने आलेच. अजपा साधनेत पूर्णता तेंव्हाच येईल जेंव्हा साधकाला आंतरिक जप आणि आंतरिक हवन या मागील सूक्ष्म रहस्य ध्यानी येईल. चित्ताची मलीनता मग आपोआप दूर होऊ लागेल. ज्ञानाचा प्रकाश स्वयमेव प्रकट होऊ लागेल. त्यासाठी गरज आहे ती हे रहस्य गुरुमुखातून नीट उमगून घेण्याची आणि प्रत्यक्ष साधनारत होण्याची. अन्य उपाय नाही.

 हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे मागील आठवड्यात आपण सर्वांनी होळी साजरी केली. उपासना मार्गात काही दिवस विशेष महत्वाचे मानले जातात. उदाहरणार्थ दिवाळीची रात्र, काही विशिष्ठ ग्रहण काल, शिवरात्र, गुप्त नवरात्र वगैरे. होळी सुद्धा त्यांपैकी एक महत्वाचा दिवस आहे. होळीचा अग्नि हा सुद्धा अत्यंत पवित्र आणि महत्वाचा मानला गेला आहे. अजपा साधकाने लक्षात ठेवायची गोष्ट ही की या दिवशी सायंकाळी किंवा रात्री अजपा साधना आणि मिळालेला गुरुमंत्र यांचा अभ्यास न कंटाळता अवश्य केला पाहिजे. तो करत असतांना ज्ञानाग्नी आणि षडरीपुंचा नाश हे उपासनेचे उद्दिष्ट नजरेसमोर असले पाहिजे.

असो.

सुरु झालेल्या या आठवड्यात ईश्वरीतत्वाचा ज्ञान प्रकाश सर्वांना योग्य वाट दाखवो या सदिच्छेसह थांबतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 05 March 2018