संपूर्ण योग-वेदांताचे सार श्रीशं

पशू, पाश आणि पति

अध्यात्मशास्त्रातील प्रत्येक दर्शन स्वतःची अशी एक वैचारीक बैठक प्रस्तुत करत असते जीच्यावर त्या दर्शनातील साधनामार्ग अवलंबून असतो. शैव दर्शन हे अत्यंत प्राचीनतम असे दर्शन आहे हे आपण मागेच पाहिले आहे. शैव दर्शनाचे अनेक भेद आहेत जसे काश्मिरी शैवदर्शन, वीर शैवदर्शन, पाशुपत मत, थिरूमुलारचा शैवसिद्धांत, गोरक्षनाथांचा सिद्ध सिद्धांत इत्यादी. काळानुसार शैव दर्शनही अधिकाधिक सखोल आणि विस्तृत झालेले आपल्याला दिसते. शैव दर्शनांच्या सर्वच शाखांमध्ये 36 शिवतत्वे ग्राह्य मानली गेली आहेत. कपिलमुनी प्रणित सांख्य तत्वज्ञानाच्या चोवीस तत्वांमध्येच भर घालून शैवांची ही 36 तत्वे बनली आहेत. ही 36 तत्वे सामान्य साधकाला समजण्यास काहीशी किचकट वाटतात आणि खरं तर सुरवातीला त्याच्या साधनेला ही तत्वे सखोलपणे माहित असण्याची गरजही नसते. म्हणूनच येथे मी ह्या 36 तत्वांविषयी न लिहिता शैव दर्शनाचा मुळ गाभा असलेल्या तीन तत्वांविषयी लिहिणार आहे. ही तीन तत्वे म्हणजे - पशू, पाश आणि पति.

ब्रह्मदेवापासून ते किडामुंगीपर्यंत जे जे कोणी जीवधारी आहेत त्यांना शैव दर्शनात पशू असे संबोधण्यात येते. साधारणत: पशू हा शब्द वाईट प्रवृत्तीचा अशा अर्थी वापरला जातो. हा अर्थ शैव दर्शनाला अभिप्रेत नाही. पशू या शब्दाने बद्ध जीव असा अर्थ सुचवायचा आहे. प्रत्येक जीवधारी मग तो कोणीही असो हा परमेश्वरी नियमांनीच बांधलेला असतो. त्याला स्वातंत्र्य एका ठरावीक मर्यादेपर्यंतच असते. एक व्यावहारीक उदाहरण घेऊ. समजा एक कुत्रा आहे. त्याच्या मालकाने त्याला साखळीने बांधून ठेवले आहे. आता तो कुत्रा आपल्या मर्जीनुसार हालचाल तर करू शकेल पण एका मर्यादेपर्यंतच. जर त्याच्या मनात आहे की काही अंतरावर पडलेला पोळीचा तुकडा खावा तर तो तसे करू शकेल कारण त्याच्या मालकाने बांधलेली साखळी त्याला तेथपर्यंत पोहोचू देईल. परंतू जर त्याला घराबाहेर जावे असे वाटले तर मात्र तो तसे करू शकणार नाही कारण त्याच्या मालकाने साखळीद्वारे त्याच्या हालचालींच्या कक्षेवर निर्बन्ध घातलेले आहेत. प्रत्येक सजीव प्राण्याचेही काहीसे असेच आहे. त्याला स्वातंत्र्य तर आहे पण ते स्वातंत्र्य तो प्रकृतीच्या नियमांना अनुसरूनच वापरू शकतो.

सजीव प्राण्याचे स्वातंत्र्य मर्यादीत करणार्‍या तत्वाला पाश असे म्हणतात. पाश म्हणजे बन्ध. हा पाश अन्य दर्शनांमध्ये माया, निसर्ग वा प्रकृती म्हणून ओळखला जातो. हा पाश शंकराच्या शक्तीपासून निर्मीत असतो. म्हणजेच आदिशक्ती शंकराच्या आज्ञेने जीवांना अज्ञानात, बन्धनात ठेवते. या पाशामुळे जीव भौतिक गोष्टींमध्येच गुरफुटून राहतो. विषयोपभोग म्हणजेच आयुष्याचे परम कर्तव्य अशी त्याची समजून बनते. आदिशक्तीचा पाश तोडल्याशिवाय मुक्ती नाही हे उघडच आहे. आता हा पाश तोडायचा कसा? तर साधना आणि अनुग्रह यांद्वारे. पैकी साधना हा घटक प्रत्येक साधकाच्या इच्छेवर अवलंबून असतो. साधनेद्वारे साधक शरीरांतर्गत शक्तीचे रूप जे कुंडलिनी तीला जागृत करत असतो आणि स्वप्रयत्नाने शिव-शक्ती सामरस्य घडवण्यासाठी क्रियाशील असतो. अनुग्रह मात्र परमेश्वराकडून प्राप्त व्हावा लागतो. परमेश्वरी हस्तक्षेपाशिवाय साधकाच्या प्रयत्नांना फल प्राप्त होत नाही. 

पशू पाशाने बद्ध आहे हे खरे पण ह्या पाशबन्धनात पशूला मुळात घातले कोणी? तर शिवाने वा परमेश्वरावे वा पतिने. पति या शब्दाचा अर्थ स्वामी, मालक, नाथ असा आहे. अनेक पुराणग्रंथांत आणि आगमग्रंथांत शंकराला पाच मुखे असल्याचा उल्लेख आढळतो. ही पाच मुखे म्हणजे परमेश्वराची पाच कार्ये - निग्रह, उत्पत्ती, स्थिती, लय आणि अनुग्रह - आहेत. निर्गूण, निराकार, अनादी-अनंत अशा परमशिवाच्या मनात अशी इच्छा निर्माण झाली की आपण अनेक रुपांत नटावे. परमेश्वरी शक्ती तीन प्रकारची असते - इच्छा शक्ती, क्रिया शक्ती, ज्ञान शक्ती. या तीन शक्तींचा वापर करून परमशिवाने स्वतःलाच अनेक रुपांत वाटले. हे अनंताचे सांत असे रुपांतर म्हणजेच निग्रह. एकाच शिवतत्वाचे असंख्य भाग झाले आणि प्रत्येक भागापासून एक जीव निर्माण झाला. हा जीव शिवापासून निर्माण झाला असल्याने या जीवालाही त्रिशक्ती प्राप्त झाल्या पण मर्यादीत स्वरूपात. ही झाली उत्पत्ती. निर्माण झालेल्या जीवाचे पालनपोषण व्हावे म्हणून परमेश्वराने सोय करून ठेवली. ही झाली स्थिती. जीव आपले आयुष्यमान संपल्यानंतर मरण पावतो आणि परत नव्या रूपात जन्माला येतो. हे Recycling लयामुळेच शक्य होते. बहुतांश जीव उत्पत्ती, स्थिती आणि लय या अवस्थांमध्येच निसर्गनियमांनुसार फिरत असतात. काही जीव मात्र असे असतात की ते प्रकृतीवर मात करतात आणि जन्ममृत्युची साखळी तोडून अनंत अशा परमशिवामध्ये विलीन होतात. त्यांचे असे विलीन होणे शिवाच्या इच्छेवरच अवलंबून असते. यालाच अनुग्रह असे म्हणतात. ही पंचकार्ये ज्याच्या आधीन असतात तो पति. म्हणूनच शंकराचे एक नाव पशुपति अर्थात पशूंचा पति असे आहे.

वरील तात्विक विवेचन जर कठीण वाटत असेल तर एक व्यावहारीक उदाहरण घेऊ. असे समजा की एक मातीचा मोठा ढिगारा ठेवलेला आहे. त्याला ना काही विशिष्ठ आकार आहे ना उद्देश. फक्त मातीचा भलामोठा ढीग एवढेच त्याचे वर्णन करता येण्यासारखे आहे. हे झाले निर्गुण, अनंत परमशिव तत्व. आता असे समजा की त्या मातीच्या ढीगार्‍यातून माती घेऊन, ती कालवून त्यांचे अनेक गोळे कले आहेत. हे झाले एका परमशिवाचे अनेक भागात रुपांतर अर्थात निग्रह. आता असे समजा की प्रत्येक गोळ्याला आकार देऊन एक एक मातीचे भांडे बनले आहे. ही झाली उत्पत्ती. आता असे समजा की ही बनलेली भांडी सुकण्यासाठी आणि फुटू नयेत म्हणून नीट काळजीपूर्वक एका उंच जागी ठेवली आहेत. ही झाली स्थिती. आता असे समजा की एकाद्या भांड्याचा आकार पसंतीस न आल्याने ते भांडे मोडण्यात आले आहे आणि परत त्याची माती कालवून हवा तो आकार देण्यात आला आहे. हा झाला लय आणि पुनर्जन्म. आता असे समजा की मोडण्यात आलेल्या त्या भांड्यातील माती पुन्हा आकारास न आणता मुळ मातीच्या ढिगात टाकली आहे. हा झाला अनुग्रह.

या पशू, पाश आणि पति संकल्पनेचेच एक सुंदर रूप आपल्याला खालील श्लोकांत आढळते. संपूर्ण योग-वेदांताचे सार श्रीशंकराने पार्वतीला केलेल्या या उपदेशात ओतले गेले आहे.

शिव उवाच -
देहो देवालयो देवी जीवो देव: सदाशिव: ।
त्यजेद्ज्ञान निर्माल्यं सोहं भावेन पुजयेत ॥   
जीवो शिव: शिवो जीव: सजीव: केवल शिव: ।
पाशबद्धो स्मृतो जीवा पाशमुक्तो सदाशिव: ॥

हे देवी! हा देह देवालय आहे. त्यात वास करणारा जीव साक्षात सदाशिवच आहे. अज्ञानरूपी निर्माल्याचा त्याग करून त्याची सोहं भावाने पूजा करावी. जीव शिव आहे आणि शिव जीव आहे. प्रत्येक सजीव हा शिवरूपच आहे. पाशांत बद्ध असलेला तो जीव आणि पाशमुक्त असलेला तो सदाशिव.

वरील उपदेश ज्याच्या हृदयात घट्ट रुजला आहे त्याला नानाविध ग्रंथ वाचण्याची गरजच नाही. वरील उपदेश कर्म, भक्ती, ध्यान आणि ज्ञान या चार मार्गांचा उत्तम समन्वय आहे. प्रत्येक साधकाने तो मुखोद्गत करावा. त्याच्या अर्थाचे मनन करावे. या उपदेशाचे संक्षिप्त विवरण खालील प्रमाणे.

देहो देवालयो देवी जीवो देव: सदाशिव: ।

निर्गुण परमशिवाच्या मनात आले की आपण दोन व्हावे. त्यानेच मग प्रकृती आणि पुरुषाचे रुप घेतले. या दोघांकरवी त्यानेच सारी सृष्टी प्रसवली. जर सारी सृष्टी त्या सदाशिवापासून निर्माण झाली आहे तर प्रत्येक जीवामधे त्याचेच चैतन्य वास करत असले पाहिजे हे उघड आहे. या अर्थाने प्रत्येक जीव हा शिवच आहे. जीव देहरूपी देवालयामधे वास करतो. देहाला दिलेली देवालयाची उपमा अगदी समर्पक आहे. देवालय कसे असते? शुद्ध, सात्विक आणि पवित्र. साधकाने देहही असाच पवित्र राखायला हवा. अर्थात देहाचे फाजील लाड करणे टाळले पाहिजे. देवालयात चैनीच्या सोयी असतात का? त्याचप्रमाणे शरीराचे फाजील लाड न पुरवता ते नियमीत आहार-विहाराच्या माध्यमातून निर्मल ठेवले पाहिजे.

त्यजेद्ज्ञान निर्माल्यं सोहं भावेन पुजयेत ।

जर प्रत्येक जीव हा शिवरूपी आहे तर मग त्याला तशी अनुभूती का बरे येत नाही? कारण प्रकृतीच्या अंमलाखाली गेल्यामुळे जीव स्वतःचे खरे स्वरूप विसरतो. त्या प्रमाणे अंधारात पडलेली दोरी सर्पाप्रमाणे भासते त्याप्रमाणे जीवाला 'मी म्हणजे माझा देह' असा भ्रम होतो. तो त्याचे शिवपण विसरून जातो. जर जीवाला त्याचे शिवपण प्राप्त करून घ्यायचे असेल तर हे भ्रमरूपी निर्माल्य कवळसून टाकायला हवे. जीवाला 'मी तो आहे' अर्थात 'सोहं' अथवा 'शिवोहम' हा बोध होणे गरजेचे आहे. हा बोध ठसवणे हीच जीवाची शिवाप्रती खरी पूजा ठरते. 

जीवो शिव: शिवो जीव: सजीव: केवल शिव: ।

जीव आणि शिव कधीच वेगळे नसतात. ते तसे असल्याचा केवळ भास जीवाला होत असतो. जीव तोच शिव आणि शिव तोच जीव. शिवरूपी चैतन्यस्पंद प्रत्येक सजीवामधे स्फुरत असतो. आरशावर धुळ बसली तर प्रतिबिंब नीट दिसत नाही. तो स्वच्छ पुसल्यावर ते दिसू लागते. जेव्हा आरसा मळलेला होता तेव्हा त्यात प्रतिबिंब उमटत नव्हते. पण म्हणून तो आरसा नव्हताच असे म्हणता येईल का? अर्थातच नाही. तसेच जीवाचे आहे. जरी जीव अज्ञानाने शिवत्व विसरला असला तरी तो मुलतः शिवच होता आणि आहे.

पाशबद्धो स्मृतो जीवा पाशमुक्तो सदाशिव: ।

जीव का बरे आपले शिवत्व विसरतो? जीव आपले शिवत्व विसरतो कारण प्रकृती त्याला नानाविध पाशांनी जखडून ठेवते. हे पाश म्हणजे - काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मात्सर्य. जोवर हे पाश आहेत तोवर जीवाला शिवपण येणे शक्य नाही. या अष्टपाशांपासून जो मुक्त आहे तो शिवच आहे. हे पाश कसे तुटतात? परमेश्वराला भक्तीपूर्वक 'सोहं' भावाने पुजल्याने. ही सोहं पूजा कर्मकांडात्मक नाही. या पुजेला जडरूपातील फुले, गन्ध, दीप, धूप, नैवेद्य अजिबात लागत नाहीत. सोहं ही भावात्मक पूजा आहे. केवळ प्रगाढ योगसाधनेच्या माध्यामातूनच ती करता येऊ शकते. 

जाता जाता अनुग्रहाविषयी थोडे सांगितले पाहिजे. आपण वर बघितले की पाश तोडण्यासाठी साधना आणि अनुग्रह यांची गरज असते. अनुग्रह हा परमेश्वराकडून मिळतो हे ही आपण पाहिले. मग आता प्रश्न असा की प्रत्येक साधकाला परमेश्वर स्वतः अवतरून अनुग्रह देतो का? तर नाही. शिव हे कार्य गुरूतत्वामार्फत साधतो. या लेखमालेच्या मागच्या भागात आपण शक्तीसंक्रमणाबद्दल संक्षेपाने जाणून घेतले आहे. शैव दर्शनाप्रमाणे शक्तीसंक्रमण हा परमेश्वरी अनुग्रहच आहे. आता कोणी म्हणेल की गुरूची शक्ती आणि शिवाची शक्ती एकच कशी? ही अतिशयोक्ती नाही का? गुरूची अवाजवी स्तुती नाही का? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी यामागचे तत्व नीट ध्यानी घेतले पाहिजे. असाच गुरू शक्तीसंक्रमण करू शकतो ज्याने स्वतः शिवतत्वाचा थोडातरी अनुभव घेतला आहे. म्हणजे शिवतत्व त्या गुरूत कार्यरत झालेले असते आणि त्या शिवतत्वाने तो अन्य साधकांचा उत्कर्ष घडवून आणू शकतो. समजा तुम्ही एक छोटी मेणबत्ती घेतलीत आणि एका मोठ्या मेणबत्तीच्या सहायाने ती पेटवलीत. आता त्या छोट्या मेणबत्तीच्या सहाय्याने काही पणत्या तुम्ही पेटवल्यात. आता सांगा त्या मोठ्या मेणबत्तीतील आग, त्या छोट्या मेणबत्तीतील आग आणि त्या पणत्यांमधील आग यात तत्वार्थाने काही फरक आहे का? अर्थातच नाही. अगदी हाच प्रकार अनुग्रहाच्या बाबतीत घडत असतो. अनुग्रह जरी कोणत्याही प्रकारच्या गुरूकडून (दैवी गुरू, सिद्ध गुरू अथवा पुरुष गुरू) मिळाला असला तरी तो साधकाचे कल्याणच करतो हे नक्की.

या लेखमालेचे उद्दिष्ट शिवभक्तांची आणि नवीन योगसाधकांची भक्ती वृद्धिंगत करणे हे आहे. अन्य कोणा दैवताची उपासना करणार्‍यांनी त्याबद्दल खेद, इर्षा वा द्वेश न बाळगता 'प्रत्येकाला आपली आई हीच श्रेष्ठ असते' या तत्वानुसार आपली आपल्या दैवताविषयीची भक्ती अखंड ठेवावी.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे संगणक सल्लागार, लेखक आणि योग मार्गदर्शक आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकातींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून योग आणि ध्यान विषयक सशुल्क मार्गदर्शन प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

हा मजकूर श्री. बिपीन जोशी यांच्या 'शिवोपासना' या पुस्तकातून घेण्यात आला आहे. या प्रकरणाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी आजच आपली प्रत विकत घ्या.


Posted On : 30 August 2010


Tags : शिव साधना लेखमाला भक्ती नाथ