सुखसमृद्धीसाठी श्रीयंत्र

सुखसमृद्धीसाठी श्रीयंत्र

मानवी आयुष्य अधिकाधिक सुखी असावे अशी इच्छा असणे ही काही नवी गोष्ट नाही. किंबहुना मानवाच्या अस्तित्वाबरोबरच ही इच्छा मानवी संस्कृतीचा एक महत्वाचा घटक बनून राहिली आहे. 'इच्छा तेथे मार्ग' या उक्तीप्रमाणे मानवाने सुखी होण्याचे अनेक मार्ग शोधण्याचा प्रयत्न केलेले आहेत. आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान मानवाला भरभरून भौतिक सुखे प्रदान करत आहेत.  प्राचीन काळीही असे अनेकानेक प्रयत्न झालेले आढळतात. या प्रयत्नांचाच भाग म्हणून प्राचीन योग्यांनी अशा काही उपासना प्रचलित केल्या ज्या मानवी आयुष्यातील नकारात्मक गोष्टी दूर करून मानवाला सुख, समृद्धी प्रदान करण्यात फायदेशीर ठरतात. अशीच एक उपासना पद्धती म्हणजे - श्रीयंत्र साधना.

श्रीयंत्र साधना ही एक आगमोक्त सात्विक साधना आहे. 'श्री' म्हणजे आदिशक्ती अथवा देवी. आदिशक्ती मातेच्या रूपाने जगाला सुख-समृद्धी प्रदान करत असल्याने 'श्री' शब्दाचा अर्थ सुख-समृद्धी असाही आहे. आगममतानुसार श्रीयंत्र हे त्रिपुरसुंदरीचे प्रतीक मानले गेले आहे. महालक्ष्मीचा वासही श्रीयंत्रात असल्याचे मानले जाते. त्रिपुरसुंदरी ही आदिशक्तीचेच एक रूप असल्याने ती शिवाचीच अर्धांगिनी आहे. याच कारणास्तव शंकराचे एक नाव आहे श्रीकंठ अर्थात देवीच्या गळ्यातील ताईत (देवीला अत्यंत प्रिय) !  'यंत्र' म्हणजे काही विशिष्ठ भौमितिक आकार. जगातील सर्व गोष्टी नाम आणि रूप या जोडगोळीच्या सहायाने ओळखल्या जातात. उदाहरणार्थ, गाढव हा शब्द (नाम) उच्चारताच तुमच्या डोळ्यासमोर एक विशिष्ठ असा प्राणी (रूप) उभा रहातो. त्याच प्रकारे प्रत्येक देवतेलाही नाम आणि रूप आहे. आगमशास्त्रानुसार देवतेचा मंत्र हे तीचे नाम आणि देवतेचे यंत्र हे तीचे रूप होय. श्रीयंत्राच्या बाबतीत बोलायचे झाले तर ते दोन प्रकारात उपलब्ध असते - द्विमितीय (2 Dimensional) आणि त्रिमितीय (3 Dimensional) . द्विमितीय श्रीयंत्र हे तांब्याच्या, चांदीच्या अथवा सोन्याच्या जाड पत्र्यावर उठवलेले असते तर त्रिमितीय श्रीयंत्र पिर्यामिडच्या आकारात तांबे, चांदी, पारड, स्फटिक अथवा मिश्रधातू पासून बनवलेले असते. खालील आकृत्यांवरून या दोन प्रकारांची कल्पना येऊ शकेल.

 

         

 

 श्रीयंत्र हे प्रामुख्याने जरी सुख-समृद्धीसाठी वापरले जात असले तरी त्याद्वारे उच्च कोटीची आध्यात्मिक प्रगतीही साधता येते. मुळात श्रीयंत्राची आकृती ही 'सहस्रार'  चक्राचे रूप मानले गेले आहे. त्यातील केंद्रस्थानातील बिन्दु हे शिव-शक्ती यांचे ऐक्य दर्शवतो. कुंडलिनी जेव्हा सहस्रारात पोहोचते तेव्हा हे ऐक्य घडून येते.

श्रीयंत्राच्या उपासानेसाठी अनेक मंत्र सांगितले गेले आहेत परंतु सर्वसाधारण साधकाला त्यातील सर्वांचीच साधना करणे केवळ अशक्य आहे. यास्तव येथे सुख-समृद्धीसाठी उपयोगात आणण्यासाठीचा सोपा मंत्रच विचारात घेऊ.

॥ ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः॥

श्रीयंत्र बाजारातून घरी आणल्यावर तसेच पूजेत ठेवू नये. एखाद्या चांगल्या दिवशी स्नानादी कर्मे उरकून श्रीयंत्राचे विधिवत पूजन करावे. त्यामध्ये पंचामृताने स्नान, फुले, दीप, धूप, प्रसाद इत्यादींचा समावेश असावा. त्या नंतर वरील मंत्राचा जप किमान एक माळ तरी करावा. जप शक्य असल्यास कमळाच्या बियांच्या माळेवर करावा. नसल्यास रुद्राक्षाची माळ वापरावी. जप झाल्यावर श्रीसुक्ताचे पठण करावे. त्यानंतर श्रीयंत्र नित्यपूजेत ठेवावे. रोज वरील जप आणि पठण करणे शक्य असेल तर उत्तमच.

येथे एक सांगायला हवे ते म्हणजे श्रीयंत्र (किंवा दुसरे कोणतेही असे उपाय) म्हणजे काही चमत्कार नाही. तशी अपेक्षा केवळ आळशी साधकच ठेवतात. आपल्या आणि आपल्या परिवाराच्या सुखसमृद्धीसाठी जो काही मार्ग असेल (नोकरी, धंदा इत्यादी) तो महनतीने आणि सचोटीने अंगिकारणे अत्यावश्यक आहे. केवळ श्रीयंत्राच्या उपासनेनेचा आयते घबाड मिळेल अशी अपेक्षा करणे मूर्खपणाचे ठरेल. कोणत्याही उपासनेने मानवी मनाची ऊर्जा आपल्या लक्ष्यावर केंद्रीत (channelize) होण्यास मदत होत असते. अंतर्मनाची शक्ती अगाध आहे हे खरे पण या शक्तीची अभिव्यक्ती होण्यास प्रयत्नांची गरज असतेच.  तेव्हा 'असेल हरी तर देईल खाटल्यावरी' अशी वृत्ती उपासनामार्गावर चालत नाही. 

श्रीयंत्राविषयीची एक प्रचलित कथा आहे. आदि शंकराचार्य नास्तिकवाद्यांचा आणि पाखंडमताचा पराभव करून काशीला श्रीविश्वनाथाचे दर्शन घेण्यास पोहोचले. मंदिरातच यथोचित पूजन उरकल्यावर ध्यानमग्न अवस्थेत सूक्ष्मरूपाने ते श्रीशंकराला भेटण्यास कैलासावर गेले. तेथे त्यांनी श्रीशंकरापुढे नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले. माता पार्वतीचेही दर्शन घेण्याची त्यांची इच्छा होती पण देवी कोठेच दिसेना. अनेकदा विचारून पाहिल्यावर शेवटी श्रीशंकर म्हणाले, "देवी तुझ्यावर रागावली आहे. त्यामुळे तुला भेटण्याची तिची इच्छा नाही. आता तूच जाऊन तिची विनवणी कर." शंकराचार्यांना काही कळेना. देवी आपल्यावर का बरे रागावली असेल? आपल्याकडून असा कोणता गुन्हा घडला? अशा ना ना प्रश्नांनी त्यांच्या मनात गर्दी केली. श्रीशंकराच्या परवानगीने ते देवीच्या अंतःपुराकडे जाण्याकडे निघाले. महालाच्या पायर्‍या चढत असताना एक अघटित घडले. शंकराचार्यांच्या शरीरातली शक्ती हळुहळू नाहीशी होऊ लागली. त्यांचे पाय लटपटू लागले. जीभ कोरडी पडली. जीव कासावीस होऊ लागला. ते कसे तरी दरवाज्यापर्यंत पोहोचले आणि तेथेच शक्तीहीन होऊन खाली कोसळले. त्याच वेळी देवीने दार उघडले आणि शंकराचार्यांकडे पहात हसत म्हणाली, "पहा! शक्ती शिवाय कोणाचे क्षणभरही चालू शकत नाही. तू शाक्तमताचा विध्वंस केलास, माझ्या भक्तांचा पराभव केलास. आता सांग शक्तीशिवाय तुझे पांडित्य काय कामाचे?" देवीच्या या बोलण्यावर शंकराचार्य खजील झाले आणि म्हणाले, "देवी! नास्तिकमताचा उच्छेद करण्यासाठी आणि धर्माच्या पुनर्स्थापनेसाठीच माझा जन्म झालाय. या कार्यात नास्तिकमतवाद्यांबरोबरच मला इतर सर्व वाईट प्रवृत्तींचा नाश करणे भाग पडले. शाक्तमार्गी तांत्रिक जारण-मारण आणि अघोरी साधनांच्या सहायाने लोकांना छळत होते. अध्यात्माच्या नावाखाली स्वैराचाराला खतपाणी घालत होते. त्यामुळे ते जरी तुझे भक्त असले तरी त्यांचा पराभव करणे मला भाग पडले.  मला उदार मनाने माफ कर."   असे म्हणून शंकराचार्यांनी तेथेच श्रीयंत्राची प्रतिष्ठापना केली आणि देवीची अनेक प्रकारे स्तुती केली. त्यावर प्रसन्न झालेल्या देवीने शंकराचार्यांना आशीर्वाद दिले. शंकराचार्यांनी भारताच्या चार दिशांना जे मठ स्थापन केले त्याच्या प्रवेशद्वाराशी श्रीयंत्राची स्थापना केलेली आहे. या कथेचा साधकांनी घ्यावयाचा अर्थ असा की - शाक्त्मतातील अघोरी, अंधश्रद्धा वाढवणार्‍या आणि स्वैराचाराला खतपाणी घालणार्‍या प्रथांचा त्याग करून त्यातील सात्विक साधना स्वीकारण्यास शंकराचार्यांची हरकत नव्हती. म्हणूनच त्यांनी लिहीलेल्या 'सौंदर्य लहरी' नामक ग्रंथात कुंडलिनी योगशास्त्राबरोबरच यंत्रउपासनेचेही सांगोपांग विवेचन आढळते.

श्रीयंत्राविषयी हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे पुढच्या आठवड्यात दिवाळी आहे. ज्यांचा विश्वास आणि श्रद्धा आहे असे अनेक साधक लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीयंत्राची पूजा, उपासना सुरू करतात. जगद्नियंता श्रीकंठ साधकांना त्यांच्या प्रयत्नांनुसार यश देत असतोच.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 17 October 2011


Tags : योग अध्यात्म मंत्रयोग कुंडलिनी चक्रे साधना कथा