Untitled 1

पिंड-ब्रह्मांडातील योगगम्य दुवे ओळखा

नाथ संप्रदायाची एक महत्वाची शिकवण म्हणजे - पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी. जे काही म्हणून बाह्य जगतात अस्तित्वात आहे ते सूक्ष्म रुपात या मानवी पिंडातही आहे. त्याचप्रमाणे जे काही मानव पिंडात अस्तित्वात आहे ते सर्व ब्रह्मांडातही आहे. हे तत्वज्ञान नाथ संप्रदायाच्या इतक्या खोलवर रुजलेले आहे की आठवड्याचे सात वार आणि त्या वारांना कारणीभूत असणारे ग्रह-तारे यांनाही नाथ सिद्ध पिंड-ब्रह्मांड भूमिकेतून पहात्ताना आपल्याला आढळतात.

सर्वसामान्यांच्या दृष्टीने बघायचं झालं तर एका आठवड्यांच विभाजन सोमवार ते रविवार अशा सात दिवसांत केलं जातं. हे सात वार हे नवग्रहांपैकी सात प्रमुख किंवा प्रत्यक्ष ग्रहांचे प्रतिनिधित्व करतात हे ही उघडंच आहे. योगी संप्रदायाच्या दृष्टीने मात्र या सात वारांना आणि नऊ ग्रहांना अधिक खोल आणि सूक्ष्म अर्थ आहे. या दृष्टीने नाथ संप्रदायातील सर्वच मच्छिंद गोरक्ष संवाद अतिशय उद्बोदक वाटतात. येथे हे ही सांगणे आवश्यक आहे की ज्यांना अजपा साधनेची किंवा अन्य गुरुप्रदत्त साधनेची घट्ट बैठक नाही त्यांना ते नीटसे कळणार नाहीत किंवा फक्त बुद्धीच्या स्तरावर कळतील. या संवादातील आणि शिकवणीतील मर्म कळण्यासाठी अजपा साधनेद्वारे ज्ञानचक्र जागृत असणे अत्यंत आवश्यक आहे.

अशाच एका मच्छिंद्र गोरक्ष संवादातून आपल्याला बाह्य जगतातले सोमवार ते रविवार हे वार योग्याच्या दृष्टीने कसे दिसतात त्याचा गुढगर्भ अर्थ दुरान्वयाने का होईना ताडता येतो.

गुरुच्या शिकवणीनुसार साधनारत होऊन पाप-पुण्याचा नाश करणे आणि यमपुरी टाळणे म्हणजेच जणू "रविवार". दशमद्वारी बंध / खेचरी लावून चंद्रापासून स्त्रवणारे अमृत प्राशन करणे म्हणजेच जणू "सोमवार". अलख आणि निरंजन अशा शिव स्थानी संचार करून पंचप्राणांनी त्याची पूजा करणे म्हणजेच जणू "मंगळवार". अजपा योगसाधनेने बुद्धीचा प्रकाश चेतवून, अलक्ष्य मुद्रा साधून अमरापुरी वास करणे म्हणजे जणू "बुधवार". ज्ञानरुपी खडगाने मनातील षडरीपुंचा नाश करणे म्हणजे जणू "गुरुवार".  मायेला मारून सहज समाधीत शिरणे म्हणजे जणू "शुक्रवार". सरते शेवटी स्थिर आणि सर्वांच्या पलीकडे असलेली तुर्यावस्था म्हणजे जणू "शनिवार". अशा प्रकारे नाथ योगी सात वार या देहांताच अनुभवत असतो.

हे सात वार ज्या ग्रहांवर अवलंबून असतात त्या ग्रह सुद्धा या देहातच कसे वास करतात ते सिद्ध गोरक्षनाथ विषद करतात. ते म्हणतात - सूर्य नेत्रांमध्ये, चंद्र श्रवणेन्द्रीयात,  मंगळ मुखात, बुध हृदयस्थानी, गुरु उदरस्थानी, शुक्र जननेन्द्रीयांच्या ठिकाणी, शनि गुद्स्थानी, राहू मनात आणि केतू नासिकेमध्ये आहे.

या लेखाशी संलग्न व्हिडिओ

येथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की नाथ संप्रदायाचे साहित्य अनेक भाषांत विखुरलेले आहे. काळाप्रमाणे त्यात काही पाठभेद किंवा फरक आले आहेत. वेगवेगळ्या लोकांनी त्यावर भिन्नभिन्न मतमतांतरे मांडली आहेत. त्यामुळे अमुक ग्रहाचे गुणधर्म अमुक स्थानाशी जुळतात की नाही किंवा किती प्रमाणात जुळतात त्याचा कीस पाडण्याची गरज नाही. ते अजापा साधकासाठी महत्वाचं नाही. महत्वाचे हे आहे की पिंड आणि ब्रह्मांड यांत जे सूक्ष्म दुवे आहेत ते ओळखण्याची. नुसते ओळखून थांबून चालणार नाही. प्रत्यक्ष साधनेने त्यांची अनुभूती घेण्याचा अविरत प्रयत्न केला पाहिजे. विस्तारभयास्तव येथे फार खोलात जात नाही. आपापल्या गुरुचे चरण धरून ते ज्ञान प्राप्त करावे हे उत्तम. स्वतः गोरक्ष म्हणतात - "हे ज्ञान जाणणारा विरळाच पण मला ते मच्छिंद्र कृपेने लाभले."

हे उदाहरण द्यायचे कारणे हे की सर्वसामान्य माणूस घडणाऱ्या घटनांची कारणमीमांसा नेहमी बाह्य जगतात शोधत असतो. बाह्य जगताचे अनेक अदृश दुवे आपल्याच अंतरंगात आहेत या बाबत तो अनभिज्ञ तरी असतो किंवा सोयीस्करपणे त्यांकडे दुर्लक्ष करत असतो. अगदी क्षुल्लक वाटणाऱ्या दैनंदिन जीवनातील घडामोडी योग दृष्टीने पाहिल्या तर अत्यंत विस्मयकारक आणि उद्बोधक वाटू लागतात. त्यांमागील अदृश्य दुवे कधी पंचमहाभूतांचे असतात, कधी पंचप्राणांचे, कधी ग्रह-ताऱ्यांचे, कधी अन्नमय असतात तर कधी मनोमय असतात. अजपा योग अभ्यासकाने हे अदृश्य दुवे ओळखायला शिकले पाहिजे. त्यांतील सुप्त कार्यकारणभाव आणि कर्मांचा असलेला संबंध अभ्यासण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

असो.

सुरु झालेल्या या आठवड्यात पिंडी आणि ब्रह्मांडी वास करत असलेलं गूढ शिवतत्व तुम्हा सर्वांना हे सूक्ष्म दुवे ओळखण्याची आणि तदनुसार आचरण ठेवण्याची प्रेरणा देवो हीच त्याच्या चरणी प्रार्थना.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 26 February 2018