Untitled 1

मुख्य साधनेची भक्कम बैठक आवश्यक

सध्या सगळेच जण काहीशा तणावाच्या आणि अनिश्चिततेच्या कालखंडातून जात आहेत. अजपा साधकाने ह्या प्रतिकूल कालखंडाचा वापर साधना अनुकूल कशी करता येईल त्याकडे लक्ष दिले पाहिजे. भगवत गीता आणि ज्ञानेश्वरी मध्ये समत्व बुद्धीची जी महती सांगितली आहे ती अशा प्रतिकूल काळात विशेष रूपाने जाणवल्याशिवाय रहात नाही. चढ आणि उतार हे मानवी आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत हे सर्वांनाच माहित असते परंतु जेंव्हा तशा खाचखळग्यांतून जायची वेळ येते तेंव्हा भल्या भल्यांची बुद्धी सहज भरकटते. समत्व तर सोडाच पण सामान्य विवेक सुद्धा माणसांना रहात नाही. त्या अनुषंगाने मग काम-क्रोध-मोह इत्यादी विकार बळावतात.

सामान्य साधकाच्या दृष्टीने बोलायचे झाले तर सध्या सुरु असलेला कालखंड साधनेची विस्कळीत झालेली घडी नीट बसवण्यासाठी चांगला आहे. एरवी "वेळ नाही" किंवा "बिझी आहे" ही सबब सांगणाऱ्या बहुतेकांच्या हाती आता थोडा मोकळा वेळ आहे. सर्व अजपा साधकांनी त्याचा सदुपयोग करावा असे सुचवावेसे वाटते. त्या दृष्टीने पहिली गोष्ट करायची ती म्हणजे आपली व्यक्तिगत २१ मिनिटांची साधना भक्कमपणे रुजवायची. गुरुमंत्राचा किंवा इष्ट मंत्राचा जप अंतरंगात जास्तीत जास्त कसा मुरेल ते पहायचे. एकदा का "जप" आणि "अजप" ही जोडगोळी तुम्ही भक्कम केलीत की मग साधना मार्गावरील बाकीच्या अनेक गोष्टी आपोआप सुकर होऊ लागतात.

ज्या प्रमाणे इमारतीचा पाया भक्कम असेल तर त्यावर अनेक मजले सहज बांधता येतात अगदी त्याच प्रमाणे मुख्य साधना भक्कम असेल तर इतर उप-साधना पटापट आत्मसात करता येतात. मी अनेक साधक बघीतले आहेत जे या बाबतीत एक मोठी चूक करतात. त्यांची मूळ साधना कच्ची असते आणि बाकीच्या चित्रविचित्र साधनांचा फाफट पसारा फार असतो. किती देवता आणि किती मंत्रांची उपासना तुम्ही करणार. एकदा अमुक देवता, एकदा तमुक देवता असं करता करता मूळ इष्ट-देवता आणि इष्ट-साधना बाजूला पडते.

जोवर इष्ट मंत्राचा जप आणि अजपा साधनेची बैठक भक्कम होत नाही तोवर अन्य उप-साधना सिद्ध होणं शक्य नाही. झाल्या तरी त्यात संपूर्ण सफलता मिळणे दुरापास्त आहे. त्यामुळे "इष्टमंत्र" आणि "अजपा गायत्री" सर्वोपरी हे मनावर खोलवर बिंबवणे अत्यंत आवश्यक आहे. खात्रीलायक ठोस प्रगतीचा दुसरा मार्ग नाही. तुम्हाला जरी कोणी कितीही गोपनीय मंत्र वगैरे सांगितले तरी जोवर तुमचा इष्ट मंत्र आणि मुख्य साधना भक्कम नाही तोवर त्यांचा काहीही फायदा नाही. साधकाचा इष्ट मंत्र आणि त्याची मुख्य साधना यांचा इतर साधना करत असतांना फार उपयोग होतो. इतर साधनांतील खाचखळगे मग साधक लीलया पार करू शकतो. इष्टमंत्र आणि इष्टसाधना यांमुळे अन्य मंत्र-साधनांची उर्जा नियंत्रणात रहाते. साधकावर त्या उर्जेचा दुष्परिणाम होत नाही. उप-साधनेत काही कमतरता राहिली किंवा काही चूक झाली तर त्याचे निराकारण स्वयमेव होते.

मी अजपाच्या बाबतीत माझ्या स्टुडंटसना आणि मित्र परिवारातील लोकांना नेहमी सांगतो की - "Ajapa is easy to learn; difficult to master." अजपा साधना ही वरकरणी किती सोप्पी साधना आहे बरं. ह्याच सहज-सोपेपणामुळे साधकांना फसायला होतं. श्वासांबरोबर होणारा "हंस" किंवा "सोहं" चा जप ही तर नुसती सुरवात आहे. अजपाच्या खोल गुढरम्य अंतरंगात उतरून तर बघा. अजपाची खोली कळली की मग म्हणाल की अरे ह्यात तर आयुष्यभर पुरून उरेल एवढं ज्ञान भरलंय की. अजपावर प्रभुत्व आणि अधिकार काही एक-दोन वर्षांत येणारा नाही. ती एक आयुष्यभराची तपस्या आहे. जेंव्हा कधी वाटेल की अजपा तर आपल्याला "समजली" की वरील वाक्य आठवा. "समजली" हा भ्रम झटकून टाकून अजून आत बुडी मारा. तुम्हाला ध्यानमार्गावरील मौल्यवान मोती हाती लागतील. अजपा "साधना" म्हणून सोपी आहेच पण तिची ध्यान "सिद्धी" व्हायला समर्पण लागतं.

असो. हा विषय असा आहे की किती लिहावे तेवढे थोडेच आहे. आज एवढेच.  

साधक, साधना आणि साध्य ही त्रिपुटी ज्या परम तेजस्वी कुंडलिनीत विलीन होते ती जगन्माता सर्व योगाभ्यासी वाचकांना आशीर्वचन प्रदान करो या मनःपूर्वक सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 06 April 2020
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates