Untitled 1

कुंडलिनी योगाचे "डेटा सायन्स"  

पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी हा कुंडलिनी योगाचा मुलभूत सिद्धांत आहे. मर्यादित अशा पिंडाद्वारे अमर्यादित अशा ब्रह्मांडाचे रहस्य जाणून घेण्यासाठी कुंडलिनी योग एक शास्त्रशुद्ध प्रणाली प्रस्तुत करते. या प्रणालीत शुद्धीक्रिया, आसने, प्राणायाम, बंध, मुद्रा, नादश्रवण, मंत्र, ध्यान अशा अनेकानेक साधना पद्धतींचा समावेश होतो. जर तुम्ही प्राचीन योगग्रंथांचा अभ्यास केलात तर तुम्हाला आढळेल की साधनाक्रियांचा हा पसारा खुप मोठा आहे.

हा पसारा किती विस्तारलेला आहे हे कळण्यासाठी काही उदाहरणे देतो म्हणजे लक्षात येईल. असं म्हणतात की जेवढ्या जीवयोनी आहेत तेवढीच म्हणजे ८४ लक्ष योगासने आहेत. प्राणायामाचे आणि कुंभकाचे २५० पेक्षा जास्त्र प्रकार शास्त्रग्रंथांत आढळतात. जवळपास पंचवीस मुद्रांचा उल्लेख योगाग्रंथांत आपल्याला सापडतो. मनोलयाचे सुद्धा ८४ लक्ष प्रकार आहेत असे मानले जाते. त्याचं धर्तीवर ध्यान आणि समाधीचे अनेकानेक प्रकार आपल्याला प्राचीन ग्रंथांत आढळतात. जर या सगळ्यांवर नजर जरी टाकली तरी नवीन साधकाची छाती दडपून जाते. या एवढ्या क्रीयांपैकी कोणत्या कराव्यात, कोणत्या खरोखर उपयोगी पडतील आणि कोणत्या करू नयेत असा प्रश्न त्याच्यापुढे उभा रहातो. मुळात मर्यादित पिंडाने करायच्या या साधना अमर्याद ब्रह्मांडा पर्यंत कशा काय घेऊन जाणार असा प्रश्नही साधकांना पडतो. या योग क्रियांचा वापर करून पिंडी ते ब्रह्मांडी हा प्रवास कसा करायचा हा एक सखोल अभ्यासाचा योगगम्य विषय आहे.

तुम्हाला जर कॉम्प्यूटर सायन्स, सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग, किंवा डेटा सायन्स वगैरे विषयांची जुजबी माहिती असेल तर तुम्हाला खालील आकृती नक्कीच परिचयाची असेल :

तुम्ही जेंव्हा कुंडलिनी योगशास्त्रातील क्रियांबद्दल पुस्तकी वाचन करत असता तेंव्हा त्या योगक्रिया तुमच्यासाठी फक्त योगशात्रातील काही तत्थ्य किंवा Data अशा असतात. अशा Raw Data चा योगमार्गावर फारसा उपयोग होत नाही. एक योगाभ्यासी म्हणून त्यांचा अंगीकार तुम्ही अजूनपर्यंत केलेला नसतो. त्यामुळे "योग महासागरात" विखुरलेल्या या साधनांचा आध्यात्मिक प्रगती करता कोणताही उपयोग तुम्ही अजूनपर्यंत केलेला नसतो.

आता योगाक्रीयांची निवड करतांना तुम्हाला मुळात हे माहिती असायला हवे की कोणत्या क्रिया उपलब्ध आहेत, कोणती योगक्रिया कशासाठी करायचो आहे आणि त्या क्रियेचा फायदा नेमका काय आहे. जेंव्हा तुम्ही या सर्व गोष्टींची सखोल माहिती करून घेता तेंव्हा तो "डेटा"  आता तुमच्यासाठी Information  झालेला असतो. बहुतेक वेळा ही Information सुद्धा तुमच्या बौद्धिक किंवा वैचारिक पातळीवरच जमा केले जात असते. निव्वळ Data पेक्षा Information अधिक उपयोगी असणार हे उघड आहे कारण ती "डेटा प्रोसेस" करून जमवलेली असते. या टप्प्यावर तुम्ही निवडलेल्या योग क्रियांच्या प्रत्यक्ष सरावाला हळू-हळू सुरवात किंवा पूर्वतयारी करत असता. परंतु अजूनही तुम्हाला वेगवेगळ्या योगक्रिया एकमेकाशी कशा जोडलेल्या आहेत ते माहित नसतं. उदाहरणार्थ प्राणायामाची नेमकी किती आवर्तनं नेमक्या कोणत्या वेळी केली तर ध्यान चांगलं लागतं ते तुम्हाला अजून उमगलेलं नसतं किंवा कोणत्या प्राणायामाचा प्रभाव कोणत्या मुदेवर अधिक पडतो ते तुम्हाला ठाऊक नसतं.

एकदा का योगक्रीयांची निवड तुम्ही केलीत की मग त्यांचा दीर्घकाळ अभ्यस किंवा सराव तुम्हाला सुरु करावा लागतो. ही महत्वाची पायरी आहे कारत आता तुमच्या पुस्तकी ज्ञानाची परिणीती प्रत्यक्ष अभ्यासात / सरावात झालेली असते. तुम्ही निवडलेल्या त्या योगक्रीयांविषयी तुम्हाला आता connecting the dots करायला जमू लागतं. ही थोडी उच्च अवस्था आहे. बऱ्याच बर्षांच्या अभ्यासानंतर तुम्हाला ते जमू लागेल. उदाहरणार्थ, मुद्राभ्यास करतांना क्रम कोणता ठेवायचा, ऋतूनुसार क्रिया कशा बदलायच्या, शरीरातील चालू तत्व कसं शोधायचं, त्यानुसार मंत्र आणि एकूणच क्रियांचा संच कसा बांधायचा हे सर्व तुम्हाला जेंव्हा कळू लागेल तेंव्हा तुम्ही knowledge ह्या पायरीपर्यंत पोहोचलात असं म्हणायला हरकत नाही. या स्तरावर पोहोचल्यावर तुम्हाला स्वतःला स्वतःची साधना design करता येते. त्यात आवश्यकतेनुसार बदल करता येतात. एक क्रिया अन्य क्रीयांशी कशी जोडली गेलेली आहे आणि कशी निगडीत आहे ते तुम्हाला उमगलेलं असतं.

कुंडलिनी योगमार्गावर निवडलेल्या क्रियात्मक साधनांचा पोत एकसारखा रहात नाही. तुम्ही जशी जशी प्रगती करत असता तशी तशी तुमची साधनासुद्धा प्रगट होत जाते. तिचा पोत आणि खोली वाढत जाते. तुम्ही जणू साधनेच्या खोल गर्भात शिरता. अशा वेळी त्या साधनेतील आश्चर्यकारक गोष्टी तुम्हाला अनुभवास येऊ लागतात. उदाहरणार्थ, अजपा ध्यानाचा सराव करता करता, श्वास मंद मंद होत होत एक दिवस केवल कुंभक अनुभवास येतो किंवा प्राण आणि अपान यांचे सामरस्य होते म्हणजे नेमके काय होतं ते अनुभवास येऊ लागते. अजपाचे श्वास-प्रश्वास हे शिव-शक्ती स्वरूप कसे ते कळू लागते. हा झाला साधनेतील Insight. शरीरातील पंचमहाभूते, पंचप्राण वगैरेंचा बाह्य घटकांशी कसा संबंध आहे किंवा त्याचा एकमेकावर प्रभाव कशा रीतीने पडतो आहे ते आता तुम्हाला स्पष्टपणे कळू लागतं.

साधनेतील हा Insight वाढीस लागला की तुमची साधना परिपक्व झाली असं म्हणायला हरकत नाही. बऱ्याच वर्षांच्या अथक योगाभ्यासा नंतर साधनेतील हा Insight तुम्हाला त्या साधनेतील सिद्धी प्रदान करतो. येथे सिद्धी म्हणजे सफलता किंवा फलप्राप्ती. ही अवस्था म्हणजे Wisdom. या अवस्थेत "knowledge" चे रुपांतर "Knowledge" मध्ये व्हायला लागते. ज्यासाठी एवढी वर्षे साधना केली त्या उद्दिष्टाप्रत तुम्ही अग्रेसर होऊ लागता. अन्नमय कोष, प्राणमय कोष, मनोमय कोष, विज्ञानमय कोष आणि आनंदमय कोष यांच्या आवरणातून आत्म्याचा तेजाळ प्रकाश दृग्गोचर होतो. स्वतःलाच तो अंतरंगातून स्पष्टपणे जाणवू लागतो.

आता गंमत बघा. तुम्ही सुरवात केली होती पिंडा पासून. शुद्धीक्रिया, आसने, प्राणायाम, मुद्रा ध्यान वगैरे क्रिया या पिंडा द्वारेच केल्या जात असतात. एक दिवस ही पिंडापासून सुरु केलेली साधना तुम्हाला "ब्रह्मांडा" चे रहस्य उलगडून दाखवते. "पिंड" भाव कमी होऊन "ब्रह्मांड" भाव वाढीस लागतो किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर पिंड आणि ब्रह्मांड एकरूप आहेत अशी प्रचीती येते. ज्ञानेश्वरीत सांगितलेला "पिंडे पिंडाचा ग्रासू" होतो तो असा होतो. 

असो.

जगदंबा कुंडलिनी सर्व अभ्यासू वाचकांना योगशास्त्राचे ज्ञान-विज्ञान उलगडण्यास सहाय्यभूत होवो या मनःपूर्वक सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 21 September 2020