योगारूढ

आज ‘देवाच्या डाव्या हाती’ चा हे शेवटचे प्रकरण लिहिताना काय लिहावे हे सुचतच नाहीये. गेल्या अनेक वर्षांचा काळ एखाद्या चलचित्रासारखा डोळ्यांसमोरून सरकतोय. अनेक नव्या-जुन्या आठवणींनी मनात दाटी केलेय. सांगण्यासारख्या बर्‍याच गोष्टी आहेत, पण सगळ्याच सांगत बसलो तर बराच वेळ जाईल. तेव्हा कोठेतरी थांबायलाच हवे. प्रत्येक साधकाच्या आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा तो केवळ योग साधक न रहाता योगी बनतो. माझ्याही आयुष्यात ती वेळ योग्य काळी आली. ही योगारूढ अवस्था शब्दांत पकडता यायची नाही. केवळ अनुभवातूनच ती कळू शकते. त्यामुळे त्याविषयी येथे फार काही लिहीता येणार नाही.

साधनारत योग्याची ध्यानावस्था प्रगत अवस्थेत पोहोचली की जगन्माता कुंडलिनी सहस्रारस्थित शिवाला प्रेमभराने आलिंगन देण्यास आतूर होते. तिचे प्रेमाचे भरते एवढे जबरदस्त असते की सहा चक्रे व तीन ग्रंथी पार फाटून जातात. कुंडलिनी जसजशी मध्यमार्गाने सहस्राराकडे जाऊ लागते तसतसे अद्भूत अनुभव येऊ लागतात. त्या मार्गावर बारा कलांनी युक्त सूर्य तुम्हाला प्रकाश दाखवेल. सोळा कलांनी युक्त चंद्र शीतल चांदणे पाडेल व दहा कलांनी युक्त अग्नी तुम्हास ऊब देईल. अनाहत नादरूपी मंगल वाद्ये तुमचे स्वागत करतील. लाल, पांढर्‍या, पिवळ्या, निळ्या रंगांची दैवी रोषणाई तुम्हाला विस्मित करेल. दशम द्वारात अंगुष्ठामात्र पुरुष तुम्हाला प्रेमभराने आलिंगन देईल. शेवटी त्याच्याही पलिकडच्या सत-चित-आनन्द रूपी परमशिवाची अनुभूती येईल. जो स्वत: निर्गुण असून भक्तांसाठी सगुण रुपाने अवतरतो तो सदाशिव तुम्हाला अलगद कवेत घेईल. जणू गगनात गगन, पाण्यात पाणी वा सोन्यात सोने मिसळावे तशी अद्वैतानुभूती तुम्हाला लाभेल. याहून मोठे सुख ते काय? मग अध्यात्म मार्गावर तुम्हाला अन्य काहीही जाणून घेण्याची कधीच गरज भासणार नाही.

परमेश्वराचे खरे स्वरूप काय आहे? या जगाचे रहस्य काय? आत्म्याचे स्वरूप कसे आहे? मुक्ती म्हणजे काय? जीवनमुक्ताची लक्षणे कोणती? या आणि अशा अनेक गोष्टींविषयी अनेकांनी अनेकप्रकारे लिहीले आहे. मी त्याबद्दल काही बोलणार नाही. येथे एक छान गोष्ट आठवते...

एकदा एक मिठाची बाहूली सर्वांना मोठ्या गर्वाने म्हणाली, “मी आत्ता समुद्रात बुडी मारते आणि त्याची खोली मोजून येते.” तीने मोठ्या आत्मविश्वासाने फेसाळणार्‍या समुद्रात उडी घेतली. पण उडी घेताचक्षणी ती समुद्राच्या पाण्यात अशी काही विरघळून गेली की समुद्राची खोली कीती हे सांगण्यासाठी कधी वर येऊच शकली नाही. परमेश्वराचेही असेच नाही का? अनंत, अथांग परमेश्वररूपी समुद्रात जेव्हा जीवरूपी मिठाची बाहूली ध्यानरूपी बुडी मारते तेव्हा स्वत:चे अस्तित्वच विसरते. मग परतल्यावर त्या स्थितीविषयी काय सांगावे?  

लाखोंतून काही शेकड्यांना योगमार्गाविषयी जिज्ञासा निर्माण होते. त्या शेकडो लोकांमधून काही हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढेच योगमार्ग न कंटाळता आचरतात. त्यातूनही केवळ एखादाच पैलतीरी पोहोचतो.  देवाच्या डाव्या हाती उभे राहून जगदंबा कुंडलिनी तुम्हाला नेहमीच ‘तो एखादा’ बनण्यासाठी मदत करत राहिल. श्रीकंठाने तुम्हा सर्वांना या मार्गावर आरूढ होण्याची  प्रेरणा द्यावी हीच त्याच्या चरणी प्रार्थना. माझ्या अनुभवावरून एकच सांगीन की जगावे तर त्या अनुभूतीसाठी, मरावे तर तेही त्याच अनुभूतीसाठी. याहून अधिक काय लिहू?


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे संगणक सल्लागार, लेखक आणि योग मार्गदर्शक आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकातींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून योग आणि ध्यान विषयक सशुल्क मार्गदर्शन प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

हा मजकूर श्री. बिपीन जोशी यांच्या 'देवाच्या डाव्या हाती' या पुस्तकातून घेण्यात आला आहे. या प्रकरणाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी आजच आपली प्रत विकत घ्या. अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.


Posted On : 06 June 2009


Tags : योग अध्यात्म कुंडलिनी चक्रे साधना देवाच्या डाव्या हाती लेखमाला पुस्तके

Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates