Untitled 1

श्रावणातील अजपा जप

पुढील आठवड्यात आपल्याकडे श्रावण मास सुरु होत आहे. एकूणच या काळात बरेच सण येत असले तरी श्रावण खऱ्या अर्थाने भगवान शंकराचा महिना आहे. श्रावणातील शिवोपासनेची लज्जत काही औरच असते. तसं कोरड्या तर्काने बघायचं झालं तर कोणत्याही देवतेच्या भक्ती करता, उपासने करता कोणत्या मुहूर्ताची गरज नसते. मनात श्रद्धा आणि भक्ती असली की झाले. एका तोंडाने म्हणायचे की परमेश्वर सदासर्वकाळ सृष्टीच्या कणाकणात ओतप्रोत भरलेला आहे आणि दुसऱ्या तोंडाने म्हणायचं की अमुक एका महिन्यात तो लवकर प्रसन्न होतो. वरकरणी हा विरोधाभास वाटणे स्वाभाविक आहे.

प्राचीन काळापासून विविध सण, उत्सव, पर्व, मुहूर्त इत्यादींची योजना आपल्या ऋषी-मुनी-तपस्वी-योगी इत्यादी जाणकारांनी केलेली आहे. परमेश्वरी चैतन्याचा त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला होता आणि तरीही त्यांनी इतरांसाठी अशा गोष्टींची आखणी केली. त्यामध्ये काय बरं उद्देश असावा? फार खोलात किंवा चर्चा-चर्वणात न जाता एक सोप्पं उदाहरण देतो. असं समजा की तुम्हाला एखाद्या बागेत फेरफटका मारायचा आहे. हा फेरफटका तुम्ही सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी अशा तीन भिन्न-भिन्न वेळी मारला आहे. एकच क्रिया - बागेतला फेरफटका - पण तो तुम्ही केंव्हा मारलात त्यावर तुमच्या त्याविषयीच्या अनुभवाचा पोत अवलंबून असेल. सकाळच्या प्रसन्न वातावरणातला फेरफटका, दुपारच्या रणरणत्या उन्हातला फेरफटका आणि संध्याकाळी उन्हं कलल्यावर मारलेला निवांत फेरफटका हा भिन्न-भिन्न अनुभूती देणारा ठरतो हे ओघाने आलेच. फेरफटक्याच्या अनुभूतीतील असाच फरक तुम्हाला हिवाळ्यात, उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात जाणवेल.

याचा अर्थ असा की अनुभव घेणारं शरीर आणि मन जरी तेच असलं तरी घेत असलेल्या अनुभवावर बाह्य घटकांचा सुद्धा प्रभाव पडत असतो. हा प्रभाव कधी चांगला असतो तरी वाईट तर कधी संमिश्र. श्रावणातील उपासनेकडे आपण या दृष्टीने पाहिले पाहिजे. परमेश्वराला सण, मुहूर्त, पर्व इत्यादींची गरज नसून ती परमेश्वराच्या उपासकाला आहे. सर्वसामान्य मानवी शरीर-मनाला स्वतःच्या अशा काही मर्यादा असतात. त्या मर्यादा लक्षात घेता परमेश्वर जरी सदासर्वकाळ सर्वव्याप्त असला तरी सामान्य योगाभ्यासकाचे शरीर-मन काही सदासर्वकाळ ईश्वरी आलंबन साधू शकत नाही. त्यावर उपाय म्हणून त्याला विशिष्ठ कालावधीसाठी नेटाने आणि दृढपणे साधनारत ठेवावे लागते. कोणतेही विधिवत अनुष्ठान, पुनश्चरण, पारायण वगैरेंमध्ये हा दृढभाव साधायचा असतो. अशा वारंवार केलेल्या अभ्यासाने मनाला ईश्वरी आलंबन हवे तेंव्हा आणि हवा तेवढा वेळ घेता येऊ लागते. अर्थात हे काही एक-दोन वर्षात साधत नाही. अनेक वर्षांचा अभ्यास त्यासाठी असावा लागतो.

भगवान शंकराला प्रसन्न करण्याचा एक योगोक्त मार्ग म्हणजे अजपा जप किंवा अजपा ध्यान. येऊ घातलेल्या श्रावणात तुमच्यापैकी कुंडलिनी योगाभ्यासी वाचक मंडळीना एक छोटा अभ्यास सुचवावासा वाटतो. बघा आवड वाटली तर. कृपया हे लक्षात घ्या की नवख्या योगाभ्यासींसाठी हा अभ्यास नाही. त्यांनी सामान्य अजपा जप करावा हे उत्तम.

तुमच्याकडे ज्ञानेश्वरी किंवा भगवत गीता असेल अशी आशा आहे. तुमची ज्ञानेश्वरीची प्रत उघडा आणि चौथ्या अध्यायातील भगवत गीता श्लोक २९-३० वरील विवेचनाच्या ओवी क्रमांक १४४-१५० नीट वाचा. अजपा जपाशी त्याचा काय संबंध आहे ते आपण पूर्वीही जाणून घेतलेलं आहे. त्या अर्थासहित अजपा जप प्रत्यक्ष साधनेद्वारे पडताळून पहाण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर पाचव्या अध्यायातील भगवत गीतेच्या श्लोक क्रमांक २७-२८ संबंधित ओव्या क्रमांक १५१ ते १५७ नीट वाचा. तुम्हाला जर अजपा नीट साधली असेल तर या दोन्ही भिन्न-भिन्न वाटणाऱ्या क्रियांमधील एक विलक्षण योगगम्य रहस्य तुम्हाला गवसेल. त्यानंतर पुढचा सहावा अध्याय तर कुंडलिनी योगाचे सारच आहे पण त्याविषयी आज काही सांगत नाही. ती सर्वस्व झोकून देऊन करण्याची उच्च कोटीची साधना आहे. त्याविषयी पुन्हा कधीतरी जाणून घेऊ. मी येथे मुद्दामच या क्रियांच्या फार खोलात जात नाही किंवा अधिक विश्लेषण करत बसत नाही. काही गोष्टी योगाभ्यासाद्वारे स्वतः हुडकून काढण्यात खरी गंमत असते.

असो.

जगदंबा कुंडलिनी सर्व योगाभ्यासी वाचकांचा श्रावणातील अजपारुपी जपयज्ञ सुखमय करो या मनःपूर्वक सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 13 July 2020
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates