Untitled 1

उत्तरायणातील देहत्याग आणि मौनाचे महत्व

उद्या म्हणजे दिनांक १४ जानेवारी २०१८ रोजी मकर संक्रांत आहे. अशी मान्यता आहे की महाभारताच्या युद्धात भीष्मांनी ज्या दिवशी स्थूल देहाचा त्याग केला तो दिवस हाच. भीष्म इच्छामरणी होते. बाणांच्या शय्येवर धारातीर्थी पडल्यावर त्यांनी लगेच प्राणत्याग केला नाही तर उत्तरायण सुरु होण्याची वाट बघत राहिले. उत्तरायणाच्या सुरु होताच त्यांनी देहत्याग केला. उत्तरायण काळात मृत्यू आल्यास देवलोकाची प्राप्ती होते अशी श्रद्धा आहे. येथे हे ही लक्षात घेतले पाहिजे की भीष्मांनी मकर संक्रांतीच्या दिवशीच देहत्याग केला का त्याविषयी मतभेद आहेत कारण भीष्म अष्टमी म्हणूनही तिथी सांगितली जाते. अर्थात ह्या लेखाच्या दृष्टीने हा भेद गौण आहे. त्यामुळे त्याच्या फार खोलात जाण्याची आपल्याला गरज नाही. येथे महत्वाचा भाग आहे तो म्हणजे उत्तरायण आणि त्या काळात मृत्यू आल्यास शास्त्रानुसार मिळणारे फळ.

त्यासंबंधी ज्ञानेश्वरीच्या आठव्या अध्यायात खालीलप्रकारे उल्लेख आहे -

आंत अग्निज्योतीचा प्रकाशु । बाहेरी शुक्लपक्षु आणि दिवसु ।
आणि सामासांमाजीं मासु । उत्तरायण ॥
ऐशिया समयोगाची निरुती । लाहोनि जे देह ठेविती ।
ते ब्रह्मचि होती । ब्रह्मविद ॥

याचा थोडक्यात अर्थ असा की अग्नि, ज्योती, दिवस, शुक्लपक्ष, आणि उत्तरायण या काळांत मृत्यू पावलेले ब्रह्मवेत्ते लोकं ब्रह्मलोकी जातात. आंत म्हणजे शरीराच्या आत अर्थात अन्नमय कोषात. जोवर अन्नमय कोषात अग्नि आहे तोवर देह जिवंत आहे. तुमच्यापैकी ज्यांचा आयुर्वेदाशी थोडातरी परिचय आहे त्यांना जठराग्नी सहित शरीरस्थ अग्नीचे महत्व माहित असेलच. तर हा जठराग्नी जोवर तग धरून आहे तोवर शरीराची चयापचय व्यवस्था काही अंशी का होईना सुरु आहे. अशा स्थितीत घडलेला देहत्याग शुभ आहे. हा पहिला निकष.

दुसरा निकष आहे की अंतर्ज्योती प्रकाशमान हवी. अंतर्ज्योती हा एका अर्थाने अग्निचाच अवतार. ही ज्योती कुठून प्रज्वलित होते तर प्राण शक्तीच्या सहाय्याने दिप्त रहाते. जर ही विझली तर आत्मग्लानी येते परिणामी देहत्यागाला अशुभ मानली जाते. तिसरा निकष म्हणजे बाह्य जगतात शुक्ल पक्ष सुरु असला पाहिजे. चौथा निकष म्हणजे दिवस सुरु असला पाहिजे (अर्थात रात्र नको). आणि पाचवा  निकष म्हणजे उत्तरायणाच्या सहा महिनांपैकी कोणतातरी एक सुरु असायला हवा.  ज्ञानेश्वर हे पाच निकष खालील प्रकारे विषद करतात :

एथ अग्नी हें पहिलें पायतरें । ज्योतिर्मय हें दुसरें ।
दिवस जाणें तिसरें । चौथें शुक्लपक्ष ॥
आणि सामास उत्तरायण । तें वरचील गा सोपान ।
येणें सायुज्यसिद्धिसदन । पावती योगी ॥

ज्ञानेश्वरांच्या शब्दांत सांगायचे तर अग्नि ही पहिली पायरी आणि उत्तरायण ही सर्वात वरची पायरी. जे ज्ञानी वरील गोष्टींची पूर्तता होत असतांना देह ठेवतात ते ब्रह्मस्वरूपी लीनता प्राप्त होते. येथे एक लक्षात ठेवले पाहिजे की वरील निकष हे ब्रह्मविद लोकांसाठी आहेत. ब्रह्मविद म्हणजे सोप्या भाषेत योगी किंवा ज्ञानी लोकं. अर्थात हे निकष सर्वसामान्य लोकांसाठी नाहीत हे उघड आहे. भीष्म हे अर्थातच ज्ञानी असल्यामुळे त्यांनी उत्तरायण सुरु होण्याची वाट पाहिली.

उत्तरायण काळाच्या बरोब्बर विरुद्ध अवस्था दक्षिणायन काळात होत असते. ज्ञानेश्वरीत त्यासंबंधी सुद्धा विवेचन केलेलं आहे. विस्तारभयास्तव येथे देत नाही. विषयाची आवड असलेल्या साधकांनी ज्ञानेश्वरी अध्याय आठवा पहावा. अजपा साधकांनी नाथ पंथाचे पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी हे तत्व येथे अवश्य लावावे. ज्याप्रमाणे बाहेर सूर्य आणि उत्तरायण आहे त्याप्रमाणे ते या मानव पिंडातही आहे. भगवान दत्तात्रेयांचा याविषयीचा गूढ उपदेश सुद्धा नीट ध्यानी घ्यावा. ही योगगम्य स्थिती आपापल्या सदगुरूंकडून नीट समजून घ्यावी म्हणजे ज्ञानेश्वर नक्की काय म्हणत आहेत ते ध्यानी येईल.

 तर मकर संक्रांतीची आणि उत्तरायणाची पार्श्वभूमी थोडक्यात ही अशी आहे. असो.

पुढल्या आठवड्यात मंगळवारी म्हणजे १६ जानेवारी २०१८ रोजी मौनी अमावास्या आहे. खरंतर अमावास्येची सुरवात मंगळवारी आणि समाप्ती बुधवारी आहे. नुकतंच काही दिवसांपूर्वी मी सोमवती अमावास्येविषयी लिहिलं होतं त्यामुळे पुनरावृत्ती करत नाही. असं म्हणतात की मौनी अमावास्या ही योगशास्त्रातील मौन व्रताचे महत्व अधोरेखित करण्यासाठीचे एक निमित्त आहे. योगशास्त्रात मौनाचे अतिशय महत्व आहे. बहुतेक सर्व योगसाधक आयुष्यातला काही काळ तरी मौनात व्यतीत करत असतात. काही तर अनेक महिने किंवा वर्षं हे व्रत अंगिकारतात.

आधुनिक काळात सर्वसामान्य माणसांचे जीवन अतिशय बेताल आणि एककल्ली झालेले आपल्याला दिसते. दिवस सुरु झाला की जी सांसारिक जबाबदाऱ्यांची आणि पैशाची शर्यत सुरु होते ती थेट दिवस संपेपर्यंत. आजकाल कोकांकडे पैसा मुबलक असतो. नसते ती मनःशांती आणि आंतरिक समाधान. दिवसभर शरीर, प्राण, मन, बुद्धी, आणि अहंकार यांची अवष्ठा घाण्याला जुंपलेल्या बैलासारखी करून टाकतात. वैखरी वाणी या पाच तत्वांची अवस्था जणू प्रकट करत असते. जो माणूस अतिशय बडबड करतो त्याचे चित्त चंचल बनते. त्याचबरोबर या बडबड करण्यामध्ये उर्जा वाया जाते ती वेगळीच. जो माणूस बडबड करत असतो त्याचे शरीर, प्राण, मन, बुद्धी आणि अहंकार सुद्धा सैरभैर होतात.

जर मौन व्रत धारण केले तर आपासून वृत्ती अंतर्मुख बनते. प्राणशक्ती निवृत्ती मार्गाला लागते. मन विषय-वासनांपासून आवरले जाते. बुद्धी आत्मतत्वाचा विचार करू लागते. मौन व्रत हे वरकरणी वाटायला सोप्पे असले तरी यथायोग्य आचरायाला महाकठीण. मी माझ्या अजपा योगाच्या स्टुडंटसना नेहमी सांगतो की तुम्ही मित्र-परिवाराबरोबर सुट्टीवर जाता तसच एक-दोन दिवस तरी स्वतःसाठी काढून मौनात जा. निसर्गाच्या सान्निध्यात जा. घड्याळ, मोबाईल, फेसबुक असल्या गोष्टींपासून स्वतःला काही काळ तरी अलिप्त ठेवा. फक्त मौन पाळा आणि त्या जोडीला साक्षीभाव जागृत असुदे. मग अजपा ध्यान करतांना एकही श्वास जाणीवेच्या पकडीतून निसटणार नाही. मग निसर्गाच्या पानापानांत तुम्हाला ईश्वरी चैतन्य खेळत आहे हे प्रत्यक्ष जाणवेल!

असो. तर मौन अमावास्या आपल्या जुन्या काळच्या ऋषीमुनींनी याच साठी सांगितली आहे. मौनाबरोबर यावेळी तीर्थस्नान, दान वगैरेही करतात पण अजपा योगाच्या दृष्टीने मौन हाच खरा मुख्य फायदा आहे. अजपा साधकांनी तीर्थस्नान सुद्धा योगगम्य अर्थानेच घ्यायला हवे. गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्या मानव पिंडात इडा, पिंगला आणि सुषुम्ना रूपाने विद्यमान आहेत. त्यांचा त्रिवेणी संगम म्हणजे काय, तो कसा होतो आणि त्यात कसे न्हावून निघावे हे सर्व आपापल्या गुरुमुखातून नीट श्रवण करावे आणि तीर्थस्नानाचे खरे रहस्य जाणून घ्यावे.

दासबोधातील खालील ओव्या सर्वच अध्यात्ममार्गी साधकांना त्या दृष्टीने समर्पक वाटतील :

उच्चरेंविण जे शब्द । ते जाणावे सहजशब्द । प्रत्ययायेती परंतु नाद । कांहींच नाहीं ॥
ते शब्द सांडून बैसला । तो मौनी म्हणावा भला । योगाभ्यासाचा गलबला । याकारणें ॥
येकांतीं मौन्य धरून बैसला । तेणें कोण शब्द जाला । सोहं ऐसा भासला । अंतर्यामीं ॥
धरितां सो सांडितां हं । अखंड चाले सोहं सोहं । याचा विचार पाहातं बहु । विस्तारला ॥

सर्व योगमार्गी साधकांना मकर संक्रांतीच्या आणि मौनी अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे चोवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून अजपा योग विषयक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 13 Jan 2018
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates