Untitled 1

कुंडलिनी योगातील त्रिबंध आणि ग्रंथी भेदन

कुंडलिनी योगमार्गावर अनेक साधकांच्या मनात नेहमी असं चित्र रंगवलेलं असतं की हा मार्ग म्हणजे सत-चित-आनंद, सुखमय आणि दु:खरहित आयुष्याची गुरुकिल्ली वगैरे वगैरे. योगसाधनेची परिणती ही अंततः सत-चित-आनंद अवस्थेत होत असली तरी या वाटचालीत अशी काही वळणं, असे काही टप्पे येतात जे सुखमय असत्तातच असे नाही. हे टप्पे जरी तात्कालिक असले, कायमस्वरूपी रहाणारे नसले तरी त्यांतून साधकाला संयम आणि दृढनिश्चय यांच्या सहाय्यानेच तरुन जावे लागते. ह्या टप्प्यांवर कठीण प्रसंगांशी न डगमगता सामना करावा लागतो. अशाच टप्प्यांपैकी एक म्हणजे ग्रंथी भेदन.

कुंडलिनी योगशास्त्रातील कुंडलिनी आणि चक्रे ही तर आजकाल सुपरिचित झाली आहेत. कुंडलिनी जागृत होणे हा फक्त एक टप्पा आहे. जागृत कुंडलिनीला एकेका चक्रावरून सहस्रारापर्यंत नेणे हा अजून एक टप्पा आहे. या दोन प्रक्रियांत अडथळा आणणाऱ्या ज्या अनेक गोष्टी आहेत त्यांतील एक महत्वाची म्हणजे ग्रंथी. ग्रंथी म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर गाठ. सुषुम्ना मार्गावर अशा तीन ग्रंथी आहेत - ब्रह्म ग्रंथी, विष्णू ग्रंथी आणि रुद्र ग्रंथी.

आपण दोरीला गाठ का बरे बांधतो. एखाद्या गोष्टीला पुढे जाण्यापासून किंवा निसटण्यापासून रोखण्यासाठी दोरीला आवश्यक त्या ठिकाणी गाठ घातली जाते. सुषुम्ना मार्गावरील या तीन ग्रंथी सुद्धा हेच कार्य करतात. कुंडलिनी मूलाधारात विसावलेली आहे. तिला सहस्रारापर्यंत सहजासहजी पोहोचता येत नाही कारण या ग्रंथी तिच्या मार्गावर "गाठी" मारून ठेवतात. अर्थात या ग्रंथी किंवा गाठी म्हणजे स्थूल शरीराचा भाग नाही. शरीरातील अंतर्स्त्राव करणाऱ्या ग्रंथींचा आणि या तीन ग्रंथींचा काही संबंध नाही. मुळात या तीन ग्रंथी म्हणजे विशिष्ठ बिंदू नाहीत तर दोन चक्रांमधील विशिष्ठ जाणीवेच्या कक्षेचा पट्टा आहेत.

ब्रह्म ग्रंथी म्हणजे मुलाधार आणि स्वाधिष्ठान यांमधील पट्टा. विष्णू ग्रंथी म्हणजे स्वाधिष्ठान ते अनाहत यांतील पट्टा. त्याचप्रमाणे रुद्र ग्रंथी म्हणजे अनाहत ते आज्ञा यांमधील पट्टा. आता या ग्रंथींच्या मूळ अस्तित्वाचे कारण असते माणसाचे जन्मोजन्मींचे संचित संस्कार. त्या संस्कारांच्या आधारावरच या ग्रंथींची गाठ "सैल" की "घट्ट" ते ठरत असते. एक उदाहरण देतो. काही लोकांना चमचमीत खाद्यपदार्थ अतिशय आवडतात. तर काहीना खाण्यापिण्यात फारसा रस नसतो. जे मिळेल ते मुकाट्याने ग्रहण करतात. आता स्वभावातील हा फरक का आला? तर रसनेवर ज्याचे जसे संचित संस्कार होते त्यानुसार या जन्मी तो स्वभाव गुणधर्म घटीत झाला. त्यामुळे पहिल्या व्यक्तीची रसनेची गाठ "घट्ट" आणि दुसऱ्याची "सैल" आहे असे आपण म्हणू शकतो. हे केवळ एक सोपे उदाहरण सांगितले. अशा अनेक गोष्टींनी ग्रंथींच्या जडणघडणीत हातभार लावलेला असतो. ब्रह्म ग्रंथी ही माणसाच्या मुलभूत व्यक्तिमत्वाशी निगडीत गोष्टी जसं काम, जीवनासक्ती, भोगलालसा, प्रजनन इत्यादी गुणांशी निगडीत आहे. विष्णू ग्रंथी ही सर्वप्रकारचा सुखोपभोग, रसना, भरण-पोषण आणि आयुष्याची गाडी पुढे हाकण्याशी संबंधी ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्याशी निगडीत आहे. रुद्र ग्रंथी ही मानवी भावभावना जसं प्रेम, द्वेष, अहंकार, राग, लोभ, मोह वगैरे त्यांच्याशी निगडीत आहे.

वरील विवेचनावरून संस्कार आणि संस्कारक्षय यांचं महत्व तुम्हाला कळू शकेल. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत जे कुंडलिनी जागृतीचं वर्णन केलेलं आहे त्यात या ग्रंथींचा विस्ताराने उल्लेख नसला तरी कुंडलिनी "संस्कारांची आटणी" कशी बनते त्याचा उल्लेख आहेच. मनावर जन्मोजन्मी साचलेली संस्कारांची पुटं काढून टाकणं हे सहज सोपं कार्य नाही. येथेच "ग्रंथी भेदन" महवाची भूमिका बजावते. ग्रंथी भेदनाची प्रक्रिया काहीशी गुंतागुंतीची आहे. साधकाच्या संचित संस्कारांनुसार ही प्रक्रिया प्रसंगी क्लेशदायक किंवा कष्टप्रद ठरू शकते. अमुक एक आसन किंवा प्राणायाम केला की झाले ग्रंथी भेदन असा प्रकार नाही. या प्रक्रियेला अनेक कंगोरे आणि बारकावे आहेत. इथेच साधकाचा कस लागतो. पुढे जाण्यापूर्वी हे सांगितले पाहिजे की ग्रंथी भेदन हा विषय प्रगत आणि "तयार" साधकांसाठी आहे. नवीन साधकांनी उगाचच घाबरून जाण्याचे कारण नाही.

ग्रंथी भेदनाचे मार्ग किंवा उपाय विस्ताराने विषद करणे हा काही आजच्या लेखाचा उद्देश नाही. आज केवळ ग्रंथी भेदनाच्या कामी अत्यंत उपयुक्त असलेल्या तीन मुद्रांचे थोडक्यात विवरण करणार आहे. सर्व हठ ग्रंथांत दहा मुद्रा कुंडलिनी जागृतीच्या दृष्टीने विशेष महत्वाच्या मानल्या गेल्या आहेत. त्यांतील तीन मुद्रा - मूलबंध, उड्डीयान बंध आणि जालंधर बंध - या ग्रंथी भेदनासाठी उपयुक्त आहेत. साधकांनी येथे लक्षात ठेवायची गोष्ट अशी की आधुनिक काळातील योगसाहीत्यात ह्या तीन मुद्रा "बंध" म्हणून वेगळ्या विषद केल्या जातात परंतु मूळ प्राचीन ग्रंथांनुसार त्या "मुद्रा" च आहेत.

मूलबंध मुद्रा ही मुलाधाराशी आणि पर्यायाने ब्रह्म ग्रंथीशी निगडीत आहे. नाथ सिद्ध श्रीगोरक्षनाथ मुलबंधाविषयी म्हणतात -

पार्ष्णिभागेन सम्पीड्य योनिमाकुष्चयेद् गुदम् । अपानमूर्ध्वमाकृष्य मूलबन्धोऽभिधीयते ॥

याचा सोप्या भाषेत अर्थ असा की पायाची टाच शिवण स्थानी घट्ट दाबून धरावी आणि मग गुदद्वाराचे आकुंचन करून अपान वायू वर आकर्षित करावा. असं केल्याने जी मुद्रा धारण केली जाते ती म्हणजे मूलबंध.

योगग्रंथांत मणिपूर चक्राशी निगडीत उड्डीयान बंध खालील प्रकारे विषद करण्यात आला आहे.

उदरात्पश्चिमे भागे ह्यधो नाभेर्निगद्यते। उड्डीयनस्य बन्धोऽयं तत्र बन्धो विधीयते ॥

याचा थोडक्यात अर्थ असा की नाभि खालील पोटाचा भाग बलपूर्वक आत खेचून पाठीच्या मागील बाजूला नेणे म्हणजे उड्डीयान बंध.

विशुद्धी चक्राशी निगडीत जालंधर बंध खालील प्रकारे विषद करण्यात आला आहे.

कण्ठमाकुञ्च्य हृदये स्थापयेच्चिबुकं दृढम् । बन्धो जालन्धराख्योऽयं जरामृत्युविनाशकः ॥

कंठाचे आकुंचन करून हनुवटी गळ्याच्या खोबणीत घट्ट दाबून धरल्याने जालंधर बंध नामक जरामृत्युचा विनाश करणारी मुद्रा बनते.

आता गंमत बघा. जर तुम्ही आजकालच्या एखाद्या योगसंस्थेचा हठयोग विषयक क्लास लावलात तर त्यात तुम्हाला या तीन मुद्रा "बंध" म्हणून हमखास शिकवल्या जातील. एखाद्या चांगल्या योगासनांच्या पुस्तकातून सुद्धा तुम्हाला त्यांची शारीरिक स्थिती शिकता येईल. अनेक योगाभ्यासक या तीन बंधांचा अभ्यास नित्यनेमाने करतात आणि त्यांचे शारीरिक लाभही मिळवतात. परंतु यांपैकी बहुतेकांना या मुद्रांचा वापर ग्रंथी भेदनासाठी करता येत नाही. याचं कारण असं की प्राचीन योगग्रंथांत या मुद्रांची केवळ शारीरिक स्थितीच थोडक्यात वर्णन केलेली आहे. त्यांद्वारे ग्रंथी भेदन कसे साधायचे किंवा त्यांचा ग्रंथी भेदनासाठी वापर कसा करायचा त्याबाबतीत प्राचीन ग्रंथांत गोपनीयता पाळलेली आहे. एक साधक म्हणून एक तर ते रहस्य तुम्हाला स्वतःच्या साधनेच्या आणि अनुभवाच्या जोरावर उलगडावे लागते किंवा एखाद्या सद्गुरूच्या अथवा जाणकाराच्या मदतीने त्याप्रत पोहोचावे लागते. प्राचीन योगग्रंथानी आखलेल्या सीमारेषेचा आदर करत येथे त्याविषयी फार खोलात काही विषद करत नाही.

हे सर्व सांगण्याचे करण्याचे कारण हे की ज्याला कुंडलिनी योगमार्गावर खरी प्रगती साधायची आहे त्याने या मार्गातील अवघड वळणांची माहिती सुद्धा अवश्य करून घ्यावी. फक्त वरवरच्या गोष्टींवर भुलून न जाता स्वतःला योगशास्त्राच्या दृष्टीने कसे घडवता येईल ते पहावे. उथळपणा टाकून खोल ज्ञानगर्भ गाभ्यात दृढ निश्चयासहित उडी घ्यावी. तेंव्हाच काही मौल्यवान मोती हाती येतील.

असो.

सर्व योगाभ्यासी वाचक संचित संस्कारांची आटणी करून कुंडलिनी योगमार्गावर आरूढ होवोत या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 23 December 2019