Untitled 1

कुंडलिनीच्या श्यामा असण्याचा गूढ योगगम्य अर्थ

कुंडलिनी योगशास्त्रात कुंडलिनीला अनेक नावांनी ओळखले जातं. त्यांपैकी एक नाव म्हणजे श्यामा. वरकरणी पाहता श्यामा या शब्दाचा अर्थ काळी-सावळी किंवा काळ्या वर्णाची असा भासेल.  परंतु त्याला कुंडलिनी योगशास्त्रात काही सूक्ष्म अर्थ आहे. तोच या लेखात थोडक्यात जाणून घेऊ.

श्यामा या शब्दाचा अर्थ विस्ताराने पाहण्यापूर्वी प्रथम हा शब्द योगाग्रंथांत कसा वापरला गेला आहे ते पाहू. उदाहरण घ्यायचं झालं तर षटचक्र निरुपण नामक ग्रंथातील हा खालील श्लोक बघा :

ध्यायेत् कुण्डलिनीं देवीं स्वयंभु लिंग वेष्टिनीम्।
श्यामां सूक्ष्मां सृष्टि रुपां सृष्टि स्थिति लयात्मिकम्।
विश्वातीता ज्ञान रुपां चिन्तयेद ऊर्ध्ववाहिनीम्।

वरील श्लोकात कुंडलिनीचे ध्यान कसं करावे ते थोडक्यात सांगितले आहे. कुंडलिनी मुलाधार स्थित स्वयंभू लिंगाला वेढे देऊन बसलेली आहे. कुंडलिनी शक्ती कशी आहे तर ती श्यामा आहे. सूक्ष्म आहे, चराचर सृष्टीत भरून राहिलेली आहे. ती सृष्टी, स्थिती आणि लय यांचे आदिकारण आहे.  विश्वाच्याही पलीकडे असलेली ती ज्ञानरुपिणी आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे ती ऊर्ध्व दिशेला वाहणारी आहे.

कुंडलिनीच्या या ध्यान प्रक्रियेत फार खोलात शिरण्याचे प्रयोजन नाही. तो एका वेगळ्या लेखाचा विषय आहे. या लेखाच्या दृष्टीने येथे कुंडलिनी साठी योजलेला श्यामा हा शब्द महत्वाचा आहे.

वरकरणी पाहता श्यामा म्हणजे काळी-सावळी किंवा काळ्या वर्णाची असा समज होणे साहजिकच आहे. कुंडलिनी ही आदिशक्तीचेच एक रूप असल्याने शिव भार्या असलेल्या काली मातेशी तिचा संबंध योगग्रंथांत अनेक वेळा जोडला गेला आहे. तो बरोबरही आहे. परंतु श्यामा या शब्दाला केवळ तेवढाच स्थूल अर्थ नाही. त्याला काही खोल अर्थ आहे.

संस्कृत ग्रंथांत श्यामा या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारे काही काव्यमय श्लोकही आहेत. उदाहरणादाखल खालील श्लोक पहा :

शीते सुखोष्णसर्वाङ्गी ग्रीष्मे च सुखशीतला।
तत्पकाञ्चनवर्णाभा सा स्त्री श्यामेति कथ्यते॥

वरील श्लोकांचा थोडक्यात अर्थ असा की श्यामा म्हणजे अशी स्त्री जिचं शरीर उन्हाळ्यात शीतल आणि थंडीत उष्ण असतं आणि जिची कांती तप्त सोन्याच्या वर्णासमान असते.

आता षटचक्र निरुपण मधील मूळ श्लोकाचा विचार करता हे लक्षात येईल की - कुंडलिनीला स्त्रीरूप मानलं गेलं आहे, कुंडलिनी उन्हाळ्यात शीतल आणि थंडीत उष्ण अशी आहे, आणि ती तप्त सोन्यासारख्या तेजस्वी वर्णाची आहे.

श्यामा शब्दाचा हा अर्थ योगगम्य कुंडलिनीच्या बाबतीत जरासा विचित्र वाटण्याचा संभव आहे. परंतु येथे हे लक्षात घेणे गरजेचे आहे की कुंडलिनी योगशास्त्राची पाळमूळ आगम-निगम शास्त्रात खोलवर रुतलेली आहेत. कुंडलिनी ही शिवाची शक्ती असल्याने सर्वच योगग्रंथांनी तिला स्त्रीरूप मानले आहे. कुंडलिनी ही आदिशक्ती असल्याने सर्वश्रेष्ठ आणि एकमेवद्वितीय आहे. त्यामुळे हे ओघाने आलेच की स्त्रीरूपातील सर्व उत्तम मानली जाणारी विशेषणे आदिशक्तीत ओतप्रोत भरलेली आहेत. किंबहुना ती विशेषणे आदिशक्तीपासूनच स्फुरलेली आहेत. भगवान शंकराची अर्धांगिनी असलेल्या देवीच्या स्वरूपाचं वर्णन करतांना, तिच्या दैवी सौंदर्याचं वर्णन करतांना हे विशेषण वापरलं गेलं आहे.

अनेक योगग्रंथांत कुंडलिनीचे वर्णन सुवर्णासारखी किंवा अतिशय तेजस्वी असे केलेलं आहे. उदाहरणार्थ, ज्ञानेश्वरीतील काही ओव्या पहा :

तया हृदयाच्या परिवरीं । कुंडलिनिया परमेश्वरी । तेजाची शिदोरी । विनियोगिली ॥
हो कां जे पवनाची पुतळी । पांघुरली होती सोनसळी । ते फेडूनियां वेगळी । ठेविली तिया ॥
नातरी वायूचेनि आंगें झगटली । दीपाची दिठी निवटली । कां लखलखोनि हारपली । वीजु गगनीं ॥

वरील उदाहरणावरून कुंडलिनी "तप्त सोन्याच्या वर्णासारखी" म्हणजे काय त्याची सहज कल्पना येईल.

आता "उन्हाळ्यात शीतल आणि थंडीत उष्ण" याचा सूक्ष्म अर्थ काय बरे? याचा सरळ अर्थ घ्यायचा तर कोणत्याही ऋतूत आनंददायक असा होईल.  पण त्याचा कुंडलिनीशी संबंध काय? तर जागृत झालेली कुंडलिनी साधकाच्या आयुष्यातील सुख आणि दु:ख अशा दोन्ही प्रसंगी साधकाला हितकारक, आल्हाददायक किंवा आनंददायकच असते. एकदा कुंडलिनी जागृत झाली की साधकाचे मन सुख-दु:खांच्या द्वन्द्वांतून बाहेत येऊ लागते. तो कुंडलिनी शक्तीपुढे जसा जसा लीन होत जातो तसा तसा त्याचा स्थितप्रज्ञ भाव वाढीस लागतो.

जवळ जवळ सर्वच साधकांचा हा अनुभव असतो की साधनेच्या सुरवातीला थोडं जरी काही मनाविरुद्ध झालं तरी मन षडरीपूंनी व्यापून जातं. कुंडलिनी ही अध्यात्म शक्ती आहे. तसेच ती देवात्म शक्ती आहे. जेंव्हा ही आत्म्याची किंवा परमात्म्याची शक्ती जागृत होते तेंव्हा ती साधकासाठी मातृवत बनते. त्याला या संसार सागरातून अलगद बाहेर काढण्याचं कठीण कार्य ती स्वतःच्या हातात घेते. साधक संसारी सुख-दु:खांचा अनुभव घेत असतांना धडपडत असतो, चुकत असतो, पावलोपावली अडखळत असतो. त्याला जगदंबा कुंडलिनी आईप्रमाणे जपते. प्रत्येक आईची इच्छा असते की आपला मुलगा नेहमी सुखी असावा. तिच्या मनी तोच एक ध्यास असतो. कुंडलिनीही अशाच प्रकारे साधकाचा सांभाळ करते. साधक भौतिक आनंदात रमत असला तरी कुठेतरी ती त्याची आध्यात्मिक उन्नतीची इच्छा जागृत ठेवते. तो भौतिक सुखांच्या जंजाळात गुरफटणार नाही याची काळजी घेते. त्याला वेळोवेळी जगाच्या नश्वरतेची आठवण करून देऊन योगमार्गावरून पदच्युत होण्यापासून वाचवते.

तर हा सगळा गुढार्थ श्यामा या एका शब्दात सामावलेला आहे. प्राचीन काळी लिहिलेले योगग्रंथ आजच्या काळात किचकट वाटतात खरे पण त्यात केला गेलेला सूक्ष्म आणि सखोल विचार सर्वच कुंडलिनी योगसाधकांना फार मोलाचा आहे.

अर्थात हा सर्व अनुभवगम्य विषय आहे. निव्वळ पुस्तकी पांडित्य ही अनुभूती कदापि देऊ शकणार नाही. अजपा योग किंवा कुंडलिनी जागरणाचे जे अन्य मार्ग आहेत त्यांपैकी एकाचे तरी प्रामाणिकपणे यावज्जीवन आचरण आणि अनुशीलन करणे हाच एकमेव तरणोपाय आहे.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 16 January 2017