Untitled 1

वाट मिळालेला योगी

लवकरच गुरुपौर्णिमा येत आहे. त्या प्रीत्यर्थ मित्रपरिवाराच्या आणि वाचकांच्या कल्याणाची इच्छा मनी धरून नुकतेच गुरुचरित्राचे पारायण केले. दत्त गुरूंच्या कृपेने ते यथास्थित पार पडले.

 त्या निमित्ताने सहज एक गोष्ट आठवली. गोष्ट आहे छोटीशीच पण फार महत्वाची आहे....

एकदा एका आश्रमात त्या आश्रामातले साधक संध्याकाळच्या आरतीला जमले होते. आरती झाल्यावर त्यांच्यात योग-अध्यात्ममार्गा विषयीच्या गप्पा सुरू झाल्या. विविध विषयांवर चर्चा, वाद-विवाद, कोणाचे मत बरोबर आणि कोणाचे चूक, आपल्याला अध्यात्ममार्गाची कशी सखोल माहिती आहे त्याचे प्रदर्शन, आपापली "फिलॉसोफी" दुसर्‍याला पटवण्याचे प्रयत्न, एकमेकांचे मीठ-मसाला लावलेले किस्से अशा अनेक गोष्टींचा फड रंगू मागला. हे सर्व घडत असताना एक साधक मार्ग एका कोपर्‍यात शांतपणे बसला होता. त्याला या गप्पांमध्ये काही रस दिसत नव्हता. ते पाहून उपस्थितांपैकी कोणीतरी त्याला विचारले - "आपणही साधक आहात ना? मग आपल्याला या गप्पांमध्ये रस नाही?" त्यावर तो स्मितहास्य करत म्हणाला - "हो. मी ही एक साधक आहे पण वाट मिळालेला."

आज अध्यात्मामार्गावर हे असेच चित्र जागोजागी दिसते. केवळ पुस्तकी "फिलॉसोफी" च्या सहायाने आपले पांडित्य सिद्ध करण्यास अनेक साधक फार उत्सुक असतात. असे फार थोडे साधक असतात ज्यांना "वाट मिळालेली" असते. एकदा का वाट मिळाली की वाद-विवाद, निरर्थक पोकळ चर्चा, आपले ते बरोबर आणि दुसर्‍याचे ते चूक ही वृत्ती अशा सर्व गोष्टी थांबतात. वाट मिळालेला साधक आपल्या अंतरंगात समाधानी असतो. तो भले अजून साक्षात्कारी वगैरे नसेल पण आपल्या मार्गाविषयी तो पूर्णतः convinced असतो. त्याला अन्य कोणाच्या philosophy ची गरजच उरत नाही.

भगवान दत्तात्रेय सर्वांना "वाट मिळण्यास" सहाय्य करोत हीच त्यांच्या चरणी विनम्र प्रार्थना.

 


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 19 July 2013


Tags : योग अध्यात्म साधना

Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates