Untitled 1

अंतरीचे गुज, बोलू ऐसे काही। वर्ण व्यक्त नाही, शब्द शून्य।।

एकदा गजानन महाराज आपल्या एका शिष्याला म्हणाले - "आज माझा एक बंधू येणार आहे. सगळं नीट झाडून स्वच्छ करून ठेव. तो फार कर्मठ आहे. जरा काही इकडचं तिकडे झालेलं त्याला खपणार नाही. जमदग्नीचा अवतार आहे जणू."

शिष्याला काही कळेना - कोण बंधू? असा न सांगता अचानक कसा येणार आहे? महाराजांना कसं माहीत की तो येणार आहे? तरी त्याने गुरु आज्ञेमुळे सगळी साफसफाई करून ठेवली.

दुसऱ्या दिवशी अचानक परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामी हजर झाले. त्यांची आणि गजानन महाराजांची क्षणभर नजरानजर झाली. दोघेही प्रसन्न हसले. केवळ काही क्षण.... आणि मग टेंबे स्वामी म्हणाले - "बरे तर. जाऊ मी आता?" गजानन महाराजांनी मान डोलावली आणि टेंबे स्वामी आले तसे निघून गेले.

शिष्य अवाक....

दोन महात्म्यांची ही अद्भुत भेट... काय विलक्षण असेल नाही ?!

उगीच लंब्याचौ्ड्या बाता नाहीत. तू श्रेष्ठ की मी श्रेष्ठ त्याचं प्रदर्शन नाही. आपापल्या मार्गाविषयी दुराग्रह नाही. कृत्रिम शिष्ठाचार नाहीत.

हा प्रसंग वर्णन केला आहे "गजानन विजय" च्या १९ व्या अध्यायात. मूळ ओव्या खालीलप्रमाणे आहेत :

अरे बाळा उदयिक । माझा बंधु येतो एक । मजलागीं भेटण्या देख । त्याचा आदर करावा ॥७०॥
तो आहे कर्मठ भारी । म्हणून उद्यां पथांतरीं । चिंध्या न पडूं द्या निर्धारी । अंगण स्वच्छ ठेवा रे ॥७१॥
चिंधी कोठें पडेल जरी । तो कोपेल निर्धारी। जमदग्नीची आहे दुसरी । प्रतिमा त्या स्वामीची ॥७२॥
तो कर्‍हाडा ब्राह्मण । शुचिर्भूत ज्ञानसंपन्न । हें त्याचें कर्मठपण । कवचापरी समजावें ॥७३॥
ऐसें बाळास आदलें दिवशीं । सांगते झाले पुण्यराशी । तों एक प्रहर दिवसासी । स्वामी पातले ते ठायां ॥७४॥
एकमेकांसी पाहतां । दोघे हंसले तत्त्वतां । हर्ष उभयतांच्या चित्ता । झाला होता अनिवार ॥७५॥
एक कर्माचा सागर । एक योगयोगेश्वर । एक मोगरा सुंदर । एक तरु गुलाबाचा ॥७६॥
एक गंगाभागीरथी । एक गोदा निश्चिती । एक साक्षात् पशुपती । एक शेषशायी नारायण ॥७७॥
स्वामी जेव्हां मठांत आले । तेव्हां गजानन होते बैसले । आपल्या पलंगावरी भले । चिटक्या करानें वाजवीत ॥७८॥
स्वामी येतां चिटकी थांबलि । दृष्टादृष्ट दोघां झाली । तैं स्वामींनीं विचारिली । आज्ञा परत जावया ॥७९॥
फार बरें म्हणून । गजाननें तुकविली मान । स्वामी गेले निघून । बाळास कौतुक वाटलें ॥८०॥

 

सगळंच अद्भुत आणि अतर्क्य... कोणीतरी एका अभंगात छान म्हटलंय - "अंतरीचे गुज, बोलू ऐसे काही। वर्ण व्यक्त नाही, शब्द शून्य।।"


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 04 May 2016


Tags : अध्यात्म कथा