Untitled 1

प. प. वासुदेवानंद सरस्वती महाराजांचे योगरहस्यम आणि मंत्रविधानम   

परमपिता परमेश्वर मानवजातीच्या कल्याणासाठी वेळोवेळी संत-सत्पुरुष निर्माण करत असतो. त्यातही किती वैविध्य असते पहा. कधी तो श्रीमच्छिंद्रनाथ, श्रीगोरक्षनाथ यांसारखे हठयोगी सिद्ध घटीत करतो तर कधी आदी शंकराचार्यांसारखा ज्ञानमार्गी जगद्गुरू पृथ्वीतलावर धाडतो. कधी तो श्रीगजानन महाराज, श्रीस्वामी समर्थ यांसारखे अवधूत वृत्ती जोपासणारे स्वच्छंदी सत्पुरुष निर्माण करतो तर कधी श्रीशंकर महाराजांसारखे अवलिया योगी. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाला अनुसरून तो समाजातील सर्व प्रकारच्या प्रकृतींच्या लोकांचा उद्धार करण्यासाठी संत-सत्पुरुषरुपी दीपस्तंभ वेळोवेळी निर्माण करत असतो.

अशाच एका अवतारी सत्पुरुषाची जयंती या आठवड्यात येत आहे. ते दत्तावतारी सत्पुरुष म्हणजे परमहंस परीव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबेस्वामी महाराज. प. प. वासुदेवानंद सरस्वती म्हणजे साक्षात संन्यास धर्माची कडकडीत वैराग्यमूर्ती. त्यांचे जीवन चरित्र अध्यात्ममार्गी साधकांसाठी प्रेरणादायी तर आहेच पण त्यांचे वैराग्य आणि कमालीची शिस्तबद्ध जीवनशैली पाहून अचंबित व्हायला होते. आदराने आपसूक हात जोडले जातात. मागे एका लेखात मी श्रीगजानन महाराज आणि प. प. वासुदेवानंद सरस्वती महाराज यांच्यातील भेटीच्या प्रसंगाविषयी सांगितले होते. दोन सत्पुरुष बाह्याचरणाने जरी पूर्णतः भिन्न-भिन्न भासत असले तरी प्रत्यक्षात एकाच ईश्वरी तत्वाशी ते कसे "कनेक्टेड" असतात ते पाहून विस्मय दाटल्याशिवाय रहात नाही.

प. प. वासुदेवानंद सरस्वती महाराजांचे अजून एक वैशिष्ठ्य म्हणजे त्यांचे विपुल साहित्य. त्यांनी रचलेली भगवान दत्तात्रेयांची अनेकानेक स्तोत्रे, दत्तमहात्म्य आणि दत्तपुराण सारखे ग्रंथ आपल्या सगळ्यांनाच परिचयाचे आहेत. त्यांचा श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार म्हणून एक मराठी ओवी बद्ध ग्रंथ आहे. वाचायला एकदम साधा सोपा. पण त्याची रचना अशी आहे की प्रत्येक ओवी मधील तिसरे अक्षर घेतले तर भगवत गीतेचा पंधरावा अध्याय तयार होतो. अशा प्रकारची काव्यप्रतिभा पाहून थक्क व्हायला होते. त्यांचे हठयोग या विषयावर सुद्धा प्रभुत्व होते. ते त्यांच्या योगरहस्यम नामक रचनेवरून स्पष्ट दिसून येते. भगवान शंकराचा कुंडलिनी योग जसा अवधूत शिरोमणी दत्तात्रेयांच्या शिकवणीत उतरलेला दिसतो किंवा भगवान दत्तात्रेयांचा कुंडलिनी योग जसा नाथपंथात उतरलेला दिसतो तसाच तो प. प. वासुदेवानंद सरस्वती महाराजांच्या योगरहस्यम मध्ये सुद्धा उतरलेला आहे. कुंडलिनी योगाची अनेक अंगे जसे प्राणायाम, बंध, मुद्रा, नादानुसंधान, धारणा, ध्यान, समाधी इत्यादी गोष्टींचा उहापोह त्यांनी या ग्रंथात केलेला आहे. ग्रंथाच्या शेवटी अनधिकारी व्यक्तीला हा योग देवू नये अशी सूचनाही त्यांनी केलेली आहे.

प. प. वासुदेवानंद सरस्वती महाराजांचा अजून एका रचनेचा येथे उल्लेख करावासा वाटतो. तो म्हणजे मंत्रविधानम नामक मंत्र संग्रह. या ग्रंथात स्वामी महाराजांनी अनेक पारंपारिक मंत्रांचा संग्रह दिलेला आहे. त्यात अनेक देवी-देवतांचे मंत्र दिलेले आहेत जसे भगवान दत्तात्रेय, भगवान शंकर, श्रीकृष्ण, श्रीविष्णू, अन्नपूर्णा देवी, रेणुका देवी वगैरे वगैरे. ह्या ग्रंथाचा उल्लेख अशासाठी केला कारण या ग्रंथाची सुरवात होते "अजपा जपविधान" प्रकरणाने. यात त्यांनी प्राचीन योगग्रंथांत आढळणाऱ्या पारंपारिक अजपा जपाचेच विवरण केलेले आहे. योगशास्त्रात सांगितल्याप्रमाणे अहोरात्र २१,६०० एवढ्या संख्येने होणारा हा जप मुलाधार ते सहस्रार या चक्रांवर किती-किती संख्येने होतो, त्या चक्रांच्या देवता कोणत्या वगैरे पारंपारिक माहिती स्वामी महाराजांनी संस्कृतात दिलेली आहे. अजपा जप हा जरी श्वासांवर होणारा असला तरी अ-जप असूनही एका अर्थी जपच आहे. किंबहुना त्यामुळेच तो सर्वमंत्रांचा मूलमंत्र आहे. प. प. वासुदेवानंद सरस्वती महाराजांसारख्या दिग्गजाला त्याला प्रथम स्थान द्यावेसे वाटले तर ते योग्यच आहे.

असो.

सर्व योगाभ्यासी वाचक अजपारुपी मूलमंत्राच्या नित्य अनुसंधानाने जगदंबा कुंडलिनीची प्रसन्नता प्राप्त करोत या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 19 August 2019