Untitled 1

या जिभेचे काय करायचे?

या लेखाचे शीर्षक वाचून कदाचित तुम्हाला असे वाटेल की जिभेचे चोजले पुरवण्यावर किंवा वायफळ बडबडीवर काही आहे की काय. नाही. त्या विषयी नाही. थोडी वेगळी गोष्ट आहे.

सर्वसाधारण माणूस कोणी डोळे मिटून मांडी घालून बसला की त्याच्या कडे बोट दाखवून म्हणतात की हा ध्यान करत आहे. परंतु ध्यानाचा अभ्यासक असलेल्या व्यक्तीलाच माहित असतं की त्याच्या अंतरंगात नक्की काय सूक्ष्म योगगम्य गोष्टी घटीत होत आहेत.

प्राचीन योग्यांनी ध्यानाच्या प्रक्रियेचा सूक्ष्म आणि सखोल अभ्यास केलेला आहे. ध्यानाची प्रक्रिया अधिकाधिक प्रभावी कशी होईल यासाठी अनेकानेक क्लुप्त्या शोधून काढल्या आहेत. त्यात हाताच्या बोटांची स्थिती, डोळ्यांची स्थिती, पायांची स्थिती, पाठीच्या कण्याची स्थिती अशा विविध गोष्टींचा समावेश होतो. आज जिभेशी संबंधित अशाच काही गोष्टी सांगणार आहे.

मानवी जीभ संपूर्णतः स्नायूंनी बनलेली आहे. आपण म्हणतोच ना की तुझ्या जिभेला काही हाड आहे की नाही. जिभेचे स्नायू लवचिक असल्याने ती लांब करता येते आणि पुढे-मागे-आजुबाजुला फिरवता येते. खात असलेल्या अन्नाचा रसास्वाद घेणे, अन्न गिळणे, बोलणे इत्यादी गोष्टींत जिभेचा वापर होतो. जीभ खालच्या जबड्याला जोडलेली असते. या जोडणीला lingual frenum म्हणतात. या lingual frenum मुळे आपण एका विशिष्ठ मर्यादेपर्यंतच जीभ मागे-पुढे करू शकतो. सर्वसाधारण माणसाला साप, बेडूक, शॅमेलिऑन इत्यादी प्राण्यांप्रमाणे लांबलचक जीभ काही बाहेर काढता येत नाही.

ध्यानाला बसल्यावर संपूर्ण शरीर स्थिरावलेलं असतं. सर्वसाधारणपणे ध्यानमार्गात नवीन असलेल्या व्यक्ती ध्यानाला बसलं की जीभ शिथिल करून खालच्या जबड्यात नैसर्गिक स्थितीत ठेवतात. परंतु काही विशिष्ठ प्रकारे जिव्हा धारण करून ध्यानाची प्रगाढता वाढवता येते. असेच काही प्रकार जाणून घेऊ.

पहिला प्रकार आहे सैलसर आणि सुखकारक जिव्हाबंध. जिव्हाबंधात जिभेचे टोक वरील दंतपंक्तींच्या मागे ठेवले जाते आणि जिभेचा पृष्ठभाग टाळूला घट्ट चिकटवून धरला जातो. त्यानंतर तोंड उघडून जास्तीत जास्त उघडले जाते जेणेकरून lingual frenum वर ताण जाणवेल. अर्थात ध्यानाला बसलेले असतांना हा तोंड उघडण्याचा भाग करणे योग्य नव्हे. तसेच जीभ टाळूवर एकदम घट्ट दाबून धरणेही योग्य नाही. त्यामुळे जबडा असा ठेवावा की वरचा जबडा खालच्या जबड्यावर अगदी अलगद बसलेला असेल. जीभेचा पृष्ठभाग दाब न देता टाळूला चिकटवून धरलेला असेल.

दुसरा प्रकार आहे नभो मुद्रा. या मुद्रेमध्ये जीभ उलटी करून घशाच्या दिशेने ढकलली जाते. उलट केल्यामुळे जिभेचा खालचा भाग टाळूवर दाबला जातो. जिभेचा खालचा भाग वर असल्याने आणि तो टाळूला दाबून धरला जात असल्याने या मुद्रेला नभो मुद्रा म्हणजे वरती, आकाशाकडे जाणारी मुद्रा असे म्हणतात. ही मुद्रा खेचरी मुद्रेची पूर्वतयारी म्हणूनही वापरली जाते. ही मुद्रा कोणालाही थोड्याफार अभ्यासाने सहज करता येण्यासारखी आहे.

तिसरा प्रकार आहे खेचरी मुद्रा. यात जीभ उलटी फिरवून ती कपालकुहरातून कवटीत मेंदूच्या दिशेला घुसवली जाते. या मुद्रेमुळे जड समाधी पटकन लागते. ही मुद्रा पूर्णपणे साधण्यास अत्यंत कठीण आहे. प्राचीन ग्रंथांत ही मुद्रा साधण्यासाठी "लम्बिका योग" सुचवला आहे. यामधे lingual frenum हळू-हळू छेदत जिभेला मोकळे केले जाते. त्याचबरोबर जिभेला लोणी किंवा तत्सम स्निग्ध पदार्थाने दोहन करून, कापडाने जीभ बांधून तिला पुढे खेचण्याचा सराव केला जातो. या अभ्यासामुळे जीभ लांब होते आणि उलटी कपालकुहरात घुसू शकतो. परंतु ह्या अभ्यासात झालेली थोडीशी चूक देखील साधकासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे सर्वसामान्य साधकांनी अशा छेदन, दोहन वगैरे प्रकारात न पडलेलेच बरे.

खेचरी मुद्रा उत्फूर्तपणे घटीत होण्याचा अजून एक प्रकार आहे. कुंडलिनी जागृत झाल्यावर जर साधकासाठी खेचरी मुद्रा आवश्यक असेल तर खेचरी मुद्रा स्वयमेव घटीत होऊ लागते. अशी उत्फूर्त खेचरी होणे अगर न होणे हे सर्वस्वी कुंडलिनीच्या हातात आहे. साधकाने कोणतीही पूर्वतयारी केलेली नसली तरी त्याला ती होऊ शकते. एकदा झाली म्हणजे दरवेळेस होईलच असेही काही सांगता येत नाही. जगन्माता कुंडलिनी ते सर्व ठरवत असते. हा कुंडलिनीचा अगम्य आणि अद्भुत कृपाप्रसादच म्हणावा लागेल. या प्रकारच्या खेचरीचे काही अनुभव सांगण्याची इच्छा होती परंतु आज विस्तारभयास्तव ते शक्य होईल असे वाटत नाही. पुन्हा कधीतरी.

सांगायचा मुद्दा हा की वरील पैकी जिभेची कोणतीही एक स्थिती साधक ध्यानावस्थेत धारण करू शकतो. अर्थात "या जिभेचे काय करायचे?" या प्रश्नाचे उत्तर हे साधकाची तयारी किती झालेली आहे आणि तो ध्यानाची कोणती पद्धती अंगीकारत आहे त्यावर सुद्धा अवलंबून आहे.

असो.

श्रावण महिन्यातील ध्यानाभ्यासात वाचक जिव्हेचा सदुपयोग करून अग्रेसर होवोत या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 29 July 2019
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates