Online Course : Kriya and Meditation for Software Developers || Build your personal meditation routine step-by-step for calm and clear mind, improved focus, and blissful inner connection.

श्रीशंकराची प्रभावी व्रते - का आणि कशी?

पुराणांमधे प्रत्येक देवतेची काही व्रते सांगितली आहेत. शंकरही त्याला अपवाद नाही. सोप्या शब्दात व्रत या शब्दाचा अर्थ आहे धार्मिक नियम. आजकाल स्वतःला आधुनीक विचारसरणीचे म्हणवणारे काही जणं व्रतं-वैकल्यांची टिंगल वा उपहास करताना आढळतात कारण त्यांना त्यामागील योगशास्त्रीय भुमिकाच समजलेली नसते. आपल्याकडे व्रतं ही बरेचवेळा काहीतरी काम्यकर्म मनात धरून केली जातात. जसे आर्थिक उन्नती, पुत्रप्राप्ती, विवाह विषयक, पारिवारीक सुखसमृद्धी इत्यादी. त्यात परत तोडगे वगैरे सांगणारे कुडमुडे तांत्रिक-मांत्रिक यांची भारतात काही कमतरता नाही. हे लोकही अनेकदा लोकांना व्रतं सुचवतात. व्रतांमुळे अशा प्रकारच्या इच्छा किती प्रमाणात पूर्ण होतात हा ज्याच्या त्याच्या विश्वासाचा आणि श्रद्धेचा भाग आहे. योगसाधकाच्या दृष्टीने बघायचे झाले तर काम्यकर्मांची पूर्तता हा व्रतांचा तसा गौण फायदा आहे. व्रतांचे पालन करण्यामागे काही आध्यात्मिक कारणे आहेत जी जास्त महत्वाची आहेत. म्हणुनच तर योगशास्त्रात 'व्रत' हा यम-नियमांमधील एक अविभाज्य घटक आहे. आता व्रतांचे आध्यात्मिक फायदे कोणते? तर पुढील प्रमाणे...

शरीर-मनाला शिस्त लागते

माणसाचा कल हा साधारणतः स्वैर वागण्याकडे असतो. त्याला स्वातंत्र्य हवेसे वाटते. जोवर हे स्वातंत्र्य हे एका मर्यादेत आहे तोवर काही हरकत नाही किंबहुना ते हवेच पण जेव्हा हे स्वातंत्र्य स्वैराचार बनते तेव्हा मात्र आध्यात्मिक प्रगतीला बाधक ठरते. मन विषयवासनांचे गुलाम फार लवकर बनते. एकदा का ते बेफाम उधळले की त्याला आवर घालणे कठीण जाते. व्रतांचे पालन केल्याने आपल्या मनाला काहि काळ तरी वेसण घालण्याचे शिक्षण मिळते. एकदा ही शिस्त लागली की मग साधना आणि योगजीवन जाचक वाटत नाही.

श्रद्धा आणि भक्तीत वाढ

जेव्हा साधक आपल्या इष्टदैवतेचे व्रत करतो तेव्हा त्याच्या भक्तीतही वाढ होत असते. आपण आपल्या इष्टदैवतेसाठी शरीर झिजवतोय ही भावनाच त्याच्या मनाला बळकटी देणारी असते. व्रताच्या निमित्ताने होणारी पूजाअर्चा, स्तोत्रपाठ, जप, आरत्या इत्यादी त्याची श्रद्धा आणि भक्ती वाढवत असतात.

इच्छाशक्तीत वाढ

व्रतामधे शरीर-मनाला वेसण घालावी लागत असल्याने साधची इच्छाशक्ती आपोआपच वाढते. उदाहरणार्थ, व्रत चालू असे पर्यंत कांदा लसूण खायची नाही वा मांसाहार करायचा नाही ही दिसायला जरी क्षुल्लक अशी गोष्ट वाटत असली तरी या नियमाच्या पालनामुळे साधक आपल्या इच्छाशक्तीचा सुयोग्य वापर करून स्व-नियंत्रण करणे शिकतो. व्रत जर एखाद्या इच्छापूर्तीसाठी रण्यात येत असेल तर साधक अत्यंत प्रखर इच्छाशक्तीद्वारे आपली इच्छा वा प्रार्थना परमेश्वरासमोर मांडतो. अशी प्रार्थना पूर्ण होण्याची शक्यता अर्थातच अधिक असते.

उपवासाचे फायदे

अनेक व्रतांमधे उपवास हा महत्वाचा भाग असतो. उपवासाने पचनसंस्थेला आराम मिळतो. शरीराला दुषित पदार्थ बाहेर घालवण्यास वाव मिळतो. आयुर्वेदात जठराग्नीला महत्व देण्यात येते ते त्या करताच. बहुतांशी माणसे आपल्या पोटाला कारखान्यातील यंत्रांप्रमाणे वागवत असतात. काम कधी बन्द नाहीच! निसर्गोपचारामध्ये उपवास हा एक अत्यंत महत्वाचा असा उपचार आहे. प्रयोगांद्वारे उपवासाचे फायदे सिद्ध झालेले आहे. जर एकाद्याला कडक उपवास करणे शक्य नसेल तर फलाहार करावा, रसाहार करावा वा उकडलेल्या भाज्यांचे सेवन करावे. उपवासाच्या नावाखाली एकादशी आणि दुप्पट खाशी हे सर्वथा निषिद्ध आहे. लोकांनी सोयीस्करपणे शोधलेली ती पळवाट आहे. उपवासाचे म्हणून जे पदार्थ खाल्ले जातात जसे बटाटा, तूप, साबुदाणा, शेंगदाणे इत्यादी ते प्रत्यक्षात जास्त उष्मांक (कॅलरीज) देणारे असतात. ते पोटभर हादडून उपवासाचा कणभरही लाभ मिळण्याची शक्यता नसते हे ध्यानात ठेवावे.

कठिण परिस्थितीत जगण्याची सवय

माणुस दैनंदीन जीवनाला सरावून गेलेला असतो. एखादे दिवशी काही वेगळे घडले वा जीवनशैली बदलली की मग तो कसनुसा होतो. व्रतांच्या पालनामुळे मनाला कठीण परिस्थितीत जगण्याची सवय होते. जर कधी अचानक दैनंदीन जीवनात बदल घडला तर जाचक वाटत नाही. योगसाधक जर एकांतवासात जाणार असेल तर ही सवय फार उपयोगी पडते.

सहनशीलतेत वाढ

व्रतांच्या आचरणाने माणसाच्या सहनशीलतेत वाढ होते. तहान, भुक, चव इत्यादी गोष्टी मनासारख्या भागल्या नाहीत तर सर्वसाधारणतः माणूस लगेच चिडतो. योग्याला तसे वागून चालत नाही. योगमार्गावर असे अनेक प्रसंग येतात जेव्हा साधकाला अतिशय धैर्याने आणि सहनशीलतेने त्यांच्याशी मुकाबला करावा लागतो.

श्रीशंकराची काही लोकप्रिय व्रते म्हणजे महाशिवरात्रीचे व्रत, सोमवार व्रत आणि प्रदोष व्रत. आपल्याकडे साधारणतः असा समज असतो की व्रते ही फक्त स्त्रियांनी करायची असतात पुरुषांनी नव्हे. काही व्रतांच्या बाबतीत हे खरे असले तरी सर्वच व्रतांच्या बाबतीत हे खरे नाही. जुन्या काळी स्त्रियांना प्रामुख्याने व्रतांचा उपदेश दिला जात असे कारण त्यावेळच्या रुढीनुसार स्त्रियांना वेदाध्ययन आणि योगसाधना यांचा अधिकार नसे. पतिच्या पुण्यातील अर्धा वाटा पत्नीला मिळतो अशी त्याकाळी समजुत असे. त्यामुळे स्त्रियांनी पतिसेवा आणि व्रते एवढेच करणे त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी पुरेसे आहे असा समज होता. काळानुसार हे चित्र बदलले आहे पण तरीही स्त्रियाच प्रामुख्याने व्रतांचे आचरण करतात असे आजही दिसून येते. असो. आता वर उल्लेखलेली व्रते कशी करायची त्याची थोडक्यात माहिती घेऊ. या विषयी सविस्तर आणि इत्यंभूत माहिती इच्छुकांनी एखाद्या चांगल्या पुस्तकावरून करून घ्यावी.

प्रत्येक महिन्यात शिवरात्री असते परंतू माघ महिन्यातील शिवरात्रीला महाशिवरात्र असे म्हणतात. कोणत्याही मराठी दिनदर्शिकेमध्ये तुम्हाला शिवरात्रीचे हे दिवस सहज सापडतील. महाशिवरात्री व्रत हे अर्थातच माघ महिनातील शिवरात्रीला करतात. माघ वद्य त्रयोदशीच्या रात्रीपासून उपवास सुरू करावा. दुसर्‍या दिवशी म्हणजे चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून स्नानादी उरकावे. मग भक्तीभावाने शिवपूजन करावे. शक्य असल्यास अभिषेक करावा. दिवसभर उपवास करावा. रात्रभर जागरण करावे. शंकराची स्तोत्रे म्हणावी. नामस्मरण करावे. शिवपुराण वाचावे. दुसरे दिवशी सुर्योदयानंतर पुजा विसर्जीत करावी.

सोमवार व्रत तीन प्रकारे करता येते. दर सोमवारी, सोमप्रदोषाच्या दिवशी अथवा सोळा सोमवारी. यात शिवपुजन, दिवसभर उपवास, शिवकथा श्रवण यांचा समावेश असतो. श्रावणी सोमवारी स्त्रिया शंकराला शिवामुठ वाहतात. शिवामुठ म्हणजे पाच मुठी धान्य शंकराला अर्पण करणे. त्यासाठी कोणत्या सोमवारसाठी कोणते धान्य वापरावे ते तुम्हाला दिनदर्शिकेवरून कळू शकेल. योगसाधकाच्या दृष्टीने दर सोमवारी निष्काम मनाने शिवपुजन आणि उपवास करणे उचित आहे.

प्रदोष व्रत त्रयोदशीला करण्यात येते. प्रत्येक महिन्यात दोन वेळा प्रदोष येतो. प्रदोष म्हणजे तिन्हीसांजेची वेळ. सूर्यास्ताच्या साधारण एक तास आधी आणि एक तास नंतर हा वेळ प्रदोष काळ समजला जातो. या दिवशी उपवास करावा. प्रदोषकाळात शिवपूजन करावे. शक्यतो पुजेला बसण्यापूर्वी स्नान करावे व शुभ्र वस्त्रे परिधान करावीत. दुसर्‍या दिवशी पुजा विसर्जीत करावी. प्रदोष व्रत करणार्‍याच्या सर्व इच्छा शंकर-पार्वती अवश्य पूर्ण करतात असे मानले जाते.

एक लक्षात घ्या की वर जरी परंपरेने चालत आलेली व्रते दिली असली तरी योगसाधक निष्काम बुद्धीने एखादा अन्य नियमही व्रत म्हणून आचरू शकतो. जसे दर सोमवारी गरजू व्यक्तीला काही दान देणे, समाजोपयोगी कार्यात सहभागी होणे, एखादा अत्यंत आवडणार्‍या खाद्यपदार्थाचा काही महिने त्याग करणे इत्यादी. व्रते करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवणे मात्र आवश्यक आहे ती म्हणजे व्रते हा काही स्वप्रयत्नांना पर्याय नाही. तेव्हा वैद्यकीय उपचार बंद करून केवळ व्रतवैकल्यानेच बरे होण्याची आशा धरणे, चांगली नोकरी मिळावी म्हणून व्रतांवर विसंबून राहून स्वतःला लायक बनवण्याचा प्रयत्न न करणे, परिक्षेत चांगले गुण मिळावेत म्हणून व्रतांवर भार टाकून अभ्यास मात्र टाळणे अशा गोष्टी निषिद्धच आहेत. असा भोळसटपणा आणि आळशीपणा योगमार्गावर काहीच कामाचा नाही.

काही वेळा अपहासाने असा प्रश्न विचारला जातो की साधक ही व्रते वगैरे करत आहे हे परमेश्वराला समजते तरी का? कोण कुठला साधक जगाच्या कोणत्यातरी कोपर्‍यात बसून व्रतंवैकल्ये करणारा. परमेश्वराला ठावूक तरी आहे का की तो व्रत करत आहे? त्याच्याकडे लक्ष द्यायला देवापाशी वेळ तरी आहे का? याप्रश्नांना उत्तर म्हणून कोठेतरी वाचलेली एक गोष्ट येथे सांगतो. गोष्ट तशी छोटीशीच पण मोठी उद्बोधक आहे.

जुन्या काळची गोष्ट. एका गावात एक वृद्ध माणूस रहात होता. गावातले सर्वजण त्याला बाबाजी म्हणत असत. वयापरत्वे बाबाजींना दोनही डोळ्यांना मोतीबिंदू झाले. त्याकाळी आजच्या सारखी शस्त्रक्रिया वगैरे नव्हती. त्यामुळे हमखास गुण देणारे उपचार असे काही नव्हतेच. परिणामी बाबाजींना अंधत्व आले. रोज गावाबाहेरच्या शिवमंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा बाबाजींचा नेम होता. आता त्यासाठी दुसर्‍यावर अवलंबून रहाण्याची वेळ आली. रोज कोणाला ना कोणाला तरी ते विनंती करत असत आणि कसेबसे शिवमंदिरात पोहोचत असत. लोकंही त्यांच्या वयाचा मान ठेवून त्यांना 'नाही' म्हणत नसत. एके दिवशी त्यांनी शेजारी राहणार्‍या एका तरुणाला शिवमंदिरात नेण्यास सांगितले. तो आपल्या कामात व्यस्त होता. साहजिकच तो जरा वैतागला आणि बाबाजींना म्हणाला, "बाबाजी! तुम्हाला आता दिसत नाही. त्यामुळे तुम्हाला पूर्वीसारखे देवाचे दर्शन घेता येत नाही. तरी तुम्ही उगीच देवळात का जाता?" त्यावर बाबाजी उत्तरले, "बेटा! मी आता देवाला पाहू शकत नाही हे खरे पण देव तर मला पाहू शकतो ना! तो तर पाहू शकतो की आपला एक भक्त रोज आपल्या ओढीने येत आहे म्हणून. झाले तर मग. अजून काय पाहिजे."

बाबाजींसारखी श्रद्धा, भक्ती आपल्याकडे आहे का याचा प्रत्येक साधकाने प्रामाणिकपणे विचार करायला हवा. परमेश्वरी इच्छेशिवाय झाडाचे पानही हालत नाही. मग त्याचे तुमच्याकडे लक्ष नाही असे कसे म्हणता येईल? भक्ती नसेल तर केवळ तर्ककुतर्कांच्या जोरावर परमेश्वराप्रत पोहोचता येणे अशक्य आहे. तेव्हा साधकाने अथक स्वप्रयत्नांना व्रतांद्वारे प्राप्त होणार्‍या प्रबळ इच्छाशक्तीची आणि श्रद्धेची जोड द्यावी आणि योगमार्गावर अग्रेसर व्हावे.

 

या लेखमालेचे उद्दिष्ट शिवभक्तांची आणि नवीन योगसाधकांची भक्ती वृद्धिंगत करणे हे आहे. अन्य कोणा दैवताची उपासना करणार्‍यांनी त्याबद्दल खेद, इर्षा वा द्वेश न बाळगता 'प्रत्येकाला आपली आई हीच श्रेष्ठ असते' या तत्वानुसार आपली आपल्या दैवताविषयीची भक्ती अखंड ठेवावी.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे संगणक सल्लागार, लेखक आणि योग मार्गदर्शक आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकातींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून योग आणि ध्यान विषयक सशुल्क मार्गदर्शन प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

हा मजकूर श्री. बिपीन जोशी यांच्या 'शिवोपासना' या पुस्तकातून घेण्यात आला आहे. या प्रकरणाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी आजच आपली प्रत विकत घ्या.


Posted On : 08 August 2010


Tags : शिव साधना लेखमाला भक्ती नाथ