Untitled 1
पिंगला वेश्येची कथा
भगवान दत्तात्रेयांचे चोवीस गुरू प्रसिद्धच आहेत. याच चोवीस गुरूंपैकी एक म्हणजे
विदेह नगरीतील पिंगला नामक वेश्या. दत्तावधूतांनी पिंगलेला आपला गुरू का मानले
त्याविषयीची कथा थोडक्यात अशी आहे...
पिंगला नामक एक वेश्या विदेह नगरीत राहून शरीरविक्रय करून आपला उदरनिर्वाह करत
असे. एके दिवशी नेहमीप्रमाणे चेहर्याला रंगरंगोटीकरून, चांगली वस्त्रेप्रावरणे
नेसून पिंगला आपल्या गिर्हाईकाची वाट पहाट बसली. मनात 'आज एखादे
श्रीमंत गिर्हाईक मिळेल' असे इमले ती बांधत होती. तीच्या दुर्दैवाने बराच वेळ झाला
तरी कोणीही तीच्याकडे फिरकले नाही. दर थोड्या वेळाने ती आत जाई, आपला चेहरा नीट आहे
ना ते आरशात निरखून पाही आणि परत दारात येऊन बसे. प्रत्येक येणारा माणूस आपल्याकडेच
येत आहे अशा आशेने ती आनंदीत होई आणि तो तीच्याकडे न येता अन्यत्र गेला की म्लान
वदनाने परत दुसर्याची प्रतीक्षा करत राही. असे करता करता रात्रीचे बारा वाजले.
शेवटचा एकदा प्रयत्न करावा असा विचार करून ती परत घरात गेली. आरशात स्वतःचा
रंगवलेला चेहरा पहात असताना तीला स्वतःची अतिशय किळस आली. क्षुद्र भौतिक सुखासाठी
आपण हा बाजार मांडला आहे या बद्दल तीला स्वतःची घृणा आली. तीच्या मनी प्रखर वैराग्य
प्राप्त झाले. त्या वैराग्यापूर्ण अवस्थेत ती म्हणाली -
"पहा मी मोहमायेने कशी पछाडलेली आहे! माझा स्वतःच्या मनावर ताबा नसल्याने मी
एखाद्या मूर्खासारखी एका पुरुषाकडून कामसुखाची अपेक्षा करत आहे. मी एवढी मूर्ख आहे
की मी माझ्या हृदयात सदैव वास करणार्या परमपुरुषाची सेवा सोडली आहे. जगद्नियंता
हाच खरा सर्वात प्रिय आहे जो सर्व सुखाचा स्त्रोत आहे आणि खर्या प्रेमाचा आणि
आनंदाचा वर्षाव करतो. तो जरी माझ्या हृदयात वास करत असला तरी मी त्याची पूर्ण
उपेक्षा करत आहे आणि अन्य तुच्छ पुरुषांची सेवा करत आहे जे माझी इच्छा पूर्ण करू
शकणार नाहीत. उलटपक्षी दुःख, भय, चंचलता आणि मोह मात्र देतील."
"माझ्या मनात जरी सूक्ष्म स्तरावर नाना प्रकारचे भोग भोगण्याविषयी आसक्ती असली
तरी माझ्या मनात वैराग्याचा उदय झाला आहे आणि ते वैराग्य मला आनंदित करत आहे.
परमेश्वर माझ्यावर नक्कीच प्रसन्न असला पाहिजे कारण नकळत माझ्या हातून त्याची
काहीतरी सेवा घडली असली पाहिजे."
"ज्याच्या मनी वैराग्य उदयास आले आहे असा मनुष्य आप्त-स्वकीय, मित्रपरिवार
इत्यादींची बंधने सहज तोडू शकतो. ज्याने या जगात दुःखे भोगली आहेत त्याला जगाविषयी
अनासक्ती निर्माण होते. मी स्वतःला भाग्यवानच म्हटले पाहिजे कारण या दुःखांमुळेच
मला वैराग्य प्राप्त झाले आहे. परमेश्वर माझ्यावर नक्कीच प्रसन्न झाला आहे.
परमेश्वराच्या कृपाप्रसादाचा मी नम्रपणे स्वीकार करत आहे. माझ्या सर्व क्षुद्र
वासना टाकून देऊन मी परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होत आहे. मी आता पूर्ण समाधानी आहे
आणि परमेश्वरी कृपेवर माझी नितांत श्रद्धा आहे. आजपासून मला जे सुखनैव प्राप्त होईल
त्यातच मी समाधान मानीन. मी परमेश्वराच्या सेवेतच आयुष्य व्यतीत करीन कारण तोच सर्व
सुखाचा ठेवा आहे."
पिंगलेच्या या वैराग्यापूर्ण शिकवणीमुळे दत्तात्रेयांनी तीला आपले गुरू मानले.
तात्पर्य - आध्यात्मर्गावर अग्रेसर होण्यासाठी वैराग्य आवश्यक आहे. जोवर भौतिक
गोष्टीत आनंद प्राप्त होत आहे तोवर त्यापासून दूर जावे असे वाटत नाही. जेव्हा
वैराग्याचा उदय होतो तेव्हा साधना पटकन फलदायी होते. कुंडलिनी अधोमुख न राहाता
ऊर्ध्वमुखी बनु लागते. वैराग्य प्राप्ती हा काही केवळ मोजक्या लोकांचा प्रांत
नाही. पिंगलेसारखी वेश्या जर वैराग्य प्राप्त करू शकली तर नवीन साधक ते का बरे
प्राप्त करू शकणार नाही? गरज आहे ती फक्त डोळसपणे भौतिक आयुष्याकडे बघण्याची
जेणेकरून दैनंदिन आयुष्यातील सुखदुःखांचा फोलपणा मनात ठसेल आणि योगमार्गावर अग्रेसर
होण्याची इच्छा दृढावेल.
हा लेख कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित आहे. कृपया कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रित करू नये.
प्रिय वाचकांनो,
गेली अनेक वर्षे आम्ही आमच्या वेब साईटच्या माध्यमातून योग-अध्यात्म विषयक लेखन प्रसिद्ध करत आहोत.
आम्ही कोणालाही आमचे लेखन अन्यत्र पुनर्मुद्रित करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही.
तरीही काही लोकांनी आमचे लेखन अन्यत्र (उदा. फेसबुक पेज, व्हॉटस अॅप, ब्लॉग वगैरे) प्रकाशित केल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.
मूळ लेखकाचे नाव आणि या वेब साईटचा दुवा देण्याचे सौजन्यही त्यांनी दाखविलेले नाही.
काहींनी तर आमचे लेखन आपल्या स्वतःच्या नावे प्रसिद्ध केले आहे.
या लोकांनी केलेले हे साहित्य चौर्य अर्थातच निंदनीय आणि खेदजनक आहे.
योग्य वेळ येताच भारतीय कायदा आपले कार्य करेलच परंतु आम्ही आमच्या सुजाण वाचकांना हे सूचित करू इच्छितो
की त्यांनी अशा साहित्य चोरांपासून सावध रहावे.
अशा लोकांशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. ही वेब साईट हे आमचे लेखन प्रसिद्ध होण्याचे एकमेव अधिकृत स्थान आहे.
आम्ही अन्य कोणालाही आमचे लेखन प्रसिद्ध करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही.
धन्यवाद.
~ वेब टीम