Untitled 1

ध्यानाचे मूळ आहार-विहारात

काही आठवड्यांवर महाशिवरात्र येऊ घातली आहे. ज्यांची अजपा साधना काही कारणाने खंडित अथवा विस्कळीत झाली असेल त्यांच्यासाठी साधना परत नव्या जोमाने सुरु करायला तो उत्तम दिवस आहे. त्या निमित्त आज काही ध्यानमार्गावर समाधानकारक वाटचाल करायला पोषक अशा काही सोप्या गोष्टी सांगणार आहे. अनेकांना मी आजवर त्या सांगितल्या आहेत आणि बहुतेकांना त्याचा फायदाही झाला आहे. तुम्हालाही त्या उपयोगी पडतील अशी आशा आहे.

झाडाला फळे आणि फुले जरी फांद्यांच्या टोकावर येत असली तरी त्या फळा-फुलांना पोषण मुळातून जात असते. अगदी त्याचप्रमाणे ध्यानाची प्रगाढता जरी समाधी अवस्थेत सर्वोच्च असली तरी तिचा सूक्ष्म उगम हा योग्याच्या दैनंदिन आहार-विहारात असतो. प्राचीन योग्यांनी विषद केलेला योगमार्ग हा अष्टांग आहे हे नेहमी लक्षात ठेवावे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, आणि समाधी अशा पायऱ्या एकामागून एक ओलांडत योगी आत्मसाक्षात्कार करून घेत असतो. जर केवळ ध्यानाला बसल्याने समाधी साधत असती तर मग प्राचीन योग्यांनी इतर सात अंगे व्यर्थ का बरे समाविष्ट केली असती. त्यांनी मानवी मनाचा सूक्ष्म अभ्यास करूनच ध्यानामार्गाची अष्टांग रचना केली.

उपनिषद कालीन अष्टांग योग प्रणालीत दहा यम आणि दहा नियम अशा एकूण वीस घटकांचा समावेश केलेला आहे. त्यांविषयी मी अनेकदा लिहिलेलं आहे. जिज्ञासू वाचकांनी ते लेख वाचावेत. पुढे पतंजली कालीन योग्यांनी त्या यम-नियमांची विभागणी अधिक सुसूत्रपणे करत पाच यम आणि पाच नियम अशी केली. प्रस्तुत लेखात यम-नियमांच्या सखोल चर्चेत जात नाही. मला येथे एवढेच अधोरेखित करायचे आहे की ध्यान ही जरी मनाची एक अवस्था प्रतीत होत असली तरी ती अवस्था साधण्यासाठी शरीर, प्राणशक्ती, मन, बुद्धी, अहंकार, आणि आहार-विहार अशा अनेकविध घटकांची गरज असते.

आता दैनंदिन आहार-विहाराचे नीती-नियम काढायचे म्हटले तर खंडीभर सांगता येतील. येथे अशा काही सोप्प्या आणि सूक्ष्म सात गोष्टी सांगतोय की ज्या नवीन साधकांना अगदी सहज आचरणात आणता येतील.

१. अध्यात्माविषयी भारंभार पुस्तके वाचण्यापेक्षा मोजकीच एक किंवा दोन पुस्तके "नित्यपाठ" म्हणून वाचनात ठेवा. योगशास्त्रात जे "सिद्धांत वाक्य श्रावणम" सांगितले आहे ते याच अर्थाने आहे. कथा-कादंबऱ्या वाचणे आणि आध्यात्मिक वाचन करणे यांत जमीन-अस्मानाचा फरक आहे. तुमच्या मनात श्रद्धा आणि भक्ती वृद्धींगत होईल अशी मोजकीच पुस्तके वाचा.  येथे श्रीज्ञानेश्वरी आणि श्रीगुरुचरीत्राचा उल्लेख अवश्य करीन. असे सिद्ध सत्पुरुषांनी लिहिलेले साहित्य अनुभवसिद्ध तर असतेच पण काहीतरी प्रचीती देण्याची क्षमताही त्यामध्ये असते. महाराष्ट्राला संत साहित्याची वैभवशाली परंपरा आहे. त्यातून मोजके माणिक-मोती निवडा आणि त्यांचे नित्य वाचन, मनन, चिंतन करा.

संत साहित्याचे महत्व कळण्यासाठी श्रीशंकर महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग उद्बोधक ठरावा -

एकदा एका भक्ताने श्रीशंकर महाराजांवर चरित्रात्मक ग्रंथ लिहिला. महाराज घरी आले असता मोठ्या आदराने त्याने तो ग्रंथ श्रीशंकर महाराजांना दाखविला. ग्रंथ उघडूनही न पहात्या त्यांनी ग्रंथाची पाने पूजेचा प्रसाद बांधण्यासाठी वापरली. म्हणाले - जोवर ज्ञानेश्वरी आणि दासबोध आहेत तोवर याची काही गरज नाही.

२. चांगल्या संगतीत राहावे. साधनामार्गावर ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. वाईट संगतीचा सूक्ष्म परिणाम तुमच्या आध्यात्मिक प्रगतीवर कसा होत असतो याची कल्पनाही करता येणार नाही. वाईट संगत म्हणजे फक्त व्यसनी किंवा भ्रष्ट वर्तन करणारे लोकं असं नाही. सारखे नकारात्मक बोलणारे, बड्या-बड्या पोकळ अनुभवशून्य बाता मारणारे, अध्यात्मामार्गाबद्दल बोलणं खुप पण आचरण शून्य असे वर्तन असणारे, दुसऱ्यावर आपले मत लादणारे, दुसऱ्यावर सदैव टीका-टिप्पणी करणारे - ह्या सर्व मंडळींची संगत ही टाळण्यास योग्य आहे.  

३. साधनेला बसण्यापूर्वी आणि साधना संपल्यानंतर एक-दोन तास तरी सोशल नेटवर्किंगचा किंवा तत्सम गोष्टींचा वापर करू नये. वर्तमानपत्र किंवा अन्य तत्सम वाचन करू नये. मोबाईल वापरू नये. टीव्ही बघत बसू नये. निरर्थक वाद-चर्चा-गप्पा इत्यादी गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवावे. या सर्व गोष्टींनी मनात विनाकारण असंख्य तरंग उठतात आणि ध्यानाला बसलं की मग तेच विचार येत रहातात. साधनेला बसल्यावर मोबाईल कटाक्षाने दूर ठेवावा.

४. भूतकाळाचा चोथा चघळणे आणि भविष्यकाळाचे गरजेपेक्षा जास्त चिंतन करणे कटाक्षाने टाळावे. सुरवातीला हे साधणे कठीण आहे पण नियमित सरावाने साधू लागते. हा mindfulness ध्यानामार्गात बराच उपयोगी पडतो. तुम्ही जर कोणाला गुरु केलं असेल तर त्यांना ह्या mindfulness चे रहस्य आणि महत्व विचारावे आणि त्याप्रमाणे आचरणात आणावे. अजपा ध्यानाने mindfulness वाढतो आणि mindfulness च्या सरावाने अजपा ध्यान चांगले करता येते. असा त्यांचा एकमेकाशी घनिष्ठ संबंध आहे.

५. जमल्यास वर्षातून किमान एकदा तरी गुरुसान्निध्यात ध्यान-साधना करावी. नवीन साधकांची ध्यानाची "बॅटरी" लवकर आटत असते. गुरुसान्निध्यात साधना उत्तम होते हा अनेक साधकांचा अनुभव आहे. गुरुसान्निध्यात साधना केल्याने उजळणी तर होतेच पण पंचकोशांत अध्यात्म उर्जेचा संचार होऊन साधना जोमाने होऊ लागते.  त्याजोडीला श्रीगुरुचरित्राचे (किंवा तत्सम सिद्ध ग्रंथाचे) वर्षातून एकदा तरी विधिवत सप्ताह पारायण करावे. 

६. जो काही आहार तुम्ही घेत असाल तो पूर्णपणे नीट पचवू शकाल असाच असावा. मी येथे मुद्दामच शाकाहारी-मांसाहारी, कांदा-लसूण वगैरे गोष्टींत जात नाहीये. एवढच सांगीन की सुरवातीला तरी खाल्लेलं अन्न "आम" निर्माण न होता पचवता येईल असं असावं. आयुर्वेदातील "अग्नि", "आम", आणि पचनसंस्था यांविषयी काही लेखांत मी सविस्तर लिहिलेलं आहेच.

७. झोप आणि विश्रांती आवश्यक तेवढी जरूर घ्या. झोप अपूर्ण झाली असेल तर ध्यानाला बसल्यावर ग्लानी येते. मन नीट एकाग्र होऊ शकत नाही. ध्यान लागण्याऐवजी भास होतात. अशावेळी साधक आनंदी होतो. त्याला वाटतं की ध्यानात देवतेचे दर्शन झाले, काही आध्यात्मिक अनुभव आला वगैरे. प्रत्यक्षात तो ग्लानीत झालेला मनाचा खेळ असतो. आजकाल लोकांची जीवनशैली अशी झाली आहे की मध्यरात्री जाग आली तर पहिले मोबाईल बघतात आणि मग झोप उडते किंवा पूर्ण होत नाही. उशीरापर्यंत टीव्ही बघणं, जेवण उशीरा करणं अशा गोष्टीही टाळायला हव्यात.

वर्ष-सहा महिने या गोष्टी पाळून तर बघा तुमच्या ध्यानाचा स्तर कसा सुधारतो ते.

असो. आजच्या साठी एवढेच पुरेसे आहे.

भगवान श्रीशंकर आणि दत्तगुरुंच्या आशीर्वादाने सर्व वाचकांची अजपा ध्यान मार्गावर प्रगती होवो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 18 February 2019
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates