Untitled 1

योगाभ्यासाला पोषक गोष्टी

लेखमालेच्या मागील भागात आपण योगाभ्यासाची हानी कोणत्या गोष्टींनी होते ते पाहिले. या भागांत आपण योगाभ्यासाचे पोषण कोणत्या गोष्टींनी होते ते पाहणार आहोत. या गोष्टी योगाभ्यासासाठी 'टॉनिक'चे काम करतात. त्यामुळे योगाभ्यास जोमाने करता येतो. परिणामी इच्छित ध्येयापर्यंत लवकर पोहोचता येते.

उत्साहात्साहसाध्दैर्यात्तत्वज्ञानाश्च निश्चयात।
जनसंगपरित्यागात्षड्भिर्योगः प्रसिध्द्यति॥

उत्साह, साहस, धैर्य, तत्वज्ञान, निश्चय, जनसंग परित्याग या सहा गोष्टी योगाभ्यासात यश देणार्‍या आहेत.

उत्साह

साधारणपणे असे आढळते की साधक सुरवातीचे काही महिने अतिशय जोमाने साधना करतात. त्यानंतर मात्र त्यांचा उत्साह मावळतो. योगसाधना ही आयुष्यभर करण्याची गोष्ट आहे हे साधक विसरतो. आयुष्यातील अन्य गोष्टी मग प्राधान्य मिळते. योगाभ्यास बाजूला राहतो. रोज साधनेसाठी लवकर उठणारा साधक मग आळस करू लागतो. 'एक दिवस साधना बुडली तर काय बिघडतय' अशी वृत्ती बळावते. याचसाठी उत्साह हा गुण आवश्यक आहे. साधकाने असे समजायला हवे की दरदिवशीची साधनेचा जणू पहिलाच दिवस आहे. रोज साधना आपल्याला काय फायदे देणार आहे, आपण साधना का सुरू केली याचे चित्र डोळ्यापुढे आणले पाहिजे (Visualization). त्यामुळे आपल्या उद्दीष्टांचा विसर पडणार नाही आणि उत्साह वाढेल.

साहस

अध्यात्ममार्गाला जीवन वाहून घेणे ही सोपी गोष्ट नाही. तलवारीच्या पात्यावरून चालण्यासारखी ही गोष्ट. पदोपदी मनाला तळहातावरील फोडाप्रमाणे जपावे लागते. त्यामुळे भौतिक सुखसोयी सोडून योगमार्गावर वाटचाल करायला साहस लागते. जुन्या काळी योगी दूर जंगलात कुटी बांधून साधना करत. अशा प्रकारे सर्व जगापासून स्वतःला तोडून घेवून जीवन कंठायला साहसी वृत्ती हवीच.

धैर्य

साधनारत योग्याला अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. विशेषतः जंगल-अरण्यात राहणार्‍या योग्यांना ऊन, पाऊस, वारा इत्यादी नैसर्गिक आपत्तींना धैर्याने तोंड द्यावे लागते. कित्येक साधकांचा असा अनुभव असतो की साधनेत स्वतःला झोकून दिले की काहीतरी विपरीत घटना घडतात. हे कर्मसंचय नष्ट होत असल्याचे, शुद्धी होत असल्याचे लक्षण आहे. त्यांमुळे मन चंचल होते. अशावेळी धैर्य आवश्यक आहे. ज्यावेळी साधनेत प्रगती होते, कुंडलिनी जागृत होते तेव्हा काहीवेळा साधकाला भितीदायक अनुभव येऊ शकतात. योगसाधकाला उत्फुर्त क्रिया, शरीराला कंप, अश्रुपात, अति झोप वा निद्रानाश, चित्रविचित्र आभास वा दर्शने इत्यादी गोष्टी होवू शकतात (अर्थात सर्वांनाच त्या होतात असे नाही). ह्या गोष्टी होत असताना त्याना धीराने तोंड देणे आवश्यक असते. डॉक़्टर अशा लक्षणांवर काही इलाज करू शकत नाही. अशा वेळी जर साधक घाबरला आणि त्याने साधना सोडली तर सगळेच मुसळ केरात!

तत्वज्ञान

योग्याला आपण साधना कशासाठी करत आहोत ते नीटपणे माहित असले पाहिजे. 'जीव तोचि शिव आणि शिव तोचि जीव' ही प्रत्यक्ष अनुभुती प्राप्त होण्यासाठी आपली साधना आहे हे त्याच्या मनात पक्के ठसले असले पाहिजे. काहि वेळा साधक ब्रह्म, माया, द्वैत, अद्वैत या तार्कीक जंजाळात एवढे गुरफुटून जातात की आपल्या आयुष्याचे नक्की ध्येय काय तेच विसरून जातात. असे होवू नये म्हणून तत्वज्ञान आवश्यक आहे. लक्षात घ्या की येथे तत्वज्ञान याचा अर्थ प्रकांड पुस्तकी पांडित्य असा नसून 'शाश्वत काय नी अशाश्वत काय, चांगले काय नी वाईट काय' याचे ज्ञान असा आहे. त्याचप्रमाणे साधना, आहार-विहार, यम-नियम हे कशासाठी आहेत ते नीट माहित असले पाहिजे. उदाहरणार्थ सत्य, अहिंसा इत्यादी गुण का जोपासायचे, त्यांचा मनावर नक्की काय परिणाम होतो ते त्याला ठावूक असले पाहिजे. केवळ योगग्रंथ ते पाळावे असे सांगतात म्हणून यांत्रिकपणे ते आचरणे योग्य नाही. 

निश्चय

मनाचा पूर्ण निश्चय झाल्याखेरीज साधकाने योगमार्गावर पाऊल टाकू नये. अनेक साधक 'बघू तरं खर काय आहे ते' अशा वृत्तीने योगमार्गाची कास धरतात. काही काळाने मग त्यांना कंटाळा येतो आणि ते दुसरा कोणतातरी मार्ग आचरतात. एक ना धड भाराभर चिन्ध्या असे वर्तन अध्यात्ममार्गावर उपयोगी पडत नाही. योगमार्ग हा आत्मसाक्षात्काराचा अनादीकालापासून चालत आलेला मार्ग आहे. त्यावर दृढ श्रद्धा ठेवून प्रत्येक साधकाने गुरूप्रदत्त मार्गावर आजीवन प्रमाणिकपणे चालण्याचा निश्चय केला तरच सफलता पदरात पडते.

जनसंग परित्याग

लेखमालेचा मागच्या भागात आपण स्वात्मारामाने जनसंग टाळण्यास सांगितले होते तर आता 'जनसंग परित्याग' करण्यास सांगितले आले. यावरूनच पुनरावृत्तीवरूनच 'साधकाने सामान्य भौतिक आशा-आकांक्षा असलेल्या लोकांत फार मिसळू नये' हा योगशास्त्राचा नियम अत्यंत महत्वाचा आहे हे कळून येते.

थोडक्यात अति आहार, श्रम, व्य्रर्थ बडबड, नियमांविषयी दुराग्रह, जनसंग, चंचलता या सहा गोष्टी साधकाने हरप्रयत्ने टाळाव्या आणि उत्साह, साहस, धैर्य, तत्वज्ञान, निश्चय, जनसंग परित्याग या सहा गोष्टी हरप्रयत्ने पाळाव्यात.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 06 January 2010


Tags : योग अध्यात्म हठयोग कुंडलिनी चक्रे साधना योगग्रंथ लेखमाला नाथ