Untitled 1

हिवाळ्यातील अजपा कुंडलिनी साधना

या वर्षी पाऊस फारच लांबलेला आहे. त्यामुळे ऋतूचक्र काहीसं विस्कळीत झालेलं आहे. हळूहळू थंडीची चाहूल लागेल अशी आशा करूयात. त्याच अनुषंगाने हिवाळ्यात अजपा कुंडलिनी साधना करणाऱ्या योगसाधकांनी काय काळजी घ्यावी त्याबद्दल काही गोष्टी आजच्या या लेखात सांगणार आहे. मुद्दामच हिवाळा सुरु होण्याच्या आगोदर ह्या गोष्टी सांगतोय म्हणजे ज्यांना कराव्याशा वाटतील त्यांना तयारी करायला पुरेसा अवधी मिळेल.

हिवाळा म्हटला की थंडी ही आलीच. अशावेळी सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठून साधनेला बसणाऱ्या अनेक साधकांना थंडीमुळे आळस किंवा कंटाळा येतो. तेंव्हा सर्वप्रथम या थंड हवेचा आणि आळसावलेल्या शरीर-मनाचा उपाय करावा. अशावेळी आलेला आळस घालवण्यासाठी अजपा ध्यान साधानेपुर्वी सूर्यनमस्कार घालावेत. केवळ सहा ते बारा आवर्तनांत शरीरातील रक्ताभिसरण वेगाने होऊ लागेल आणि त्यामुळे आपोआप उबदार वाटू लागेल. जर तुम्ही स्नान करून अजपा साधनेला बसत असाल तर कोमट पाण्याचा वापर फायदेशीर ठरेल.

थंडीच्या दिवसांत अजपा साधनेला बसतांना नेहमी "ऊनी" आसन वापरावे. खरंतर अजपा साधकाने नेहमीच लोकरीचे आसन वापरावे. आजकाल साधक सर्रास "योगा मॅट" वापरतात. त्यापेक्षा बाजारातून लोकरीचे कापड आणून किंवा शाल / कांबळी / घोंगडी चौपदरी करून वापरावी. आवश्यक वाटल्यास त्यावर स्वच्छ धूतवस्त्र पांघरावे आणि त्यावर साधनेला बसावे. पतंजली मुनींनी "स्थिर सुख आसनम" हे जरी शारीरिक स्थिती साठी सांगितले असले तरी तोच नियम ज्यावर ध्यानाला बसायचे त्या आसनालाही लागू होतो. थंडी जर खुप असेल तर साधनेला बसल्यावर अंगाभोवती पातळ शाल किंवा चादर लपेटून घ्यायलाही काही हरकत नाही.

थंडीच्या दिवसांत साधनेला बसल्यावर आलेली मरगळ किंवा निरुत्साह घालवण्यासाठी साधेनेच्या सुरवातीला भस्त्रिका किंवा कपालभाती अशा जलदगती प्राणायामाची आवर्तने करावी. फार काळ करायची गरज नाही. पाच मिनिटे केली तरी पुरेत. त्याने एक प्रकारची उर्जा खेळू लागते आणि तरतरी येते.

तुम्ही जर अजपा साधनेच्या जोडीला प्राणायामाचा अभ्यास करत असाल तर सूर्यभेदन, भस्त्रिका असे उष्णता देणारे प्राणायाम अधिक प्रमाणात करायला हरकत नाही. त्याचबरोबर शितली किंवा सित्कारी यांसारखे थंडावा देणारे प्राणायाम कमी प्रमाणात करावेत. अर्थात प्राणायाम वाढवताना स्वतःची प्रकृती कफ, वात, पित्त यांपैकी कशी आहे त्यानुसार ते वाढवावेत. त्याविषयी सरधोपट प्रमाण सांगता येत नाही.

जे साधक थोडे प्रगत झालेले आहेत त्यांनी या काळात मणिपूर चक्राच्या साधना वाढवाव्यात. हा थोडा सूक्ष्म विषय आहे त्यामुळे येथे फार खोलात जात नाही. परंतु मणिपूर चक्र हे अग्नितत्वाचे केंद्र असल्याने त्याच्या साधना फायदेशीर ठरतात. "ओढीयान" बंध लावून काही बीजमंत्रांचा केलेला जप सुद्धा त्याकामी उपयोगी ठरतो. येथे एक गोष्ट सांगितली पाहिजे की जर एखाद्या नवख्या साधकाने ह्या क्रिया केल्या तर त्याला कदाचित काहीच फायदा होणार नाहीत. कारण ह्या क्रिया सूक्ष्म असल्याने ज्या साधकांची थोडीतरी प्रगती झालेली आहे त्यांनाच त्या खऱ्या अर्थाने उपयोगी पडतात.

हिवाळ्यात शरीराची चयापचयाची शक्ती काहीशी मंदावलेली असते. त्यादृष्टीने योगसाधकाने आपल्या आहारात सुद्धा बदल करणे आवश्यक ठरते. आजकाल लोकांमध्ये आहाराविषयी बरीच जागरूकता निर्माण झालेली आहे. अनेक मार्गांनी त्याविषयीची माहिती सर्वांच्याच वाचनात / श्रवणात येत असते. त्यामुळे फार खोलात जात नाही.

या हिवाळ्यात थंड वातावरणात मस्तपैकी शाल लपेटून, हलके सुखद त्रिबंध लावून, हात गुढग्यावर रोऊन धरत, कुंडलिनीचे सुषुम्नेत चालन करत अजपा जपाचा हंस-सोहंचा अद्भूत ध्वनी ऐकून तर बघा काय गंमत असते ते. कार्यालयातील कामकाज असो किंवा योगसाधना त्याला एकसुरीपणाचा किंवा रटाळपणाचा दोष लागण्याची शक्यता नेहमीच असते. तुम्ही त्या एकसुरी पणावर मात कशी करता आणि साधनेची गोडी चाखत-चाखत पुढे कसे जाता यावर सर्वकाही अवलंबून असतं.

असो.

जगदंबा कुंडलिनीच्या प्रेमळ आणि उबदार परीस स्पर्शाने सर्व योगाभ्यासी वाचकांची हिवाळ्यातील साधना सुखमय होवो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 04 November 2019