Kriya and Meditation for Software / IT Professionals. Conducted by Bipin Joshi. Read more...

Untitled 1

श्रावण २०१७ निमित्त काही....

उद्यापासून श्रावण सुरु होत आहे. श्रावण हा श्रीशंकराची उपासना विशेष रूपाने करण्याचा महिना. त्या निमित्ताने मनातले काही शब्द शिवकृपेने व्यक्त करत आहे. अवश्य विचारमंथन आणि आचरण करावे.

१. आज समाज फार विचित्र परिस्थितीतून जात आहे. एकीकडे विज्ञान आणि तंत्रज्ञान अफाट प्रगती करत आहे तर दुसरीकडे सामाजिक विषमतेला, विद्वेषाला आणि भेदभावाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष खतपाणी मिळत आहे. पैसा हा केवळ स्वतःच्या आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा स्त्रोत न रहाता सामाजिक श्रेष्ठत्वाचे बटबटीत प्रतिक बनला आहे. गुरुचरित्रात एके ठिकाणी अशा स्वरूपाचा उल्लेख आहे की कलियुगात ज्या गोष्टींना प्रतिष्ठा मिळू नये त्यांना ती मिळेल आणि ज्या गोष्टी वंदनीय असतील त्या टाकाऊ समजल्या जातील. आज याचे तंतोतंत प्रतिबिंब समाजात उमटलेले दिसत आहे. या सामाजिक परिस्थितीवर बाह्योपचार काय करायचे ते त्या त्या विषयांतील तज्ञ जाणोत परंतु एक योगसाधक म्हणून आपण स्वतःला बदलू शकतो. ते नक्कीच आपल्या हातात आहे. श्रीशंकराने प्रकट केलेला योग हा त्या कामी अत्यंत उपयोगी आहे. किंबहुना स्वतःमध्ये अंतर्बाह्य सुधार घडविण्याचा त्याशिवाय दुसरा ठोस उपाय नाही.

२. आज आध्यत्मिक क्षेत्रही या बजबजपुरीपासून अलिप्त राहिलेलं नाही. माझा मार्ग श्रेष्ठ की तुझा, माझा गुरु श्रेष्ठ की तुझा अशा तुच्छ अहंकारी मायापाशात कित्येक "योग साधक"  म्हणवणारे लोकं आणि त्यांचे "गुरु" अडकलेले आपल्याला दिसतील. केवळ एखाद्याच्या भगव्या वस्त्रांवर किंवा गोडगोड प्रवचनांवर किंवा पंचतारांकित भव्यदिव्य आश्रमांवर भाळण्याचे दिवस राहिलेले नाहीत ही कटू वाटली तरी वस्तुस्थिती आहे.  अशा वेळी वाट दाखवण्याचे सामर्थ्य कशात असेल तर ते प्राचीन योगग्रंथांत आणि संत साहित्यात. मराठी संत साहित्याचा अमृतकुंभ आहे भावार्थ दीपिका उर्फ ज्ञानेश्वरी. असं म्हणतात की वेदांचा विस्तार अफाट आहे. समस्त वेदांचे सार उपनिषदांमध्ये सामावलेले आहे. काळानुसार लोकांना उपनिषदेही दुष्प्राप्य झाली म्हणून श्रीकृष्णाने भगवत गीतेच्या रुपात ते ज्ञान प्रकट केले. दुर्दैवाने सर्वसामान्य लोकांना भगवत गीता सुद्धा नीट कळेना अशी स्थिती आली. त्या वेळी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी भगवत गीतेचा भावार्थ अत्यंत सुबोध आणि रसाळ पद्धतीने मायमराठीत सांगितला. आपणा मराठी जनांचे हे केवढे मोठे भाग्य म्हटले पाहिजे. एका सिद्ध योग्याने आपल्यासाठी अवतरण घेऊन एवढ्या लहान वयात हे ज्ञान शब्दबद्ध केले. त्या ज्ञानामृताचा आस्वाद आपण घेतला नाही तर आपल्या सारखे करंटे आपणच. सांगण्याचा मतितार्थ हा की एका ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाने (निव्वळ वाचनाने नाही!)  समस्त योगग्रंथ समजून येतात हे निखळ सत्य आहे. अनुभव घेऊन पहावा.

३. आज ज्ञान (खरंतर माहिती असा शब्दप्रयोग करायला हवा) अनेक मार्गांनी आपल्याकडे झेपावत आहे. झेपावत आहे असं म्हणण्याच कारण असं की तुम्हाला हवं असो किंवा नको माहितीचा मारा अहोरात्र आपल्यावर होत आहे. सोशल नेटवर्किंग असो की ब्लॉगस असोत किंवा मोबाईल अॅप्स असोत हा माहितीचा मारा काही थांबताना दिसत नाही. या ऐकलेल्या, वाचलेल्या माहितीला "ज्ञान" समजण्याची घोडचूक नवखे योगसाधक करतांना सर्रास दिसत आहेत. एखादी गोष्ट वरकरणी बौद्धिक स्तरावर कळली म्हणजे ती साधली असा गैरसमज होतांना दिसत आहे. त्यापुढे जाऊन प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठी अथक प्रयत्न करण्याची त्यांची तयारी दिसत नाही. अनेक योगग्रंथांत एक श्लोक थोड्याफार पाठभेदाने आलेला आहे तो असा -

वेद शास्त्र पुराणानि सामान्य गणिका इव |
एकैव शांभवी विद्या गुप्ता कुलवधू रिव ||

याचा थोडक्यात अर्थ असा की वेद, शास्त्र, पुराण इत्यादी स्त्रोतांमधून मिळणारे पुस्तकी ज्ञान एखाद्या गणिके प्रमाणे आहे. कारण कोणीही हे ग्रंथ पैसे फेकून विकत घेऊ शकतो. याउलट गोपनीय अशी शांभवी विद्या अर्थात शिवप्रणीत योगमार्ग हा कुलवधू प्रमाणे आहे. कारण योगमार्ग प्रत्यक्ष अनुभूतीचा मार्ग आहे. पुस्तकी पांडित्याला येथे थारा नाही. त्यामुळेच तो सर्वांना उपलब्ध होत नाही. योगमार्गाची कास धरावी अशी इच्छा व्हायला सुद्धा पूर्वजन्मीच सुकृत असावं लागतं. जे हा मार्ग आचरतात त्यांचं जीवन सार्थकी लागतं यात शंका नाही.

बस्स. आज जे सांगायचं होतं ते इतकंच. ज्यांना या मार्गाची गोडी लागलेली आहे त्यांनी आज शिवचरणी लीन होवून ज्योतीरूपी ज्ञानाग्निला साक्षी मानून योगमार्गावर चालण्याचा आपला निश्चय पुन्हा एकदा दृढ करावा. येऊ घातलेला श्रावण आपल्यासाठी योग आणि ज्ञान संवर्धक होवो हीच श्रीशिवचरणी विनम्र प्रार्थना.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे संगणक सल्लागार, लेखक आणि योग मार्गदर्शक आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून योग आणि ध्यान विषयक सशुल्क मार्गदर्शन प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 23 Jul 2017