Untitled 1

तद्रूपचरणी मुक्ता वटेश्वरी दक्ष

नुकतीच सिद्ध नाथ योगी चांगदेव यांनी जेथे साधना केली त्या चांगा वटेश्वर शिवमंदिराला पुन्हा एकदा भेट देण्याची संधी मिळाली त्या निमित्ताने चांगदेवांविषयी काही....

महाराष्ट्रात चांगदेव अपरिचित अजिबात नाहीत. ज्यांनी ज्यांनी ज्ञानेश्वरांनी भिंत चालविल्याची कथा ऐकली-वाचली आहे त्यांना चांगदेवांचा परिचय असतोच. अर्थात चांगदेवांचा हा परिचय ज्ञानेश्वरांच्या छायेत घडत असतो हे खरे. परंतु चांगदेवांवर काही संशोधन झालेले आहे आणि ते कोण, कुठले, त्यांची गुरुपरंपरा कोणती याचा शोध घेण्याचा प्रयत्न रा. चिं. ढेरें सारख्या तज्ञांनीही केलेला आहे.

चांगदेव, चांगा वटेश्वर,  चक्रपाणी अशा नावांनी ओळखली जाणारी ही व्यक्ती नक्की कोठे जन्मली ते ठाऊक नाही. परंतु ह्या सिद्ध योग्याचा अधिकार आणि दबदबा मोठा होता हे मान्य करावेच लागेल. काही नाथ ग्रंथांनुसार चांगदेवांचा जन्म वडाच्या झाडाच्या ढोलीत झाला. पुढे स्वसामर्थ्याने ते सिद्ध योगी बनले. त्यांची परंपरा नाथ पंथीच आहे. त्यांची गुरुपरंपरा खालील प्रमाणे सांगितली जाते -

आदीनाथाचे मच्छिंद्र त्याचे गोरक्ष |
तद्रूपचरणी मुक्ता वटेश्वरी दक्ष ||
चक्रपाणी विमला चांगदेवी साक्ष |
जनार्दनाचे पायी नरहरीचे लक्ष ||

वरील श्लोकांवरून चांगदेवांची परंपरा आदिनाथ > मच्छिंद्रनाथ > गोरक्षनाथ > मुक्ताई > चांगदेव अशी लक्षात येते.

गंमत म्हणजे वरील परंपरेत उल्लेखलेली मुक्ता म्हणजे ज्ञानेश्वरांची बहिण नव्हे. वरील मुक्ता गोरक्ष शिष्या होती आणि अतिशय उच्च कोटीची सिद्ध योगिनी होती. तिनेच चांगदेवांना उपदेश दिला होता. परंतु तिने कालौघात समाधी घेतली. पुढे जेंव्हा चांगदेवांची भेट ज्ञानेश्वर भगिनी मुक्ताईशी झाली तेंव्हा त्याने मुक्ताईला आपली गुरु गोरक्ष शिष्या मुक्ता हिचा अवतार या स्वरूपात स्वीकारले.

असा हा नाथ पंथी साधनेची आणि विचारधारेची भक्कम बैठक लाभलेला चांगदेव चौदाशे वर्षे जगला. असं म्हणतात की मृत्यूची घडी जवळ आली की तो सर्व प्राण सुषुम्नामार्गे सहस्रार चक्रात शोषून घेई, समाधिस्त होई आणि जणू मृतप्राय होत असते. मृत्यूची घटिका टाळून गेली की मग तो प्राण हळू हळू परत खाली आणत असे. अशाप्रकारे चौदाशे वर्षे त्याने मृत्युला चकवले.

या काळात त्याने अनेक शिष्यगण जमवले. अनेकानेक सिद्धी त्याच्या पायांशी लोळण घेऊ लागल्या. मृत व्यक्तीला लीलया उठवणे वगैरे चमत्कार तो करू लागला. पंचक्रोशीत त्याच्या नावाचा दबदबा वाढला. त्याच्या नावाचा वेगळा पंथही अस्तित्वात आला. हे सगळे जरी असले तरी त्याला शिवपद किंवा आत्मज्ञान काही प्राप्त झाले नाही. शिष्यगण, सिद्धी यांनी अहंकार दुणावला.

इकडे ज्ञानेश्वरांचे अवतरण झाले आणि कोवळ्या वयातच त्यांची कीर्ती दूरवर पसरली. ही कीर्ती चांगदेवाच्या कानावर पडली आणि ज्ञानेश्वरांना भेटण्याची त्याला इच्छा झाली. या इच्छेमागे ज्ञानप्राप्ती हा हेतू नव्हता तर अहंकारच होता. ज्ञानेश्वर भेटी आधी त्यांना एक पत्र पाठवावे असे त्याला वाटले.  आता ज्ञानेश्वर वयाने खूपच लहान परंतु अधिकाराने खुप मोठे. त्यांना नक्की काय संबोधावे हे त्याला कळेना आणि म्हणून मग त्याने कोरेच पत्र ज्ञानेश्वरांना पाठवले.

चांगदेवाच्या या कोऱ्या पत्राला ज्ञानेश्वरांनी अद्वैत ज्ञानाने परीपूर्ण असे पासष्ठ ओव्यांचे उत्तर पाठवले. तेच चांगदेव पासष्ठी म्हणून सुप्रसिद्ध आहे. ज्ञानेश्वरांचे उत्तर वाचून चांगदेव फार प्रभावित झाले आणि आपल्या लव्याजम्यासह वाघावर बसून ज्ञानेश्वर भेटीला निघाले. चांगदेवांच्या मनातील अहंकार ज्ञानेश्वरांनी ओळखला आणि निर्जीव अशी भिंत चालवून ते चांगदेवांच्या भेटीस गेले. ज्ञानेश्वरांचा हा चमत्कार पाहून चांगदेवांचा अहंकार गळाला आणि ते ज्ञानेश्वरांना शरण आले.

अहंकार नष्ट झालेले चांगदेव आता ज्ञानेश्वर आणि त्यांचे बहिणभाऊ यांच्या समवेत वावरू लागले. एक दिवस मुक्ताई स्नानाला बसली होती.  त्याच वेळी चांगदेव ज्ञानेश्वरांच्या भेटीस आले. मुक्ताईला त्या अवस्थेत बघून त्यांना खुप संकोच वाटला आणि ओशाळून ते आल्या पावली गुपचूप परत फिरले. परंतु मुक्ताईने त्यांना बघितले आणि त्यांची संकोचलेली स्थिती पाहून म्हणाली -

जरी गुरुकृपा असती तुजवरी | तरी विकार न येता अंतरी ||
भिंतीस कोनाडे तैसियापरी | मानुनी पुढे येतासी ||
जनी वनी हिंडता गाय | वस्त्रे नेसत असती काय |
त्या पशुऐशीच मी पाहे | तुज का न ये प्रत्यया ||  

वास्तविक चांगदेव एक स्त्री स्नानाला बसली आहे तेंव्हा आपण तेथे जाणे योग्य नाही या सर्वसाधारण रूढ सामाजिक प्रथेला अनुसुरूनच वागले होते. सर्वसामान्यांच्या दृष्टीकोनातून ते योग्यही होतं. परंतु जो खरा ज्ञानी असतो तो लिंग, जात, धर्म या भेदांच्या पलीकडे पोहोचलेला असतो. गाय किंवा अन्य पशु काही वस्त्र नेसत नाहीत. ज्याच्या विकारांचा पूर्णतः उपशम झालेला आहे तो ज्ञानी पशु आणि मनुष्य ह्या दोघांनाही समदृष्टीने पहातो. चांगदेव एवढे मोठे सिद्ध योगी असूनदेखील या भेदाच्या पलीकडे जाऊ शकलेले नाहीत हे मुक्ताईने ओळखले. चांगदेवाना गुरुकृपा पूर्णपणे मिळालेली नाही (कारण त्यांच्या गुरूने समाधी घेतली) आणि म्हणून त्यांच्या मनात विकार अणुमात्र का होईना शिल्लक आहे अशी कारण मीमांसाही तिने केली. 

मुक्ताईच्या या स्पष्टोक्तीने चांगदेवांचा अहंकार पुरता निमाला आणि ते मुक्ताईला शरण गेले. ज्ञानेश्वरांची भगिनी मुक्ताई चांगदेवांची गुरु ही अशी बनली. कल्पना करा - एक चौदाशे वर्षांचा सिद्ध योगी. तो ही असा की ज्याच्या मागेपुढे अष्टमहासिद्धी येरझारा घालताहेत. पंचमहाभुतांवर ज्याचा ताबा चालतो आहे. प्रत्यक्ष मृत्यूला ज्याने धोबीपछाड घातला आहे.  तो आपला सगळा अहंकार टाकून एका चिमुरडीला शरण गेला. तिच्यापुढे नतमस्तक झाला. चांगदेव आणि मुक्ताई या दोघांचाही अधिकार केवढा उच्च कोटीचा असला पाहिजे!

सर्वसाधारण साधकांसाठी येथे काही महत्वाच्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत :

१. सिद्धी किंवा चमत्कार हे काही योग्याचे ध्येय नाही. अनेक साधकांना अशा चमत्कारांचे आकर्षण असते आणि मग ते त्यातच गुरफटत जातात. सुरवातीला सिद्धी जरी सुखकारक वाटल्या तरी ज्ञानप्राप्तीकरता त्यांचा काडीमात्र उपयोग होत नाही.

२. अहंकार हा योगमार्गावरचा सर्वात मोठा अडथळा आहे. मी अमुक-अमुक ग्रंथ वाचले, मी अमक्या-तमक्याचा शिष्य आहे, मी इतकी-इतकी वर्षे साधना केली वगेरे वगैरे गोष्टी हा फुकाचा अहंकार आहे. ह्या अहंकाराने दुसऱ्यापुढे शेखी मिरवण्यापलीकडे काहीही हाती येत नाही.

३. एखाद्याला गुरु करतांना तो केवढा प्रसिद्ध आहे, त्याचे किती आश्रम आहेत, तो किती वयोवृद्ध आहे, तो चमत्कार दाखवतो का असे बाह्य आणि उथळ निकष लावणे हे तुमच्या अज्ञानाचे लक्षण आहे. चांगदेवाने मुक्ताईला शरण जातांना तिचा आध्यात्मिक अधिकार पाहिला, वय किंवा अन्य गोष्टी पाहिल्या नाहीत.

४. आपल्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्या व्यक्तीपुढे, मग तिचे वय-लिंग-कुल इत्यादी काहीही असोत, नतमस्तक होण्यात कमीपणा नसतो तर तुमच्या लीनतेचे ते एक लक्षण असतं. त्या श्रेष्ठपदी विराजलेल्या व्यक्तीला तुम्ही नतमस्तक व्हा किंवा होऊ नका काही फरक पडत नाही. फरक तुम्हाला पडत असतो. त्याच्या पुढे नतमस्तक न होऊन, आपल्या अहंकाराचे प्रदर्शन करून तुम्ही त्याच्या शुभसंकल्पाला मुकत असता. याउलट त्याच्यापुढे नमल्याने तुमचाच अप्रत्यक्ष फायदा होत असतो. सर्वसाक्षी ईश्वर तुमच्यातील अहंकाराच्या मापानुसार फळ प्रदान करत असतो. त्याला फसवता येत नाही. हे पक्के ध्यानात ठेवावे.

चांगदेवांचा अहंकार गळून त्याना जसा मुक्ताईरुपी गुरुतत्वाचा लाभ झाला त्याचप्रमाणे सर्वाना गुरुतत्वाचा प्रसाद लाभो ही शिवचरणी प्रार्थना.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 06 February 2017