Untitled 1

अजपा गायत्रीच्या सहाय्याने मनाचा पोत सुधारा

महर्षी पतंजलींची योगसूत्रे सुप्रसिद्ध आहेत. त्यांची निराळी ओळख करून द्यायला नको. पातंजल योगावरील व्यासभाष्यात आपल्याला मनाच्या पाच अवस्था वर्णिलेल्या आढळतात. ह्या पाच अवस्था साधकाच्या मनाचा सध्याचा पोत कसा आहे त्यावर आधारलेल्या आहेत. चित्ताच्या या पाच अवस्था अशा - मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध.

सर्वसाधारण मनुष्याचे मन या पाच अवस्थांमध्ये कसे असते हे पाहण्यापेक्षा आपण येथे अजपा साधकाच्या दृष्टीकोनातून या पाच अवस्थांचं अवलोकन करुया. प्राचीन योगाग्रंथानी योगमार्गावरील साधकांची विभागणी चार प्रकारात केलेली आहे. ते प्रकार म्हणजे मंद, मध्यम, तीव्र आणि तीव्रतर. साधना मार्गावरील गुण-दोषांच्या अनुषंगाने ही विभागणी केलेली आहे हे उघड आहे. या विभागणीचा आणि आधी सांगितलेल्या चित्ताच्या अवस्थांचा मेळ घालण्याचा केलेला हा प्रयत्न.

साधकाच्या मनावर जेंव्हा तमोगुणाचे अतिक्रमण होते तेंव्हा ते मूढ अवस्थेत असते. तमोगुणाची जी वैशिष्ठ्ये सांगितली जातात जसे आळस, निद्रा, जडत्व, अविवेक, राग, अभक्ष भक्षण वगैरे तसले गुण मूढ चित्तामध्ये प्रगट होत असतात. असा साधक भले अध्यात्माविषयी बड्या-बड्या गप्पा करो पण साधनेच्या नावाने शून्य असतो. साधनारत होण्याचा एकप्रकारचा कंटाळा किंवा आळस त्याच्यामध्ये ओतप्रोत भरलेला असतो. स्वैर जीवनाला सोडचिठ्ठी देऊन यम-नियमांच्या आधारे जीवन जगणे त्याला कर्मकठीण वाटते. किंबहुना त्या सर्वांतून तो नाना प्रकारे पळवाटा शोधत असतो. आपल्या पलायनाला पुष्टी देण्यासाठी तो शास्त्रार्थ तोडून-मोडून पुढे करायलाही कमी करत नाही. असा मूढ मनोभूमी असलेला साधक हा मंद प्रकारचा साधक म्हणावा लागेल.

प्रमुख लक्षणे : आळस, निद्रा, अविवेक

चित्ताची त्यापुढची अवस्था आहे क्षिप्तावस्था. अशा साधकाचे मन हे रजोगुणाने ओतप्रोत भरलेले असते. ते अत्यंत चंचल असते. आज हा गुरु तर उद्या दुसरा गुरु. आज ह्या सत्पुरुषाची भक्ती तर तर उद्या दुसऱ्याच कोणाचीतरी. आज एक साधना तर उद्या दुसरी. अशी त्याची भरकटलेली अवस्था असते. त्याच्या मनात शांत भाव क्वचितच प्रगट होतो. अजपा साधना खरोखरच श्रेष्ठ आहे हा. अजपाने आपले कल्याण होईल की नाही. अशा प्रकारच्या शंका त्याच्या मनात सदैव येत असतात. स्वतःला तो वरकरणी अमुक-अमुकचा शिष्य वगैरे म्हणून मिरवत असला तरी त्या अमुक-अमुकची शिकवण प्रामाणिकपणे आचरणात आणणे त्याला जमत नाही. गुरुप्रदत्त साधनेविषयी आणि आपल्या मार्गाविषयी त्याच्या मनात असंख्य शंका-कुशंका असतात. चंचलता हा क्षिप्तचित्ताचा स्थायीभाव असल्याने असा साधक मंद आणि मध्यम यांच्यामध्ये कुठेतरी गणला जातो.

प्रमुख लक्षणे : साधनेची वरकरणी आवड परंतु थेट आध्यात्मिक अनुभूतींची उणीव, पराकोटीची चंचलता

साधनामार्गावर काही काळ गेला, सुयोग्य साधना हातून घडली की मग चित्ताचा पोत थोडा सुधारू लागतो. ते विक्षिप्त या अवस्थेप्रत पोहोचते. सर्वसाधारण मराठीत विक्षिप्त या शब्दाचा जो अर्थ घेतला जातो तो येथे लागू पडत नाही. येथे विक्षिप्त म्हणजे असे चित्त जे काही काळ स्थिर आणि काही काळ चंचल अशा दोन भूमिकांमध्ये हिंदोळ्यासारखे फिरत असते. असा साधक मध्यम प्रकारचा साधक असतो. साधनेत त्याचे चित्त काही प्रमाणात का होईना पण स्थिर झालेले असते. अजपा ध्यानाच्या प्राथमिक पायऱ्या त्याला सहज जमू लागतात. परंतु हा स्थिरभाव संपूर्ण दिवसभर राखणे त्याला जमत नाही. रजोगुण आणि सत्वगुण यांच्या मध्ये तो गिरक्या घेत असतो. अशा साधकाचा गुरुवाक्यावर पूर्ण विश्वास बसलेला असतो. शंका असल्याचं तर त्या करत असलेल्या साधनेविषयी असतात. त्यांचे निराकारण तो आपल्या गुरुकडून करवून घेऊन तो परत प्रयत्नाला लागतो.

प्रमुख लक्षणे : मानसिक स्थैर्य आणि अस्थैर्य दोहोंचा प्रादुर्भाव

अजपा साधानामार्गावरचा पुढचा टप्पा म्हणजे चित्ताची एकाग्रता. अशा साधकाचे मन अजपा साधनेवर लगेच एकाग्र होऊ शकते. तो न कंटाळता बराचकाळ साधनेला बसू लागतो. हंस: सोहं या अजपा गायत्रीच्या मुलमंत्रात तो स्वतःला विसरू लागतो. परंतु चित्तातील संचित संस्कारांमुळे त्याच्या मनाच्या एकाग्रतेला मर्यादा पडतात. कालांतराने त्याची एकाग्रता भंग पावून तो अन्य मनोभूमींवर येऊ शकतो. असा साधक तीव्र स्वरूपाचा असतो. त्याच्या आचार-विचारांवर सत्वगुणाचा पूर्ण प्रभाव असतो. वारंवार होणाऱ्या एकाग्रतेमुळे अध्यात्ममार्गावरची रहस्ये त्याला काही प्रमाणात उमगू लागतात. ईश्वरी साक्षात्काराविषयीची त्याची ओढ दिवसेदिवस वाढीस लागते. ही धारणा-ध्यानाची उच्च अवस्था होय.

प्रमुख लक्षणे : आध्यात्मिक अनुभूतीना सुरवात, सात्विक वृत्तीत वाढ, ध्यान चांगले जमू लागणे, साधनेचा निखळ आनंद मिळणे.

एक दिवस साधक एकाग्रतेच्याही पुढे जावून मनावर पूर्ण ताबा मिळवतो. त्यावेळीस त्याच्या मनातील विचारांचे पूर्णपणे शमन झालेले असते. असे मन निरुद्ध अवस्थेला पोहोचलेले असते. ध्यानाची पायरी ओलांडून साधक आता समाधीच्या विविध पायऱ्या चढू लागतो. असा साधक अर्थातच तीव्रतर प्रकारात मोडतो. ईश्वरी अस्तित्व, आत्मसाक्षात्कार अशी गूढगम्य रहस्ये त्याला स्वानुभवाने उमगू लागतात. पुस्तकी पोपटपंचीला तेथे थारा नसतो. समाधीद्वारे चित्तातील संचित संस्कार काढून टाकण्याचे कार्य तो आता हाती घेतो. प्रारब्धवश तो सर्वसामान्य लोकांप्रमाणे आचरण करताना दिसला तरी त्याच्या आचार-विचारात निरुद्ध चित्तातील प्रगाढ शांतता जाणवत असते. सत्वगुणाची उच्चतम अभिव्यक्ती त्याच्या आयुष्यात दिसू लागते.

प्रमुख लक्षणे : समाधीच्या विविध अवस्था, आध्यात्मिक आनंद, संचित संस्कारांचा लय

साधकांचे जे चार प्रकार मी आधी सांगितले त्याना योग साधायला अनुक्रमे १२, ९, ६ आणि ३ वर्षांचा कालावधी लागतो. आज आपल्या आजुबाजुला आपल्याला असे अनेक साधक दिसतात की जे मंद श्रेणीच्याही खाली असतात. ज्याने त्याने प्रामाणिकपणे आपली गती पडताळून पहावी हे उत्तम.

आता मनाच्या अवस्थांच्या या पायऱ्या चढायच्या कशा असा प्रश्न कदाचित तुमच्या मनात येईल. प्राचीन योग्यांनी कृपाळूपणे आपल्याला अजपाच्या रूपाने मार्ग दाखवलेला आहे. अजपा, अजपा जप, सोहं, हंस, अजपा गायत्री, प्राण गायत्री अशी अनेक नामे धारण करणारी अजपा साधना प्राचीन योगाग्रंथानी "न भूतो न भविष्यति" अशी गौरवलेली आहे. बाकीच्या साधना "हठपूर्वक" कराव्या लागतात. अजपा ही सहज आणि नैसर्गिक साधना आहे. स्वयमेव घटीत होणारी साधना आहे. सहज, सुलभ, कोणालाही जमण्यासारखे हे अजपारुपी श्वासांचे गाणे आजच्या साधकांसाठी कामधेनु सारखे आहे. गरज आहे ती मनातील अहंकार टाकून, पुस्तकी पांडित्याला सोडचिठ्ठी देऊन गुरुप्रदत्त साधनामार्गावर आरूढ होण्याची.

सर्व वाचकांच्या साधनेला लवकरात लवकर पूर्णत्व प्राप्त होवो अशी शिव-दत्त-नाथ चरणी प्रार्थना करून लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 21 January 2019
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates