दत्तात्रेय-गोरक्ष संवाद

पुढच्या आठवड्यात दत्त जयंती आहे. दत्तात्रेय शैव आणि शाक्त मार्ग आणि योगमार्ग यांचेही पुरस्कर्ते होते. दक्षिणेकडील श्रीशैल पर्वतावरून त्यांनी आपले प्रसारकार्य केले असे मानले जाते. श्रीशैल ह्या नावाचा अर्थच मुळी "देवीचा पर्वत" असा आहे. तेथील ज्योतिर्लिंगही प्रसिद्धच आहे. जटाजुट, भस्म, रुद्राक्ष अशी त्यांची अवधूतमूर्ती वैराग्याचे साक्षात प्रतीक. त्रिदेवांचा अंश असलेल्या भगवान दत्तात्रेयांनी नाथ सिद्धांना अजपा साधनेचा उपदेश केला होता. शैव संप्रदायाच्या आणि नाथसंप्रदायाच्या या "अजपा गायत्री"ची सविस्तर माहिती आता आमच्या संकेतस्थळावर मराठीतूनही देण्यात आली आहे (मुखपृष्ठ पहावे). गोरक्षनाथांनी गौरवलेली "न भूतो न भविष्यती" अशी ही सहज सोपी, कोणालाही करता येण्यासारखी पण अत्यंत प्रभावकारी साधना सर्वच योगसाधकांनी आचारावी अशी आहे. श्रीशंकराने दत्तात्रेयांच्या हस्ते मच्छेंद्रनाथांच्या माध्यमातून नाथ संप्रदायाची गुढी उभारली. त्यामुळे दत्त संप्रदायाबरोबरच नाथ संप्रदायातही दत्तात्रेयांना मानाचे स्थान आहे. अशी मान्यता आहे की सिद्ध गोरक्षनाथ आजही दत्तसेवेत आहेत. याच विषयीची एक कथा पाहू...

स्त्री-राज्यातून मच्छिंद्रनाथांची सुटका केल्यावर मच्छिंद्र-गोरक्ष ही गुरू-शिष्यांची जोडगोळी नाना ठिकाणची भ्रमंती करत होती. एके दिवशी मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना भिक्षा आणण्यास सांगितले. त्यावेळी त्यांचा मुकाम एका पर्वतावर होता. आजूबाजूस चिटपाखरूही नव्हते. जवळपास गावही दिसत नव्हते. भिक्षा मागायला जाणार कुठे या चिंतेत असताना गोरक्षनाथांना मैनावाती राणीचे बोल आठवले. स्त्री-राज्यातून निरोप घेताना तीने "कधीही भिक्षा मागायला या" असे सांगितले होते. गोरक्षांनी योगसामर्थ्याने आपले भिक्षापात्र आकाशमार्गाने स्त्री-राज्यात धाडले. ते भिक्षापात्र थेट राणीपुढे जाऊन पडले. राणीने नाथाचे पात्र लगेच ओळखले आणि ती आश्चर्यचकीत झाली. तीलाही आपले शब्द आठवले आणि ही गोरक्षांचीच किमया आहे याची खात्री पटली. एवढ्याशा पात्रातली भिक्षा तीघांना (मच्छिंद्र, गोरक्ष आणि मीननाथ) कशी पुरणार अशी काळजी वाटून तीने आपल्या दासींना त्या पात्रात भरपूर भिक्षा वाढण्यास सांगितले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेवढी भिक्षा घालावी तेवढे ते पात्र मोठे मोठे होत होते. अगदी मारूतीच्या शेपटासारखे. शेवटी राणी अहंकार सोडून मनातल्यामनात मच्छिंद्रनाथांना शरण गेली. तक्षणी पात्र पूर्ण भरले आणि परत अवकाशमार्गाने गोरक्षनाथांकडे निघाले.

वाटेत एका पर्वतावर अत्रिपूत्र दत्तात्रेय बसले होते. त्यांनी आकाशमार्गाने उडत जाणारे हे भिक्षापात्र पाहिले. त्यांना विस्मय वाटला. हे कोणाचे पात्र आहे ते विचारावे या हेतूने त्यांनी हातातला दंड वर केला. पात्र घेवून जाणारी सिद्धी त्या दंडाला आपटून खाली पडली. दातात्रेयांनी तीला ठावठिकाणा विचारला आणि पुढे जाण्याची अनुमती दिली. सिद्धी भिक्षापात्रासह गोरक्षांनाथांकडे पोहोचली आणि म्लान वदनाने उभी राहिली. गोरक्षनाथांनी तीला उशीर होण्याचे कारणं विचारले. सिद्धीने झालेला सर्व प्रकार कथांना केला. आपल्या सिद्धीला कोणी गोसाव्याने दंड मारून पाडले हे एकून गोरक्षनाथांचा क्रोध अनावर झाला. आपल्या योगसामर्थ्याचा अपमान करणार्‍याला शासन करायला ते त्या पर्वतावर पोहोचले.

गोरक्षनाथांचा क्रोध म्हणजे ज्वालामुखीच. पर्वतावर दत्तात्रय ध्यानस्थ बसले होते. गोरक्षनाथांनी क्रोधायमान होऊन दातात्रेयांवर झेप घेतली. पण अघटीत घडले. गोरक्ष दत्तात्रेयांच्या शरीरातून त्यांना काहीही इजा न करता आरपार निघून गेले. पाण्यातून काठी फिरवली तरी ते जसे अभेद रहाते अगदी तसे. गोरक्ष विस्मयचकीत झाले. दत्तात्रेयांनाही गोरक्षांची परीक्षा पहावी असे वाटले. ते गोरक्षनाथांना म्हणाले, "गोरक्षा! तुझ्या सिद्धींविषयी मी बरेच ऐकून आहे. तु सिद्धांचा सिद्ध आहेस असे एकले आहे. तुला ब्रह्मांडसमाधीचा अनुभव आहे म्हणे. जरा पंचतत्वात लीन होवून दाखव बरे. बघूया तुला शोधता येतय का ते." गोरक्षनाथ अवश्य म्हणत तेथून गुप्त झाले आणि समुद्रात एक छोटा मासा बनले. दत्तात्रेयांनी ध्यान लावले आणि क्षणात गोरक्षांचा ठाव शोधला. पटकन पाण्यात हात घालून त्यांनी माशाच्या रूपातील गोरक्षनाथांना बाहेर काढले. मग ते गोरक्षनाथांना म्हणाले, "आता मी अदृश्य होतो. तू जर मला शोधू शकलास तर तू खरा सिद्ध. मग माझे सर्वस्व तुला दिले असे समज." गोरक्षाने होकार देताच दत्तात्रेय अदृश्य पावले. गोरक्षाने चौदा भुवने, तीर्थक्षेत्रे, गुहा, वने, समुद्र सर्व शोधले पण दत्तात्रेय काही त्यांना सापडले नाहीत. आपण हरलो असे लक्षात येऊन गोरक्षांनी मच्छिंद्रनाथांचा धावा केला. मच्छिंद्रनाथ तात्काळ पर्वतावर प्रकट झाले. गोरक्षांनी झालेली हकीकत सांगितली. ती एकल्यावर मच्छिंद्र म्हणाले, "गोरक्षा! हा नक्कीच अत्रेय आहे. त्यांच्याशिवाय अन्य कोणालाही असला अचाट प्रकार करता येणार नाही. त्याला शोधण्याचा मार्ग एकच की तू लीन भावाने पंचतत्वात विलीन झालेल्या दत्तात्रेयांना मनोध्यानाने शोध." गुरू आज्ञेनुसार गोरक्षांनी तसे करताच दत्तात्रेयांचे दिव्य स्वरूप त्यांना दृगोचर झाले. "अलक्ष" शब्द गर्जून गोरक्ष त्यांना "आदेश" करते झाले आणि म्हणाले,

अलक्ष दत्तात्रेय अवधूत। तू निरालंब मायातीत॥
अध ऊर्ध्व अजपा जपत। अलक्षलक्षी जागसी॥
अलक्षचिन्नभी चिदद्वयचंद्र। तो अमृत स्त्रवे निरंतर॥
कोटी विद्युल्लता चंद्र भास्कर। अलक्षलक्षी जागसी॥
अलक्ष इडा पिंगला शुषुम्ना। मनोन्मन ध्यानधारणा॥
सहजसमाधी मनोपवना। अलक्षलक्षी जागृत॥
अलक्ष शुन्यभूवन श्रुत। ते सहस्त्र्दळहारीनिवांत॥
भ्रमरगुहा गुंजारवीत। अलक्षलक्षी जागसी॥
अलक्ष मी आदिनाथ पौत्र। मच्छेंद्रगुरूचा वरदपुत्र॥
तत्प्रसादे निगममंत्र। अलक्षलक्षी जागृत॥
अलक्ष चित्तचैतन्यचिद्रस। तेथे संलग्न समरस॥
गोरक्ष चौपदी अविनाश। अलक्ष लक्षे लक्षी पै॥

गोरक्षाच्या या ओळखीवर दत्तात्रेय उद्गरले, "गोरक्षा! अजून ऐक..."

मी वेदशास्त्र अगोचर। मी लोकत्रयाहूनी पर॥
मी नव्हेची गा निर्जर। यज्ञादी वर्ण नव्हे मी॥
मज नसे कुळ गोत्र याती। मज स्वर्ग ना अधोगती॥
मी ब्रहमैव अरूपस्थिती। मी परमार्थ तत्व जाण पां॥
मी पर ना अपर। मी क्षर ना अक्षर॥
मी शब्द ना ओंकार। अकार उकार नव्हे मी॥
मी कृपण ना उदार। मी प्रकाश ना अंधकार॥
मित्र ना रोहिणीवर। चटवारश्रुंग नव्हे मी॥
मी कर्ता ना अकर्ता। मी भोक्ता न आभोक्ता॥
मी सत्ता न असत्ता। आर्ता पाता नव्हे मी॥
मी जाणता न अजाण। मी सेव्य ना शरण॥
मी कारण ना अकारण। ज्ञान अज्ञान नव्हे पै॥
मी पाप ना पूण्य। मी कुरूप ना लावण्य॥
मी अल्प ना अगण्य। धन्याध्यन्य मी नव्हे॥
मी श्वेत ना सावळा। मी रक्त ना पिवळा॥
मी नीळ ना सुनीळा। रंगावेगळा असे मी॥
मी ब्रह्मचर्य ना गृहस्थ। मी वानप्रस्थ ना सन्यस्थ॥
मी स्वस्थ ना अस्वस्थ। वृत्तस्थ कुटस्थ नसे मी॥
मी नसे स्थावर जंगम। मज नसे क्रिया कर्म॥
वर्णाश्रम धर्माधर्म। अनामा नाम मज कैचे॥
मी खेचरी ना भूचरी। मी चाचरी ना अगोचरी॥
मी अलक्ष नव्हे निर्धारी। पवन मन नव्हे मी॥
जागृत स्वप्न सुषुप्ती तुर्या। हेही भेद भासती वाया॥
मी नसेची मच्छेंद्रतनया। छायामाया रहित मी॥

दत्तात्रेयांच्या या उत्तरावर गोरक्ष देहभान विसरले. त्या अवस्थेतच मच्छेंद्रनाथांनी गोरक्षांचा हात दत्तात्रेयांच्या हातात ठेवला. द्वैत नावालाही उरले नाही. केवळ सोहम भाव भरून राहीला.

(ओव्या - नाथलीलामृत)


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 13 December 2010


Tags : योग अध्यात्म शिव साधना कथा भक्ती नाथ

Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates