Ajapa Yoga : Kriya and Meditation Online Course || Build your personal kriya and meditation routine step-by-step for calm and clear mind, improved focus, and blissful inner connection.

Untitled 1

अक्षय तृतीये निमित्त ध्यानसाधना

अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक. अक्षय तृतीयेचे महत्व सर्वज्ञात असल्याने त्या विषया अधिका काही सांगण्याची गरज नाही. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्ताचे औचित्य साधून योग-ध्यानमार्गाची आवड असणारी मंडळी विशेष साधना आणि सरावाचा श्रीगणेशा सुद्धा करत असतात. आज अशीच एक ध्यानसाधना सांगणार आहे. ही साधना अगदी नवख्या लोकांसाठी नाही. ज्यांना कुंडलिनी योगशास्त्राची प्राथमिक माहिती आहे आणि ज्यांनी ध्यान-धारणेचा काही काळ तरी अभ्यास केलेला आहे अशा लोकांसाठी प्रामुख्याने ही साधना आहे.

खरं तर अक्षय तृतीयाचा संपूर्ण दिवसच शुभ मानला जातो परंतु हा ध्यानाभ्यास असल्याने तो अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजे ३ मे २०२२ रोजी सकाळी साडेपाच ते सहा च्या दरम्यान सुरु करून सात ते साडेसात असा दीड तास पर्यंत तरी करावा. सर्व प्रथम सांब सदाशिवाची जगदंबा आणि गणेशा सहित यथाशक्ती पूजा करावी. त्या जोडीला आदी शंकराचार्यांनी रचना केलेले शिव मानस पूजा स्तोत्र अर्थासहित पठण करावे. त्यांतील योगगर्भ अर्थाकडे विशेष लक्ष द्यावे.

त्यानंतर कमीतकमी दहा वेळा नाडीशोधन प्राणायाम करावा. काही क्षण स्तब्ध बसून मनाला अंतरंगात विहार करू द्यावे.

त्यानंतर ब्रह्म ग्रंथीवर ध्यान लावून रुद्राक्षाच्या माळेवर श्रीशिवपंचाक्षर किंवा श्रीशिवषडाक्षर मंत्राचा तीन माळा जप करावा. जप करत असतांना चित्त शक्य तितके शांत आणि अविचल ठेवण्याचा प्रयत्न करावा. असं समजा की हा तीन माळा जप करण्यासाठी तुम्हाला साधारण पंधरा मिनिटे एवढा वेळ लागलेला आहे. आता जपमाळ बाजूला ठेऊन ब्रह्म ग्रंथीवर ध्यान धरत तेथेच पंधरा मिनिटे अजपा जप करावा.

त्यानंतर पुन्हा जपमाळ हातात घ्यावी आणि ध्यानाचे केंद्र ब्रह्म ग्रंथीवरून वर विष्णू ग्रंथीवर न्यावे. येथेही आगोदर प्रमाणे तीन माळा जप करावा. जप झाल्यावर माळ बाजूला ठेऊन द्यावी आणि पंधरा मिनिटे विष्णू ग्रंथीवर अजपा जप करावा.

आता पुन्हा जपमाळ हाती घेऊन ध्यानाचे केंद्र रुद्र ग्रंथीवर न्यावे. येथेही श्रीशिवपंचाक्षर किंवा श्रीशिवषडाक्षर मंत्राचा तीन माळा जप करावा. जप झाल्यावर माळ बाजूला ठेऊन द्यावी आणि पंधरा मिनिटे रुद्र ग्रंथीवर अजपा जप करावा.

अशा प्रकारे साधारणपणे ब्रह्म ग्रंथी ३० मिनिटे + विष्णू ग्रंथी ३० मिनिटे + रुद्र ग्रंथी ३० मिनिटे असा दीड तासाचा हा अभ्यास होईल.

ध्यानाभ्यास संपल्यावर परत दहा वेळा नाडीशोधन प्राणायाम करावा. आसनावरून लगेच उठू नये. दहा-पंधरा मिनिटे शांतपणे मौन पाळत तसेच बसून राहावे. त्यानंतर साधनेला विराम द्यावा. जर सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन्ही वेळी ही साधना करणे शक्य झाले तर उत्तमच. अक्षय तृतीयेचे महत्व लक्षात घेता दिवसभर उठता-बसता नामस्मरण स्वरूपात सुद्धा श्रीशिवपंचाक्षर किंवा श्रीशिवषडाक्षर मंत्राचा जप तुम्ही करू शकता.

ब्रह्म ग्रंथी, विष्णू ग्रंथी आणि रुद्र ग्रंथी यांचे भेदन हा एक स्वतंत्र आणि विस्तृत विषय आहे. येथे एवढे लक्षात घेणे पुरेसे आहे की या ग्रंथींचे स्वतःचे असे काही गुणविशेष आहेत. वरील साधनेने या ग्रंथीत्रयीचे अवगुण कमी होऊन त्यांचे उत्तम गुण प्रकट होण्यास मदत होते.

परत एकदा सांगतो की हा अभ्यास नवख्या साधकांसाठी नाही. ज्यांना ध्यानाभ्यासाचा थोडातरी दैनंदिन सराव आहे त्यांनाच ही साधना प्रामुख्याने आवडेल आणि उपयोगी पडेल. नवख्या साधकांनी आपापल्या इष्ट देवतेच्या मंत्राचा जप आणि त्यानंतर अजपा जप असा ध्यानाभ्यास केल्यास तो त्यांना अधिक सुलभ आणि सुखकारक वाटेल.

असो.

ब्रह्म ग्रंथी, विष्णू ग्रंथी आणि रुद्र ग्रंथींचा वेध घेत थेट सहस्राराकडे झेपावणारी जगदंबा कुंडलिनी सर्व वाचकांना "अक्षय योगज्ञान" प्रदान करो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा योग क्रिया आणि ध्यानाच्या ओंनलाईन सेशन्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 02 May 2022