Untitled 1

योगशास्त्रातील सूर्य आणि चंद्र

मानवाला नेहमीच आपल्या सभोवतालच्या निसर्गाविषयी कुतूहल वाटत आले आहे. विशेषतः अवकाशातील ग्रह-तारे हा त्याच्या आवडीचा विषय ठरला आहे. योगशास्त्रही त्याला अपवाद नाही. योगशास्त्राच्या दृष्टीने बोलायचे झाले तर सूर्य आणि चंद्र यांचा हठयोगाशी आणि कुंडलिनी योगामार्गाशी घनिष्ठ संबंध आहे. तोच या लेखात संक्षेपाने जाणून घेऊया.

आकाशातील सूर्य आणि चंद्र म्हणजे विश्वंभराचे दोन डोळे असे वर्णन अनेक ग्रंथात केले गेले आहे. वरकरणी हे वर्णन निव्वळ कविकल्पना वाटेल परंतु योगशास्त्राचा नीट अभ्यास केल्यास त्यांतील खरे रहस्य उमगून येईल. नाथ संप्रदायात 'पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी' हे तत्व सुप्रसिद्ध आहे. शिव संहितेतही हाच सिद्धांत सांगितला आहे. हा सिद्धांत लावला तर अवकाशातील सूर्य आणि चंद्राच्या जोडीला मानवी शरीरात देखील सूर्य-चंद्र असणार हे उघड आहे.

हठयोगातला 'हठ' हा शब्द ह + ठ असा बनलेला आहे. 'ह' म्हणजे सूर्य आणि 'ठ' म्हणजे चंद्र मानला गेला आहे. डाव्या नासिकाग्रातून वाहणाऱ्या नाडीला इडा नाडी अथवा चंद्र नाडी म्हणतात तर उजव्या नासिकाग्रातून वाहणाऱ्या नाडीला सूर्य नाडी अथवा पिंगला असे म्हणतात. या नाड्यांना असे म्हणण्याचे कारण असे की इडा नाडी चंद्रासारखा थंडावा प्रदान करते तर पिंगला नाडी सूर्यासारखी उष्णता प्रदान करते. या दोन्ही नाड्यांचा संबंध मेंदूच्या अनुक्रमे उजव्या आणि डाव्या भागाशी आहे.

मेंदूचा उजवा भाग मानवी भावभावना किंवा Emotional Quotient  वर नियंत्रण ठेवतो तर मेंदूचा डावा भाग तर्कशुद्ध विचार किंवा Intelligence Quotient  वर नियंत्रण ठेवतो. चंद्राची तुलना नेहमीच प्रेम किंवा शांती अशा तरल भावनांशी केली जाते तर सूर्य हा ज्ञानाचे प्रतिक मानला जातो. मेंदूच्या डाव्या-उजव्या भागाचे कार्य लक्षात घेतले तर ही तुलना बरोबर आहे हे सहज लक्षात येईल.

कुंडलिनी योगशास्त्रात चंद्र आणि सूर्य यांची शरीरातील स्थानेही सांगितली आहेत. चंद्राचे स्थान सहस्रार चक्राच्या जवळ असून सूर्याचे स्थान नाभि जवळ आहे. पैकी सूर्य स्थान समजणे सोपे आहे. नाभि स्थानी जठराग्नी प्रज्वलित असतो अर्थात सूर्यासारखी उष्णता असते. कुंडलिनी जेंव्हा जागृत होऊन सहस्रारात स्थिरावते तेंव्हा शिव-शक्ती मिलनाने प्रगाढ शांती प्राप्त होते. बिंदूचे सर्वोच्च स्थानही सहस्रार चक्रच आहे. सहस्रार, बिंदू आणि 'अमृत' यांचा घनिष्ठ संबंध आहे. तेंव्हा चंद्र स्थान सहस्रारात असणे स्वाभाविक आहे.

अवकाशातील सूर्य-चंद्र आणि शरीरस्थ सूर्य-चंद्र अनुक्रमे बारा आणि सोळा कलांनी सुशोभित मानले गेले आहेत. हा कुंडलिनी योगशास्त्रातील आणि मंत्रशास्त्रातील एक गहन विचार आहे. ज्ञानेश्वरीत उल्लेखलेली चंद्राची 'सतरावी कला' म्हणजे नित्य, शाश्वत स्वरूप. विस्तार भयास्तव येथे अधिक खोलात जात नाही. त्याविषयी पुन्हा कधीतरी विस्ताराने लिहीन.

सूर्याचा प्रकाश आणि चंद्राचा प्रकाश हे दोन्ही जरी 'प्रकाश' असले तरी त्यांच्या गुणधर्मांत जमीनअस्मानाचा फरक आहे.  सूर्याचा प्रकाश प्रखर आणि अति उष्णता प्रदान करणारा असतो हे तर सर्वांनाच माहित आहे. शरीरस्थ सूर्याचा गुणधर्मही असाच आहे. सूर्याची प्रखर उष्णता थोड्या प्रमाणात ठीक वाटते परंतु ती जास्त झाली तर मात्र त्रासदायक वाटते. याच कारणामुळे शरीरस्थ सूर्य हा 'विष ओकणारा' मानला गेला आहे. याउलट चंद्राचा प्रकाश हा नेहमी शीतल असतो. शरीरस्थ चंद्रही शीतलता आणि पोषण प्रदान करतो अशी योगशास्त्रीय मान्यता आहे. त्यामुळेच चंद्र 'अमृत स्त्रवणारा' मानला गेला आहे.

सूर्य आणि चंद्र यांना आणखी एक आध्यात्मिक अर्थ आहे. सूर्य हा आत्म्याचे प्रतिक मानला गेला आहे तर चंद्र हा मनाचे प्रतिक मानला गेला आहे. आत्मज्ञान म्हणजे निखळ सत्य. सत्य अतिशय निष्ठुर असतं. सत्याला भावभावना असत नाहीत. जे आहे ते त्याच्या मूळ स्वरूपात दर्शवणे हा सत्याचा स्वभाव आहे. तेथे तुमच्या मताला किंवा भावनेला महत्व नाही. याउलट मानवी मन हळवं असतं. प्रसंगी सत्याशी फारकत घेऊन गोष्टी दर्शवणं हा हळव्या मनाचा स्वभाव आहे. मनाला प्रखर सत्यापेक्षा भावभावना महत्वाच्या वाटतात.

हठ्योग्याचे उद्दिष्ठ म्हणजे चंद्र आणि सूर्य यांचे ऐक्य घडवून आणणे. याचा अर्थ असा की चंद्र आणि सूर्य यांना समतोल बनवून सुषुम्ना नाडी जागुत करणे. मेंदूचा डाव्या आणि उजव्या भागात समतोल आला की समाधी आपोआप साधते. हाच 'हठ योग'. हठयोगात ही अवस्था साधण्यासाठी कुंभकयुक्त प्राणायाम, बंध, मुद्रा, नादश्रवण वगैरे क्लिष्ट प्रक्रिया आहेत. अर्थात ही साम्य स्थिती साधण्याचे अन्य उपायही आहेत. अजपा योगाद्वारे हीच अवस्था कोणत्याही क्लिष्ट क्रिया न करता अगदी सहज,सुलभ पद्धतीने प्राप्त केली जाते.

बहुतेक सर्व नाथ पंथी सिद्धांच्या समाध्यांवर चंद्र आणि सूर्य कोरलेले असतात.  ते का असतात ते आता तुम्हाला अधिक चांगल्याप्रकारे कळू शकेल.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 02 January 2017