Untitled 1

चिदंबर आणि दिगंबर

काही दिवसांपूर्वीची गोष्ट. उन्हात गाईच्या दुधात कालवलेल्या भस्माचे गोळे सुकवत ठेवले होते. श्रीदत्त जयंती येतेच आहे थोड्या दिवसांत. शैव मार्गात रुद्राक्षाप्रमाणेच भस्म अथवा विभूतीलाही महत्वाचे स्थान आहे.  दैनंदिन जीवनात रोज जरी अंगभर लावणे शक्य झाले नाही तरी शिवपुजनात आणि काही शैवपंथी / नाथपंथी साधनांत विभूतीचा वापर हमखास होतोच. वैराग्याची सदैव आठवण करून देणारी विभूती! ते गोळे सारखे करायला गेलो तो सहज आकाशाकडे लक्ष गेले. लख्ख अथांग निळाई जणू या विश्वाला अलगद कवेत उचलून घेत आहे असं वाटत होतं.

भारतीय अध्यात्माचे एक वैशिष्ठ आहे ते म्हणजे सर्वोच्च अवस्था, मग ती ज्ञानाची असो अथवा साधनेची,  ही अनेक विशेषणे वापरून दर्शविली जाते. योगमार्गावरील साधक मजल दरमजल करत एक दिवस ज्या अवस्थेला प्राप्त करतो त्या अवस्थेला सुद्धा अनेक विशेषणांनी गौरविलेले आहे. भस्माच्या त्या तयार होणाऱ्या गोळ्यांकडे विशाल गगनाच्या पार्श्वभूमीवर पहात असतांना अशीच दोन विशेषणे आठवली - चिदंबर आणि दिगंबर.

चिदंबर ह्या शब्दाची फोड चित + अंबर अशी सांगतात. चित म्हणजे चैतन्य अथवा ज्ञान आणि अंबर म्हणजे आकाश. परमेश्वराचे चैतन्य हे काही एका जागी एकवटलेले नाही. संपूर्ण चराचरात ते ओतप्रोत भरलेले आहे. सृष्टीच्या कणाकणात भरलेल्या चैतन्याचा ज्याला प्रतिक्षण अनुभव आहे तो चिदंबर. दक्षिणेकडे हे विशेषण भगवान शंकराला दिले जाते. चिदंबरमचे नटराज मंदिर प्रसिद्धच आहे. 

दिगंबर ह्या शब्दाची फोड दीक + अंबर अशी केली जाते. दीक म्हणजे दिशा आणि अंबर म्हणजे आकाश. दाही दिशांत भरून राहिलेले आकाश हेच ज्याचे वस्त्र बनले आहे तो म्हणजे दिगंबर. दिगंबर शब्दाचा रूढ अर्थ निर्वस्त्र असा असला तरी त्याचा आध्यात्मिक अर्थ दाही दिशा व्यापून राहिलेला असा आहे.

अध्यात्म दृष्टीने पाहिल्यास चिदंबर आणि दिगंबर हे एकमेकाच्या जवळ जाणारे शब्द आहेत. आता गंमत बघा. चिदंबर हे विशेषण भगवान शंकरासाठी वापरतात आणि दिगंबर हे विशेषण भगवान दत्तात्रेयांसाठी वापरतात. शंकर आणि दत्तात्रेय यांची जीवनशैली पाहू गेल्यास ती बरीच सारखी आढळते. उन्मत्त, पिशाचवृत्ती, वैराग्यशील, भस्मधारी, रुद्राक्ष माळांनी वेढलेले, जटाजूट धारण केलेले, योगामार्गी, आगम-निगम प्रिय असे अनेक समान गुणविशेष सांगता येतील. खरं सांगायचं तर जो शिव तोच दत्त आणि जो दत्त तोच शिव असा प्रकार आहे.  नावं भिन्न पण तत्व एकच.

असो.

येऊ घातलेल्या श्रीदत्त जयंतीच्या पावन मुहूर्तावर सर्व वाचकांना चिदंबर आणि दिगंबर यांचा वरदहस्त लाभो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 17 December 2018