Untitled 1

अजपा साधकांसाठी पंचीकरण रहस्य

म्हणता म्हणता पावसाळा येऊन ठेपला आहे. उकाडा कमी होऊन हवामान जरा सुखकारक बनले आहे. पहाटे-पहाटे पक्ष्यांची ऐकत राहावीशी वाटणारी किलबिल आता कानावर पडू लागली आहे. थंड पावसाळी हवेची हवीहवीशी वाटणारी झुळूक शरीर-मन सुखावून जात आहे. पाउस पडून गेल्यावर चमचम करणारे उन्हाचे कवडसे चैतन्याची अद्भुत अनुभूती करून देत आहेत. झुळूझुळू वाहणारं पावसाचं पाणी जीवनाच्या गतिशीलतेची आठवण करून देत आहे. कोणत्याही मानवनिर्मित सुगंधापेक्षा श्रेष्ठ असणारा मातीचा गंध जीवन जगण्यची एक वेगळीच उर्जा प्रदान करत आहे.

तसं बघायला गेलं तर निसर्गात उत्पत्ति आणि लय यांचा खेळ प्रतिक्षण सुरूच असतो. निसर्ग देवता आपल्या "कुंभाराच्या चाकावर" पंचमहाभूतांच्या सहाय्याने नानाविध सजीव-निर्जीव गोष्टींचं सृजन करत असते. पावसाळ्यात पंचमहाभूतांचा हा खेळ अधिक प्रकर्षाने जाणवतो. पक्ष्यांची किलबिल म्हणजे आकाश तत्व, वाऱ्याची झुळूक म्हणजे वायुतत्व, उन्हाचे कवडसे म्हणजे अग्नितत्व, झुळूझुळू वाहणारे पाणी म्हणजे जलतत्व आणि मातीचा सुगंध म्हणजे पृथ्वीतत्व. 

सृष्टीतील बहुतांश गोष्टींप्रमाणे मानवी पिंड सुद्धा पंचमहाभुतांनीच बनलेला आहे. अधिक खोलात गेल्यास आपल्याला मानवी पिंडाचे पुढील घटक आढळून येतील - पंचमहाभूते,  पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, पंचप्राण, मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त.

पंचमहाभूतांनी बनलेले स्थूल शरीर कसं घटीत होतं याविषयी योग-अध्यात्म शास्त्राची स्वतःची अशी एक सुस्पष्ट भूमिका आहे. थोडक्यात ही भूमिका काय आहे ते जाणून घेऊया.

प्रकृती, माया, आदिशक्ती वगैरे नावांनी ओळखली जाणारी जी काही उर्जा आहे ती त्रिगुणमयी आहे. ती सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुणानी युक्त आहे. एखादी गोष्ट ज्या गुणांनी युक्त असते तेच गुण त्या गोष्टीपासून घडलेल्या निर्मितीत असतात. उदाहरणार्थ, पांढऱ्या वस्त्रापासून बनलेल्या सदरा, टोप्या, रुमाल, टॉवेल इत्यादी सर्व गोष्टी सुद्धा पांढऱ्या रंगाच्याच असतात. तात्पर्य हे की मायेपासून निर्माण झालेले चेतन आणि अचेतन जगत सुद्धा सत्व-रज-तम या गुणांनी युक्त असते. मायेपासून घटीत झालेली पंचमहाभूते सुद्धा त्रिगुणांनी युक्त असतात हे ओघाने आलेच.

मायेपासून प्रथम सूक्ष्म अशा आकाश तत्वाचे सृजन होते. आकाश तत्त्वातून वायुतत्व जन्माला येते. वायुतत्वातून अग्नीतत्व प्रगट होते. अग्नितत्वातून जलतत्व निर्माण होते. शेवटी जल तत्त्वातून पृथ्वी तत्व घटीत होते. आता गंमत बघा. गुणधर्माचा विचार करता पंचमहाभूते एकमेकाच्या अगदी विरुद्ध स्वभावाची आहेत. मायेची जादू अशी की परस्पर भिन्न असलेली ही तत्वे एकत्र एकाच पिंडात खेळीमेळीने रहातात.

नाद, ध्वनी किंवा शब्द हा आकाश तत्वाचा गुणधर्म आहे. वायुतत्वात नाद आणि स्पर्श हे गुणधर्म आहेत. अग्नितत्वाकडे नाद, स्पर्श आणि आकार हे गुणधर्म आहेत. जलतत्वाकडे नाद, स्पर्श, आकार आणि चव हे गुण आहेत. पृथ्वीतत्वाकडे नाद, स्पर्श, आकार, चव आणि गंध हे गुणधर्म आहेत.

मानवी पिंडातील पाच ज्ञानेद्रीये म्हणजेच कान, त्वचा, नेत्र, जिव्हा आणि नाक ही महत्वाची भूमिका बजावत असतात. आकाश, वायू, अग्नि, जल आणि पृथ्वी यांच्या सत्वगुणा पासून पंचेंद्रियांची उत्पत्ति होत असते. आकाश तत्वाच्या सात्विक गुणाधर्मामुळे कानांना ऐकु येते, वायु तत्वाच्या सात्विक गुणधर्मा मुळे स्पर्श कळतो, अग्नीच्या सत्व गुणामुळे नेत्र बघू शकतात, जल तत्वाच्या सात्विक गुणामुळे जिभेला चव समजते आणि पृथ्वी तत्वाच्या सात्विक गुणधर्मामुळे नाकाला गंध समजतो. पंचमहाभूतांच्या व्यक्तिगत सात्विक गुणधर्मामुळे ज्ञानेंद्रिये निर्माण होतात तर पंचमहाभूतांच्या एकत्रित सत्वगुणापासून मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त यांची निर्मीती होते.

ही झाली सत्वगुणाची गोष्ट. आता रजोगुणाची गंमत समजून घेऊ.

आकाश तत्वातील रजोगुणामुळे वाणी कार्यान्वित होते. वायू तत्वाच्या रजोगुणामुळे हातांना गोष्टी धरण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. अग्नि तत्वातील रजोगुणा मुळे पायांना चालता येते. जल तत्वाच्या रजोगुणा मुळे प्रजनन करण्याची शक्ती प्राप्त होते. पृथ्वी तत्वातील रजोगुणा मुळे मल-मुत्रादिंचा त्याग करता येतो. थोडक्यात सांगायचं झालं तर पंचमहाभूतांच्या व्यक्तिगत रजोगुणाच्या प्रभावाने कर्मेंद्रिये निर्माण होतात. त्यांच्या रजोगुणाच्या एकत्रित प्रभावाने पंच प्राणांची निर्मीती होते.

वर विवेचन केलेली मन, बुद्धी, अहंकार, चित्त, ज्ञानेंद्रियांची आणि कर्मेंद्रियांची निर्मीती ही सूक्ष्म स्तरावरील निर्मीती म्हणावी लागेल. स्थूल पंचमहाभूतांची निर्मीती होते त्या-त्या तत्वातील तमोगुणामुळे.  प्रत्येक तत्वातील तमोगुणी भाग दोन समान भागात विभागला जातो. तत्वाचा पहिला भाग उर्वरित चार तत्वांच्या एक अष्टमांश भागा बरोबर मिसळला जातो आणि त्या स्थूल तत्वाची निर्मीती होते. असाच प्रकार सर्व तत्वांबरोबर घडतो आणि जड पिंडाची निर्मीती होते.

वरील विवरण मी मुद्दम सोपं करून सांगितलं आहे पण एकंदरीत मायेचा "खेळ" काय असतो त्याची तुम्हाला कल्पना आली असेल. या "खेळाला" योग-अध्यात्म शास्त्रात पंचीकरण असं म्हटलं जातं.

तुमच्या मनात कदाचित असा प्रश्न येईल की एक माहिती म्हणून हे सर्व ठीक आहे पण साधकाला याचा प्रत्यक्षात काय उपयोग?? याचे उत्तर असं की ज्ञानाचा उपयोग कसा करायचा हे माहित असेल तर या ज्ञानाचा खुप उपयोग करता येतो. उदाहरणार्थ, जर तत्वांच्या असंतुलनामुळे काही त्रास होऊ लागला तर अनुभवी साधक काही मुद्रांचा वापर करून आवश्यक ते तत्व कमी-अधिक करू शकतो. सुषुम्ना मार्गावरील पहिल्या पाच चक्रांचा तर पंचमहाभूतांशी अत्यंत जवळचा संबंध आहे. अजपा साधना करता-करता जे काही विस्मयकारी अनुभव साधकाला येत असतात त्यांची तर्कसंगत उकल त्याला होऊ लागते कारण त्यातील बरेचसे अनुभव हे तत्वांच्या साक्षीने घटीत होत असतात. फार खोलात जात नाही परंतु पंचमहाभूतं आणि पंचीकरण जर नीट उमगलं तर अनुभवी साधक आपल्या पिंडात योगमार्गाला आवश्यक असलेले सूक्ष्म बदल घडवू शकतो.

असो.

पंचमहाभूतांवर अधिराज्य गाजवणारी आदिशक्ती कुंडलिनी सर्व योगाभ्यासी वाचकांना "भूतशुद्धी" प्रदान करो या मनःपूर्वक सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 08 June 2020
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates