Untitled 1

भगवान शंकराचा अवतार महायोगी श्रीगोरक्षनाथ

आधुनिक काळातील इतिहास संशोधक मच्छिंद्रनाथ-गोरक्षनाथ यांचा काळ १०-११ व्या शतकाच्या आसपासचा मानत असले तरी अनेक प्राचीन घटनाप्रसंगांमध्ये गोरक्षनाथांचा उल्लेख आपल्याला आढळून येतो. असाच एक प्रसंग.

एकदा भगवान श्रीकृष्णाने गर्ग मुनींना विनम्रपणे विचारले -

"हे मुनिवर, गोरक्षनाथ म्हणजे नक्की कोणती देवता? गोरक्षनाथांचे मंत्र कोणते? त्यांची उपासना कशी करावी? कृपया हे सर्व मला विस्ताराने सांगा. "

श्रीकृष्णाच्या या प्रश्नांवर प्रसन्न होऊन गर्गमुनी म्हणाले -

"श्रीकृष्णा ऐक. एकदा सर्व ऋषींनी भगवान शंकराला गोरक्षनाथांच्या चरित्राविषयी विचारले. तेंव्हा देवांचे देव महादेव उत्तरले -

ऋषींनो, मीच गोरक्षनाथ आहे. माझेच एक रूप म्हणजे साक्षात गोरक्षनाथ असे जाणा. योगमार्गाचा प्रसार करण्यासाठी मी हे रूप धारण केले आहे. स्वतः ज्योतिस्वरूप असणारा, शून्य, निराधार, निरंजन अशा माझ्या या अवताराला गोरक्ष असे नामाभिधान आहे. 

त्यानंतर सर्व ऋषींनी भगवान शंकराला गोरक्षनाथांची उपासना कशी करायची त्याबद्दल विचारणा केली.

भगवान शंकर त्यांना म्हणाले की - "माझ्या गोरक्षरुपाचे सदासर्वकाळ ध्यान केल्याने योगसाधक योगींद्र होतो अर्थात योग्यांमध्ये श्रेष्ठ होतो. गोरक्षनाथांची विधिवत उपासना केल्याखेरीज योग सिद्ध होत नाही. गोरक्ष मंत्राच्या प्रभावाने सर्व योगसिद्धी प्राप्त होतात अर्थात योगमार्गात यश मिळते."

त्यानंतर गर्गमुनींनी श्रीकृष्णाला भगवान शंकराने ऋषींना जे विधीविधीन सांगितले होते तेच मंत्र, ध्यान आणि अन्य विधिविधान सांगितले. त्याशिवाय हे ही सांगितले की जे योगसाधक विधीपूर्वक गोरक्षनाथ उपासना करतात त्यांना गोरक्षकृपेने योगमार्गावर यश अवश्य मिळते.

विस्तारभयास्तव आज गोरक्षनाथांचे विविध मंत्र आणि उपासनेचे विधिविधान सांगत नाही. काही साधकांना ही उपासना कदाचित थोडी क्लिष्ट वाटणे शक्य आहे पण योगमार्गावर ती अद्भुत फलप्रदान करणारी आहे एवढे नक्की. ज्यांना ही क्लिष्टता नको असेल त्यांना नामस्मरण, स्तोत्र आणि भक्तिमार्गानेही गोरक्ष उपासना करणे शक्य आहे. येथे सांगण्याचे तात्पर्य हे की ज्याला भगवान शंकराच्या आणि अवधूत शिरोमणी दत्तात्रेयांच्या हठयोग, नाथपंथी योग, कुंडलिनी योग, अमनस्क योग इत्यादींत लवकर सफलता मिळवायची आहे त्यांनी सदाशिव अवतार श्रीगोरक्षनाथांच्या चरणी भक्ती अवश्य ठेवावी. ज्यांनी "नाथांची अजपा" नित्य योगसाधना म्हणून अंगिकारली आहे त्यांना तर गोरक्ष भक्ती अत्युत्तम आहे हे ओघाने आलेच.

असो.

सर्व योगाभ्यासी वाचकांवर श्रीशंकराचा आणि श्रीगोरक्षनाथांचा कृपाशीर्वाद राहो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 24 June 2019
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates