Untitled 1

बुद्धीच्या पलीकडले (प्रश्नोत्तरे - ऑगस्ट २०१५)

प्रिय वाचकांनो,

परवापासून म्हणजे १५ ऑगस्ट २०१५ पासून श्रावण सुरू झाला आहे. श्रावण महिना म्हणजे भगवान शिवशंकराची भक्ति विशेषरूपाने अंगिकारण्याचा काळ. उपास-तापास, व्रतंवैकल्ये, पूजा, जप अशा अनेक मार्गानी शंकराची भक्ति केली जाते. आपापल्या श्रद्धेनुसार भक्त मार्गक्रमण करत असतो. योगमार्गी साधक या सगळ्या उपासना प्रकारांना योगाभ्यासाची जोड देत असतो. त्याच्या दृष्टीने बाह्य आचरणाने केली जाणारी साधना गौण असून योगाक्रियांच्या मार्गाने केली जाणारी साधनाच प्रधान असते.

सर्वच शास्त्रग्रंथांनी असे प्रतिपादन केले आहे की परमशिव किंवा परमेश्वर म्हणून जे काही तत्व आहे ते मानवी बुद्धीच्या पलीकडले आहे. मानवी बुद्धीच्या सहाय्याने परमेस्वराच्या स्वरूपाविषयी कल्पना करता येतात परंतु त्याचे खरे स्वरूप मानवी बुद्धीच्या पकडीत येणे शक्य नाही. त्याचे कारण असे की मानवी बुद्धी शेवटी स्थल-काल-देह इत्यादींच्या सीमांमध्ये बद्ध आहे आणि परमेश्वर तर या सगळ्या मर्यादांपासून मुक्त आहे. आपल्याला अशाच गोष्टींचे आकलन होऊ शकते ज्या मानवी बुद्धीच्या आणि परिणामी मानवी मेंदूच्या कक्षेत आहेत. परमेश्वर या सर्व मानवी मर्यादांच्या पलीकडे आहे असे सर्वच शास्त्रं एकमुखाने सांगतात.

आता प्रश्न असा की जर परमेश्वर मानवी बुद्धीला अगम्य आहे तर त्या परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग तरी मानवी बुद्धीच्या कक्षेतला असू शकेल का? नीट विचार केल्यास असे लक्षात येईल की मानवी बुद्धीला अगम्य असलेला परमेश्वर मानवी बुद्धीच्या गम्य असलेल्या कोणत्याही साधनाने आकळता येणार नाही. त्याचं कारण असं की जर एखादा मार्ग आपल्या बुद्धीच्या कक्षेतला असेल तर त्या मार्गाचे उद्दिष्ठही बुद्धीच्याच कक्षेतले आहे असे म्हणावे लागेल. जर तसे नसेल तर तो त्या उद्दिष्ठाचा मार्ग आहे असे आपल्याला म्हणता येणार नाही. तात्पर्य हे की कोणत्याही बुद्धिगम्य मार्गाने परमेश्वरपर्यंत पोहोचता येणे शक्य नाही.

जर परमेश्वर कोणत्याही ज्ञात मार्गानी जाणता येणार नसेल तर मग त्याला जाणून घेण्याचा मार्ग कोणता? बुद्धीच्या पलीकडल्या परमेश्वराला जाणून घेण्याचा मार्गही बुद्धीच्या पलीकडलाच असला पाहिजे. शैव दर्शनानुसार आणि नाथ संप्रदायाच्या शिकवणीनुसार हा बुद्धीच्या पलीकडला मार्ग म्हणजे कुंडलिनी शक्ति. कुंडलिनी शक्ति मानवी शरीरात सुप्तावस्थेत असलेली परमात्म्याचीच शक्ति आहे. प्रत्येक मानवी पिंडात ती अस्तीत्वात आहे. ती परमेश्वराचीच अर्धांगिनी आहे. त्यामुळे तिच्या सहाय्याने परमेश्वरापर्यंत पोहोचणे शक्य आहे असे शैव दर्शनाचे सांगणे आहे. बहुतेक सर्वच हठयोग ग्रंथ कुंडलिनी जागृत कशी करावी ते सांगतात पण ती जागृत झाल्यावर नक्की काय करायचे किंवा काय घडेल त्या विषयी साधारणतः मौन बाळगतात. त्याचं कारणच हे आहे की प्रत्येक साधकाची जडणघडण वेगळी असल्याने केवळ ज्ञानवती कुंडलिनीच साधक ते शिव यांतील मार्ग जाणू शकते. अन्य कोणाला ते शक्य असत नाही. कुंडलिनी जागृत झाल्यावर साधकाला जे अनुभव येतात ते अनेक वेळा विस्मयकारक असतात, साधकाच्या कल्पनेच्या पलीकडले असतात ते याच कारणामुळे.

आता मग प्रश्न असा उरतो की मग जगात जप, तप, भक्ति, योग वगैरे ज्ञात मार्ग अवलंबणारे एवढे लोक आहेत ते चुकीचे आहेत की काय?  अर्थातच नाही. परंतु एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या सर्व साधना मार्गांचे एकच उद्दीष्ट आहे ते म्हणजे मानवी शरीरातील सुप्त अशा कुंडलिनी शक्तीला जागृत करून "ऊर्ध्वमार्गी" करणे. जर ते उद्दीष्ट साध्य होत नसेल तर त्या साधनेलाही काही अर्थ उरत नाही.

आधुनिक काळात अनेक साधक एक चूक करताना आढळतात ती म्हणजे पुस्तकी पांडित्यावर समाधान मानणे. कुंडलिनी, चक्रे, त्यांचे रंग, दलांची संख्या, त्यांचे बीजमंत्र वगैरे गोष्टी त्यांच्या तोंडपाठ असतात पण साधना करण्यात मात्र आळस. त्यामुळे अशा साधकांना प्रत्यक्ष अनुभूति कधीच येत नाही. बुद्धीच्या पलीकडल्या शिवतत्वाला गवसणी घालण्याचा मार्ग साधनेच्या भक्कम सोपानावरच आखला जात असतो. पुस्तकी पांडित्य आणि बुद्धीचा अहंकार तेथे कुचकामी ठरतो.

श्रावणमासारंभी भगवान शिवशंकर आणि जगदंबा कुंडलिनी सर्व साधकांना योगमार्गावर अग्रेसर करो हीच प्रार्थना.

आता वाचकांच्या निवडक प्रश्नांकडे वळू.

प्रश्न

मी पूर्वी नाद साधना करत असे परंतु त्यात मला म्हणावे तसे यश मिळाले नाही. मी अजपा साधना करतो पण मला नाद साधनेतही यश मिळवायचे आहे. त्याबाबत आपण काही मार्गदर्शन कराल का?  

उत्तर

प्रथमतः तुम्हाला नाद साधनेत यश का मिळाले नाही ते पहावे लागेल. नाद साधना ही लय योगांतर्गत येते. सुरवातीला षणमुखी क्रियेद्वारे नाद साधना करताना मन अगदी मुग्ध होऊन जाते. परंतु कालांतराने मनाला कंटाळा येऊ लागतो. हा त्या साधनेचा एक टप्पा आहे. सर्वच साधकांना असा अनुभव येत असतो. त्यामुळे जर अशा अनुभवाला तुम्ही अपयश म्हणत असाल तर ते बरोबर ठरणार नाही. साधना निग्रहाने पुढे सुरू ठेवावी म्हणजे एक दिवस प्रगती नक्कीच होईल.

तुम्ही वर उल्लेखल्याप्रमाणे अजपा साधनाही करत आहात. येथे एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे नाद साधनेत जे दहा प्रकारचे नाद सांगितले आहेत ते नाद मनाच्या विलयाच्या स्थितीवर अवलंबून आहेत. अजपा साधनेत प्रगत अवस्था प्राप्त केलेल्या साधकालाही असेच नाद ऐकू येतात. तेंव्हा नाद ही काही फक्त षणमुखी मुद्रेची परिणीती नाही तर ती मनाची विलयावस्था आहे. तुम्ही नाद साधना आणि अजपा यांचा एकत्र अभ्यासही करू शकता. म्हणजे असं की षणमुखी मुद्रेत अजपा साधनेचा सराव करायचा. जर तुम्हाला षणमुखी आवडत असेल तर अजपाची जोड तुमच्या आनंदात भर टाकेल यात शंका नाही.

 परमशिव तुम्हाला योग्य मार्ग दाखवो ही सदिच्छा.

प्रश्न

मी गेली पाच वर्षे प्राणायामाचा अभ्यास करत आहे. मला कुंडलिनी जागृतीचे काही अनुभव जसे ऊर्जेची हालचाल, प्राणाच्या हालचालीमुळे जाणवणारे धक्के वगैरे. आलेले आहेत. मी जेंव्हा शांभवी मुद्रा करतो तेंव्हा मला प्राणाची हालचाल आणि धक्के जाणवत रहातात. प्राणाच्या हालचालीमुळे शरीर थरथरत असतांना ध्यानमग्न कसे राहावे ते कळत नाही. याबद्दल काही सांगाल का?

उत्तर

तुम्ही बराच काळ प्राणायाम करत असल्याने तुमचा प्राणमय कोष प्रस्फुटित झालेला आहे. तुम्ही जे अनुभव सांगत आहात त्यांना मी कुंडलिनी जागृती म्हणणार नाही. असे अनुभव प्रामुख्याने प्राण प्राबल्य दर्शवतात. अर्थात ही सुद्धा एक चांगली खूण आहे. प्राणाच्या शुद्धीकरणाचा हा एक भाग आहे. नेटाने साधना सुरू ठेवल्यास कालांतराने असे धक्के जाणवणे नाहीसे होते. सध्या तुमचा अन्नमय कोष आणि प्राणमय कोष यांच्यात alignment होण्याची प्रक्रिया सुरू आहे. साधनेचा तो एक टप्पा आहे. मुद्दाम बलपूर्वक अशा हालचाली दाबू नयेत किंवा साधनेत अमुलाग्र बदलही करू नये. शांत चित्ताने साधना सुरू ठेवावी. आपोआप प्राण ताब्यात येण्यास सुरवात होईल.

 परमशिव तुम्हाला योग्य मार्ग दाखवो ही सदिच्छा.

प्रश्न

मी गोरक्षशतक वाचत आहे. त्यामध्ये पाच प्रकारच्या धारणा सांगितल्या आहेत. त्या प्रत्येकात प्राण आणि मन हे एकेका चक्रांवर दोन तासांसाठी ठेवावे असे सांगितले आहे. मी चक्रांवर मन काही काळ ठेऊ शकतो परंतु प्राण त्या ठिकाणी दोन तास कसा ठेवायचा? याचा नेमका अर्थ काय आहे?

उत्तर

प्रथमतः हे लक्षात घ्या की गोरक्ष शतक किंवा तत्सम नाथ ग्रंथ हे नाथ संप्रदायातील साधकांसाठी लिहिले गेले आहेत. त्यातील सर्वच योगक्रिया सर्वसामान्य साधकाच्या आवाक्यातील नाहीत. नाथ संप्रदायात शरीरशुद्धी आणि कुंभकयुक्त प्राणायाम यांना अतिशय महत्व देण्यात आलेले आहे. प्राण आणि मन हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. प्राण आणि मन हे एकमेकाशी निगडीत असल्याने जेथे मन जाईल तेथे प्राणही धावतो. प्राणायामाचा दीर्घकाळ अभ्यास केल्यानंतर साधकाला प्राण आणि मन यातील सूक्ष्म भेद समजू लागतो. शरीराच्या निरनिराळ्या ठिकाणी प्राणाचा स्पंद (pulsation) साधक अनुभवू शकतो. 

चक्र धारणा जेंव्हा केली जाते तेंव्हा मन त्या त्या चक्रावर ठेवणे हाच प्रमुख भाग असतो. ज्या साधकाने कुंभकयुक्त प्राणायाम साध्य करून घेतला आहे किंवा प्राणमय कोषावर ताबा मिळवला आहे असा साधक प्राणशक्तीही शुषुम्नामार्गाने त्या त्या चक्रावर नेऊ शकतो. अर्थात ही अत्यंत प्रगत अवस्था आहे. त्यात परत प्रमाणाबाहेत कुंभक युक्त प्राणायाम करण्यात धोकेही संभवतात. नवख्या साधकाने अशा साधनांच्या वाटेला जाण्यापूर्वी पूर्वतयारी करणे नितांत गरजेचे आहे. अनेक वर्षांच्या तयारीनंतरच अशा प्रकारची धारणा सिद्ध होत असते.

परमशिव तुम्हाला योग्य मार्ग दाखवो ही सदिच्छा.

 


सदा शिवचरणी लीन,
बिपीन जोशी

Posted On : 17 August 2015


Tags : योग कुंडलिनी साधना