Untitled 1

आदी शंकराचार्यांचे अजपाजपस्तोत्र

भारत हा अनादी काळापासून साधू, संयाशांचा देश म्हणून प्रसिद्ध आहे. प्राचीन भारतीय अध्यात्मात ईश्वर प्राप्तीचे जे काही मार्ग सांगितले आहेत त्यांमध्ये योग-वेदांताचे स्थान अढळ आहे. जर प्राचीन ऋषी-मुनींकडे लक्ष टाकले तर आपल्याला असे आढळते की जवळजवळ सर्वानीच कोणत्या ना कोणत्या स्वरूपात योगमार्गाचे आचरण केलेले आहे. मग तो मंत्रयोगाचा मार्ग असो वा हठयोगाचा अथवा ध्यानयोगाचा.

हजारो वर्षांचा इतिहास असलेली ही भारताची अध्यात्मगाथा म्हणजे केवळ योग-वेदांताची गरुडभरारी नाही. प्रसंगी अनेक खाच-खळग्यातून आणि सांस्कृतिक अतिक्रमणांतून ही भव्य गाथा तावून-सुलाखून निघालेली आहे. अनेक योगी, तपस्वी, मुनी, सिद्ध आणि आचार्यांनी या परंपरेला समृद्ध केलेले आहे. गरज पडल्यास तिचे पुनर्प्रसारण केलेले आहे. या दिग्गजांपैकी दोन मला विशेष महत्वाचे वाटतात. आज योग-वेदांत-अध्यात्म यांचा जो साचा आपल्याला भारतभर आणि परदेशातही ग्राह्य मानलेला दिसतो त्यात या दोघांचा सिंहाचा वाटा आहे. या दोन व्यक्ती म्हणजे नाथ सिद्ध गोरक्षनाथ आणि आदी शंकराचार्य.

गंमत बघा की दोघेही आपापल्या मार्गांवरचे दिग्गज आणि एकदम "पोहोचलेले" सिद्ध सत्पुरुष परंतु त्यांच्या कार्य प्रणालीत खुप फरक होता. एकाचे कार्य काहीसे सुप्त स्वरूपात साधानाप्रधान मार्गाने केले गेले तर दुसऱ्याचे प्रकट स्वरूपात तत्वज्ञानप्रधान मार्गाने केले गेले. परमेश्वर गरज पडेल त्या नुसार सिद्ध-सत्पुरुषांना अवतरण घेण्यास सांगतो आणि कार्य संपल्यावर परत आपल्याकडे बोलावून घेतो. अजून एक ईश्वरी संकेत बघा - गोरक्षनाथांना शंभू जती अर्थात भगवान शंकराचा अवतार मानले जाते. आदी शंकराचार्यांना सुद्धा भगवान शंकराचा अवतार मानले जाते. देवांचा देव भगवान शिवशंकर हा आदिगुरु आहे. आदिनाथाच्या या अवतारांनी पृथ्वीतलावर येऊन आध्यात्मिक क्रांती घडवून आणावी यात नवल ते काय.

ज्या वेळेस हिंदू धर्माला मरगळ आलेली होती त्या वेळेस आचार्य शंकर तारणहार म्हणून अवतरले. आजकालचे सर्वसामान्य नामधारी लोकं गुरु, आचार्य, पंडित वगैरे पैशापासरी मिळणाऱ्या पदव्या आपल्या नावापुढे लावून स्वतःचा मोठेपणा जगापुढे मिरवण्याचा प्रयत्न करत असतात. तसला प्रकार तेथे नव्हता. जगद्गुरू शंकरचा "शांकर दिग्विजय" एवढा मोठा होता की त्यांच्या नावाशी संलग्न झाल्याने आचार्य ही पदवी धन्य धन्य झाली.

उपनिषदातील अद्वैत वेदांत त्यांनी हिरीरीने जगापुढे मांडला. त्या काळाच्या अन्य मत-मतांतरे मानणाऱ्या लोकांशी वाद-विवाद करून त्याना परास्त केले. सर्वम खल्विदं ब्रह्म हा वेदांत विचार मायावादाच्या आधाराने इतरांना पटवून दिला. एवढेच नाही तर पंचदेवता उपासना, अनेक देवी-देवतांची स्तोत्रे, उपनिषद, गीता आणि ब्रह्मसूत्र इत्यादी ग्रंथावरील भाष्ये लिहिली. इतरही अनेक ग्रंथ लिहिले. काहीशा विस्कळीत झालेल्या संन्यास धर्माची दशनामी पद्धतीत विभागणी केली. भारताच्या चारी कोपऱ्यांत मठ उभारून त्यांच्याकरवी ज्ञानप्रसाराचे कार्य आपल्या पश्चातही अविरत सुरु राहील याची काळजी घेतली. वयाच्या केवळ ३२ व्या वर्षी हा ज्ञानमार्गी योगी आपले जीवित कार्य संपवून या भारत भूमीवरून लुप्त झाला. भारतीय अध्यात्म जगतावर आदी शंकराचार्यांचे अनंत उपकार आहेत. ते विसरता येणे केवळ अशक्य आहे.

हे सर्व सांगायचे कारण म्हणजे या आठवड्यात गुरुवारी, दिनांक ९ में २०१९ रोजी आदी शंकराचार्यांची जयंती आहे. अनेक अजपा साधकांना कदाचित माहित नसेल की त्यांनी अजपा साधनेवर एक स्तोत्र लिहिले आहे. या स्तोत्राचे काही पाठभेद मला आढळले. काहींमध्ये या स्तोत्राला अजपाजपस्तोत्र असे म्हटले आहे तर काहींमध्ये या स्तोत्राला अजपातंत्रातर्गत दत्तात्रेयस्तोत्र असे म्हटलेले आहे. श्लोकांच्या संख्येतही थोडा भेद आहे. हे स्तोत्र दत्तषट्‍चक्रस्तोत्रं नामक अन्य एका स्तोत्राशी मिळते-जुळते आहे. पूर्ण स्तोत्र काही येथे देत नाही. केवळ स्तोत्र कशा स्वरूपाचे आहे याची कल्पना यावी म्हणून आरंभ आणि अंत देत आहे.

ओम मुलाधारे वारिजपत्रे चतूरस्त्रम वं शं षं सं वर्णविशालं स्रविशालं
रक्तं वर्णे श्रीगणनाथम भगवंतम दत्तात्रेय श्रीगुरुमूर्ती प्रणतोस्मी ||

वरील श्लोकावरून तुमच्या लक्षात आलं असेल की त्यात मुलाधार चक्राचे वर्णन तर आहेच पण भगवान दत्तात्रेयांना गुरु मानून वंदनाही केलेली आहे. अशाच प्रकारे अन्य चक्रांचे वर्णन या स्तोत्रात आहे. शेवटी हंस-हंस, सोहं-सोहं ची महती विषद केलेळी आहे. स्तोत्राची सांगता अशी आहे -

इति श्रीमत परमहंस परीव्राजकाचार्य श्रीमत्शंकराचार्य विरचितं अजपाजप स्तोत्र संपूर्ण 

आदी शंकराचार्यांसारख्या दिग्गजाने अजपास्तोत्राची रचना करणे, त्यांत चक्रांची मालिका ओवणे आणि भगवान दत्तात्रेयांना गुरुमूर्ती मानणे यातच अजपा साधनेचे आणि कुंडलिनी योगाचे महत्व अधोरेखित होते. अजून निराळे काही सांगण्याची गरजच नाही.

असो.

सर्व वाचक अजपारुपी हंस पक्ष्यावर आरूढ होऊन अध्यात्मभरारी घेवोत या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे चोवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून अजपा योग विषयक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 06 May 2019
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates