Online Course : Kriya and Meditation for Software Developers || Build your personal meditation routine step-by-step for calm and clear mind, improved focus, and blissful inner connection.

शिवलिंग पूजनाचा खरा अर्थ

मागच्या भागात आपण शिवलिंगाची पौराणिक कथा आणि शिवलिंगाचा आध्यात्मिक अर्थ जाणून घेतला. आता शिवलिंगाचे पूजन कसे करावे ते पाहू.

शिवलिंग पूजनाकडे वळण्याआगोदर प्रथम शिवलिंग कसे असावे ते माहित असणे महत्वाचे आहे. बाजारात अनेक प्रकारची शिवलिंगे उपलब्ध असतात. साधारणतः संगमरवर, पितळ, पंचधातू, स्फटिक, पारद, काच यांचे बनलेले शिवलिंग वापरतात. जर आर्थिकदृष्य़ा शक्य असेल तर पारद वा स्फटिक शिवलिंग जरूर खरेदी करावे. पारद आणि स्फटिक शिवलिंग आर्थिक भरभराटीसाठी आणि सुखसमृद्धीसाठी चांगली मानली जातात. त्यातही पारद शिवलिंग जास्त लोकप्रिय आहे. पारद शिवलिंग लोकप्रिय असण्याचे अजुन एक कारण म्हणजे पारा हा शंकराचे वीर्य असल्याचे मानले जाते. त्यामागील कथा थोडक्यात अशी...

राक्षसांकडून देवांचा वारंवार पराभव होऊ लागला. त्यामुळे त्रासून जाऊन सर्व देव ब्रह्मदेवाकडे मदतीसाठी धावले. ब्रह्मदेवाने सांगितले की याला उपाय एकच आणि तो म्हणजे शंकराचा पुत्र. देव काळजीत पडले कारण शंकर तर सदा समाधीत. यावर उपाय म्हणून त्यांनी शंकर आणि पार्वतीला एकांतात क्रिडेकरिता पाठवले आणि आतातरी शिव-पार्वती मिलन होऊन शंकराला पुत्ररत्न होईल अशी आशा करू लागले. मदन, रति आणि वसंत ऋतु यांनाही आपला पूर्ण प्रभाव पाडण्यास त्यांनी विनवले अनेक वर्षे लोटली पण शंकर-पार्वती मिलन काही घडेना. वैराग्यशाली शंकरापुढे मदन काहीच करू शकेना. मग देवांनी अग्निला शंकर-पार्वती मिलन घडले की नाही हे पाहण्यासाठी पाठवले. अग्नि याचक बनुन तेथे गेला. मिलन घडले नाही असे कळताच त्याने शंकराजवळ इच्छित बस्तुची याचना केली. शंकर बैरागी त्याच्या जवळ याचकाला देण्यासाठी काय असणार? म्हणून अग्निने शंकराचे वीर्य मागितले. शंकरानेही पुढील भविष्यार्थ जाणून आनंदाने होकार दिला. दिलेल्या वीर्याचे तेज प्रत्यक्ष अग्निही सहन करू शकला नाही. त्याने ते गंगेत टाकले. गंगाही ते वीर्य धारण करू शकली नाही. गंगेने ते पृथ्वीवर लोटले. पृथ्वीवर आलेले ते शिववीर्य म्हणजेच पारा! 

पारा हा एकमेव धातू असा आहे की जो द्रव स्वरुपात आढळतो. पार्‍याचा गन्धकाशी संयोग करून आणि त्यावर अजुनही काही जटील प्रक्रिया करून पारद बनवले जाते. पारद शिवलिंग किंमतीच्या दृष्टीने जरा महाग असते. साधारणतः ते ग्रॅमच्या भाषेत विकले जाते. छोट्या आकाराचे असली शुद्ध पारद शिवलिंग सहज चार ते पाच हजाराच्या घरात जाऊ शकते. बहुतांशी दुकानांमधे किंमतीची ही अडचण लक्षात घेऊन काहिसे अशुद्ध पारद वापरले जाते. असे जरी असले तरी उपासनेच्या दृष्टीने ते जवळजवळ सारखेच प्रभावी असते. कमी प्रतीचे पारद लवकर काळपट होते. जर ते काळपट झाले तर त्यावर लिंबाचा रस लावून कोरड्या खरखरीत कापडाने पुसावे. काळपटपणा जाऊन ते परत लखलखीत होते.

शिवलिंग मग ते कोणत्याही पदार्थाचे बनलेले असो, आपल्या स्वतःच्या अंगठ्या एवढे उंच असावे असे सांगितले जाते. जर कमी असेल तर उपासनेच्या फलात कमतरता येते. जास्त मोठे असेल तर काही हरकत नाही. पण अर्थात प्रत्येकाने आपली आर्थिक कुवत बघुन आणि तारतम्य बाळगुन याबाबतचा निर्णय घ्यावा.

नवीन शिवलिंग एकदा घरात आणले की ते उपासनेस वापरण्यापूर्वी सिद्ध करावे लागले. आजकाल या सिद्धीकरणाच्या नावाखाली फार खोटेपणा चालतो. काही दुकानदार आपण विकत असलेले शिवलिंग सिद्ध केलेले आहे असे सांगुन जास्त पैसे उकळतात. काही वेब साईटस तर सिद्ध करत असतानचे फोटो वगैरेही दाखवतात. सुज्ञ वाचकांना त्यात काय खरे आणि काय खोटे हे सांगण्याची गरज नाही. काही ठिकाणी प्लॅस्टिकच्या पॅकिंग वरून पंचामृताने स्नान घालण्यासारखे हास्यास्पद प्रकारही घडतात. थोडे विषयांतर झाले तरी येथे एखादे यंत्र वा लिंग सिद्ध करणे म्हणजे काय ते थोडक्यात सांगतो. जेव्हा एखाद्या कारखान्यात वा दुकानात यंत्र वा शिवलिंग बनते तेव्हा ते केवळ जड पदार्थ असते. त्यात शक्ती नसते. असे समजा की हाडामासाचा देह आहे पण प्राण नाही. त्यात उर्जा प्रस्थापित झालेली नसते. ही उर्जा कशी स्थापावी याचे एक शास्त्र आहे. त्यासाठी अत्यंत प्रबळ संकल्पशक्ती असावी लागते. कुंडलिनी जागृत असावी लागते. प्राण-संक्रमण म्हणजे काय ते माहित असावे लागते. आजकाल अनेक लोक पुस्तकांत वाचून यंत्रे सिद्ध करतात. लोकांचा असा समज असतो की काही मंत्र म्हटले आणि पूजा केली की झाले यंत्र सिद्ध!  भौतीक पदार्थांनी केलेली पूजा यंत्रात प्राण कसा ओतणार? हाच प्रकार मंत्राच्या बाबतीत होतो. बहुतेक उपासक सुरवातीला तरी आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत नसतात. त्यांनी म्हटलेले चैतन्यहीन मंत्र यंत्रात शक्ती कशी ओतणार? मग साधक अपेक्षित फळ मिळाले नाही वा कमी मिळाले म्हणून तक्रार करतात. म्हणूनच प्राचीन काळी शैव दिक्षेच्या वेळी गुरू शिष्याला स्वतः सिद्ध केलेले शिवलिंग देत असत. अर्थात काहीच संस्कार न केलेल्या शिवलिंगापेक्षा अप्रगत साधकाने संस्कारीत केलेले शिवलिंग केव्हाही श्रेष्ठच ठरते.

शिवलिंग आणल्यावर त्याची जागा निश्चित करावी. घरच्या देव्हार्‍यात ठेवले तर सगळ्यात उत्तम. काही उपासक कपाट, टेबलाचा खण, साधनेची जागा अशा ठिकाणीही ते ठेवतात. कोठेही ठेवले तरी त्याचे पावित्र्य राखले जाईल, ते धुळ खात पडणार नाही याची काळजी घ्यावी. ज्यांना शक्य असेल त्यांनी शिवलिंगाची रोज पूजा करावी. ज्यांना काही कारणाने हे शक्य नाही त्यांनी निदान दर सोमवारी तरी ती करावी. जर आपल्याला शिवलिंगाची काळजी घेणे आणि त्याचे पावित्र्य राखणे शक्य नसेल तर शिवलिंग आणण्यापेक्षा दर सोमवारी वा जमेल तेव्हा शिवमंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. शिवलिंग आणल्यावर मग त्याकडे दुर्लक्ष करून त्याचा अपमान करू नये.

अभिषेकाचासहित शिवपूजनाचा शास्त्रोक्त विधी शिवपूराणात किंवा बाजारात मिळणार्‍या पुजेच्या पुस्तकांत सहज मिळण्यासारखा आहे. पण आजच्या धावपळीच्या काळात बहुतेकांना असे विस्तृत शिवपूजन करणे शक्य होत नाही, वेळेच्या दृष्टीनेही आणि पैशाच्या दृष्टीनेही. तेव्हा येथे सर्वांना सुलभपणे करता येईल असा विधी देत आहे. ज्यांना यथाविधी पूजन करायचे असेल त्यांनी एकाद्या पुरोहिताकरवी ते करवून घ्यावे हे उत्तम.

आपल्याकडे पूजनाचे अनेक प्रकार प्रचलित आहेत. पंचोपचार, षोडशोपचार, मानसपुजा वगैरे. त्यापैकी पंचोपचार पुजा आजच्या काळात बहुतेकांना करता येण्यासारखी आहे. पंचोपचार पुजेमध्ये पाच वस्तुंचा उपयोग केला जातो. त्या पाच वस्तु म्हणजे गन्ध, फुले, धुप, दिप आणि नैवेद्य. भारतातल्या अनेक घरांमधे रोज पंचोपचार पुजा केली जाते पण यापुजेचा खरा अर्थ फारच थोड्यांना माहित असतो. मानवी शरीर पंचमहाभुतांनी बनलेले आहे. पृथ्वी, जल, अग्नि, वायु आणि आकाश ही ती पाच तत्वे. परमेश्वर या पाच तत्वांचा जनक असला तरी यांपासून वेगळा आहे. कुंडलिनी योगशास्त्राप्रमाणे पंचमहाभुतांचे वास्तव्य अनुक्रमे मुलाधार, स्वाधिष्ठान, मणिपुर, अनाहत आणि विशुद्धी या चक्रांपाशी आहे. या चक्रांच्या वरचे चक्र आज्ञाचक्र म्हणून ओळखले जाते. तेच शिवस्थान म्हणूनही प्रसिद्ध आहे. कुंडलिनी योगशास्त्रानुसार परमशिवाशी एकरूप होण्याचा मार्ग म्हणजे लय वा प्रतिप्रसव. म्हणजेच पंचमहाभुतांचा लय केल्याशिवाय शिवतत्व हाती येणार नाही. पंचोपचार पुजनामधे अर्पण केले जाणारे पदार्थ प्रत्यक्षात पंचमहाभुतांचे प्रतिक आहेत. गन्ध हे पृथ्वीतत्वाचे, पुष्प हे आकाशतत्वाचे, दिप हे अग्नितत्वाचे, धुप हे वायुतत्वाचे आणि नैवेद्य हे जलतत्वाचे प्रतिक आहे. जेव्हा तुम्ही परमेश्वराला गन्ध, फुले वाहता वा निरांजनाने ओवाळता तेव्हा आपला पंचमहाभुतात्मक देह परमेश्वराच्या चरणी अर्पण करत आहोत ही भावना हवी. कुंडलिनीयोग साधकाने हीच भावना त्या त्या चक्राच्या शुद्धीबद्दल बाळगावी. केवळ यांत्रिकपणे गन्ध-फुले वाहण्यापेक्षा या समर्पणाच्या भावनेने पुजा केली तर शतपटीने अधिक फायदा मिळेल. असो तर आता प्रत्यक्ष कृतीकडे वळू.

प्रथम आणलेले शिवलिंग पाण्याने स्वच्छ धुवावे. बाजारातून आणलेले शिवलिंगा अनेकदा हाताळल्याचे ठसे, रंग, माती इत्यादी गोष्टींनी मलिन झालेले असते. म्हणून ते सर्वप्रथम स्वच्छ करावे. यासाठी गंगाजल वापरता आले तर उत्तमच. त्यानंतर शिवलिंगाला पंचामृताने (दुध, दही, तुप, मध, साखरपाणी) स्नान घालावे. मग परत गंगाजलाने शिवलिंगाला स्नान घालावे. पंचामृताने आलेला ओशटपणा आणि चिकटपणा जाईल याची काळजी घ्यावी. त्यानंतर शिवलिंग देव्हार्‍यात वा तबकात ठेवावे. मग खालील मंत्र म्हणत पंचोपचार पुजा करावी.

ॐ लं पृथिव्यात्मकं गन्धं परिकल्पयामि।

असे म्हणत शिवलिंगाला गंध लावावे. मनात आधी सांगितल्याप्रमाणे समर्पणाचा भाव ठेवावा.

ॐ हं आकाशात्मकं पुष्पं परिकल्पयामि।

असे म्हणत शिवलिंगाला फुले आणि बेलाची पाने वहावीत. बेलाचे पान तम, रज आणि सत्व या त्रिगुणांचे प्रतीक आहे. फुले शक्यतो पांढर्‍या रंगाची असावीत. पांढरा रंग निर्मळ, निरंजन परमात्याचे प्रतिक आहे.

ॐ यं वाय्व्यात्मकं धुपं परिकल्पयामि।

असे म्हणत धुप वा अगरबत्ती लावावी. कृत्रिम रसायनांनी बनवलेल्या अगरबत्तीपेक्षा धुप, लोबान वा गुग्गुळ वापरणे चांगले.

ॐ रं वह्न्यात्मकं दीपं दर्शयामि।

असे म्हणून निरांजन ओवाळावे. निरांजनात शक्यतो गाईचे तुप वापरावे.

ॐ वं अमृतात्मकं नैवेद्यं निवेदयामि।

असे म्हणत नैवेद्य दाखवावा.

ॐ सौं सर्वात्मकं सर्वोपचारं समर्पयामि।

असे म्हणत मनानेच आपले सर्वस्व श्रीशंकराच्या चरणी अर्पण करत आहोत अशी भावना ठेवून नमस्कार करावा.

(कुंडलिनी योगसाधकांनी पंचतत्वांचे बीजमंत्र आणि चक्रांचे बीजमंत्र यांतील साधर्म्य लक्षात घ्यावे)

जर मंत्र म्हणणे काही कारणाने शक्य नसेल तर एकामागून एक नुसते उपचार अर्पण करावेत. जर फुले, धुप, दीप इत्यादी गोष्टी काही कारणाने उपलब्ध नसतील तर केवळ मनानेच मंत्र म्हणत तो तो उपचार अर्पण करत आहोत अशी भावना ठेवावी. मनोमन पुजनात काही कमतरता राहिली असेल तर त्याबद्दल क्षमायाचना करावी.

वरीलप्रकारे पूजन झाल्यानंतर शिवलिंगासमोरच साधनेचे आसन टाकावे. येत असल्यास प्रथम दहा-बारा वेळा नाडिशोधन प्राणायाम करावा. जर आपण कुंडलिनी योगमार्गावरचे प्रगत साधक असाल तर सुषुम्ना चालु करावी (ती कशी करावी ते शब्दात सांगण्याचा विषय नाही). तदनंतर पंचाक्षर मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र कमीतकमी 108 वेळा रुद्राक्षाच्या माळेवर म्हणावा. अकरा माळा जमल्यास उत्तम. माळ नसेल तर घडाळ्यावर मोजून तो म्हणवा. मंत्र म्हणत असताना शिवलिंगाकडे एकाग्रचित्ताने पहात शिवतत्व आपल्यावर प्रसन्न होत आहे अशी भावना ठेवावी. मंत्रजप पूर्ण झाल्यावर परत नाडिशोधन प्राणायाम करावा. त्यानंतर डोळे मिटून शिवध्यान करावे वा अजपा ध्यान करावे. आसनावरून उठण्यापूर्वी शंकराचे एखादे स्तोत्र म्हणावे आणि मग उठावे.

पंचामृताने स्नान रोज घालण्याची गरज नाही पण निदान शिवरात्रीच्या दिवशी घालावे. वरील संपूर्ण विधी रोज करणे ज्यांना शक्य नाही त्यांनी आपल्या कुवतीनुसार जेवढे जमेल तेवढे करावे. पुजनाने भक्तीवर्धन झाले पाहिजे हे लक्षात ठेवावे. केवळ यांत्रिकपणे पुजन करून काही उपयोग नाही. शंकराचे एक नाव आशुतोष अर्थात भक्तावर लवकर प्रसन्न होणारा असे आहे तेव्हा मनात भक्ती असेल तर सदाशिव प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही.

या लेखमालेचे उद्दिष्ट शिवभक्तांची आणि नवीन योगसाधकांची भक्ती वृद्धिंगत करणे हे आहे. अन्य कोणा दैवताची उपासना करणार्‍यांनी त्याबद्दल खेद, इर्षा वा द्वेश न बाळगता 'प्रत्येकाला आपली आई हीच श्रेष्ठ असते' या तत्वानुसार आपली आपल्या दैवताविषयीची भक्ती अखंड ठेवावी.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे संगणक सल्लागार, लेखक आणि योग मार्गदर्शक आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकातींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून योग आणि ध्यान विषयक सशुल्क मार्गदर्शन प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

हा मजकूर श्री. बिपीन जोशी यांच्या 'शिवोपासना' या पुस्तकातून घेण्यात आला आहे. या प्रकरणाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी आजच आपली प्रत विकत घ्या.


Posted On : 21 July 2010


Tags : शिव साधना लेखमाला भक्ती नाथ