पाच मिनिटांच्या पाच साधना

पाच मिनिटांच्या पाच साधना (भाग १ - ॐकार साधना)

अनेक वाचाकांचा एक नेहमीचा प्रश्न म्हणजे - "आम्ही आमच्या दैनंदिन जीवनात अतिशय व्यस्त असतो. त्यामुळे योग, अध्यात्म वगैरे साठी फारसा वेळच नसतो. जो काही थोडाफार वेळ असतो त्यात ध्यान, जप, नामस्मरण वगैरे करून बघतो पण मन लागत नाही आणि साधना काही धड होत नाही. आमच्या सारख्या नवख्या साधकांनी काय करावे?"

आजकाल शहरातील दैनंदिन जीवन एवढं धावपळीचं झालं आहे की स्वस्थपणे बसायला फुरसत नसते तर साधना कुठून करणार? अशाच साधकांसाठी येऊ घातलेल्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने ही एक छोटीशी लेखमाला सादर करत आहे. यामध्ये मी तुम्हाला पाच साध्या, सोप्या पण परिणामकारक अशा साधना सांगणार आहे. यातील प्रत्येक साधना करायला पाच मिनिटे पुरेशी आहेत. अर्थात तुम्ही जास्त वेळ देऊ शकत असाल तर "अधिकस्य फलम अधिकम" या उक्ती प्रमाणे फायदा जास्त मिळेल. या साधना निवडताना खालील गोष्टींचा विचार केलेला आहे :

 • सर्वसाधारण नवख्या साधकाला एकदम ध्यानाचा सराव करणे कठीण आणि कंटाळवाणे वाटते. त्यामुळे साधना अशी असावी की बहिर्मुख मनाला अंतर्मुख तर बनवेल पण एकदम नाही. सुरवातीला काही प्रमाणात मन अंतर्मुख बनले की दोन्ही पातळ्यांमधील फरक सुखकारक वाटतो. त्यात कंटाळा वाटत नाही.
 • निदान सुरवातीला साधना ही पाचच मिनिटे करा. काही वेळा साधन सुरवात तर अगदी उत्साहानी करतात पण थोड्याच दिवसांत कंटाळतात. "ससा आणि कासवाच्या" गोष्टी प्रमाणे थोडी पण नित्यनेमाने साधना होणे जास्त महत्वाचे आहे.
 • या पाच पैकी कोणत्याही एकाच साधनेचा सराव केला तरी चालेल. अर्थात वेळ असेल तर जास्त प्रकार करू शकता.
 • धावपळीच्या आयुष्यात योगसाधनेचे नियम जसे साधनेच्या आधी दोन तास आहार घेऊ नका, अमुक-अमुक वेळेतच साधना करा वगैरे, पाळणे कठीण जाते. या साधनांना असे कोणतेही विशेष नियम पाळले नाहीत तरी हरकत नाही. अर्थात आहारविहार सात्विक ठेवता आला तर उत्तमच पण या साधनासाठी ते अत्यावश्यक नाही.
 • सगळेच साधक परमेश्वर प्राप्ती करता साधनारत असतीलच असे नाही. कोणाला ताणतणावा पासून मुक्तता हवी असेल तर कोणाला फक्त थोडी मनःशांती हवी असेल तर कोणाला फक्त कुतूहल म्हणून एखादी साधना करायची असेल. येथे दिलेल्या साधना वरीलपैकी कोणत्याही उद्दिष्टासाठी उपयोगी ठरतील.

असो. तर या भागात पहिल्या साधनेची - ॐकार साधनेची - माहिती करून घेऊ. साधना सांगण्यापूर्वी एक सूचना देणे आवश्यक आहे ती म्हणजे - स्वतःच्या मनानेच या साधनेत काही बदल करू नका. साधना खाली दिल्याप्रमाणे तंतोतंत करण्याचा प्रयत्न करा.

 • घरातल्या एखाद्या शांत खोलीत किंवा देवघरात साधंनेकरता आसन घाला. आसन म्हणून चादरीची चौपदरी घडी आणि त्यावर सूती पंचा वापरू शकता.
 • आसनावर पूर्वेला किंवा उत्तरेला तोंड करून बसा. डोळ्यावर भगभगीत प्रकाश पडणार नाही किंवा जोराने वारा येणार नाही असं पहा.
 • डोळे मिटून शांत चित्ताने दीर्घ स्वास घेण्यास सुरवात करा.
 • श्वास असा घ्या की छाती हवेने पूर्ण क्षमतेपेक्षा किंचित कमी भरलेली असेल.
 • आता श्वास घेणे थांबवा आणि श्वास आतच रोखून धारा. लक्षात ठेवा श्वास आत रोखण्यास फार कष्ट किंवा ताण पडता कामा नयेत.
 • आता तोंडाने ॐकाराचे दीर्घ उच्चारण सुरू करा. एक श्वास-एक ॐकार असा कालावधी तुम्हाला साधायचा आहे. उच्चार स्पष्ट आणि एकसारखा असला पाहिजे. फार मोठयाने म्हणण्याची गरज नाही. तुम्ही ज्या खोलीत बसला आहात त्या खोलीच्या बाहेर आवाज जाण्याची गरज नाही.
 • जसं जसं ओंकाराचं उच्चारण दीर्घ होत जाईल तसं तसं तुमचे पोट आत ओढलं गेलं पाहिजे. पोट आत घेताना सावकाश आणि संथपणे उदरावरण आकुंचन पावेल याची काळजी घ्या.
 • ओंकाराचं उच्चारण होत असताना जाणीव स्पंदनांवर (sound vibrations) ठेवा.
 • जेव्हा अशी वेळ येईल की तुम्हाला श्वास रोखून ठेवणे अशक्य आहे तेव्हा ओंकाराचं उच्चारण थांबवा.
 • तोंड बंद करून उदरावरण शिथिल करा जेणेकरून पोट पूर्वस्थानी येईल.
 • आता पाहिल्यासारखा संथ आणि दीर्घ श्वास घ्या.
 • येथे एक आवर्तन संपले. अशी एका मागून एक आवर्तने करा. प्रत्येकाच्या श्वासधारणाच्या क्षमतेनुसार पाच मिनिटात किती ॐकार बसतात ते ठरेल.

सुरवातीला दोन आवर्तनांमध्ये सुसूत्रता येणार नाही पण थोड्या सरावाने जमू लागेल. नियमित सराव केल्यावर तुम्हाला असा अनुभव येईल की ओंकाराची स्पंदने अधिकाधिक स्पष्ट आणि सखोल होत आहेत. या स्पंदनामुळे एकप्रकारचा नाद घुमल्यासारखं वाटतं. एक वेगळाच आनंद शरीरात पसरतो. काही दिवसांनी तुमची श्वास धारण करण्याची शक्तिही वाढेल. हा एक प्रकारचा कुंभकच आहे. काहींना शरीरावर रोमांच उठल्यासारखे वाटेल किंवा हलका घामही येईल. ही सर्व साधना योग्य दिशेने जात असल्याची लक्षणं आहेत.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 22 February 2014


Tags : योग अध्यात्म साधना लेखमाला

Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates