Untitled 1

 योगाभ्यासाला उपयुक्त जागा

लेखक : बिपीन जोशी

सुराज्ये धार्मिके देशे सुभिक्षे निरुपद्रवे।
धनुः प्रमाणपर्यंतं शिलाग्निजलवर्जिते।
एकांते मठिकामध्ये स्थातव्यं हठयोगिना॥
अल्पद्वारमरंघ्रगर्तविवरं न्यात्युच्चनीचायतं।
सम्यग्गोमयसांद्रलिप्तममलं निःशेषजंतूज्झितम॥
बाह्ये मडपवेदिकूपचिरं प्राकारसंवेष्टितं।
प्रोक्तंयोगमथस्यलक्षणमिदंसिद्धैर्हठाभ्यासिभिः॥

जेथे राज्य व्यवस्थित चालले आहे, जेथे धर्मिक वातावरण आहे, जेथे भिक्षा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, जेथे दगड, अग्नि, पाणी यांजपासून उपद्रव होणार नाही अशा ठिकाणी साधारणतः दीड मीटर मापाची कुटी बांधावी आणि त्यात एकांतात साधना करावी. कुटीचे दार लहान असावे, त्याला खिडक्या नसाव्या, भोके वा भेगा नसाव्या. कुटी अती उंच अथवा अती सखल जागी नसावी. ती स्वच्छ, किडामुंग्यांपासून मुक्त आणि गाईच्या शेणाने सारवलेली असावी. बाहेर चबुतरा असावा ज्यावर छत घातलेले असावे. जागेजवळ विहीर असावी आणि जागेला कुंपण असावे. ही हठयोगाभ्यासाला उपयुक्त अशा कुटीची लक्षणे तज्ञांनी सांगितली आहेत.

स्वात्मारामाने येथे योग्याने कशा प्रकारच्या कुटीत अभ्यास करावा ते सांगितले आहे. वरील वर्णन वाचून तुम्हाला कदाचित असे वाटेल की ते जुन्या काळालाच लागू आहे. आजच्या आधुनिक सिंमेंटकॉंक्रिटच्या काळात हे वर्णन कालबाह्य आहे. पण या वर्णनाचा गाभा लक्षात घेतल्यास आजच्या योग्यालाही हे घटक गरजेचे आहेत आणि थोड्याशा प्रयत्नाने ते अंमलात आणणेही शक्य आहे.

स्वात्मारामाने वर्णन केलेल्या कुटीसाठी पहिले आवश्यक आहे ते म्हणजे सुराज्य. योगाभ्यासात व्यग्र रहायचे असेल तर युद्धे, विस्कळीत समाजजीवन, भय, समाजकंटकांचा उपद्रव इत्यादी गोष्टींची बाधा असून चालणार नाही. अन्यथा मन कायम चिंताग्रस्त राहील. त्यामुळे जेथे योगाभ्यास करावयाचा तेथे चांगल्या राजाचे राज्य असले पाहिजे. आधुनिक काळात नवे घर घेताना लोक असाच विचार नाही का करत? प्रवासाच्या सोयी आहेत का? शाळा, दुकाने जवळ आहेत का? आजुबाजुला वस्ती कशी आहे? झोपडपट्ट्या आहेत का? गुंड-मवाल्यांचा त्रास तर नाही ना? अशा अनेक गोष्टींची खात्री करून नवे घर घेतले जाते. योग्यालाही जिथे कुटी उभारायची त्या जागेविषयी अशी छानबीन करावी लागते. नाहीतर साधनेत व्यत्यय येण्याचा धोका असतो.

जेथे साधना करणार त्या ठिकाणी जर धार्मिक वातावरण असेल तर ते साधनेला पोषक ठरते. जर आजुबाजुचे लोक धार्मिक बाबतीत उदासिन असतील तर तुमच्या बद्दल मैत्रीचा आणि मदतीचा भाव त्यांच्या मनात असणार नाही. तुमची जीवनशैली आणि त्यांची जीवनशैली अगदी भिन्न असेल. माणूस हा समजप्रिय प्राणी आहे. तुम्ही अगदी लोकांमधे फार मिसळला नाहीत तरी त्यांच्याशी थोडासा का होईना संबंध हा येतोच. तेव्हा सभोवताली धार्मिक वातावरण असेल तर मदत होते. माझ्या परिचयातील एक व्यक्ती भारतात रहात असताना रोज नित्यनेमाने अग्निहोत्र करीत असे. पुढे नोकरीसाठी ती व्यक्ती परदेशी गेली. तेथे अग्निहोत्रासाठी लागणारे सामान जसे होम कुंड, गोवर्‍या, गाईचे तुप इत्यादी सहज मिळेनासे झाले. ती व्यक्ती पेंईंगगेस्ट म्हणून रहात असे. अगदी अग्निहोत्राचे सामान जरी मिळाले असते तरी तेथील घर मालकाने अशा गोष्टी करायला परवानगी दिली असतीच असे नाही. याचाच अर्थ नव्या जागेत त्याच्या आगोदरच्या धार्मिक वातावरणाशी मिळतेजुळते वातावरण नसल्याने त्याच्या साधनेत व्यत्यय आला.

योगी आपले सर्व जीवन परमेश्वरप्राप्तीसाठी वाहून घेतो. सर्वसामान्यांसारखी नोकरी-चाकरी वा उत्पन्नाचे साधन त्याच्याकडे असतेच असे नाही. अशा वेळी तो भिक्षा मागून उदरनिर्वाह करतो. अर्थात दोन वेळची भिक्षा मिळेल अशी परिस्थिती हवी. त्यामुळे सुभिक्षा हे लक्षण स्वात्मारामाने सांगितले आहे. जुन्या काळी भिक्षा मागणारा आणि भिक्षा देणारा या दोघांच्याही मनाचा पोत सुयोग्य असे. भिक्षा मागणारा पूर्ण वैराग्ययुक्त जीवन जगून केवळ जीव जगवण्याकरता भिक्षा मागत असे. भिक्षेचा अनावश्यक संचय करायचा नाही असा नियम असे. भिक्षेसाठी अमुकच पाहिजे असा आग्रह नसे. मिळेल त्यात समाधान मानले जात असे. भिक्षा देणारा दानाच्या भावनेने भिक्षा घालत असे. भिक्षा ग्रहण करणारा तृप्त होत आहे याकडे त्याचे लक्ष असे. योगी, संन्यासी हे समाजाच्या आध्यात्मिक विकासाठी आवश्यक आहेत या भावनेने त्यांचा पूर्ण आदर करून त्यांना भिक्षा दिली जात असे. आजच्या काळात मुळात पाखंड एवढे वाढले आहे की खरा संन्यासी कोण आणि खोटा कोण हेच बर्‍याचदा कळत नाही. त्यामुळे लोक सरसकट सर्वांनाच टाळतात. आजच्या जीवनशैलीमुळे दान हा गुण लोप होत चालला आहे. आधुनीक काळात कर्मयोगयुक्त राहून योगाभ्यास करणे योग्य आहे. तेव्हा सुभिक्षा याचा अर्थ आपल्या दैनंदीन गरजा पुर्ण करता येतील असा उत्पन्नाचा मार्ग असा करणे योग्य आहे. कर्मयोगयुक्त होऊन केलेल्या कार्याचा मोबदला हा मिळणार्‍या भिक्षेसमान मानून योगयुक्त जीवन जगणे हेच आजच्या काळाला साजेसे आहे.

योगाभ्यासाची कुटी अशा ठिकाणी बांधावी की जेथे दगड, पाणी आणि अग्नि यांचा त्रास होणार नाही. दगडाचा त्रास याचा अर्थ दरडी पडणे वा जमीन धसणे असा आहे. पाण्यापासून त्रास म्हणजे पूर वा अति पर्जन्यवृष्टी. अग्निचा त्रास म्हणजे वणवा. प्राचीन काळी योगी साधारणतः जंगलात वा वस्ती पासून दूर रहात असत. तेव्हा वरील गोष्टींचा त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असे.

योग्याची कुटी लहानशीच असावी. उगाच मोकळी जागा आहे म्हणून मोठी कुटी असा प्रकार नसावा. कुटीचे दार लहान असावे व तीला खिडक्या नसाव्या. त्यामुळे साधनेला बसल्यावर नजर बाहेर जात नाही. तुम्हा सगळ्यांनाच अनुभव असेल की घरात असताना बाहेर काही आवाज झाला तर लगेच खाली डोक़ावून पाहिले जाते. नजरेला कायम आपला भोग्य विषय शोधण्याची सवय असते. साधनेला बसल्यावर बाहेरील गोष्टींकडे फारसे लक्ष जावू नये म्हणून दार लहान असावे आणि खिडक्या नसाव्यात असे सांगितले जाते. आधुनीक काळाला अनुसरून असे म्हणावे लागेल की साधनेला बसताना खिडक्या दारे लावून बसावे. ते शक्य नसेल तर किमान पडदेतरी लावावेत.

कुटीच्या भितींना भेगा नसाव्या. भेगा असतील तर त्यात किडेमुंग्या घर करण्याची शक्यता असते. याचसाठी भिंती शेणाने सारवलेल्या असाव्या असे सांगितले आहे. शेणाने सारवल्याने फटी असल्याच तर त्या बुजल्या जातात आणि किडामुंग्याना प्रतिबन्ध होतो. साधनेला बसल्यावर जर किडे, डास, माशा यांपासून त्रास झाला तर साधनेत व्यत्यय येईल त्यामुळे साधनेची जागा स्वच्छ असणे अत्यंत आवश्यक आहे. आधुनीक काळातल्या घरात रंगरंगोटी, प्लॅस्टरींग, 'पेस्ट कंट्रोल' इत्यादी गोष्टी केल्या जातातच. त्याशिवाय प्रत्येक साधकाने आपली बसण्याची जागा स्वच्छ असेल याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्या जागी अन्न पदार्थ खावू नयेत म्हणजे मुंग्या वा माशा येणार नाहीत. जर डास फार असतील तर तुम्ही मच्छरदाणीत साधनेला बसू शकता अथवा बाजारात मिळणारी आधुनिक यंत्रे/डासांच्या अगरबत्त्या वापरू शकता. साधनेला बसण्या पूर्वी त्या जागेचा केर काढला तर अतिउत्तम.

ही झाली साधेनेची मुख्य खोली. या खोलीच्या बाहेरच छोटा मंडप असावा असे सांगितले आहे त्याचा उपयोग इतर कार्ये जसे भोजन करणे वा विश्रांती घेणे यांसाठी करता येतो. साधनेव्यतिरीक्त अन्य कार्यांसाठी साधनेची खोली शक्यतो वापरू नये. पाणी हे दैनंदीन वापरासाठी लागतेच. म्हणून विहिर असावी असे स्वात्माराम सांगतो. जुन्या काळात आजच्या सारखे नळ सोडला की पाणी अशी स्थिती नसे. त्यामुळे पाणी सहजपणे मिळणे आवश्यक असे. विहीर मठाच्या आवारातच असावी कारण मग अन्यत्र पाणी आणण्यासाठी जावे लागणार नाही. वेळ आणि कष्ट वाचतील. या मठाला कुंपण असावे जेणे करून वन्य प्राणी वा गुरेढोरे आत येणार नाहीत.

हे झाले योग्याच्या कुटीचे वर्णन. आता स्वात्माराम एक महत्वाचा मुद्दा सांगत आहे तो हा की साधना एकांतात करावी. तुम्हाला जर लवकर सफलता मिळवायची असेल तर हे अतिशय महत्वाचे आहे. माझ्या कडे येणारे अनेकजण नेहमी तक्रार करतात की त्यांना घरात एकांत, शांतता कधी मिळतच नाही. टी.व्ही., लहान मुले, पाहुणे, मित्रमंडळी या सगळ्यात साधनेकडे दुर्लक्ष होते. अशा सर्वांनीच 'इच्छा तेथे मार्ग' हे लक्षात ठेवावे. बर्‍याचदा असे आढळते की या साधकांच्या आयुष्यात साधनेचे स्थान दुय्यम असते. असे जोवर आहे तोवर तुम्हाला वरील त्रासांपासून सुटका मिळणे अशक्य आहे. जरा नीट विचार करा. तुम्हाला जर साधना प्रिय असेल तर मग लहान मुलांना काही वेळ शांत रहा असे समजावून सांगणे अशक्य आहे का? घरच्यांना पुढील काही वेळ मला हाक मारू नका असे सांगणे अशक्य आहे का? मित्रांना, पाहुण्यांना साधेनेच्या वेळी येऊ नका असे सांगणे (अर्थात योग्य तर्‍हेने) अशक्य आहे का? टी.व्ही. चा आवाज हळू ठेवणे वा तो काही काळ बन्द ठेवणे अशक्य आहे का? वरील गोष्टी खरोखरच शक्य नसतील तर सकाळी साधनेसाठी तासभर लवकर उठणे अशक्य आहे का? पणे कित्येकदा साधक ते करतच नाहीत कारण साधनेवर त्यांचे खरे प्रेम नसते. आयुष्यातल्या इतर अनेक गोष्टी त्यांच्यासाठी महत्वाच्या असतात. त्यांतून वेळ मिळाला तर साधनेचे बघू असा त्यांचा स्वभाव असतो. येथे मला स्पष्टपणे सांगितले पाहिजे की असा दृष्टीकोन असेल तर योगमार्ग त्रासदायकच वा निष्प्रभ वाटेल. तुम्ही साधनाच नीट करत नसाल तर सिद्धी कशी प्राप्त होणार?

थोडक्यात सांगायचे झाले तर आजच्या काळातल्य योग्यासाठी योगाभ्यासाची जागा अशी असावी जी शांत, एकांत प्रदान करणारी, स्वच्छ आणि प्रसन्न असेल.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 11 December 2009


Tags : योग अध्यात्म हठयोग कुंडलिनी चक्रे साधना योगग्रंथ लेखमाला नाथ