Untitled 1

कुंडलिनी योग आणि गृहस्थाश्रम

कुंडलिनी योगमार्गाविषयी उत्सुकता आणि आकर्षण असणार्‍या नवख्या साधकांचा असा एक गैरसमज असतो की कुंडलिनी योग, कुंडलिनी जागृती किंवा एकूणच योगजीवन हे सर्वसामान्य संसारी आयुष्य जगणार्‍या माणसांसाठी नाही. त्यांचा असा समज असतो की योगजीवन हे केवळ संन्यासी, बैरागी किंवा रानावनात भटकणारे योगी अशांसाठीच मर्यादित आहे. संसारी माणसाने काही त्यात पडण्यात अर्थ नाही वगैरे. हा समाज सपशेल खोटा आहे. निव्वळ गृहस्थाश्रम टाळून अथवा अविवाहित राहून कोणी योगी बनेलच याची काही खात्री देता येत नाही. योगमार्गावरील प्रगति ही साधकाची मनोभूमी किती "पक्की" किंवा "कच्ची" आहे त्यावर अवलंबून आहे. सर्वसंग परित्याग करून हिमालयात गेलेल्या योगसाधकाच्या मनात जर भौतिक सुखाविषयीचे विचार घोळत असतील तर त्याचा सर्वसंगपरित्याग पोकळच म्हणावा लागेल. त्याचप्रमाणे शहरी जीवन जगणारा एखादा योगसाधक मनातून विवेक-वैराग्यशील असणे शक्य आहे. सांगायचा मुदा हा की कुंडलिनी योग हा गृहस्थाश्रमी साधकांसाठीही तेवढाच उपयोगी आहे जेवढा तो संन्यासी अथवा बैराग्यांसाठी आहे. या लेखात आपण हाच मुद्दा शिवसंहितेच्या आधाराने समजून घेणार आहोत.

शिवसंहितेच्या पाचव्या पटलामध्ये कुंडलिनी योग हा गृहस्थाश्रमी साधकांसाठी कसा उपयोगी आहे हे भगवान शिव आपली अर्धांगिनी जगन्माता पार्वतीला सांगतात -

यदृच्छालाभसंतुष्ट: संत्यक्तान्तरसांगक: ।
गृहस्थश्चाप्यनासक्त: स मुक्तो योगसाधनै: ॥

अर्थ - जे मिळेल त्यात संतुष्ट राहून इंद्रायांवरून आसक्ती हटवून विरक्त असलेला गृहस्थी साधकासुद्धा नियमित योगसाधनेच्या जोरावर मुक्त होऊ शकतो.

 वरील श्लोकात भगवान शंकराने कुंडलिनी योगसाधनेत सफलता मिळवण्यासाठी गृहस्थी साधकाने काय गुण अंगी बाणवणे आवश्यक आहे ते विशद केले आहे. पहिला गुण म्हणजे जे मिळेल त्यात संतुष्ट राहण्याची वृत्ती. सर्वसामान्य माणूस हा नाना इच्छा, आकांक्षा आणि वासना यांनी लडबडलेला असतो. कितीही मिळाले तरी "अजून जास्त" अशी त्याची वृत्ती असते. या वृत्तीमुळे त्याचे सर्व लक्ष आणि ताकद ही भौतिक सुखे मिळवण्यात खर्ची पडते. योगसाधनेला आणि योगमार्गाला त्याच्या आयुष्यात मग वेळ उरत नाही. ज्याला योगी बनायचे आहे त्याने ही हावरट वृत्ती सोडून दिली पाहिजे. येथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की संसारी साधकाला केवळ स्वतःपुरता विचार करून चालत नाही. समजा पती मिळेल त्यात समाधान मानणारा आहे परंतु त्याची पत्नी आणि मुले मात्र अगदी विरोधी वृत्तीची आहेत. आशा वेळी काय होईल? अर्थातच त्या साधकावर आपल्या कुटुंबियांची हौस पुरवण्यासाठी दडपण येईल. त्याने या कामी अनास्था दाखवताच आजूबाजूचे लोक त्याला "कुटुंबाकडे दुर्लक्ष करत आहे" असे बोल लावतील. त्यामुळे मिळेल त्यात संतुष्ट राहण्यासाठी साधकाची वृत्ती तर तशी हवीच पण त्याच्या जोडीदाराची वृत्तीही मिळतीजुळती असणे गरजेचे आहे. अन्यथा ओढाताण, असमाधान, असंतोष अटळ आहे. याचसाठी आपल्याकडे जोडीदार निवडताना कुंडली / पत्रिका जुळवण्याची पद्धत रूढ आहे. अर्थात ज्योतिष शास्त्रानुसार "गुणमिलन" हा केवळ एक छोटा आणि वैयक्तिक विश्वासाचा भाग झाला. आधुनिक काळ पहाता त्या जोडीला "मेडिकल पत्रिका" आणि "स्वभाव पत्रिका" जुळवून पाहणेही तितकेच गरजेचं आहे.

मिळेल त्यात संतुष्ट राहाण्यासाठी इंद्रिय संयम आवश्यक आहे. बळकट इंद्रिये मनाला सहज फसवतात आणि योगमार्गावरून साधकाचे पतन होण्याचा धोका असतो. इंद्रियांना ताब्यात ठेवण्यास योगक्रिया, विवेक (चांगले काय आणि वाईट काय) आणि अनासक्ती आवश्यक ठरते. काही साधकांना असा प्रश्न पडेल की योगजीवनाला आवश्यक असणारे ब्रह्मचर्या सारखे घटक संसारी साधक असे काय पाळू शकणार? याला उत्तर असे की तारतम्य बाळगून, विषयवासनांचा अतिरेक न करता, सात्विक जीवनशैलीच्या आधाराने साधक "गार्हस्थ्य ब्रह्मचर्य" सहजपणे पाळू शकतो. ब्रह्मचर्याचे पालन काया-वाचा-मन या तीन पातळ्यांवर होणे गरजेचे आहे. एखाद्या संन्याशाला या तिघांचेही कठोर पालन आवश्यक आहे. परंतु गृहस्थी साधकाला धर्माधिष्ठित मार्गाने निवडलेल्या जोडीदाराबरोबर सात्विक वृत्तीने नैसर्गिक प्रेरणांचा निचरा करण्याची सूट योगशास्त्राने दिलेली आहे. त्याशिवाय योगशास्त्राने मानवी शरीराचा सखोल अभ्यास करून अशा काही क्रियाही विकसित केल्या आहेत त्यांद्वारे "गार्हस्थ्य ब्रह्मचर्य" पाळणे सोपे जाते. तात्पर्य हेच की संसारी साधकही नियमित योगसाधना करून खात्रीशीरपणे प्रगति करू शकतो.

गृहस्थानां भावेत्सिद्धीरीश्वराराधानेण वै।
योगाकरियाभी युक्तांना तस्मात्संयतते गृही॥

अर्थ - योगाक्रियांचा अभ्यास करणारा साधक ईश्वराच्या (शिव) आराधनेने योगमार्गात सफलता मिळवतो. म्हणूनच गृहस्थी साधकांनी सतत योगाभ्यास केला पाहिजे.

शिव संहिता हा शिव-पार्वती संवाद आहे. भगवान शंकराच्या अनेक नावांपैकी एक नाव आहे ईश्वर. शिवसंहितेत जागोजागी शंकराला "ईश्वर" असेच संबोधलेले आढळते. येथे शंकराने स्वतः गृहस्थी योगसाधकांसाठी "शिव आराधना" हा मार्ग सुचवला आहे. योगशास्त्र हे शिवप्रणीत असल्याने शंकराच्या आशिर्वादाशिवाय त्यात सफलता येत नाही असा योगीजनांचा विश्वास आहे. त्यामुळेच संन्यासी असो वा गृहस्थी योगसाधकासाठी शिवोपासना अनिवार्य आहे. गृहस्थी साधकासाठी तर शंकर-पार्वती हे आदर्श पती-पत्नी आहेत. शंकर स्वतः "गृही असून वैरागी" असा आहे. शिवसंहितेतही अगदी याच प्रकाराचे आचरण अपेक्षित आहेत. शंकर आणि पार्वती वरकरणी अगदी भिन्न वाटतील पण त्यांचे एकमेकांवरील प्रेम असे आहे की शंकराने पार्वतीला आपले अर्धे अंग देऊन अर्धांगिनी केले! शिवलिंग हे ही शिव-शक्ति एकीकरणाचेच प्रतीक आहे.

गृहे स्थिता पुत्रदारादी पुर्णे।
संगं त्यक्त्वा चान्तरे योगमार्गे॥
सिद्धेश्चिन्हन विक्ष्य पश्चाद गृहस्थ:।
क्रीडेत्सो वै मे मतं साधयित्वा॥

अर्थ - पुत्र, पत्नी इत्यादींनी परिपूर्ण घरात राहून सुद्धा सर्व आसक्ती रहित होऊन, योगमार्गावर आरुढ होऊन, त्याद्वारे अनुभवास येणारी चिन्हे पाहून साधकाने साधनेत मग्न राहावे आणि मिळणार्‍या आनंदाचा आस्वाद घ्यावा असे माझे (शंकराचे) मत आहे.

वरील श्लोक अभ्यासल्यावर नवीन साधकांच्या मनातील कुंडलिनी योग आणि गृहस्थी जीवनाविषयीचा गैरसमज नक्कीच दूर होईल. भगवान शंकराने येथे स्पष्टपणे सांगितले आहे की पत्नी, पुत्र इत्यादि सगेसोयर्‍यांबरोबर रहात असून सुद्धा जर साधनाने आधी सांगितलेला अनासक्तीचा भाव मनात रुजवला तर तो नक्कीच योगमार्गावर प्रगति करू शकतो. ही प्रगति पोकळ पुस्तकी ज्ञानाची नसते तर त्याला स्वानुभवाचे अधिष्ठान असते. साधक स्वतःमध्ये योगसाधना योग्य दिशेने सुरू असल्याची चिन्हे स्पष्टपणे पाहू शकतो. त्याला दुसर्‍या कोणी अनुमोदन देण्याची गरज भासत नाही. असा योगारुढ झालेला साधक गृहस्थी असून देखील निखळ आनंदाचा अनुभव घेतो. हे शिववचन आहे.

प्राचीन काळी ऋषीमुनी, सिद्ध हे गृहस्थी होते. यांनी वरील प्रकारे जीवन जगत स्वतःची उच्चतर आध्यात्मिक प्रगति करून घेतली. गृहस्थाश्रम स्वीकारणे अथवा न स्वीकारणे हा जरी प्रत्येक साधकाचा वैयक्तिक प्रश्न असला तरी योगशास्त्राने त्याबाबतीत कोणतीही ताठर अथवा टोकाची भूमिका घेतलेली नाही हे वरील विवेचनावरून स्पष्ट होते. शिवसंहितेतल्या या उपदेशाचे पालन करून गृहस्थी साधकही कुंडलिनी योगमार्गावर वाटचाल करू शकतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 27 December 2012


Tags : योग अध्यात्म शिव कुंडलिनी