Untitled 1

कुंडलिनी जागृतीचे सुलभ मार्ग

कुंडलिनी जागृती करून आध्यात्मिक प्रगती करू इच्छिणार्‍या नवीन साधकांना नेमकी कोणती साधना करावी असा प्रश्न पडतो. हठयोग हा कुंडलिनी जागृतीचा प्रभावी उपाय आहे हे तर खरेच पण सर्वचजण तो अभ्यासू शकतात असे नाही. हठयोगाचा अभ्यास करण्यासाठी अतिशय चिवट शरीरक्षमता असावी लागते आणि बहुतेक साधकांकडे ती असत नाही. शिवाय हठयोगांतर्गत कुंभकयुक्त प्राणायामाच्या अतिरेकाने फायद्यापेक्षा नुकसानच होऊ शकते. आजचा मुंबईसारख्या शहरात राहणारा साधक साधारणतः खालील प्रकारात मोडतो:

  •  बहुतेक साधक हे सर्वसामान्यांसारखे संसारी आयुष्य जगतानाही आध्यात्मिक प्रगती कशी साधता येईल हे पहात असतात.
  • आत्मसाक्षात्कार अथवा परमेश्वरप्राप्ती हे त्यांचे प्रथम ध्येय नसते. आयुष्यातील इतर अनेक गोष्टी सांभाळून (जसे नोकरी, संसार, जबाबदार्‍या) मग उरलेला वेळ ते या कामी देत असतात.
  • दर दिवशी फार वेळ योगाभ्यासासाठी देणे त्यांना शक्य नसते. दिवसातून फारच फार एक तास ते साधनेसाठी देऊ शकतात.
  • अभ्यासाच्या जोडीला आवश्यक असलेले वैराग्य अंगी बाणायला ते नाखूश असतात किंवा ते त्यांना नीटसे जमत नाही.
  • आपली साधना फलीत व्हायला वेळ लागतो हे त्यांना पटत नाही. साधनेची फळे चाखायला ते अगदी अधीर झालेले असतात. संगणकाच्या कळ दाबल्या प्रमाणे तत्काळ साधनेचे फळ मिळाले पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असते.
  • हठयोगाने जागृत झालेली कुंडलिनी अनेकदा तीव्र स्वरूपाची असते. हा जागरणाचा आवेग पेलणे अनेकांना कठीण जाऊ शकते.

आता वरील सर्व मुद्दे लक्षात घेता अशा साधकांना हठयोग वा क्रियायोग जड वाटतो यात नवल वाटण्यासारखे काहीच नाही. मग अशा साधकांनी काय करावे? त्यांनी कुंडलिनी जागृती कशी अनुभवावी? अशा साधकांसाठी काही सोपी, सुरक्षित साधना आहे का?

मला जेव्हा वाचक किंवा सल्ला मागण्यासाठी आलेले साधक हे प्रश्न विचारतात तेव्हा मी त्यांना दोन साधना सुचवतो. त्या दोन साधना म्हणजे जप साधना आणि अजपा साधना. या दोनही साधना सर्वांना करता येण्याजोग्या आहेत. त्यांचे कोणतेही दुष्परीणाम नाहीत. आणि मुख्य म्हणजे त्यांचे परिणाम त्यामानाने लगेच दिसून येतात.

येथे जप या शब्दाचा नामस्मरण असा अर्थ मला अपेक्षित आहे. तांत्रिक मंत्रांचे पुनश्चरण असा अर्थ मला अपेक्षित नाही.

दुर्दैवाने या दोनही साधना साधकांकडून दुर्लक्षिल्या जातात. कित्येक साधक जपाच्या नावाखाली माळाच्या माळा ओढताना दिसतात. पण त्यापासून त्याना फायदा मात्र होताना दिसत नाही. याचे कारण त्यांना नामस्मरण कसे करावे हेच माहीत नसते. नामस्मरण ही एक ध्यान पद्धती आहे हेच ते विसरतात. केवळ काही मंत्र तोंडातल्या तोंडात पुटपुटणे म्हणजे जप नव्हे हे त्यांच्या लक्षातही येत नाही. प्रत्येक नामाला एक रुप आणि अर्थ असतो. नाम-रुप-अर्थ या त्रिवेणी संगमात ध्यान करणे म्हणजेच खरी जप साधना. जर साधकाना जप कसा करायचा ते माहीत नसेल तर त्यांनी आपल्या गुरूला (वा एखाद्या तज्ञाला) नम्रपणे त्या बद्दल विचारले पाहीजे. जपाचा वास्तवीक अर्थ आणि तो करण्याची पद्धत नीट समजावून घेतली पाहीजे.

जप साधना परमेश्वरावर गाढ भक्ती असणार्‍यांसाठी अतिशय चांगली आहे. इतरांनाही त्यापासून फायदा होतोच. जप साधनेचा महत्वाचा फायदा म्हणजे आपल्या उपास्य दैवतेवर असतेली श्रद्धा आणि भक्ती वाढते. जप साधनेने कुंडलिनी अतिशय आल्हाददायकपणे जागृत होते. मन हमखासपणे ताब्यात येते. म्हणूनच तर हिंदू धर्मामधे जपावर एवढा भर देण्यात आला आहे.

दुसरी साधना म्हणजे अजपा साधना. श्वासांवर मन ठेवणे हा अजपा साधनेचा केन्द्रबिंदू आहे. उपनिषदे, तंत्रग्रंथ, पुराणे आणि योगग्रंथ या सगळ्यांनीच या साधनेला 'न भुतो न भविष्यती' म्हणून गौरवलेले आहे. समर्थ रामदासांनीही दासबोधामधे अजपा साधना सांगितली आहे. या सर्वांवरून अजपा साधनेचे महत्व सहज लक्षात येते.

अजपा म्हणजे केवळ श्वासांवर मन ठेवणे नाही. चक्रशुद्धी, शुषुम्ना उघडणे आणि कुंडलिनी जागरण ही महत्वाची कार्ये अजपा मुळे साध्य होतात. हे कसे साधायचे ते गुरूकडून वा तज्ञाकडून नीट समजवून घेतले पाहीजे. अजपा साधनेने केवल कुंभक विनासायास साध्य होतो. साधना सुरू केल्यानंतर काहीच दिवसात श्वास मंद आणि कमी होत आहेत हे साधक पडताळून घेऊ शकतो. शरीर-मनाला येणारी सुखद शिथिलता स्वतः अनुभवू शकतो.

जप आणि अजप यांची कास धरून कुंडलिनी आल्हाददायकपणे जागृत करता येते आणि आध्यात्मिक प्रगती साधता येते हे निर्विवाद सत्य आहे. मी स्वतः अनेकांना या दोनही साधना शिकवल्या आहेत. माझ्या विद्यार्थ्यांच्या अनुभवावरूनच मी खात्रीलायकपणे सांगू शकतो की वरील दोन साधनांची कास धरल्यास आध्यात्मिक प्रगती प्रत्येक साधकाला सहज साधता येईल.

येथे एक सांगावेसे वाटते की कृपया जप आणि अजप या साधना मंद परिणाम करणार्‍या आहेत व तीव्र आध्यात्मिक ओढ असणार्‍यांसाठी त्या नाहीत असा समज होऊ देऊ नका. तीव्र आध्यात्मिक ओढ असणार्‍यांसाठी तर या साधना अति शीघ्र फल देतात.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 17 August 2009


Tags : योग अध्यात्म शिव मंत्रयोग अष्टांगयोग कुंडलिनी चक्रे प्राणायाम भक्ती नाथ