Untitled 1

नाथ संप्रदाय आणि नाथ सिद्ध

लेखक : बिपीन जोशी

हठविद्यां हि मत्स्येन्द्रगोरक्षाद्या विजानते।
स्वात्मारामोथवा योगी जानीते तत्प्रसादतः॥

हठविद्या मत्स्येन्द्रनाथांना माहित होती. ती त्यांनी गोरक्षनाथ आणि इतरांना प्रदान केली. त्या योग्यांच्या कृपेने स्वात्मारामाला ती प्राप्त झाली.

स्वात्माराम आता आपल्याला हठयोग कसा माहित झाला ते सांगत आहे. प्रथम मत्स्येन्द्रनाथांना तो ज्ञात झाला आणि त्यांनी मग तो गोरक्षनाथांना दिला. गुरूपरंपरेने तो स्वात्मारामाला प्राप्त झाला. मत्स्येन्द्रनाथांना हठविद्या कशी प्राप्त झाली त्याची एक सुरस कथा आहे. ती अशी...

एकदा पार्वतीने भगवान शंकरांना या सृष्टीचे रहस्य आणि जन्म-मृत्युचे चक्र भेदण्याच्या उपायांविषयी विचारणा केली. ते ज्ञान अतिशय गुढ असल्याने भगवान शंकर पार्वतीला एकांतात घेऊन गेले. चुकुनसुद्धा कोणाच्या कानी हा विषय पडू नये म्हणून त्यांनी आपले वस्त्रालंकारही काढून ठेवले. भगवान शंकर आणि पार्वती समुद्र किनारी बसून गुजगोष्टी करू लागले. भगवान शंकर पार्वतीला गुढातीगुढ असे हठविद्याचे ज्ञान प्रदान करू लागले. त्याचवेळेस समुद्रातील एका माशाने ते ज्ञान एकले. जेव्हा शंकराच्या हे लक्षात आले तेव्हा त्याने कृपाळूपणे त्या माशाला मनुष्यरूप प्रदान केले. तोच मत्स्येन्द्रनाथ. मनुष्यरूपातील मत्स्येन्द्रनाथाने मग नाथ सम्प्रदाय स्थापून गोरक्षनाथाला शिष्य केले.

जरी मत्स्येन्द्रनाथ नाथ संप्रदायाचे संस्थापक असले तरी नाथ पंथाच्या प्रासाराचे खरे श्रेय गोरक्षनाथांनाच जाते. भारतभर भ्रमण करून त्यांनी नाथ संप्रदायाचा प्रसार केला. संस्कृत व्यतिरीक्त इतरही अनेक भारतीय भाषांतून ग्रंथ लिहिले. सामान्य लोकांना संस्कृत मंत्र सिद्ध कठीण म्हणून शाबरी मंत्रविद्या जन्मास घातली. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही की आज नाथ संप्रदायाची जडणघडण झालेली आहे त्यामधे गोरक्षनाथांचा सिंहाचा वाटा आहे. गोरक्षनाथांसह चौरेंशी नाथ सिद्ध महत्वाचे मानले जातात. या सिद्धांनी नाथ संप्रदायाचा प्रसार केला. काहींनी आपापले उप-पंथही स्थापले. स्वात्मारामाने केवळ येथे केवळ एवढाच मोघम उल्लेख केला आहे की या मत्स्येन्द्रगोरक्षादी सिद्धांकडून सुरू झालेल्या गुरूपरम्परेने त्याला हठविद्या मिळाली. त्याने स्वतःची गुरूपरम्परा स्पष्टपणे दिलेली नाही.

नाथ संप्रदायाचाविषयी काही लोक हेटाळणीच्या सुरात असे म्हणतात की गोरक्षनाथांनी एवढे भारतभ्रमण केले पण तरीही त्यांचा नाथ पंथ हा शेवटी गुढच राहीला. तो सामान्यजनांचा मुख्य अध्यात्ममार्ग न होता केवळ काहीजणांचाच राहिला वगैरे. या आक्षेपाला खरंतर काही अर्थ नाही. हे म्हणजे असे म्हणण्यासारखे आहे की आय.आय.टि. मधे सर्वसामान्य बुद्धीमत्तेचा विद्यार्थी प्रवेश घेऊ शकत नाही त्यामुळे आय.आय.टि. तच काही उणीव आहे! प्रत्येक अध्यात्ममार्गाचे स्वतःचे असे काही पात्रता निकष असतात (होय. अगदी नामस्मरणाचे सुद्धा!). नाथांचा हठयोग इतर अनेक मार्गांपेक्षा लवकर फळ देणारा आहे पण त्याचे नियमही तसेच कडक आहेत. जर एखाद्याची हे नियम पाळण्याची पात्रता नसेल तर त्याला हठयोग कसा काय जबाबदार? दुसरे असे की एकच अध्यात्ममार्ग हा काही पृथ्वीच्या पाठीवरील प्रत्येक मनुष्यप्राण्यासाठी लागू पडत नाही तेव्हा हठयोग केवळ काहींपुरताच पर्यादित राहीला या आक्षेपाला काही अर्थ नाही. तो काहींपुरताच मर्यादित राहीला कारण काही मोजकेच तो आचरण्यास समर्थ असतात.

हठयोग आणि गूढता यांबाबतही असाच आक्षेप आढळतो. आपण मागील भागात पाहिले की स्वात्मारामाने स्पष्टपणे असे सांगितले आहे की हठयोगाचा उपयोग केवळ राजयोगाच्या प्राप्तीकरताच आहे. हठयोग्याला साधनारत असताना काहीवेळा आणिमादी सिद्धिंच्या प्रलोभनांना सामोरे जावे लागते. पंचमहाभूतांवर त्याचे प्रभुत्व चालू लागते. सर्वसामान्य माणसाला, ज्याच्या अंगी वैराग्य आणि मुमुक्षत्व नीट बाणलेले नाही, या सिद्धी आणि साधनेच्या अनुषंगाने मिळणारे भौतिक फायदे यांचीच भुरळ पडण्याची शक्यता अधिक. भले भले योगी जीथे अशा प्रलोभनांना बळी पडले तेथे सर्वसामान्यांची काय कथा. हठयोगशास्त्राचा कोणी दुरुपयोग करू नये म्हणून ते गुरूपरंपरेद्वारे केवळ मोजक्या पात्र शिष्यांना शिकवले गेले. आजच्या युगातही हेच घडत नाही का? अमेरीकेसारखी आर्थिकदृष्ट्या बलाढ्य राष्ट्रे अणुबॉंम्बविषयक संशोधन करतात. असे संशोधन इतर सर्वच राष्ट्रांबरोबर उघड केले जाते का? अर्थातच नाही. ते फक्त काही मोजक्या जबाबदार राष्ट्रांबरोबरच चर्चिले जाते. जर काही आततायी देशांनी अशा संशोधनाचा दुरुपयोग केला तर जग बेचिराख होण्याच्या धोका असतो. असाच प्रकार हठयोगाच्या बाबतीतही होऊ शकतो. दुसरे असे की प्राचीन काळी हठयोगी एकांतवासात साधना करत असत. त्यामुळे जनसामान्यांशी त्यांचा संबंध कमीच असे. काहीही असले तरी हे मात्र सत्य की हठयोग्यांनी हेतुपुरस्कररीत्या ही विद्या केवळ पात्र शिष्यांपुरतीच मर्यादीत ठेवली. म्हणूनच योगग्रंथांत वारंवार 'केवळ अधिकारी व्यक्तीलाच हे ज्ञान द्यावे' अशी सुचना केलेली आढळते. ज्ञानेश्वरांसारखे श्रेष्ठ योगी जे स्वतः नाथयोगी होते त्यांनी सर्वसामान्य जनमानसां करता हठयोग शिकावला नाही त्याचे नेमके हेच कारण आहे. त्यांनी हठयोग सर्वसामान्यांना शिकवला नाही तो हठयोगात काही उणे आहे म्हणून नव्हे तर त्यांना माहित होते की सर्वच लोक हठयोगाभ्यासाला पात्र नसतात आणि या विद्येचा दुरुपयोग आणि चुकिचा प्रसार होऊ शकतो.

योगसाधनांचे ज्ञान अचूक पद्धतीने प्रदान करणे आवश्यक असते. जर त्यात काही उणे दुणे राहिले तर साधक इच्छित परिणामांना मुकतो. प्राचीन काळी ही अचुकता राखण्याचा एकमेव मार्ग होता तो म्हणजे एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीला ज्ञान प्रत्यक्ष प्रदान करणे. गुरूपरंपरेतील महत्वाचे गुरू अहार-विहाराचे नियम ठरवत स्वानुभवावरून आणि शास्त्रग्रंथांवरून ठरवत असत. गुरूंमधील स्वानुभवाच्या फरकामुळे, त्यांच्या विचारसरणीच्या फरकामुळे नाथ पंथातही वेगवेगळ्या गुरूपरंपरा तयार झाल्या. त्यामुळे गोरक्षनाथांनी स्थापिलेला नाथ पंथाचा वृक्ष नाना गुरूपरंपरारूपी फांद्यांनी बहरून गेला.

इत्यादयो महासिद्धा हठयोगप्रभावतः।
खंडयित्वा कालदंडं ब्रह्मांडे विचरंती ते॥

या महासिद्धांनी हठयोगाद्वारे काळाला जिंकले आणि ते ब्रह्मांडामधे विचरण करत असतात.

नाथ संप्रयदायात आपले उद्दिष्ट साध्य केलेल्या योग्याला 'सिद्ध' असे म्हणतात. हे उद्दिष्ट कोणते? तर शिवत्वाची प्राप्ती. हे सिद्ध काळाला जिंकून स्वेच्छेनुसार सर्वत्र भ्रमण करण्यास समर्थ असतात. महाराष्ट्रात नवनाथ फार प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत. असे मानले जाते की हे सर्व नाथ सुक्ष्म शरिराने अजुनही अस्तित्वात आहेत. नवनाथ उपासकांना त्यांचे दर्शन झाल्याचेही दाखले सापडतात. असे हे जीवनमुक्तावस्था प्राप्त केलेले सिद्ध प्रकृतीच्या आश्रयाने सर्वत्र संचार करू शकतात. या योग्यांना अष्टमहासिद्धी प्राप्त झालेल्या असल्याने निसर्गातील प्रत्येक गोष्टीवर त्यांचे प्रभुत्व चालते. या अष्टमहासिद्धी म्हणजे अणिमा, लघिमा, महिमा, गरीमा, प्राप्ती, प्रकाम्य, वशित्व आणि इशत्व. सिद्धांना या आणि अशा अनेक सिद्धी हठयोगानेच प्राप्त झालेल्या असतात. अर्थात परमेश्वराशी एकरूप झालेल्या सिद्धांकडून या सिद्धींचा दुरूपयोग होणे शक्यच नसते. असे मानले जाते की हे सिद्ध आजही योग्य साधकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मार्गदर्शन आणि मदत करत असतात.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 23 November 2009


Tags : योग अध्यात्म शिव हठयोग कुंडलिनी चक्रे साधना योगग्रंथ लेखमाला नाथ