Untitled 1

स्थूल, सूक्ष्म, कारण देहातील अजपा स्पंद

अजपा साधना ही वरकरणी जरी अतिशय साधी आणि सोपी क्रिया वाटत असली तरी या क्रियेमध्ये अंतरंगात खोल बुडी मारून तेथील ज्ञानरुपी मोती मिळवण्याचे सामर्थ्य आहे. मानवी पिंडा द्वारे घडणाऱ्या श्वासांचे अनुसंधान म्हणजे अजपा अशी उथळ व्याख्या करून चालणार नाही. साधनेच्या सुरवातीच्या काळात भौतिक पिंडाच्या दृष्टीने जरी ही व्याख्या बरोबर असली तरी जसजशी साधना दृढ होत जाते तसतशी अजपाची व्याप्ती किती मोठी आहे ते तुमच्या ध्यानी येईल.

सर्वसाधारणपणे असं म्हटलं जातं की एखाद्या मंत्राचा जप जेवढा जास्त करावा तेवढा उत्तम. हा नियम सर्वसाधारण वैखरी वाणीने उच्चारण्यात येणाऱ्या मंत्रांबद्दल खरा असला तरी अजपा जपाच्या बाबतीत तो तसाच्या तसा लावता येत नाही. असं समजा की अजपा साधनेच्या सुरवातीला तुमचे एका मिनिटात १५ श्वासोच्छ्वास होत आहेत. याचा अर्थ एका मिनिटात १५ वेळा "सोहं" किंवा "हंस" जप तुमच्या कडून घडत आहे. जशी जशी तुमची साधना दृढ होत जाते तसे तसे तुमचे श्वासोच्छ्वास मंद गतीने होऊ लागतात. म्हणजेच आता मिनिटाला १२ किंवा दहा वेळा ते होऊ लागतात. याचा अर्थ असा की "अजपा गायत्रीचा" जप आता तुम्ही पहिल्यापेक्षा कमी वेळा अर्थात १०-१२ बेळाच करत आहात. परंतु तुमची ध्यानाची खोली आता पहिल्यापेक्षा कितीतरी प्रगाढ झालेली असणार आहे. अशी प्रगती करता करता एक दिवस असा येतो की अजपा साधक योगशास्त्रात वर्णिलेली "केवल कुंभक" किंवा "सहज कुंभक" ही अवस्था प्राप्त करतो. या अवस्थेत साधकाचे बाह्य श्वासोच्छ्वास पूर्ण थांबलेले असतात परंतु तो ध्यानाच्या उच्चतम भूमीवर आरूढ झालेला असतो.

वरील विवेचनावरून तुम्हाला हे लक्षात आलं असेल की अजपाचा श्वासांशी असलेला संबंध हा स्थूल पिंडाच्या क्रियात्मक भूमिकेतून मांडलेला आहे. अजपा साधनेची ती सुरवात असल्याने समजायला सोपे जावे म्हणून योगग्रंथांनी तसं विवरण केलेलं आहे. एकदा का साधक अजपा "जप" ओलांडून अजपा "ध्यान" या भूमीवर प्रवेश करता झाला की अनेकानेक आध्यात्मिक अनुभूतींचा स्वयमेव साक्षीदार बनतो. अजपा म्हणजे श्वास नसून मूळ कुंडलिनी स्वरूपा आदिशक्तीचा स्पंद आहे हे त्याला उमगून येते. श्वासांपाठची "सोहं" भूमिका मग त्याच्यासमोर स्वयमेव उलगडू लागते.

मानवी पिंडाकडे व्यापक दृष्टीने पाहिल्यास त्याची विभागणी तीन शरीरे आणि पाच कोष यांमध्ये करता येते. योगग्रंथांनुसार मानवी देह स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर यांनी बनलेला आहे. आपण सर्वसाधारणपणे ज्याला शरीर म्हणतो ते म्हणजे स्थूल शरीर. स्थूल शरीर हे पंचमहाभूतांपासून अर्थात पृथ्वी, जल, अग्नि, वायू आणि आकाश यांपासून बनलेले असते. पंचमहाभूतांच्या मिश्रणाने रस, रक्‍त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र असे सप्त धातू बनतात आणि स्थूल शरीर किंवा अन्नमय कोष घटीत होत असतो. कुंडलिनी आणि चक्रांच्या दृष्टीने बघायचे झाले तर आधुनिक विज्ञानाला सापडलेली plexuses, pineal gland, spinal chord वगैरे गोष्टी ह्या स्थूल शरीरात मोडतात. स्थूल शरीरात अजपा साधना ही श्वासोच्चासरुपी "जप" या स्वरूपात असते.

स्थूल शरीरापेक्षा सूक्ष्म शरीर हे अर्थातच अधिक तरल असते. प्राण, मन, बुद्धी, अहंकार, चित्त इत्यादी गोष्टींचा समावेश सूक्ष्म शरीरात होतो. त्या अनुषंगाने प्राणमय कोष, मनोमय कोष आणि विज्ञानमय कोष हे सूक्ष्म शरीराचा भाग आहेत. सूक्ष्म शरीर डोळ्यांना दिसत नाही पण त्याचे अस्तित्व क्षणोक्षणी जाणवत असते. ज्यांनी अजपा साधना बराच काळ केलेली आहे त्यांना येणारे योगमार्गावरील अनुभव हे प्रत्यक्षात सूक्ष्म शरीराशी निगडीत असतात. उदाहरणार्थ, ध्यानाला बसले असता आसन हवेत उचलले जात आहे असा भास होणे, शरीर गोलाकार फिरल्याचा भास होणे, मंत्रजप अचानक प्रचंड वेगाने होऊ लागणे वगैरे. कुंडलिनी आणि चक्र सूक्ष्म शरीरात देखील अस्तित्वात असतात परंतु त्यांचे कार्य सुद्धा सूक्ष्म स्वरूपात घडत असते. कुंडलिनी वरील तीन कोषांवर कार्य करत असते. सूक्ष्म शरीरात अजपा साधना ही केवळ जप न रहाता "ध्यान" बनते.

उच्च कोटीच्या योग्यांना सूक्ष्म देहावर हवा तसा ताबा मिळवता येतो आणि त्याचे स्थूल शरीरा शिवाय त्याचे "चलन-वलन" घडवता येते. अशी दोन उदाहरणे प्रसिद्ध आहेत. एक उदाहरण आहे आदी शंकराचार्यांचे ज्यांनी शास्त्रार्थ करतांना झालेल्या वाद-विवादा प्रसंगी एका राजाच्या मृत देहात प्रवेश केला आणि काही विषयांचे ज्ञान मिळवले. दुसरे उदाहरण आहे नाथ सिद्ध मच्छिंद्रनाथांचे. त्यांनीही एका मृत राजाच्या शरीरात प्रवेश करून तब्बल बारा वर्षे राज्य केले. या दोन्ही अति उच्च कोटीच्या महात्म्यांना "परकाया प्रवेशा" ची सिद्धी मिळाली ती सूक्ष्म शरीरावर पूर्ण ताबा असल्यामुळेच.

अजपा करता करता ज्या वेळी साधक ध्यानाच्या उच्च स्तरावर जाऊ लागतो तेंव्हा त्याला ध्यानावस्थेचा एक विलक्षण आनंद येऊ लागतो. हा आनंद कारण शरीराचा आणि आनंदमय कोषाचा विषय आहे. साधनेतून आनंद मिळणे ही प्रगत अवस्था आहे. केवळ ध्यानाने होणारी तणावमुक्ती वगैरे गोष्टींमधून जो आनंद साधकाला मिळत असतो तो या आनंदापेक्षा कनिष्ठ प्रतीचा असतो. अशुद्ध कारण शरीर अविद्येचे माहेरघर असते तर शुद्ध कारण शरीर आत्मानंदाचे. कारण शरीर हे बरेचसे abstract आणि vague असते. चित्तात साठलेल्या सत्व, रज, तम गुणांनी माखलेल्या संस्कारांना त्यात मूर्तरूप मिळालेले नसते. कारण शरीरात कुंडलिनी तिची "माया" प्रगट रुपात दाखवत नसते. आनंदमय कोषातील अजपा साधनेचा स्तर म्हणजे "सहजावस्था" असते.

अजपा साधना "जप", "ध्यान", "सहजावस्था" हे सोपान पार करत करत एक वेळ अशी येते की देह, गुण, अवस्था हा सगळा खेळ संपतो आणि निखळ शुद्ध "सोहं" भरून रहातो.

 असो.

अजपा साधनेचे सोपान पार करण्यासाठी आवश्यक असलेली इच्छा-ज्ञान-क्रिया शक्ती भगवती कुंडलिनी. सर्व योगाभ्यासी वाचकांना प्रदान करो या मनःपूर्वक सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 04 May 2020
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates