Untitled 1

धूळ, धूर, गर्दी इत्यादींमुळे होणारा त्रास आणि काही योगोपचार

 

दिवाळीचे दिवस सध्या सुरु आहेत. त्यामुळे माझे अनेक स्टुडंटस भेटण्यासाठी म्हणून येत आहेत. काल त्यांतील एकाने सहज बोलता बोलता त्याला होणारा त्रास सांगितला आणि योगाद्वारे काही उपाय करता येईल का ते विचारले. त्याविषयी काही...

त्याने मला जे सांगिलते ते थोडक्यात असे -

"सर, गेले तीन-चार दिवस मी बायको बरोबर दिवाळीच्या छोट्या-मोठ्या खरेदीसाठी फिरतोय. कधी गोखले रोड, कधी स्टेशन रोड, कधी गावदेवी मार्केट तर कधी मोठं मार्केट. सगळीकडे लोकांची एवढी गर्दी, धूळ, त्यात परत वाहनांचा धूर. त्यामुळे होतंय काय तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठलो की मला सर्दी झाल्यासारखं वाटतं, नाक चोंदलेलं असतं, डोकं जड झाल्यासारखं वाटतं, कधी खोकलाही वाटतो. दिवस सुरु झाला की ही लक्षणं कमी होतात औषधं वगैरे काही घेतलं नाही तरी. पण धूळ-धूर खाल्ला की परत असाच त्रास होतो. यावर उपाय म्हणून काही योग-क्रिया आहेत का?"

आपली जीवनशैली सध्या अतिशय विषम झालेली आहे. अनेकजण दिवसभर ऑफिसात बैठे काम करतात. वातानुकुलीत हवेत दिवस जातो. ही हवा तशी शुद्ध आणि चांगली असते पण त्यामुळे होतं काय की शरीराला थोड्याही अशुद्धीची सवय रहात नाही. मग जेंव्हा धूळ, धूर, गर्दी वगैरे गोष्टींशी संपर्क होतो तेंव्हा जास्त त्रास होतो. धूळ, धूर, गर्दीमधील कार्बनचे जास्त प्रमाण या सगळ्यामुळे फुफ्फुसांतील अशुद्ध हवेचे प्रमाण वाढते. तो कचरा मग शरीरात फुफ्फुसे, श्वास नलिका, नाक, सायनस, घसा इत्यादी ठिकाणी आपला दुष्परिणाम दाखवतो. ती साचलेली आणि नको असलेली घाण आणि विजातीय द्रव्ये बाहेर काढण्याचे काम शरीर आपल्यापरीने करत असते. त्याचाच एक भाग म्हणून वर सांगितलेली लक्षणे उद्भवत असतात. प्रत्येकाच्या रोग-प्रतिकारक शक्तीवरही होणाऱ्या त्रासाची तीव्रता अवलंबून असतं.

कदाचित तुम्हा वाचकांपैकी काहींना सुद्धा असा त्रास होत असण्याची शक्यता आहे. त्याला मी जे काही उपाय सुचवले ते खाली देत आहे. जर तुम्हाला श्वसनाचा किंवा अन्य तत्सम विकार आधीपासून असेल तर आपापल्या डॉक्टरच्या सल्ल्यानेच उपाय करावेत.

 नाक आणि तोंड झाकलं जाईल असा मास्क लावणे

ज्यांना असा त्रास होतो त्यांनी एक गोष्ट न कंटाळता केली पाहिजे ती म्हणजे - गर्दीच्या आणि धुळीच्या ठिकाणी नाक आणि तोंड झाकलं जाईल असा मास्क लावणे. लोकांना हे माहित असतं पण चाराचौघात असा मास्क लावला तर लोकं विचारातील, लोकं काय म्हणतील अशा फालतू गोष्टींमुळे ते टाळाटाळ करतात. त्रास शेवटी तुम्हाला होणार आहे, लोकं काय म्हणतील किंवा तुम्ही कसे दिसाल असल्या गोष्टीना फारशी किंमत नाही. आजकाल हिरव्या रंगाचे कापडी मास्क केमिस्ट कडे अगदी सहज उपलब्ध असतात. एखाद वेळी मास्क नसेल तर नाकातोंडाला रुमाल लावावा आणि धूळ-धूर-गर्दी पासून स्वतःचे संरक्षण करावे.

नाक, घसा पाण्याने धुणे

हा सुद्धा एक साधा पण परिणामकारक उपाय आहे. सर्वसाधारणपणे बाहेरून घरी आल्यावर हात-पाय धुतले जातात. पण अशा गर्दीच्या किंवा धुळीच्या ठिकाणाहून आल्यावर हातापाया व्यतिरिक्त दोन्ही नाकपुड्या आणि घसा स्वच्छ करणे आवश्यक आहे. थंड पाण्याने दोन्ही नाकपुड्या आतून नीट धुवून काढाव्या. स्वच्छ कोरड्या कराव्यात. तळव्यामध्ये किंवा छोट्या वाटीमध्ये पाणी घेऊन नाकाने थोडे आत ओढल्यासारखे करावे आणि बाहेर टाकून द्यावे. असे वारंवार करावे. त्याचबरोबर गुळण्या करून घसा खाकरून साफ करावा. डोळेही धुवावेत. ही सफाई बाहेरून आल्याआल्या लगेच करावी. मगच पुढच्या कार्यास लागावे.

साजूक तुपाचा उपाय

बाहेरून आल्यावर वर सांगितलेली सफाई झाली की मग गाईच्या साजूक तुपाचे एक-दोन थेंब दोन्ही नाकपुड्यात सोडावे. धुळीने नाकाच्या आतील नाजूक त्वचा irritate झालेली असते. त्या त्वेचेला साजूक तुपामुळे एक प्रकारचे वंगण मिळते. जर दिवसा हा उपाय करता येणे शक्य नसेल तर त्या दिवशी रात्री झोपतांना तो करावा. 

जलनेती शुद्धीक्रिया

ज्यांना हठयोगाच्या शुद्धी क्रियांची माहिती आहे त्यांनी बाहेरून आल्याआल्या जलनेती अवश्य करावी. जल नेती करण्याकरता एक वेगळे पात्र मिळत त्याचा वापर तुम्ही करू शकता. जर असे नेती पॉट नसेल तर साध्या पाणी पिण्याच्या भांड्याने सुद्धा ही क्रिया करणे शक्य आहे. अर्थात नेती पॉट वापरायला खुप सोपं जातं. जलनेती मुळे नाकात गेलेले धुलीकण आणि कार्बन कण बाहेर काढण्यास मदत होते. जलनेती दोन्ही नाकपुड्यांनी करावी आणि कपालभाती क्रिया करून राहिलेले पाणी बाहेर काढावे.

दीर्घ श्वसन

धूळ, धूर आणि गर्दी यांमुळे शरीरातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढलेले असते. त्याचबरोबर विषारी आणि विजातीय घटक शरीरात शिरकाव करत असतात. यावर एक सोपा उपाय म्हणजे शरीराला ऑक्सिजनचा मुबलक पुरवठा करणे. हे साधण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे दीर्घ श्वसन. दीर्घ श्वसन करण्यासाठी सुखासन, पद्मासन किंवा खुर्चीत ताठ बसावे. त्यानंतर डोळे मिटून एक दीर्घ श्वास आत घ्यावा. तो घेत असतांना मनातल्या मनात १-२-३-४-५ असे आकडे मोजावे. दीर्घ श्वास घेतल्यावर तुमची छाती फुगली पाहिजे जेणेकरून फुफ्फुसांत अधिक ऑक्सिजन जाईल. मग लगेच दीर्घ उच्छ्वास करावा. तो करत असतांना उलट्या क्रमाने म्हणजे ५-४-३-२-१ असे आकडे मनातल्या मनात मोजावे. हे झाले एक आवर्तन अशी एकामागून एक आवर्तने निदान १० ते १५ मिनिटे करावीत. बघा कसं फ्रेश आणि उत्साही वाटेल ते.

कपालभाती

नाक आणि सायनस पोकळ्या यांच्या सफाईचा एक प्रभावी मार्ग म्हणजे कपालभाती. हठयोगात कपालभातीची गणना प्राणायामात न करता तो शुद्धीक्रियांत केली जाते.  कपालभाती मध्ये श्वास आत घेण्याची क्रिया संथ आणि passive असते तर उच्छ्वास टाकताना तो जोराने पोटाला हबके देत टाकला active पणे टाकला जातो. परिणामी हवा नाक आणि सायनस पोकळ्यांमधून फिरत वेगाने बाहेर पडते आणि स्वच्छता घडवून आणते. ज्यांना कपालभाती येत असेल त्यांनी ती अवश्य करावी. ज्यांना येत नसेल त्यांनी प्रथम ती नीट शिकून घ्यावी आणि मगच सराव करावा. कपालभाती करतांना सुखासन, पद्मासन, वज्रासनाचा वापर करता येतो किंवा खुर्चीमध्ये बसूनही ही क्रिया करता येते. जलनेती नंतर कपालभाती करून राहिलेले पाणी बाहेर टाकले जाते. कपालभाती करतांना एखादा रुमाल किंवा टॉवेल जवळ ठेवावा.

भस्त्रिका प्राणायाम

भस्त्रिका प्राणायामात श्वास आणि उच्छ्वास दोन्ही active पणे वेगावेगाने घडत असतात. या क्रियेत छाती लोहाराच्या भात्यासारखी हलत असते म्हणून त्याला भस्त्रिका किंवा भस्रा म्हणतात. भस्त्रिका करायला जोर थोडा अधिक लागतो. त