Untitled 1

कुंडलिनी शक्तीत दशमहाविद्यांचे एकीकरण

आठवड्या-दोन-आठवड्यात नवरात्र सुरु होणार आहे. नवरात्र म्हटलं की देवीची विविध रूपांत उपासना ही ओघाने आलीच. शक्ती उपासनेत आदिशक्तीची उपासना दहा स्वरूपांत करण्याची प्रथा पाचीन काळापासून सुरु आहे. ही दहा स्वरूपे कोणती तर काली, तारा, छिन्नमस्ता, षोडशी, भुवनेश्वरी, त्रिपुरभैरवी,  धूमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमला.

उपासना मार्गावर साधक अनेक साधनांद्वारे आपल्या उपास्याची सेवा-आराधना करू शकतो. या सर्व साधनांद्वारे जे ज्ञान प्राप्त करायचे ते म्हणजे विद्या. तसं बघायला गेलं तर अध्यात्मामार्गावर अनेकानेक विद्या आहेत. त्यांतील देवी उपासनेशी संबंधित विद्यांनाच "महाविद्या" म्हणतात एवढे त्यांचे अनन्यसाधारण महत्व आहे. आता महाविद्या म्हटलं की इतर विद्यांपेक्षा श्रेष्ठ हे उघड आहे. या श्रेष्ठत्वाबरोबर त्यांची सिद्धी सुद्धा परम दुर्लभ आहे. अनेक वर्षे नेटाने साधना करावी तेंव्हा त्यांत सफलता मिळते. दशमहाविद्या हा भारतीय अध्यात्मातील फार उच्च आणि महत्वाचा भाग आहे.

आजकाल काय झालंय की आपल्याला पुस्तकं, इंटरनेट वगैरे माध्यमांतून प्रचंड माहिती उपलब्ध झालेली आहे. अन्न जर मुबलक उपलब्ध असेल पण ते चुकीच्या प्रकारे आणि चुकीच्या प्रमाणात सेवन केलं गेलं तर काय होतं? अर्थात तब्येतीवर त्याचा दुष्परिणाम होतो. अध्यात्म ज्ञानाच्या बाबतीतही हाच प्रकार आज घडताना दिसत आहे. त्यांमागील मुलतत्वे आणि मुलसिद्धांत अडगळीत टाकून फक्त तोडकी-मोडकी साधना प्रणालीचा अवलंब सर्रास होतांना आपल्याला दिसतो आहे. गंमत म्हणजे अशा साधकांना आपण काय करतोय याचं भानही नसतं.

असाच एक किस्सा थोडक्यात सांगतो काही वर्षांपूर्वी घडलेला म्हणजे मला काय सांगायचंय ते ध्यानी येईल. माझ्या परिचयातील एका व्यक्तीची काही अन्य कामानिमित्ताने भेट घडण्याचा योग आला. बोलता बोलता सहज तो म्हणाला की येऊ घातलेल्या गुप्त नवरात्रीत तो अमुक-अमुक देवीची उपासना काही मंत्र अनुष्ठानाने करणार होता. त्याने देवीचे जे स्वरूप सांगितले आणि ज्या मंत्राच्या अनुष्ठानाविषयी सांगितले ते ऐकून माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली.  मी त्याला म्हटलं - बाबारे, तू देवीचा जो मंत्र सांगत आहेस तो अत्युग्र स्वरूपाचा आहे हे तुला माहित आहे ना? ह्या मंत्राचा जप करत असतांना अनुष्ठान काळात अनेकदा अंगात आवेश रहातो, क्रोध वाढतो, प्रसंगी ब्लडप्रेशर वाढते, अंगात कणकण रहाते. हे सगळं तुला नीट माहित आहे ना? त्यांपासून बचाव कसा करायचा ते तू सर्व नीट शिकून घेतेलयस ना?

मी दिलेली धोक्याची सुचना त्याने फारशी मनावर घेतली नाही. त्याच्या मनावर वाचीव-ऐकीव माहितीचा एवढा पगडा बसला होता की त्या सर्वाची दुसरी बाजू जाणून घ्यायची गरजही त्याला वाटली नाही. परिणाम व्हायचा तोच झाला. त्याला त्या अनुष्ठानाचा फायदा होण्याऐवजी तोटाच जास्त झाला.

असो.

वर उल्लेखलेल्या दहा देवी रूपांची विभागणी आपल्याला तीन प्रकाराने करता येईल - सौम्य, उग्र, मिश्र. सौम्य देवी स्वरूपे म्हणजे त्रिपुरसुंदरी, भुवनेश्वरी, मातंगी आणि कमला. उग्र देवी रूपांमध्ये काली, छिन्नमस्ता, धूमावती आणि बगलामुखी यांचा समावेश होतो. तर मिश्र देवी स्वरूपांमध्ये तारा आणि त्रिपुरभैरवी यांचा समावेश होतो. यात परत काही भेद आहेत पण या लेखासाठी त्या विषयाच्या खोलात जायची आपल्याला गरज नाही.

वरील तीन प्रकारच्या देवी स्वरूपाची विभागणी सत्व, रज आणि तम या गुणांच्या आधारावर सुद्धा करता येईल. प्रत्येक देवी ही जरी त्रिगुणात्मिका शक्ती मानली असली तरी वेगवेगळ्या देवी रूपांमध्ये वेगवेगळ्या गुणांचे प्राधान्य आहे. उदाहरणार्थ, काली स्वरूपात तमोगुणाचे प्राधान्य आहे, त्रिपुरसुंदरी स्वरूपात सत्वगुणाचे प्राधान्य आहे तर कमला स्वरूपात रजोगुणाचे प्राधान्य आहे असे आपल्याला दिसून येईल.

योगसाधाकाच्या दृष्टीने बघायचं झालं तर त्याची लाडकी मातृस्वरुपा शक्ती एकच - जगदंबा कुंडलिनी. आता गंमत बघा. कोणा चित्रकाराने कल्पनेने काढलेल्या भिंतीवरच्या दशमहाविद्यांच्या चित्रावर लोकांचा प्रचंड विश्वास असतो. पण जी शक्ती प्रतिक्षण श्वास, हृदयाची धडधड, शरीरक्रिया, मन-बुद्धी-अहंकार इत्यादी अनेकानेक प्रकाराने अभिव्यक्त होत असते त्या प्राणशक्तीवर आणि त्या प्राणशक्तीचा स्त्रोत असलेल्या कुंडलिनीवर लोकांचा म्हणावा तेवढा विश्वास आणि श्रद्धा असत नाही. त्या शक्तीला ते कनिष्ठ मानत असतात. मठ-मंदिरांमध्ये देवी-देवता शोधण्याच्या प्रयत्नात ते शरीरातील आंतरिक शक्तीकडे दुर्लक्ष करत असतात.

अजपा योग या आंतरिक शक्तीला नुसतं जागृतच करत नाही तर तिची प्रसन्नताही साधकाला प्राप्त होते. जगदंबा कुंडलिनी म्हणजे दशमहाविद्यांचे जणू एकत्रीकरण. समस्त महाविद्यांची उपासना केवळ कुंडलिनीच्या योगमय उपासनेने साधता येते. हे कसे साधायचे हा गहन अभ्यासाचा विषय आहे. योगी त्यासाठी वर्षोनवर्षे कठोर मेहनत घेतात. अजपा योग ज्याला साधला त्याला कुंडलिनी देवीची प्रसन्नता सुखमय स्वरूपात प्राप्त होते. कुंडलिनी जागृत करणं तर ठीक आहे पण जागृत कुंडलिनीला प्रसन्न करण्याचे महत्व काही औरच आहे. असं म्हणतात की रोग जर गोड औषधाने दूर होणार असेल तर मुद्दाम कडू औषध का घ्यावे. त्याचप्रमाणे जर अजपा सारख्या सहज-सुगम-सुखमय साधनेने कुंडलिनीची प्रसन्नता प्राप्त होणार असेल तर क्लिष्ट-उग्र-प्रसंगी धोकादायक मार्ग का बरे चोखाळावे. त्यामुळेच अजपा योग कुंडलिनी उपासनेतील एक महत्वाचा दुवा आहे.

असो.

सर्व योगाभ्यासी वाचक जगदंबा कुंडलिनीची प्रसन्नता आणि आशीर्वाद प्राप्त करोत या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 16 September 2019