सुषुम्ना, वज्रा आणि चित्रारूपाने विराजणार्‍या तुला नमस्कार असो

हे देवी! तु अखिल विश्वाची जननी आहेस.
ब्रह्मा, विष्णू, रुद्र ह्या तीन बाळांचे पालन आपल्या गर्भात तु मोठ्या प्रेमाने करतेस.
चराचर विश्वाचे पालन करणार्‍या जगन्मातेला नमस्कार असो.

हे देवी! प्रत्यक्ष कामालाही क्षणात दग्ध करणारा आदिनाथ बैरागी म्हणून प्रसिद्ध.
त्या स्मशानयोग्याला तु असे वश केलेस की तो आपले अर्धे अंग तुला कायमचे देऊन बसला.
प्रत्यक्ष कामदहनालाही भुरळ पाडणार्‍या त्रिपुरसुंदरीला नमस्कार असो.

हे देवी! ब्रह्मा, विष्णू, रुद्र, इश्वर आणि सदाशिव यांच्या प्रेतांवर तु मोठ्या आनंदाने विराजमान होतेस.
तुला 'शवारूढा' म्हणतात ते योग्यच आहे.
पंचप्रेतासनावर आरूढलेल्या आणि अट्टहास्य करणार्‍या महाकालीला नमस्कार असो.

हे देवी! खेचरीमुद्रेद्वारे हलके हलके ठिबकणारा सोमरस तु प्राशन करतेस.
त्या अमृताने सुखावलेली तु अर्धोन्मिलीत नेत्रांनी स्मितहास्य करत जगाला अभय देतेस.
आपल्या कृपाप्रसादाने जगाला आनंदित करणार्‍या त्रिपुरभैरवीला नमस्कार असो.

हे देवी! सारीपाट खेळताना तु सगळे डाव शंकरावर उलटवलेस आणि त्यामुळे रुसून तो जंगलात निघून गेला.
तु शबरीच्या रुपात नृत्य-गायन करून त्याची मनधरणी केलीस व त्याला परत कैलासावर आणलेस.
आपल्या पदन्यासाने पृथ्वीला रोमांचित करणार्‍या जगदंबेला नमस्कार असो.

हे देवी! तुच महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिन्ही रुपांत नटतेस.
तम, रज आणि सत्व या त्रिगुणांनी जगाला मोहित करणारी तु या गुणांच्या पलिकडली आहेस.
रौद्र, तेजस्वी आणि शांत भाव धारण करणार्‍या प्रणवरूपिणीला नमस्कार असो.

हे देवी! गजानन आणि षडानन यांचे तु पालनपोषण केलेस.
तुझी विस्मयकारक लीला अशी की एकाला तु वैभवशाली बनवलेस तर एकाला वैराग्यशाली.
जगाला भोग आणि मोक्ष प्रदान करणार्‍या गौरी आणि स्कंदमातेला नमस्कार असो.

हे देवी! शिव जर शक्तीरहित झाला तर शव बनतो.
त्याची शक्ती बनून तुच निमिषार्धात असंख्य सृष्टींची घडामोड करतेस.
चौर्‍यांशी लक्ष योनींची टाकसाळ चालवणार्‍या आदिमायेला नमस्कार असो.

हे देवी! तुच शरीरात कामबीज, वाग्भवबीज आणि शक्तीबीजासहीत कुंडलिनीरूपाने रहातेस.
मेरूदंडातून वाहणार्‍या सुषुम्ना, वज्रा आणि चित्रा ह्या योग्यांना प्राणप्रिय असणार्‍या नाड्या तुझीच रुपे आहेत.
मुलाधारातील योनीकंदाला वेढुन बसलेल्या आणि सहस्रारातून चंद्रामृताचा वर्षाव करणार्‍या भुजांगीला नमस्कार असो. नमस्कार असो. नमस्कार असो.

 


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 08 October 2010


Tags : अध्यात्म शिव कुंडलिनी शक्ती विचार नाथ

Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates