नवरात्रौत्सव आणि कुंडलिनी

लेखक : बिपीन जोशी

तुम्हा सर्वांना नवरात्रीचा उत्सव साजरा का करतात त्यामागील कथा माहीतच असेल. नवरात्र हा खरंतर कोणत्या एका विशिष्ठ देवीचा सण नाही. तो आहे आदीशक्तीचा उत्सव. असे सांगितले जाते की या नऊ दिवसांपैकी पहिले तीन दिवस महाकालीची उपासना करावी, नंतरचे तीन दिवस महालक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस महासरस्वतीची उपासना करावी. याचा वास्तविक अर्थ काय बरे?

आदिशक्ती त्रिगुणमयी आहे. तम, रज आणि सत्व या गुणांनी ती सुशोभीत आहे. या जगातील सर्वच गोष्टी या त्रिगुणांच्या सपाट्यात सापडल्या आहेत. महाकाली तमोगुणाचे, महालक्ष्मी रजोगुणाचे तर महासरस्वती सत्वगुणाचे प्रतीक आहे. सामान्यतः असा एक समज असतो की साधकाला फक्त सत्व गुणच आवश्यक आहे. रज आणि तम गुणांची त्याला बिलकूल गरज नाही. पण हे बरोबर नाही. जोवर हा देह आहे तोवर कमी-अधिक प्रमाणात हे तीनही गुण लागतातच. पण सत्वाचे आधिक्य करून रज आणि तम काबूत ठेवणे हे साधकाचे परम कर्तव्य आहे.

अज्ञान, आळस, झोप, क्रोध ही तमोगुणाची वैशिष्ठ्ये. महाकालीच्या रौद्र स्वरूपाची उपासना करण्यामागे तमोगुणापासून निवृत्ती हा उद्देश आहे. तमोगुणाने भरलेले शरीर-मन आध्यात्ममार्गावर वाटचाल करू शकत नाही. तेव्हा त्यापासून स्वतःला वाचवावे हे ओघाने आलेच. अर्थात येथे लक्षात ठेवले पाहीजे की थोड्या प्रमाणात तमोगूण आवश्यक आहे. थकल्यावर झोप घेणे, अन्यायाविरुद्ध लढताना क्रोधाविष्ट होणे इत्यादींमधे तमोगुणाचा हातभार असतोच.

कार्य, काम, इच्छा-आकांक्षा ही रजोगुणाची वैशिष्ठ्ये आहेत. महालक्ष्मी ही रजोगुणाची तृप्ती करणारी देवी आहे. म्हणूनच रजोगुणाचे संतुलन करण्यास तीची उपासना करतात. पैसा, सुख, समृद्धी कोणाला नको असते. भौतिक सुखांची आस आणि त्यांची पुर्तता हे रजोगुणामुळे साधते. तुम्ही रोज नोकरीवर जाता आणि काम करून तुमच्या कुटुंबासाठी पैसा कमवता ते रजोगुणामुळेच.

तम आणि रज हे गुण रोजच्या जीवनात आवश्यक असले तरी ते प्रमाणाबाहेर वाढून चालत नाहीत. त्यांमधे असमतोल झाल तर मग आळस, हावरटपणा इत्यादी अवगूण प्रगट होतात. या दोन गुणांना ताब्यात ठेऊन जेव्हा सत्वगुण प्रबळ होतो तेव्हा तो अध्यात्मजीवनास पोषक ठरतो. सत्वगुणाचे प्रतीक असलेल्या महासरस्वतीची उपासना करण्यामागे हाच हेतू आहे. सत्वगुणामुळे दया, ज्ञान, परोपकार असे गुण वाढीस लागतात. गाडीतून जात असताना एखाद्या जख्खड म्हातार्‍या भिकार्‍याला पैसे द्यावे अशी इच्छा तुम्हाला होते ती या सत्वगुणामुळेच.

केवळ उत्सवापुरतेच महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीची उपासना करून काही उपयोग नाही. त्यामागचे गुढ तत्व समजून घेतले पाहिजे. आदिशक्ती या शरीरातच कुंडलिनी रूपाने स्थित आहे. कुंडलिनीही अर्थातच त्रिगुणात्मक आहे. कुंडलिनीची उपासना केल्यास या तीनही देवीरूपांची उपासना केल्याचे फळ मिळेल यात शंकाच नाही. कुंडलिनीची उपासना कशी करावी? गुरूप्रदत्त साधनामार्गाचा निरंतर अभ्यास करूनच ही उपासना शक्य आहे. तुम्ही नामस्मरणाचा मार्ग चोखाळा वा ध्यानमार्ग वा हठयोग चोखाळा. जगदम्बा कुंडलिनीला शरण गेल्याशिवाय गुणांचा समतोल साधणे आणि यथावकाश गुणातीत अवस्थेचा अनुभव घेणे शक्य नाही.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 19 September 2009


Tags : योग अध्यात्म शिव कुंडलिनी चक्रे साधना शक्ती भक्ती