Untitled 1

आत्म्याचे आणि वैराग्याचे मिलन

खरंतर आज संध्याकाळीच मकर संक्रांत सुरु होत आहे. ही वेळ उशीराची असल्याने शास्त्रानुसार मकर संक्रांत उद्या साजरी होणार आहे. एखाद्या चांगल्या दिनदर्शिकेत तुम्हाला संक्रांतीचा पुण्यकाळ सहज मिळून जाईल. अनेक ठिकाणी ग्रहगोलांच्या दृष्टीने मकर संक्रांत म्हणजे काय त्याचे विश्लेषण केलेलेही तुम्हाला वाचायला, पहायला मिळेल. मी येथे त्या विस्तारात जाणार नाही. परंतु अजपा साधकांसाठी काही महत्वाच्या गोष्टी जरूर सांगीन.

मकर संक्रांत म्हणजे सूर्याचा मकर राशीत प्रवेश. संक्रांतीपासून सूर्याचे उत्तरायण सुरु होत असते. उत्तरायणाला आणि दक्षिणायनाला अनुक्रमे देवतांचा दिवस आणि रात्र मानण्यात आलं आहे. याच कारणामुळे उत्तरायणात जप, तप, साधना, उपासना इत्यादी गोष्टींचे महत्व आहे. संक्रांतीच्या दिवशी केलेली साधना अनेकपट जास्त पुण्यप्रद असते अशी मान्यता आहे. त्यामुळे अजपा साधकांनी साधना न चुकवणे. किंबहुना आज रात्री आणि उद्या सकाळी अशा दोन्ही वेळेस अजपा साधना घडेल असे पहावे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये उत्तरायण आणि दक्षिणायन यांचे निरूपण केले आहे. जर घरी भगवत गीता किंवा ज्ञानेश्वरी असेल तर काढून नीट वाचा. अर्थात नुसते वाचून त्याचा सगळा योगगर्भ अर्थ अजिबात कळणार नाही. पण निदान शाब्दिक अर्थ तरी समजू शकेल.

या घटनेचा मी सांगतोय तो योगाशास्त्रीय संकेत जरा लक्षात घ्या. सूर्य मकर राशीत येण्याआधी धनु राशीत असतो. आता धनु राशीचा स्वामी आहे गुरु ग्रह. गुरु हा शुभ ग्रह मानला गेला आहे. गुरु हा ज्ञान, धर्म, अध्यात्म, सुख-समृद्धी यांचा कारक ग्रह आहे. मकर राशीचा स्वामी आहे शनि. शनि हा अशुभ ग्रह मानला गेला आहे. असं जरी असलं तरी शनिचा संबंध प्रखर वैराग्य, अध्यात्म, अंतर्मुख वृत्ती यांच्याशी आहे.

आता योगशास्त्रात सूर्य हा आत्म्याच प्रतिक मानला गेला आहे. गुरु ग्रहाने दिलेलं धर्म-अध्यात्म विषयक सात्विक ज्ञान जोवर शनिच्या वैराग्यशील वृत्तीत बदलत नाही तोवर खरं अध्यात्म सफल झालं असं म्हणता येत नाही. सूर्याचा मकर राशीत प्रवेश किंवा सूर्याने शनीची भेट घेणं हे अजपा साधकांनी या सूक्ष्म अर्थाने लक्षात घ्यावे. ही आत्माने वैराग्याला दिलेली भेट आहे. साधनेच्या अग्नीने तावून-सुलाखून निघालेल्या पिंडातील जीवाची वैराग्याशी ओळख होण्याचा हा कालावधी आहे. नुसतं कर्मकांडात्मक गोष्टी करून संक्रांत कोणीही साजरी करेल. अजपा साधकांनी योगामार्गानेच ती साजरी करावी हे उत्तम. अर्थात वरील संकेत ज्योतिषाच्या काटेकोर दुर्बिणीतून पाहू नये. या लेखाचा तो विषय नाही.

मकर संक्रांतीला तिळगुळाबरोबरच खिचडीचा भोग लावतात. नाथ पंथातही खिचडीचे स्वतःचे असे महत्व आहेच. गोरक्षनाथ एकदा ज्वाला देवीला भेटायला गेले. देवीला खुप आनंद झाला. तिने गोरक्षनाथांच्या स्वागतासाठी पंच-पक्वान्ने तयार केली. वैराग्यशील गोरक्षनाथांनी मात्र नम्रपणे नकार दिला आणि खिचडीसाठी शिधा घेऊन येतो म्हणून निघाले. इकडे खिचडीसाठी म्हणून देवीने विस्तवावर पाणी ठेवले आणि गोरक्षनाथांची वाट पहात बसली. गोरक्षनाथ फिरत फिरत गोरखपूरला आले आणि तिथेच समाधिस्थ झाले. लोकांनी त्यांच्या भिक्षापात्रात तांदूळ-डाळ टाकायला सुरवात केली. ज्वाला देवी आजही गोरक्षनाथ कधी येणार त्याची वाट पहात बसली आहे. तेंव्हापासून गोरखपूरला खिचडीची प्रथा सुरु झाली.

वरील फोटो आहे मागील वर्षी मी माझ्या गुरुमंडलाला खिचडीचा भोग अर्पण केला त्यावेळचा. स्वतःचे जेवण तर आपण रोजच बनवतो. पण गुरुमंडलासाठी अन्न शिजवण्यात काही आगळेच समाधान आणि आनंद असतो.

यावर्षी मकर संक्रांती बरोबरच कुंभमेळा असा योग जुळून आला आहे.  यावर्षीचा कुंभमेळा प्रयागराज येथे तो साजरा होत आहे. अनेक आखाडे आपापल्या अनुयायांसह सहभागी होतात या सोहळ्यात. भगवान दत्तात्रेयांना इष्ट मानणारा एक आखाडाही (जुना दत्त शैव आखाडा) यामध्ये असणार आहे. असं म्हणतात की पूर्वी या आखाड्याचे इष्ट भगवान भैरव होतं. कालांतराने शिवावतार भगवान दत्तात्रेय त्यांचे इष्ट बनले. काही वर्षांपूर्वी मी एक लेख लिहिला होता कुंभमेळ्याच्या योगगर्भ अर्थावर. या दुहेरी संयोगामुळे आज त्याची सहज आठवण झाली.

असो.  

उत्तरायण सुरु होत आहे. सर्व वाचकांना आपापल्या इष्ट देवतेचा आशिष लाभो आणि साधनामार्गात त्यांची प्रगती होवो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे चोवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून अजपा योग विषयक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 14 Jan 2019
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates