Untitled 1

स्वतःच्या सद्गुरूंना ओळखा

कार्तिक शुद्ध दुर्गाष्टमी (या आठवड्यात १६ नोव्हेंबर २०१८ रोजी) म्हणजे सद्गुरू श्रीशंकर महाराजांचा प्रगट दिन. महाराज वेशभूषेने नसले तरी मनाने नाथपंथी होते. त्यांचे भक्त त्यांना भगवान श्रीशंकराचा अवतार मानतात. या अवलियाच्या आयुष्यातील अनेक लीला प्रसंग आपल्याला थक्क तर करून टाकतातच पण त्याही पेक्षा जास्त अंतर्मुख करून सोडतात. असाच एक छोटा पण फार उद्बोधक प्रसंग...

शिर्डीचे श्रीसाईबाबा स्थूल देहाने अस्तित्वात असातानाची ही गोष्ट. एकदा एक स्त्री खुप आजारी पडली. अनेक उपाय केले पण काही गुण येईना. धड चालताही येत नव्हते. जेंव्हा स्वप्रयत्न थकतात तेंव्हा माणसाला ईश्वरीय शक्तीची प्रकर्षाने गरज भासते. तसच काहीसं त्या स्त्रीच्या बाबतीत झालं. तिला शिर्डीच्या श्रीसाईबाबांविषयी श्रद्धा वाटली आणि तिने त्यांचा धावा सुरु केला. तिच्या जवळच्या माणसांनी शेवटचा उपाय म्हणून तिला श्रीसाईबाबांच्या दर्शनासाठी म्हणून शिर्डीला नेले.

मोठ्या आशेने तिने श्रीसाईबाबाना आपली वेदना बोलून दाखवली. तिचे बोलणे ऐकून घेतल्यावर साईबाबा म्हणाले - "तू शंकर महाराजांच्या दर्शनाला जा. तेच तुला मदत करतील."

साईबाबांच्या सांगण्याप्रमाणे त्या स्त्रीला श्रीशंकर महाराजांकडे नेण्यात आले. आश्चर्य म्हणजे महाराजांचे दर्शन घेतल्यावर काहीच काळात तिला आराम पडला आणि ती पूर्णतः व्याधीमुक्त झाली. ती स्त्री अर्थातच खुप आनंदित झाली.

(संदर्भ : श्रीशंकर गीता, अध्याय १५)

वरील कथा केवळ श्रीशंकर महाराजांशी संबंधित लीला म्हणून ऐकून सोडून देण्याची नाही. त्यांत एक खोल आध्यात्मिक संदेश दडलेला आहे.

वरील प्रसंगात श्रीसाईबाबांसारख्या उच्च कोटीच्या सत्पुरुषाला त्या स्त्रीचं दु:ख दूर करणं खरंतर सहज शक्य झालं असतं. परंतु त्यांनी तसं केलं नाही. त्यांना त्या स्त्रीचे आणि सद्गुरू श्रीशंकर महाराजांचे आध्यात्मिक अदृश्य धागे ज्ञात होते. त्यामुळेच तिला व्याधीमुक्त करण्याचे काम त्यांनी श्रीशंकर महाराजांनाच करू दिले. त्या स्त्रीला श्रीशंकर महाराजांची आठवण झाली नाही कारण आपला उद्धार कोणाकडून होणार आहे हे तिला ज्ञात नव्हते. श्रीसाईबाबांना ते ज्ञात होते.

अध्यात्ममार्गावर आपले गुरु, सद्गुरू आणि इष्ट यांचे स्थान मातेचे असते. जगात अनेक माता असतात पण आपली आई ती आपली आई. दुसऱ्याची आई आपल्याशी वाईट वागेल असं नाही. तीही कदाचित आपलावर प्रेम करेल आणि आपले लाड पुरवेल. पण आपल्या स्वतःच्या आईच्या प्रेमाची सर काही त्याला येणार नाही. तसंच काहीसं गुरु, सद्गुरू आणि इष्ट यांच्या बाबतीतही आहे.

अनेक वेळा अध्यात्म मार्गावर नुकताच पदार्पण केलेला साधक आपल्या मनानेच, आपल्या श्रेद्धेने कोणा सत्पुरुषाला किंवा एखाद्या दैवातेला मनोमन आपले गुरु मानतो. त्यांत त्याची काही चूक असते अशातला भाग नाही. परंतु जसं त्या नवख्या साधकाने त्या सत्पुरुषाला गुरु मानलं त्याचप्रमाणे त्या सत्पुरुषाने / दैवातेने देखील त्या साधकाला "आपलं" मानणं महत्वाचं असतं. ज्या प्रमाणे टाळी वाजण्यासाठी दोन्ही हातांची गरज असते त्याप्रमाणे आध्यात्मिक जीवन सफल होण्यासाठी गुरु आणि शिष्य अशा दोन्ही बाजूंकडून एकमेकांचा स्वीकार होणे गरजेचं असत. एखाद्या सत्पुरुषाची अथवा देवतेची उपासना आणि भक्ती सर्वांनाच फळते असं नाही. त्यात त्या सत्पुरुषाचा, दैवातेचा किंवा त्या साधकाचा काही दोष नसतो. मुळात त्या दोघांचा गुरु-शिष्य नातं जुळण्याचा योगच नसतो मग ती उपासना फळणार कशी!

अध्यात्ममार्गावर हे गुरु-शिष्य-इष्ट यांच्याशी असलेले आपले अदृश्य संबंध जाणणे फार फार महत्वाचं असतं. नाहीतर बहुमुल्य वेळाही वाया जातो आणि हातीही काही फारसं लागत नाही. जर साधक अहंकारमुक्त असेल तर एक दिवस त्याच्या अंतःकरणात आपसूक त्याला योग्य त्या सत्पुरुषाविषयी आणि दैवताविषयी भक्ती उमलते किंवा त्याच्या आयुष्यात सा काही प्रसंग घडतो की तो त्या सत्पुरुषाशी आणि इष्ट देवतेची असलेले आपले संबंध जाणू लागतो. काही वेळा असेही होते की तो सत्पुरुष किंवा ईश्वरीय शक्ती त्या साधकाला अशा कोणा देहधारी गुरूशी गाठ घालून देते की त्याला पुढचा मार्ग आणि मार्गदर्शक मिळून जातो. साधकाचे अनाहत चक्र आणि आज्ञा चक्र किती प्रमाणात उघडलेले आहे यावरही या गोष्टी अवलंबून असतात. या उलट जर साधक अहंकारयुक्त असेल तर मग तो निव्वळ प्रसिद्धी, चमत्कार, शिष्यपरिवाराची संख्या, पुस्तकी पांडित्य इत्यादी उथळ गोष्टींवरून सद्गुरूंची / गुरूंची निवड करतो. ही निवड त्याच्यासाठी बरोबर ठरेलच याची काही शाश्वती नसते.

असो.

नाथपंथी अवलिया सद्गुरू श्रीशंकर महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त सर्व वाचक आपापल्या सद्गुरूंना आणि गुरुतत्वाला जाणण्यास समर्थ होवोत अशी प्रार्थना करून लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 12 November 2018
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates