Ajapa Yoga : Kriya and Meditation Online Course || Build your personal kriya and meditation routine step-by-step for calm and clear mind, improved focus, and blissful inner connection.

घेरंड मुनींचा ध्यानयोग - पार्श्वभूमी आणि परिचय

प्राचीन काळच्या हठयोगावरील जे आधारभूत आणि प्रामाणिक ग्रंथ आहेत त्यांतील एक म्हणजे घेरंड संहिता. साधारण तीनशेच्या आसपास श्लोक असलेला हा ग्रंथ म्हणजे घेरंड मुनी आणि चंडकापाली यांमधील संवाद. हठयोग प्रदिपिकेतील ध्यानमार्ग हा प्रामुख्याने नादश्रवणाच्या माध्यमातून फुलत जातो. हठयोगाचे प्रयोजन म्हणजे राजयोगाची प्राप्ती असे जरी स्वात्माराम योग्याने सांगितले असले तरी हठयोग प्रदिपिकेतील ध्यानयोग हा विस्तृत आणि सर्वंकष वाटत नाही. तो लययोगाला आणि नादयोगाला केंद्रस्थानी मानून विषयाचे दिग्दर्शन करतो. या उलट घेरंड मुनींचा ध्यानयोग हा त्यांनी विस्तृत आणि सुसूत्र पद्धतीने मांडलेला आहे. त्यांत त्यांना ज्ञात असलेल्या सर्व ध्यानशैलींचा समावेश केलेला आहे. त्यामुळेच ध्यानमार्गाची कास धरलेल्या योगसाधकांसाठी घेरंड मुनींचा ध्यानयोग महत्वाचा ठरतो.

अन्य अनेक प्राचीन ग्रंथांप्रमाणे घेरंड संहितेच्या रचनाकारा विषयी काही माहिती उपलब्ध नाही. घेरंड मुनी आणि चंडकापाली या दोन व्यक्तिरेखा नक्की कोण होत्या, त्यांचा नेमका कालखंड कोणता, ते कोणत्या गुरुपरंपरेचे होते, त्यांचे भौगोलिक स्थान कोणते वगैरे वगैरे अनेक प्रश्न अनुत्तरीतच रहातात. प्रत्यक्ष ग्रंथांत त्याबद्दल काहीही माहिती उपलब्ध नाही. जाणकारांनी आपापल्या मताप्रमाणे आणि अभ्यासाप्रमाणे या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा यत्न केलेला असला तरी खात्रीलायक पुराव्या अभावी आपण वरील गोष्टींचा केवळ अंदाज बांधू शकतो. अर्थात त्याने ग्रंथाच्या मुळ विषयाला काही बाधा येत नाही पण एक योगाभ्यासक म्हणून आपल्याला कुतूहल नक्कीच वाटत रहाते.

बहुतांशी प्राचीन योगरंथांत योग चार प्रकारांचा मानला आहे. ते चार प्रकार म्हणजे मंत्रयोग, हठयोग, लययोग आणि राजयोग. काही ग्रंथांत राजाधिराजयोग असा पाचवा प्रकारही आढळतो परंतु पहिले चार सर्वच परंपरांनी स्वीकारलेले आहेत. त्यातील हठयोग ही शाखा प्रामुख्याने शरीराने आठवा पिंडाने करावयाच्या आसन, प्राणायाम, बंध, मुद्रा वगैरे गोष्टींशी निगडीत आहे. घेरंड मुनींचा योग सुद्धा पारंपारिक हठयोग प्रणालीनुसारच जाणारा आहे परंतु आपल्या प्रणालीला त्यांनी हठयोग असं न म्हणता घटयोग आठवा घटस्थ योग असं म्हटलं आहे. घट म्हणजे मानवी शरीर अथवा पिंड. या देहाच्या सहायाने करावयाचा योग म्हणून घटयोग. हा नावातील बदल सोडला तर घटयोग आणि हठयोग एकच आहेत.

घेरंड मुनी स्वतः कोण होते, कोणत्या परंपरेशी निगडीत होते वगैरे गोष्टींची माहिती जरी उपलब्ध नसली तरी ते योगशास्त्रातले तज्ञ आणि जाणकार होते यात शंका नाही. जेंव्हा चंडकापाली नामक कोणी एक व्यक्ती त्यांच्या कुटीत येतो तेंव्हा -

एकदा चण्डकापालिर्गत्वा घेरण्डकुट्टिरम्
प्रणम्य विनयाद्भक्त्या घेरण्डं परिपृच्छति

चंडकापाली घेरंड मुनींच्या कुटीत गेल्यावर प्रथम त्यांना विनयपूर्वक प्रणाम करतो आणि मगच त्यांना आपली शंका विचारतो. यावरून घेरंड मुनी हे नक्कीच श्रेष्ठ योगाचार्यापैकी एक असणार असं स्पष्टपणे जाणवतं.

कुटीत प्रवेश केल्यावर तो विचारतो -

घटस्थयोगं योगेश तत्त्वज्ञानस्य कारणम्
इदानीं श्रोतुमिच्छामि योगेश्वर वद प्रभो

अर्थात - हे योगेश ! घटस्थ योग हा तत्वद्न्यानाचे साधन आहे. हे योगेश्वर ! मला तो योग श्रवण करण्याची इच्छा आहे.

चंडकापाली घेरंड मुनींना "योगेश" आणि "योगेश्वर" असं संबोधत आहे. याचा अर्थ घेरंड मुनी हे नावाजलेले योगाचार्य असणार हे उघड आहे. त्याचबरोबर चंडकापालीच्या मनात त्यांच्या विषयी नितांत आदर आहे हे सुद्धा या पृच्छे मधून स्पष्ट होत आहे.

चंडकापालीच्या पृच्छेला उत्तर देतांना घेरंड मुनी म्हणतात -

साधु साधु महाबाहो यन्मां त्वं परिपृच्छसि ।
कथयामि हि ते वत्स सावधानावधारय

अर्थात - वत्सा ! ही तुझी विचारणा अतिशय उत्तम आणि शुभ आहे. मी आता सांगतो ते नीट काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक ऐक.

वरील श्लोकावरून हे स्पष्ट आहे की घेरंड मुनी चंडकापालीला "वत्स" अर्थात पुत्रवत मानत आहेत. चंडकापालीच्या मनातील घेरंड मुनीं बद्दलचा आदर आणि त्याना चंडकापाली बद्दल वाटणारे पुत्रवत प्रेम हे स्पष्ट दिसत असल्याने काही भाषांतरकारांनी आणि अभ्यासकांनी चंडकापालीला घेरंड मुनींचा शिष्य मानले आहे. प्रत्यक्षात त्यांच्या मध्ये योगमार्गाला अभिप्रेत असलेले गुरु-शिष्याचे नाते दीक्षाविधीद्वारे स्थापित झाले होते अथवा नाही हे कळायला काही मार्ग नसला तरी हे संपूर्ण गोपनीय योगज्ञान घेरंड मुनी गुरुच्या अथवा योगाचार्याच्या भूमिकेतून देत आहेत आणि चंडकापाली ते शिष्याच्या अथवा विद्यार्थ्याच्या भूमिकेतून स्वीकारत आहे हे मात्र नक्की.

हठयोग प्रदिपिकेत सुरवातीच्या काही श्लोकांत जी हठयोग्यांची परंपरा दिलेली आहे त्यात चंडकापाली नावाशी साधर्म्य असणाऱ्या योग्याचे नाव आलेले आहे. बहुतेक सर्व अभ्यासकांनी घेरंड संहितेचा कालखंड हा हठयोग प्रदिपिकेच्या नंतरचा मानला असल्याने त्या दोन व्यक्ती एकच असणे शक्य वाटत नाही. काहींनी "कापाली" या शब्दाचा संबंध शैव दर्शनातील कापालिक पंथाशी जोडलेला आहे परंतु त्याविषयी सुद्धा खात्रीलायकपणे काही सांगता येत नाही. तात्पर्य हे की चंडकापालीची आध्यात्मिक किंवा योगमार्गी जडणघडण कशी झाली होती, त्याची पार्श्वभूमी नक्की काय होती ते ज्ञात नसल्याने तो एक मुमुक्षु योगजिज्ञासू असावा एवढेच आपण समजू शकतो.

घेरंड मुनींनी चंडकापालीला जो योग सावधचित्ताने श्रावण करायला सांगितला आहे त्यात सात प्रमुख विभाग आहेत. शुद्धीक्रिया, आसने, मुद्रा, प्रत्याहार, प्राणायाम, ध्यान आणि समाधी असा सात अंगांचा हा कुंडलिनी योग आहे.

घेरंड मुनींच्या या सात योगांगांचे वैशिष्ठ्य म्हणजे त्यात मुद्रा आणि प्रत्याहार ही अंगे प्राणायामाच्या आधी आलेली आहेत. अन्य हठग्रंथांत साधारानात्तः प्राणायाम आधी आणि मग मुद्राभ्यास आणि प्रत्याहारात्मक साधना असा क्रम आपल्याला दिसून येतो.

नेती-बस्ती आदी शुद्धीक्रियांनी शुद्ध झालेल्या शरीराने पर्तःम आसनांचा अभ्यास करायचा. त्यानंतर मुद्राभ्यासाने आणि प्राणायामाच्या सहायाने कुंडलिनी जागृत करायची. शेवटी ध्यान आणि समाधी साधनांनी योगशास्त्राचे अंतिम उद्दिष्ठ गाठायचे असा काहीसा क्रम घेरंड मुनींनी आखला आहे.

सर्वसाधारण योगसाधकाला नेहमी असे ठसवले जाते की ध्यान आणि समाधी ह्या एकाच प्रक्रियेच्या चढत्या क्रमाने दोन अवस्था आहेत. ढोबळमानाने ते बरोबरच आहे. घेरंड मुनींच्या घटयोगात मात्र त्यांनी या दोन अंगांचे उद्दिष्ट स्पष्ट सांगितले आहेत. घेरंड मुनींच्या ध्यानयोगाचे उद्दिष्ट आहे आत्मसाक्षात्कार आणि त्यांच्या समाधीयोगाचे उद्दिष्ट आहे योगशास्त्राला अभिप्रेत असलेली कैवल्य मुक्ती, आत्मा-परमात्मा मिलन, मोक्ष, परमपद वगैरे नावांनी ओळखली जाणाऱ्या अवस्थेची प्राप्ती. प्रथम आत्मसाक्षात्कार आणि मग आत्म्याचा परमात्म्यात विलय असा चढत्या क्रमाचा हा प्रवास आहे.

घेरंड मुनी केवळ ध्यानयोग आणि समाधीयोग यांचे पुस्तकी ज्ञान देत नाहीत. ते साधनात्मक क्रियांचे वर्णन करतात. अजपा योग हा ध्यानात्मक असल्याने आपल्यासाठी ध्यान आणि समाधी ही दोन अंगे सर्वाधिक महत्वाची आहेत. पुढील काही लेखांमधून आपण घेरंड मुनींनी चंडकापालीला विषद केलेल्या याच दोन अंगांविषयी विस्ताराने जाणून घेणार आहोत.

असो.

पिंड ब्रह्मांड ऐक्याचा संदेश पार्वतीच्या कानात फुंकणारा भगवान सदाशिव सर्व योगजिज्ञासूंना कुंडलिनी योगमार्गावर अग्रेसर करो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा योग क्रिया आणि ध्यानाच्या ओंनलाईन सेशन्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 14 November 2022